Thursday, June 2, 2022

* कॅमेर्‍याबाहेरचे मुंडे साहेब.....

परचुंडी या गावापासून केवळ आठ किमी अंतरावर, त्या काळात मला राजकारण, पक्ष, निवडणूक याचे काही ज्ञानही नव्हते, अशा वेळी मुंडे साहेबांची जीप आली की, त्या जीपच्या मागे इतर मित्रांप्रमाणे धावत जाणे, एवढाच काय तो माझा उद्योग. अर्थात, ज्या नेत्याच्या मागे नकळत आपण केवळ उत्सुकतेपोटी जात आहोत, तो भविष्यकाळात आपला लोकप्रिय नेता बनेल.
असे तेव्हा कधी स्वप्नातही वाटले नव्हते.
पुढे शिक्षण अर्धवट सोडून संभाजीनगर येथे स्थायिक झालो. छायाचित्राचे जुजबी ज्ञान घेऊन पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला. तेव्हा मी सिटिजन्स या हिंदी दैनिकासाठी काम करीत असे. मुंडे साहेब तेव्हा प्रथमच विरोधी पक्षनेते झाले होते. एके दिवशी ते येणार असल्याचे कळाल्यावर मी सुभेदारीत त्यांना भेटण्यासाठी गेलो. अर्थात तेव्हा आलेला संबंध केवळ त्यांच्यासोबत फोटो काढण्यापुरता, पुढे देवगिरी तरुण भारतचे काम करण्यास सुरुवात केली. युतीचे शासन नुकतेच सत्तेवर आले होते.
एके दिवशी हॉटेल वेदांतमध्ये त्यांची पत्रपरिषद होती. तेव्हा मी त्यांची भेट घेतली. आठ दहा वर्षांपूर्वी झालेल्या भेटीचे स्मरण दिले. मी परचुंडीचा असल्याचे सांगून तरुण भारतसाठी काम करीत असल्याची माहिती त्यांना दिली. तेव्हा ते पाठीवर थाप टाकीत म्हणाले, ’व्वा... पेपरही आपलाच... फोटोग्राफरही आपलाच... ही ओळख पुढे घट्ट झाली.
मुंडे साहेब उपमुख्यमंत्री असताना जेव्हा जेव्हा संभाजीनगरला येत. तेव्हा तेव्हा त्यांची भेट घेणे, त्यांच्या कार्यक्रमाची छायाचित्रे काढणे हे माझे कामच होऊन बसले. 
तरुण भारतचे काम म्हणून मी हे करीत असत, त्याचप्रमाणे माझ्या मनात कळत नकळत साहेबांबद्ल आदराची भावना निर्माण झाली. या भवनेपोटी त्यांची छायाचित्रे काढण्याचा मला छंद जडला कालांतराने छायाचित्रांचा अल्बम करण्याचे मी ठरविले. अल्बमधील माझ्या मनातील भावना मी विशद केल्या. अल्बम त्यांना समर्पित करावयाचा होता. त्याकरिता सहजच त्यांना म्हणालो, ’साहेब, माझ्या घरी तुम्ही आले पाहिजे...!
ही अट साहेब मान्य करतील, अशी मला कधीच वाटले नव्हते तेव्हा ते म्हणाले आलोच. मलाही आश्चर्याचा धक्काच बसला. मी तातडीने घरी येऊन साहेब येणार असल्याचे सांगितल्यावर घरचे मंडळींनीही मला वेड्यात काढले. जेव्हा खरोखरच सायंकाळी बंदोबस्त लागला, तेव्हा मग घरी धावपळ सुरू झाली. एका छोटयाशा भाड्याच्या खोलीत रहात होतो. कबूल केल्याप्रमाणे साहेब आले... त्यांचे मी स्वागत केले. त्यांना अल्बम अर्पित केला. हा दिवस म्हणजे माझ्या घरी फटाके न फोडता साजरा झालेला दिवाळीसणच असे म्हणावे लागेल.
विद्यमान उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांची सुवर्णमहोत्सवी यात्रेत मला जाण्याचा योग आला. चाळीसगावच्या घाटात धाब्यावर अडवाणींची यात्रा काही काळ थांबली होती. माझ्यासोबत असलेले तरुण भारतचे वृत्तसंपादक उमेश काळे हे अडवाणींची मुलाखत घेत होते. या आगळ्यावेगळ्या प्रसंगाचे मी छायाचित्रे माझ्या कॅमेर्‍यात बंदिस्त करीत होतो. माझे काम झाल्यावर साहेबांनी मला बोलावून अडवाणींजवळ नेले व आपल्या तरुण भारतचा छायाचित्रकार आहे व माझ्या मतदारसंघातील परचुंडी गावचा अशी ओळख करून दिली. साहजिक माझी छाती अभिमानाने फुलून आली. कालांतराने मी माझ्या प्लॅटचा वास्तु करावयाचा ठरवला. वास्तुचा मुहूर्तही साहेबाना विचारून ठरविला. (साहेब संभाजीनगरात केव्हा येणार ते...) दिवसभराचे कार्यक्रम आटोपून साहेब शहरात आले.
त्यांना माझ्या घरी येण्यास थोडासा उशीर झाला. परंतू दिलेला शब्द त्यांनी पाळला. उल्कानगरी भागात मी माझा स्टुडिओ टाकण्याचे ठरविले. स्टुडिओच्या उद्घाटनाकरिताही साहेबांनी येण्याचे मान्य केले. तथापि काही आकस्मिक कारणास्तव त्यांचा हा दौरा रद्द झाला. काही दिवसांनी साहेब जेव्हा संभाजीनगरात आले. तेव्हा आवर्जुन ते माझ्या स्टुडिओत आले. कामाची घाई असूनही पंधरा मिनिटे थांबले. आणि पुढील कारकिर्दीला शुभेच्छा दिल्या.

         *भीमाशंकर नावंदे*
      प्रेस फोटोग्राफर, संभाजीनगर

No comments:

Post a Comment