Thursday, April 30, 2026
संत तुकडोजी महाराजांनी आपल्या कीर्तन व ग्रामगीतेच्या माध्यमातून समाजप्रबोधना चे महान कार्य केले-अभयकुमार ठक्कर
परळीत सोमवारी मांस विक्री बंदीचा ऐतिहासिक निर्णय सर्वानुमते ठराव मंजूर भक्तांचा व जन भावनांचा आदर.
मराठा भवन व राजमाता जिजाऊंचे स्मारक याविषयी परळी नगर परिषदेची अनास्था.सकल मराठा समाज आक्रमक ११ मे पासून बेमुदत ठिय्या आंदोलचा ईशारा.
परळी वैजनाथ : (प्रतिनिधी) अनेक वर्षापासून प्रलंबित असलेले “मराठा भवन” व “बाल शिवबासह राजमाता जिजाऊ माँ साहेबांचा पुतळा” याविषयी तात्काळ निर्णय घ्यावा याकरिता मंगळवार दिनांक ३१ मार्च २०२६ रोजी सकल मराठा समाजाच्या वतीने परळी वै. च्या नगराध्यक्षा व मुख्याधिकारी यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली होती. परंतु याविषयी परळी नगर परिषदेची अनास्था दिसून येत आहे. त्यामुळे सोमवार दिनांक ११ मे २०२६ पासून नगर परिषद कार्यालया समोर बेमुद्दत ठिय्या आंदोलन करण्याचा ईशारा सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आला आहे.
परळी शहरात “मराठा भवन” उभारण्यासाठी जागेच्या संर्भात नगर पालिकेकडे अनेक वर्षापासून
मागणी केली जात होती. दि. ७ मे २०२३ रोजी मराठा समाजाच्या झालेल्या व्यापक बैठकीत तत्कालीन पालकमंत्री तथा सद्याचे परळीचे आ.धनंजयजी मुंडे यांनी मराठा भवन बनवण्यासाठी साठी पंडित दिनदयाल उद्यान,औद्योगिक वसाहत येथील जागा देण्याचे नगर पालिकेस आदेशीत केले होते. तशा स्वरूपाची घोषणाही त्यांच्याकडून करण्यात आली होती. मराठा समाजाकडून या निर्णयाचे मोठ्या प्रमाणात स्वागत पण केल्या गेले होते.
परंतु आजतागायत शिवसृष्टी तथा मराठा भवन जागेच्या बाबतीत होत असलेली थट्टा आता सहन केली जाणार नाही. बहुतेक न. प. प्रशासनास मागणीच्या अनुषंगाने निर्णय घ्यायचाच नाही का काय ? मराठा समाजास असा प्रश्न पडत आहे.
दुसरा विषय असा की परळी शहरातील राजमाता जिजामाता उद्यानाचे काम करण्यासाठी लाखो रुपये खर्च झाले आहेत. सदरील उद्यानाच्या प्रवेशद्वारा समोर बालशिवबा सहित जिजाऊ माँ साहेबांचा पुतळा उभारण्यात यावा अशी मागणी समस्त परळीकरांकडून वारंवार करण्यात आली होती. जिजाऊ माँ साहेबांचा पुतळा उभारण्यासाठी तशा स्वरूपाचे बेसमेंट पण करण्यात आले आहे. मात्र नगर पालिकेस मुहूर्त का सापडत नसेल ? परळीकरांना हा प्रश्न पडला आहे.
तब्बल तीन वर्षाची मागणी अद्याप पावेतो पूर्ण केली गेली नाही. ठिय्या आंदोलनाचे निवेदन देऊन एक महिना उलटला परंतु त्याकडे न. प. कार्यालयाकडून पूर्णपणे दुर्लक्ष केल्या गेले. आमच्याकडे आता आंदोलना शिवाय पर्याय उरला नाही. असे सकल मराठा समाजाच्या वतीने आम्ही ठिय्या आंदोलनावर ठाम असल्याचे सांगण्यात आले आहे.
Monday, April 27, 2026
उष्माघाताचा पहिला तीव्र उन्हाने शरीर पोळले, उष्माघाताने तरूणाचा मृत्यू .
परभणी(प्रतिनिधी) जिल्ह्यात उष्माघाताचा पहिला बळी नोंदवला गेला आहे. नाशिक येथून परभणीत आपल्या भावाला भेटण्यासाठी आलेल्या 37 वर्षीय शिवाजी बबन कांबळे या व्यक्तीचा तीव्र उन्हामुळे मृत्यू झाला.
ही धक्कादायक घटना परभणीतील नांदखेडा रोड भागात घडली आहे. शिवाजी कांबळे हे मूळचे जिंतूर तालुक्यातील चारठाणा येथील रहिवासी असून कामासाठी ते नाशिकला स्थायिक झाले होते. दोन दिवसांपूर्वीच ते आपल्या कुटुंबासह परभणीत विटभट्टीवर काम करणाऱ्या भावाकडे आले होते, मात्र काळाने त्यांच्यावर घाला घात.
साडूच्या घरी जाताना चक्कर आली आणि खड्ड्यात कोसळले
शिवाजी कांबळे हे 24 एप्रिल रोजी सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास आपली पत्नी मिनाक्षी, मुलगी विद्या आणि सासू यांच्यासह साडू विजय मस्के यांच्या घरी जाण्यासाठी निघाले होते. वाटेत जात असताना त्यांना अचानक चक्कर आल्याचे त्यांच्या मुलीने पाहिले. त्यानंतर ते बेपत्ता झाले होते. दुपारी 12 वाजेच्या सुमारास त्यांच्या पत्नीने ही माहिती भाऊ महादेव कांबळे यांना दिली. बराच वेळ शोध घेतल्यानंतर, मोबाईल लोकेशनच्या आधारे शोध घेतला असता नांदखेडा रोडवरील एका खड्ड्यात शिवाजी यांचा मृतदेह पालथ्या अवस्थेत पडलेला आढळून आला.
