Saturday, January 31, 2026

धक्कादायक घटना! केज तालुक्यात युवकाची गळा चिरून निर्घुन हत्या.

केज (प्रतिनिधी): बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात एका युवकाची गळा चिरून निर्घुन पद्धतीने हत्या केल्याची घटना उघडकीस आल्याने केज मध्ये एकाच खळबळ उडाली आहे. केज तालुक्यात एका पाठोपाठ एक घटना समोर येत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे. तालुक्यातील हनुमंत पिंपरी शिवारात एका २५ वर्षीय तरुणाची गळा चिरून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांनी तातडीने गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता तपासाला वेग वाढवत एका संशयिताला बेड्या ठोकल्या आहेत.
या प्रकरणात मिळालेल्या अधिकच्या माहितीनुसार, केवड आणि हनुमंत पिंपरीच्या शिवारात एका युवकाचा रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळून आला. यावेळी नागरिकांनी पाहणी केली असता विक्की उर्फ आण्णा रावसाहेब चंदनशिव (वय २५ वर्ष) असे मृत तरुणाचे नाव असल्याचे समोर आले. विक्कीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला पाहून असे लक्षात आले की अज्ञात हल्खोराने विक्कीच्या गळ्यावर तीक्ष्ण हत्याराने वार केले होते. जखम खोल असल्याने मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला असल्याचे समोर येत आहे सकाळी साडे दहाच्या सुमारास ही घटना ग्रामस्थांच्या निदर्शनास आली आल्यामुळे खरा प्रकार समोर आला आहे. आणि या घटनेमुळे संबंध केज तालुक्यात आता एकच खळबळ उडाली आहे.
या बाबद घटनेची माहिती मिळताच केज येथील पोलीस दलासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यामध्ये अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके, उपविभागीय पोलीस अधिकारी व्यंकटेश देशपांडे, पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे व महेश क्षीरसागर, पोलीस उपनिरीक्षक उमेश निकम, इनामदार आणि अशोक सोनवणे यांनी घटनास्थळाचा तत्काळ पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे या अनुषंगाने तपास वेगाने सुरू केला असल्याचे संबंधित पोलिसांच्या वतीने सांगण्यात आले आहे.

या प्रकरणी पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तत्परता दाखवत महेश चंदनशिव नावाच्या संशयित आरोपीला काही वेळातच ताब्यात घेतले आहे. अद्याप घटनेचे नेमके कारण समोर येऊ शकले नाही मात्र हा खून जुन्या वादातून झाला की अन्य काही कारणातून, याचा तपास पोलीस करत आहेत. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे

पक्षाच्या भविष्याकरिता राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री. सुनेत्रा पवार यांनी घेतली शपथ.


मुंबई (प्रतिनिधी): कुटुंबावर ओढावलेले संकट बाजूला सारून पक्षाच्या भविष्याकरिता धीरोदात्तपणे सुनेत्रा पवार यांनी पुढे येऊन राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारली आहेत. विधिमंडळ गटनेतेपदी त्यांची निवड झाल्यानंतर शनिवारी सायंकाळी पाच वाजता त्यांचा शपथविधी कार्यक्रम संपन्न झाला.

राज्याच्या इतिहासात पहिल्याच महिला उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची नोंद झाली आहे. अजित पवार यांना स्मरूण त्यांनी पद आणि गोपनियतेची शपथ घेतली. यावेळी एकद वादा अजितदादा… अजितदादा अमर रहे अशा घोषणांनी राजभवनचा सेंट्रल हॉल दुमदुमून गेला.

तत्पूर्वी सरकारी बंगला ‘देवगिरी’वर सुनेत्रा पवार यांनी स्वर्गीय अजित पवार यांच्या फोटोला नमस्कार करून राजभवनाकडे कूच केली. शपथ घेण्याआधी त्यांनी अजित पवार यांना नमन करून त्यांचे एकप्रकारे स्मरण केले. उपमुख्यमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारण्याआधी त्यांनी अजित पवार यांचे आशीर्वाद घेऊन आपल्या नव्या कारकीर्दीला सुरुवात केली.

पवार घराण्यातील सत्तासंघर्ष अजितदादांच्या माघारीनंतरही जैसे थे!

अजित पवार यांच्या माघारी पक्षाचे नेतृत्व कोण करणार, याचे उत्तर त्यांच्या निधनानंतर अवघ्या ७२ तासांत महाराष्ट्राला मिळाले. राष्ट्रवादीच्या सर्वच ज्येष्ठ नेत्यांनी वायू वेगाने सुनेत्रा पवार यांची गटनेतेपदी निवड करून वहिनींशिवाय दुसरे कुणीही नेतृत्व करणार नाही, याची यथोचित काळजी घेतली. आज दुपारी सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ गटनेतेपदी निवड करण्यात आली तसेच पक्षातील निर्णयांचे सर्वाधिकार त्यांच्याकडे सोपवले.