तीव्र उन्हाने शरीर पोळले; पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद
शिवाजी यांचा मृतदेह सापडला तेव्हा त्यांचे शरीर कडक झाले होते आणि पाठ व हातावर तीव्र उन्हामुळे त्वचा करपल्याचे व्रण दिसत होते. त्यांच्या नाकातून आणि तोंडातून रक्त येत असल्याचेही प्रत्यक्षदर्शींनी पाहिले. विटभट्टी मालक देशमुख यांच्या गाडीतून त्यांना तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. या घटनेनंतर महादेव बबन कांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नानलपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
Saturday, April 25, 2026
टोकवाडी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी
केजमध्ये गरिबांचा घरकुल निधी गायब ४ कोटींचा घोटाळा; निवृत्त मुख्याधिकाऱ्या सह ६ जणांवर गुन्हा.
केज (प्रतिनिधी): येथील नगरपंचायती मध्ये 'प्रधानमंत्री आवास योजने'च्या निधीत ४ कोटी २४ लाख ७३ हजार रुपयांचा मोठा अपहार झाल्याचे चौकशी समितीच्या अहवालावरून स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी तत्कालीन मुख्याधिकारी मिलिंद सावंत यांच्यासह सहा कर्मचाऱ्यांविरुद्ध केज पोलीस ठाण्यात शुक्रवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्वसामान्यांच्या हक्काच्या घरांच्या निधीवर डल्ला मारणाऱ्या या टोळीमुळे संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
असा झाला ४ कोटींचा 'डबल गेम
'२० मे २०२१ ते ३१ जानेवारी २०२२ या कालावधीत तत्कालीन मुख्याधिकारी मिलिंद सावंत यांनी लेखापाल आणि इतर कर्मचाऱ्यांच्या संगनमताने हा निधी नियबाह्य पद्धतीने वापरला. केंद्र आणि राज्य सरकारकडून प्राप्त झालेला निधी केवळ पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावर वर्ग करणे बंधनकारक असताना, तो इतर अनधिकृत खात्यांवर वळवण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांनी नेमलेल्या उपविभागीय अधिकारी दीपक वजाळे यांच्या समितीने सखोल चौकशी केल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
गुन्हा दाखल झालेले आरोपी.
मुख्याधिकारी अजित ढोपे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी खालील सहा जणांवर गुन्हा नोंदवला आहे:१. मिलिंद सावंत (तत्कालीन मुख्याधिकारी, सेवानिवृत्त)२. असद इसाकोद्दीन खतीब (तत्कालीन लेखापाल)३. लक्ष्मण मारुती जगताप (कंत्राटी लेखापाल सहाय्यक)४. भास्कर एकनाथ ससाणे (व्हॅल्वमन)५. भीमराव शामराव मस्के६. बाशेद वलियोद्दीन काझी
कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेनंतर ऊसतोड मजूर महिलांवर जमिनीवरच उपचार कामा ला जायचे असल्यान रुग्णाचा आग्रह !
केज (प्रतिनिधी):बीड जिल्ह्याचा कणा असलेल्या ऊसतोड मजुरांच्या नशिबी असलेली परवड काही केल्या संपण्याचे नाव घेत नाही. कष्टाचे डोंगर उपसून ऊसतोडीचा हंगाम संपवून परतलेल्या महिला मजुरांना आता सरकारी दवाखान्यातही अपमानास्पद वागणूक मिळत आहे. केज तालुक्यातील विडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेनंतर पाच महिलांना चक्क जमिनीवर झोपवून उपचार केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. या घटनेने आरोग्य विभागाचे ढिसाळ नियोजन चव्हाट्यावर आले आहे.
प्रशासनाकडून अजब 'सारवासारव'.
या प्रकरणाची माहिती पसरल्यानंतर प्रशासनाने अजब तर्क मांडण्यास सुरुवात केली आहे. "त्या महिलांनीच आम्हाला जमिनीवर उपचार चालतील, असे सांगितले होते," असा दावा वैद्यकीय अधिकारी डॉ. रोहन गायकवाड यांनी केला आहे. मात्र, रुग्ण असुविधा असतानाही उपचार करा म्हणत असेल, तर डॉक्टर आपली जबाबदारी झटकून रुग्णाला धोकादायक स्थितीत ठेवू शकतात का? हा खरा प्रश्न आहे.
या प्रकाराची आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनीही दखल घेतली. त्यांनी थेट महिला रुग्णांशी संवाद साधला. मात्र, त्याआधीच या महिलांना प्रशासनाकडून "काय बोलावे" याचे प्रशिक्षण दिल्याचा संशय व्यक्त होत आहे. त्यामुळे मंत्र्यांकडे तक्रार झाली नसल्याची चर्चा आहे. आता आबिटकर कारवाई करणार की, डॉक्टरांच्या खुलाशावर समाधान मानून त्यांना पाठीशी घालणार, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
महिलांनीच आग्रह धरला.
१५ पैकी ५ महिलांना गादी टाकून उपचार केले. संसर्ग होणार नाही, याची काळजी घेतली. महिलांनीच कामाला जायचे असल्याने आग्रह धरला होता. आरोग्य मंत्री यांनीही फोनवरून महिला रुग्णांशी संवाद साधला आहे.-डॉ. रोहन गायकवाड, वैद्यकीय अधिकारी, विडा ता. केज.
Thursday, April 23, 2026
महावितरणमध्ये खळबळ! १८ हजार लाच स्वीकारणाऱ्या महावितरणच्या महिला अभियंता ए.सी.बीच्या अटकेत.
आष्टी (प्रतिनिधी): राज्यात एकीकडे सौर ऊर्जेला प्रोत्साहन देण्यासाठी विविध सवलती दिल्या जात असताना महावितरणचे अधिकारी मात्र याच प्रकल्पांच्या नावाखाली वसुली करत असल्याचे उघड झाले आहे. आष्टी येथील महावितरण कार्यालयातील सहायक अभियंता कोमल अर्जुन शिंदे यांना १८ हजार रुपयांची लाच स्वीकारताना बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) मंगळवारी दुपारी रंगेहात अटक केली.
तक्रारदाराने आपल्या सोलर प्रकल्पाची पडताळणी करून देण्याची विनंती केली होती. हे काम करण्यासाठी कोमल शिंदे यांनी १८ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. तक्रारदाराने याबाबत बीड एसीबीकडे तक्रार दाखल केली. तक्रारीची शहनिशा केल्यानंतर एसीबीने आष्टी येथील कार्यालयात सापळा रचला. मंगळवारी दुपारी जसा तक्रारदाराने पैसे देण्याचा प्रयत्न केला, तसा दबा धरून बसलेल्या पथकाने कोमल शिंदे यांना रंगेहात पकडले.
महावितरणमध्ये खळबळ.
बीड एसीबीचे उपअधीक्षक सोपान चिटमपल्ले आणि त्यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली. एका महिला अधिकाऱ्याला अशा प्रकारे लाच घेताना अटक झाल्यामुळे महावितरण विभागात मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
Wednesday, April 22, 2026
१५ ऑगस्टपर्यंत रेल्वे सुरू झालीच पाहिजे रस्त्यातील ब्लॅकस्पॉट कमी करा.रेल्वे व महामार्ग आढावा बैठकीत खा.बजरंग सोनवणे यांच्या अधिकाऱ्यांना निर्देश
Tuesday, April 21, 2026
एसीबीच्या छत्रपती संभाजीनगर पथकाची कारवाई.जालन्यात कृषी अधिकारी, बीड मध्ये ग्रामविकास अधिकारी एसीबीची जाळ्यात.
जालना (प्रतिनिधी): शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी लाचेची मागणी करणाऱ्या शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. बोरगाव (खु.) येथील सहायक कृषी अधिकारी राजकुमार मोतीराम खिल्लारे (४८) याला ५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. या प्रकरणी त्याला प्रोत्साहन देणारा खासगी इसम ज्ञानेश्वर उर्फ माउली पवार याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनुदानासाठी लाचेची मागणी.
तक्रारदाराने आपल्या शेतात लावलेल्या आंबा बागेचे शासनाकडून मिळणारे अनुदान मिळवण्यासाठी 'कुशलचे मस्टर' ऑनलाईन करणे आवश्यक होते. हे काम करण्यासाठी खिल्लारे याने ५ हजार रुपयांची मागणी केली. तक्रारदाराने जालना एसीबीकडे धाव घेतल्यावर सोमवारी सापळा रचण्यात आला. पैसे स्वीकारताच दबा धरून बसलेल्या पथकाने खिल्लारे आणि पवार या दोघांनाही बेड्या ठोकल्या. त्यांच्याकडून लाचेची रक्कम, मोबाईल आणि एटीएम कार्ड जप्त करण्यात आले आहे.
बीडमध्येही ग्रामविकास अधिकाऱ्यावर कारवाई.
एसीबीच्या छत्रपती संभाजीनगर पथकाने केवळ जालन्यातच नव्हे, तर बीड जिल्ह्यातही मोठी कारवाई केली. गेवराई तालुक्यातील तलवाडा येथील ग्रामविकास अधिकारी सोपान नामदेव मुसळे (४८) यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दुहेरी कारवाईमुळे महसूल आणि ग्रामविकास विभागात मोठी खळबळ उडाली आहे.
परळी रेल्वे स्टेशन जवळ रेल्वे खाली येऊन एका युवकाचे दोन्ही पाय निकामी.
राज्यातील अतिरिक्त 30,000 शिक्षकांच्या नोकरीवर टांगती तलवार!
मुंबई (प्रतिनिधी) राज्यात एका बाजूला शेकडो शाळा अत्यल्प पटसंख्या असूनही सुरू आहेत, तर त्याच वेळी अत्यल्प पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये शिक्षकसंख्या मोठी आहे. परिणामी, कमी पट असलेल्या शाळांचे अस्तित्व आणि शिक्षकांच्या नोकऱ्या या दोन्ही गोष्टी धोक्यात आल्या आहेत. ‘कमी विद्यार्थी आणि अधिक शिक्षक’ अशा विसंगत परिस्थितीमुळे अनुदानित तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांतील शाळांतील 30 हजारांवर शिक्षकांना अतिरिक्त होण्याची भीती आहे.
राज्यात एकूण 1 लाख 8 हजार 35 शाळांमध्ये तब्बल 7 लाख 46 हजार 377 शिक्षक कार्यरत आहेत आणि तब्बल 2 कोटींहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. ही आकडेवारी समाधानकारक वाटत असली, तरी प्रत्यक्षात चित्र वेगळे आहे.
अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या अत्यल्प असताना शिक्षकांची संख्या अधिक असल्याचे कारण देत शालेय शिक्षण विभागाकडून 15 मार्च 2024 च्या शासन निर्णयानुसार 20पेक्षा कमी विद्यार्थी असलेल्या शाळांतील शिक्षकांना अतिरिक्त ठरवले जात आहे. अतिरिक्त व समायोजन झालेल्या शिक्षकांचे वेतन रोखण्याचेही प्रकार आता शालेय शिक्षण विभागाकडून सुरू झाले आहेत. सध्या सुरू असलेली ‘पटपडताळणी’ मोहीम 22 एप्रिलपर्यंत चालणार आहे.
या ‘पटपडताळणी’नंतर मोठ्या प्रमाणावर शिक्षक समायोजन होण्याची शक्यता असून, कमी पट असलेल्या शाळांतील तब्बल 80 हजार शिक्षकांचे समायोजन होईल, अशी भीती आहे. विशेषतः ग्रामीण भागातील शाळा, जिथे आधीच विद्यार्थीसंख्या घटली आहे, त्या शाळांवर याचा मोठा परिणाम होईल. अशा शाळा बंद होण्याची किंवा त्यांची समूह शाळा होण्याची शक्यता अधिक आहे.
" कुटुंब नियोजनामुळे कुटुंबात एक किंवा दोन शिकणारी मुले आहेत. ग्रामीण भागात शिकलेले पालक शहराकडे स्थलांतरित झाले किंवा त्यांची मुले शहरांत शिकत आहेत. यातून ग्रामीण शाळांतील विद्यार्थी संख्या कमी होत चालली आहे. पटसंख्या राखण्यात येणाऱ्या अडचणी समजून घेणे महत्त्वाचे आहे.-महेंद्र गणपुले, माजी उपाध्यक्ष मुख्याध्यापक संघटना
" पहिली ते पाचवीचे वर्ग असताना दोन शिक्षक असण्यात चुकीचे काय? कमी पटसंख्येच्या शाळेत दोन शिक्षक आहेत म्हणजे खूपच शिक्षक आहेत ही भूमिकाच चुकीची आहे.सहावी ते आठवीची पटसंख्या 20 पर्यंत असल्यास नवीन संचमान्यता धोरणानुसार गणित-विज्ञान विषय पदवीधर शिक्षकाचे एकच पद, उर्वरित तीनही भाषा आणि समाजशास्त्र याकरिता एकच शिक्षक हे कसे? सर्वच विषय एकाच शिक्षकाने शिकविण्यातून गुणवत्तापूर्ण विद्यार्थी घडवणे शक्य तरी आहे का?-विजय कोंबे, राज्याध्यक्ष, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती
Saturday, April 18, 2026
तहसीलदार गिड्डे यांच्या मृत्यूचे गूढ वाढले. मोबाईल-लॅपटॉप गायब कारची अदलाबदल! तपास आता गुन्हे शाखेकडे!
केज(प्रतिनिधी) केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांच्या अपघाती निधनाचे सस्पेन्स दिवसेंदिवस गडद होत चालले आहे. पहाटेच्या अंधारात टोलनाका ओलांडताना गाडीत असलेली 'ती' रहस्यमय दुसरी व्यक्ती आणि अपघातानंतर घटनास्थळावरून गायब झालेला मोबाईल, लॅपटॉप व टॅब यामुळे या प्रकरणाला आता गंभीर वळण मिळाले आहे. या घटनेचे गांभीर्य ओळखून लातूरचे पोलिस अधीक्षक अमोल तांबे यांनी हा तपास रेणापूर पोलिसांकडून थेट स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला आहे.
तपासातील सर्वांत धक्कादायक बाब म्हणजे वाहनांची अदलाबदल. बुधवारी (दि. ८) रात्री साडेआठ वाजता अंबाजोगाई-लातूर महामार्गावरील सेलूअंबा टोलनाका ओलांडताना जी कार सीसीटीव्हीत कैद झाली आणि ज्या कारचा रेणापूरजवळ भीषण अपघात झाला, त्या दोन्ही कार वेगवेगळ्या असल्याचे निष्पन्न झाले आहे. तहसीलदारांसारख्या जबाबदार अधिकाऱ्याला प्रवासात कार बदलण्याची गरज का भासली? या प्रवासात त्यांच्यासोबत तिसरी व्यक्ती दुसरी कार घेऊन चालली होती का, यादृष्टीने आता गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुधाकर भावसार तपास करत आहेत.
'त्या' सोबत्याचा शोध घेण्याचे आव्हान.
टोलनाक्यावरील फुटेजमध्ये तहसीलदार गिड्डे यांच्या बाजूला एक व्यक्ती बसलेली दिसत आहे. मात्र, अपघातानंतर केवळ गिड्डे यांचाच मृतदेह सापडला. ती दुसरी व्यक्ती कोण आणि अपघाताच्या वेळी ती कुठे होती, याचा शोध घेणे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे. दरम्यान, गिड्डे यांचे बंधू अक्षय गिड्डे यांनी या प्रकरणाच्या सखोल तपासाची मागणी केली होती, त्यानंतरच हा तपास गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला आहे.
साहित्याची चोरी : अपघातानंतर गिड्डे यांचा मोबाईल, लॅपटॉप आणि टॅब गायब होणे घातपाताची शक्यता वर्तवते.वाहनांची अदलाबदल : टोलनाका ओलांडलेली कार आणि अपघात झालेली कार वेगळी असणे हा तपासातील मुख्य केंद्रबिंदू आहे.मिस्टर 'एक्स' कोण?: प्रवासात सोबत असलेली दुसरी व्यक्ती अपघातानंतर बेपत्ता कशी झाली?दोन कारचे गूढ : प्रवासात तहसीलदारांसोबत दुसरी एक कार पाठलागावर किंवा सोबतीला होती का?
सखाेल तपासानंतर अधिक स्पष्टता येईल.
केज येथील तहसीलदार राकेश गिड्डे यांच्या अपघाताचा तपास स्थानिक गुन्हे शाखा करत आहे. वेगवेगळ्या बाजूंनी सखाेल तपास केला जात असून, घटनाक्रम आणि अपघात, अशा दाेन्ही बाबींची पडताळणी केली जात आहे. तपास पूर्ण झाल्यानंतर याबाबत अधिक स्पष्टता समाेर येईल.-अमाेल तांबे, पाेलिस अधीक्षक, लातूर
आष्टीत मंदिरामागे हॉटेल कामगाराचा संशयास्पद मृतदेह.नैसर्गिक मृत्यू की घातपात? पोलिसांचा तपास सुरू .
आष्टी (प्रतिनिधी): आष्टी येथील बाबाजी कुस्ती संकुलासमोरील शिवमंदिराच्या पाठीमागे शनिवारी सायंकाळी एका ४७ वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे. गजानन लोडबाजी साबळे (४७) असे मृत व्यक्तीचे नाव असून, ते मूळचे यवतमाळ जिल्ह्यातील रहिवासी आहेत. दर्शनासाठी गेलेल्या एका भाविकाला हा मृतदेह दिसल्यानंतर ही घटना उघडकीस आली.
पोलीस पथकाची घटनास्थळी धाव.
घटनेची माहिती मिळताच आष्टी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद भुतेकर, सहायक पोलीस निरीक्षक विक्रांत हिंगे, विजय नरवाडे, उपनिरीक्षक कृष्णा शिंदे आणि पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मृताच्या खिशातील ओळखपत्रावरून त्याची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले. गजानन साबळे हे आष्टी तालुक्यातील एका हॉटेलवर कामगार म्हणून रुजू झाले होते, अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे.
मृत्यूचे कारण अस्पष्ट.
मृताचा देह शवविच्छेदनासाठी आष्टी येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. हा मृत्यू नैसर्गिक कारणाने झाला आहे की त्यामागे काही घातपात आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस सध्या ते कोणत्या हॉटेलवर कामाला होते आणि शनिवारी सायंकाळी ते मंदिराच्या पाठीमागे कसे पोहोचले, याचा शोध घेत आहेत.
जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर जन्मोत्सव निमित्त शोभायात्रेचे कल्याणकारी हनुमान मंदिर न्यू माणिकनगर येथे आयोजन.
Friday, April 17, 2026
उन्हाळी सुट्ट्यांत एसटी प्रवास महाग 10% भाडेवाढ 2रु. स्वच्छता अधिभार लागू !प्रवाशांची नाराजी .
मुंबई (प्रतिनिधी) उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर राज्य परिवहन महामंडळाने (एसटी) प्रवासी भाड्यात १० टक्के वाढ लागू केली असून, प्रत्येक तिकिटावर ₹२ स्वच्छता अधिभार आकारण्याचा निर्णय घेतला आहे. ही वाढ बुधवारपासून लागू झाली असून, प्रवाशांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
काय आहे निर्णय?
एसटीकडून १०% भाडेवाढ लागू करण्यात आल्यानंतर प्रत्येक तिकिटावर ₹२ स्वच्छता अधिभार लावण्यात आला आहे. १५ एप्रिल ते १५ जून या कालावधीत उन्हाळी सुट्ट्यांतील वाढती गर्दी लक्षात घेऊन निर्णय
प्रवाशांची नाराजी
यापूर्वीच एसटीने काही महिन्यांपूर्वी भाडेवाढ केली होती. त्यामुळे आता पुन्हा हंगामी वाढ केल्याने सर्वसामान्य नागरिकांवर आर्थिक ताण वाढल्याने कुटुंबासह प्रवास करणे महाग झाले आहे.लांब पल्ल्याच्या प्रवासाचा खर्च देखील वाढला आहे“भाडेवाढ झाली, पण सुविधा कुठे आहेत?” असा प्रश्न प्रवाशां कडून विचारला जात आहे उन्हाळी सुट्ट्यांमध्ये गावी जाणारे प्रवासी
पर्यटनासाठी जाणारे नागरिक देवदर्शना साठी जाणारी गर्दी यामुळे एसटी बसमध्ये प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते.
इंधन दरवाढ,बस देखभाल खर्च,अतिरिक्त सेवा व्यवस्थापन , या कारणांमुळे भाडेवाढ आवश्यक असल्याचे एसटी महामंडळा कडून सांगितले जात आहे.वाढत्या प्रवासी संख्येमुळे महसूल वाढून मागील नुकसान (दिवाळी काळातील) काही प्रमाणात भरून निघणार आहे
समस्या अजूनही कायम
्भाडेवाढ झाली असली तरीबसची स्वच्छता अपुरी,वेळेचे पालन नाही आरामदायी प्रवासाचा अभाव या समस्या जैसे थेच आहेत त्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजी अधिक वाढली आहे.
धक्कादायक घटना रेल्वे पोलीस कर्मचाऱ्या चा संशयास्पद मृत्यू, कारण अस्पष्ट.
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) येथे रेल्वेमध्ये कार्यरत असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज सकाळी उघडकीस आली. ही घटना माधवबाग परिसरातील भाड्याच्या घरात घडली असून परिसरात खळबळ उडाली आहे.
काय घडलं नेमकं?
मिळालेल्या माहितीनुसार, मयत पोलीस कर्मचारी नितीन पंडित ढगे वय ३०, रा. लोहारा ता. लोहारा जि. धाराशिव त्यांचे अवघ्या आठवडाभरात लग्न होतं.ते काही दिवस सुट्टीवर गावी आले होते. त्यानंतर ते पुन्हा परळी येथे नोकरीवर रुजू झाले. मात्र आज सकाळी त्यांच्या राहत्या घरात त्यांचा मृतदेह आढळून आला.
प्राथमिक माहितीनुसार, कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून त्रास होत असल्याची चर्चा समोर येत आहे. मात्र, त्यांनी हे टोकाचं पाऊल का उचललं, याबाबत अद्याप अधिकृत कारण स्पष्ट झालेले नाही.
पोलिसांचा तपास सुरू
घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला उत्तरीय तपासणीसाठी पार्थिव उपजिल्हा रुग्णालय, परळी येथे पाठवण्यात आलंसर्व बाजूंनी तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली
अनेक प्रश्न अनुत्तरित
हा मृत्यू नेमका कशामुळे झाला?कामाच्या तणावाचा संबंध आहे का?कोणाचा दबाव किंवा छळ होत होता का? या सर्व प्रश्नांची उत्तरं अद्याप समोर आलेली नाहीत.
केज तालुक्यातील धक्कादायक प्रकार.८ वीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर ८ महिने अत्याचार, 'पोक्सो' अंतर्गत गुन्हा.
केज (प्रतिनिधी): तालुक्यातील एका गावात सालगडी म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीच्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर गेल्या आठ महिन्यांपासून सातत्याने अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आरोपी राहुल भालशंकर (रा. जि. बुलढाणा, ह.मु. केज) याने लग्नाचे आमिष दाखवून आणि वडिलांना जिवंत मारण्याची धमकी देऊन पीडितेचे लैंगिक शोषण केले. याप्रकरणी केज पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लग्नाचे आमिष अन् धमकीचा धाक.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी इयत्ता ८ वीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. तिचे वडील आणि आरोपी राहुल हे दोन्ही मूळचे विदर्भातील असून केज परिसरात वेगवेगळ्या शेतकऱ्यांकडे सालगडी म्हणून काम करतात. ओळखीचा फायदा घेत राहुलने १ सप्टेंबर २०२५ रोजी मध्यरात्री पहिल्यांदा अत्याचार केला. हा प्रकार कोणाला सांगितल्यास वडिलांना ठार मारण्याची धमकी दिल्याने पीडिता दहशतीत होती.
पिंक पथकाकडून तपास सुरू.
हा अत्याचाराचा सिलसिला १४ एप्रिल २०२६ पर्यंत सुरू होता. अखेर पीडितेने धाडस करून हा सर्व प्रकार सांगितल्यानंतर केज पोलिसांनी मंगळवारी दुपारी गुन्हा नोंदवला. आरोपी फरार असून पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंक पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक प्रकाश शेळके या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
गुटख्याची माहिती दिल्याच्या संशयावरून शिक्षकावर 'फायटर'ने हल्ला. माफियांवर 'मकोका' अंतर्गत कारवाईची मागणी.
केज (प्रतिनिधी): शहरातील गुटखा तस्करीची माहिती पोलिसांना दिल्याच्या संशयावरून लाखा येथील एका प्राथमिक शिक्षकाला दोन गुटखा माफियांनी फायटरने बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यात शिक्षक गंभीर जखमी झाले असून, गुटखा माफियांच्या वाढत्या दहशतीमुळे केज परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
लाखा येथील प्राथमिक शाळेचे सहशिक्षक मौसीन साबेर कुरेशी हे १४ एप्रिल रोजी सकाळी ११:३० च्या सुमारास नगरपंचायतीसमोर उभे होते. यावेळी मुजाहीद खैरूमिया कुरेशी आणि आबुजर खैरूमिया कुरेशी (दोघे रा. कुरेशी मोहल्ला, केज) हे तेथे आले. "आमच्या गुटख्याची माहिती पोलिसांना का दिलीस? तुझ्यामुळे आमचे नुकसान झाले आहे," असा जाब विचारत त्यांनी शिवीगाळ करत बेदम मारहाण सुरू केली.
जिवे मारण्याची धमकी.
आरोपींनी मौसीन कुरेशी यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करत हातातील लोखंडी 'फायटर'ने त्यांच्या तोंडावर, नाकावर आणि पोटावर गंभीर प्रहार केले. "पुन्हा पोलिसांना माहिती दिलीस, तर तुला जिवंत सोडणार नाही," अशी धमकी देऊन आरोपी पसार झाले. या प्रकरणी मौसीन कुरेशी यांच्या फिर्यादीवरून केज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस निरीक्षक स्वप्निल उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार महावीर सोनवणे तपास करत आहेत.
Thursday, April 16, 2026
राज्यातील पाच बड्या आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या दोन आठवड्यांत तिसरी वेळ.
मुंबई : राज्यातील पाच बड्या आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. बुधवारी सायंकाळी पाच वाजता त्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले. मागील दोन आठवड्यांत राज्यातील सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांची ही तिसरी वेळ आहे.
कोणत्या अधिकाऱ्यांच्या कुठे बदल्या?
१. डॉ. बी. एन. पाटील (आयएएस: नॉन-एससीएस: २०१४), संचालक, पर्यटन, मुंबई यांची प्रकल्प संचालक, रुसा, उच्च व तंत्रशिक्षण विभाग, मुंबई येथे बदली झाली आहे.
२. श्री मंगेश जोशी (आयएएस: एससीएस: २०१५), उपमहासंचालक, यशदा, पुणे यांची संचालक, पर्यटन, मुंबई येथे बदली झाली आहे.
३. श्री कुलदीप जंगम (आयएएस: आरआर: २०२०), मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर यांची अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, पिंपरी येथे बदली झाली आहे.
४. श्री कुशल जैन (आयएएस: आरआर: २०२२), प्रकल्प अधिकारी, आयटीडीपी, अहेरी आणि सहायक जिल्हाधिकारी, अहेरी उपविभाग, गडचिरोली यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर येथे बदली झाली आहे.
५. श्री रेवैया डोंगरे (IAS:RR:2023) सहायक जिल्हाधिकारी, भूम उपविभाग, धाराशिव यांना प्रकल्प अधिकारी, ITDP, पांढरकवडा आणि सहायक जिल्हाधिकारी, केळापूर उपविभाग, यवतमाळ म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; एकाच दिवशी ४० जणांना चावा, नागरिकांमध्ये भीती.
केज (प्रतिनिधी) येथील नगर पंचायतीच्या दुर्लक्षामुळे सोमवारी एका पिसाळलेल्या कुत्र्याने तब्बल ४० नागरिकांना चावा घेतल्यामुळे शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
सोमवारी या कुत्र्याने बसस्थानक परिसरात अक्षरशः धुमाकूळ घातला. दिसेल त्या व्यक्तीला हा कुत्रा चावा घेत होता. बसस्थानक परिसरासह मंगळवारपेठ, अजिजपुरा, भीमनगर, रोजा मोहल्ला भागातही या कुत्र्याने अनेकांना चावा घेऊन धुमाकूळ घातला. एक ते दोन तासांत तब्बल ४० जणांना कुत्र्याने चावा घेतल्यामुळे खळबळ उडाली. कुत्रा चावल्याने जखमी रुग्णांची येथील उपजिल्हा रुग्णालयात रेबीज इंजेक्शन घेण्यासाठी सोमवारी रांग लागली होती.
जखमी रुग्णांवर उपचार.
सोमवारी पिसाळलेल्या कुत्र्याने तब्बल ४० जणांना चावा घेतला होता. या सर्व जखमी रुग्णांना केज येथील उपजिल्हा रुग्णालयात रेबीज इंजेक्शन दिल्याचे व दहा रुग्णांना कुत्र्याने जास्त ठिकाणी चावा घेतल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी स्वाराती रुग्णालयात पाठविल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. दत्तात्रय केंद्रे यांनी सांगितले.
केज शहरातील मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यांचा बंदोबस्त नगर पंचायतीने करण्याची मागणी केज विकास संघर्ष समितीने केली आहे. याची दखल त्यांनी न घेतल्यास नगर पंचायतीच्या कार्यालयात शहरातील सर्व मोकाट कुत्रे आणून सोडण्याचा इशारा समितीचे तालुकाध्यक्ष प्रा. हनुमंत भोसले यांनी दिला.
कुत्रा चावल्यास काय करावे?
तात्काळ जखम धुवा: कुत्रा चावल्यानंतर ती जागा नळाच्या वाहत्या पाण्याखाली साबणाने किमान १० ते १५ मिनिटे स्वच्छ धुवावी.घरगुती उपचार टाळा: जखमेवर मिरची, हळद किंवा तेल लावणे टाळावे.रेबीज इंजेक्शन: वेळ न घालवता २४ तासांच्या आत जवळच्या शासकीय रुग्णालयात जाऊन रेबीज प्रतिबंधक लस घ्यावी.निरिक्षण: चावा घेणाऱ्या कुत्र्यावर १० दिवस लक्ष ठेवावे.
Wednesday, April 15, 2026
दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांचे सी.बी.एस.ई बोर्ड परीक्षेत घवघवीत यश.
आधुनिक सीबीएसई शिक्षण पध्दती पालक,विद्यार्थी आणी काळाची गरज.
Wednesday, April 8, 2026
बीड जिल्ह्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई. तलाठी व ग्रामसेवक लाच घेताना रंगेहाथ अटक.
केज तालुक्यातील दहिफळ (वडमाऊली) येथे ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) परमेश्वर अभिमान जाधव (वय ४७) याला ९ हजार रुपयांची लाच घेताना ACB ने पकडले.
तक्रारदाराच्या वारस नोंदी सातबाऱ्यावर करण्यासाठी जाधवने ३५ हजार रुपयांची मागणी केली होती त्यापैकी ९ हजार रुपये आगाऊ घेताना तो रंगेहाथ सापडला उर्वरित रक्कम काम पूर्ण झाल्यावर घेण्याचे ठरले होते विशेष बाब म्हणजे, जाधव हा माजी सैनिक असून फक्त ६ महिन्यांपूर्वीच सेवेत रुजू झाला होता ही कारवाई उपअधीक्षक सोपान चिट्टमपल्ले यांच्या पथकाने केली
दुसरी कारवाई: परळी तालुक्यात ग्रामसेवक अटक
परळी तालुक्यातील जिरेवाडी येथे ग्रामसेवक दशरथ देविदासराव गोरे याला ५०० रुपयांची लाच स्वीकारताना पकडण्यात आले. विहीर बांधकामाच्या बिलावर सही करण्यासाठी १,००० रुपयांची मागणी केली होती.पंचायत समिती परिसरात मागणी करुन आपल्या खासगी कार्यालयात ५०० रु लाच स्वीकारली
पोलीस निरीक्षक कवडे आणि त्यांच्या पथकाने कारवाई करत गोरेला पकडले
भरधाव ट्रकनं बँक अधिकाऱ्याला चाका खाली चिरडलं.दुर्दैवी अपघातात बँक अधिकाऱ्याचा मृत्यू.
भरधाव ट्रकच्या धडकेत बँक अधिकाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू
घडलेल्या घटनेनुसार, सुदर्शन टाक हे आता नेहमीप्रमाणे सकाळी स्कूटीवरून कामासाठी बँकेत निघाले होते. पण, त्याचक्षणी रिंग रोडच्या मानवलोक कार्यालयाजवळ नको तेच होऊन बसलं, अनियंत्रित ट्रकने दुचाकीला जोराची धडक दिली होती. संबंधित धडक इतकी भीषण होती की, या धडकेत त्याला गंभीर मार लागल्याने त्यांचा घटनास्थळी दुर्दैवी मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच, अंबेजोगाई शहर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत, पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला. या प्रकरणी मृतदेह शवविच्छेदनासाठी स्वामी रामानंद तीर्थ (स्वाराती) रुग्णालयात पाठवला. दरम्यान, पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांच्या मार्गदर्शनाखाली अपघाताचा पुढील तपास सुरु करण्यात आला.
दरम्यान, अपघाताचे वृत्त समजताच, दीनदयाळ बँकेचे अध्यक्ष अॅड. मकरंद पत्नी तसेच इतर संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी तातडीने रुग्णालयात आणि घटनास्थळी धाव घेत संपूर्ण घटनेची माहिती मिळवली. या घटनेनं परिसरात गोंधळ उडाल्याचं चित्र आहे. सुदर्शन टाक यांच्या अपघाती मृत्यूनंतर त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे.
Tuesday, April 7, 2026
1252 शाळांची मान्यता रद्द;वारंवार अपात्र ठरलेल्या शाळांवर सरकारची कारवाई 30एप्रिल पर्यंत अंतिम मुदत
मुंबई (प्रतिनिधी महाराष्ट्र शासनाने शिक्षण क्षेत्रात मोठा निर्णय घेत राज्यातील 1252 शाळा आणि 827 तुकड्यांची मान्यता रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे हजारो शिक्षकांचे भविष्य अधांतरी झाले आहे.
सन 2000 मध्ये कायम विनाअनुदानित तत्त्वावर मान्यता मिळालेल्या जवळपास 6 हजार शाळांपैकी अनेक शाळांचे मूल्यांकन करण्यात आले होते. यामध्ये काही शाळांनी टप्पा अनुदान मिळवले, मात्र वारंवार अपात्र ठरणाऱ्या 1252 शाळांवर अखेर कठोर कारवाई करण्यात आली आहे.
शासनाच्या निर्णयानुसार, या शाळांना आता स्वयं-अर्थसहाय्यित तत्त्वावर नव्याने मान्यता घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. अन्यथा, संबंधित शाळा कायमस्वरूपी बंद केल्या जाणार आहेत.
महत्त्वाची तारीख
1 एप्रिल 2026 पासून कारवाई लागू
30 एप्रिल 2026 अंतिम मुदत अर्जासाठी
तसेच, या शाळांमधील विद्यार्थ्यांचे नजीकच्या शाळांमध्ये समायोजन करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.
शासनाच्या नियमांनुसार, सलग 3 वर्षे मूल्यांकनात अपात्र ठरणाऱ्या शाळांची मान्यता रद्द केली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
विभागनिहाय आकडेवारी
प्राथमिक शाळा – 433 (33 तुकड्या)
माध्यमिक शाळा – 324 (412 तुकड्या)
उच्च माध्यमिक शाळा – 505 (382 तुकड्या)
एकूण. – 1252 शाळा (827 तुकड्या)
धक्कादायक घटना; निवासी डॉक्टरची गळफास घेऊन आत्महत्या, वैद्यकीय क्षेत्रात खळबळ.
अंबाजोगाई (प्रतिनिधी) – स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे शिक्षण घेणाऱ्या एका निवासी डॉक्टरने भाड्याच्या खोलीत गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे अंबाजोगाई शहरासह वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
मृत डॉक्टरचे नाव डॉ. मंदार दाभाडे असे असून ते चनई परिसरातील रोहिदास नगर भागात भाड्याच्या घरात राहत होते. बराच वेळ दरवाजा न उघडल्याने संशय आल्यावर ही घटना उघडकीस आली.
घटनेची माहिती मिळताच अंबाजोगाई शहर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.
डॉ. दाभाडे हे पदव्युत्तर शिक्षण घेत असून रुग्णालयातील कामात सक्रिय होते. त्यामुळे एक होतकरू डॉक्टरने असे टोकाचे पाऊल का उचलले, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. प्राथमिक माहितीनुसार कामाचा ताण, वैयक्तिक कारण किंवा इतर काही कारणांचा तपास सुरू आहे.
या घटनेमुळे रुग्णालयातील सहकारी डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांमध्ये शोककळा पसरली आहे. पोलिस अधिक तपास करत आहेत.