दुसरीकडे मुंबईत या सगळ्या घडामोडी घडत असताना ज्येष्ठ नेते शरद पवार आणि त्यांच्या पक्षातल्या सुप्रिया सुळे, रोहित पवार, युगेंद्र पवार यांना अंधारात ठेवल्याचे सांगितले जाते. महत्वाचे म्हणजे आजच्या शपथविधीसंदर्भात आम्हाला काहीही माहीत नाही, असे शरद पवार यांनी जाहीरपणे सांगून सुनेत्रा पवार यांच्याशी आपल्याशी कोणताही संवाद झालेला नसल्याचे सूचित केले. पवार घराण्यातील सत्तासंघर्ष अजितदादांच्या माघारीनंतरही असाच राहील, याची ‘संबंधितांनी’ योग्य काळजी घेतलेली दिसते.

पवार कुटुंबातील कुणीही शपथविधीला नव्हते

सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीला शरद पवार यांच्या कुटुंबातील कुणीही उपस्थित नव्हते. अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी शरद पवार यांची भेट घेऊन त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. परंतु शरद पवार यांनी शपथविधीला उपस्थिती लावण्यासंदर्भात कोणतीही अनुकूल प्रतिक्रिया दिलेली नाही. सुप्रिया सुळे अर्थसंकल्पासाठी नवी दिल्लीला रवाना झाल्या. तर रोहित पवार हे दिवंगत पोलीस अधिकारी विदीप जाधव यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी फलटणला गेले.

सुनेत्रा पवार यांना लहानपणीच राजकारणाचे बाळकडू, कशी राहिली कारकीर्द

सुनेत्रा पवार यांना लहानपणीच राजकारणाचे बाळकडू मिळाले. त्यांचे माहेरचे पाटील कुटुंब हे राजकारणातील त्यावेळसचे महत्त्वाचे कुटुंब होते. त्यांचे वडील बाजीराव पाटील हे त्याकाळचे मोठे स्थानिक नेते होते. तेर गाव आणि आसपासच्या बारा वाड्यांचे ते कारभारी पाटील होते. त्यांच्यानंतर त्यांचे पुत्र पद्मसिंह पाटील हे राज्याचे गृहमंत्री होते. त्यांनी दीर्घकाळ शरद पवार यांच्यासोबत काम केले. त्यांच्यानंतर त्यांचा वारसा त्यांचे पुत्र राणा जगजीतसिंह पाटील यांनी पुढे चालवला. आता सुनेत्रा पवार देखील उपमुख्यमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारून नव्या आव्हानाला तोंड द्यायला सज्ज आहेत.

Friday, January 30, 2026

मच्छिंद्रनाथ गडाच्या दरीत दोन कुजलेले मृतदेह सापडल्याने खळबळ,पोलिस तपास सुरू.


आष्टी (आष्टी): आष्टी तालुक्यातील सावरगाव येथील प्रसिद्ध मच्छिंद्रनाथ देवस्थान (मायंबा) परिसरात गुरुवारी एक हृदयद्रावक आणि धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. देवदर्शनासाठी आलेल्या दोन भाविकांचे मृतदेह गडावरील खोल दरीत आढळून आले असून, यातील एका तरुणाचा केवळ सापळा उरला आहे, तर वृद्धाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला.

सरपण वेचणाऱ्यांना दिसले मृतदेह .

गडावरील खोल दरीत सरपण गोळा करण्यासाठी काही स्थानिक नागरिक गेले होते. दरीच्या दुर्गम भागात त्यांना मानवी अवशेष दिसताच त्यांनी गावात धाव घेऊन माहिती दिली. अंभोरा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मंगेश साळवे यांनी पथकासह तातडीने घटनास्थळी धाव घेतली. दुर्गम भाग असल्याने पोलिसांनी मोठ्या शर्थीने हे मृतदेह बाहेर काढले.

ओळख पटली अन् कुटुंबीयांचा आक्रोश 

मयत निलेश नारायण घोंगरे (वय २६, रा. बेलापूर खुर्द, जि. अहिल्यानगर) हा महिनाभरापूर्वी गडावर दर्शनासाठी आला होता, पण तिथूनच तो बेपत्ता झाला होता. त्याच्या घरच्यांनी अंभोरा पोलिसात तक्रारही दिली होती. दरीत सापडलेला सापळा निलेशचाच असल्याची ओळख पटताच त्याच्या कुटुंबीयांनी एकच टाहो फोडला. दुसरा मृतदेह दिनकर नाना घडशिंग (वय ६५, रा. भिलवाडा, पाथर्डी) या वृद्धाचा असल्याचे निष्पन्न झाले.

नेमकं काय घडलं?

 दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले आहेत. हे भाविक भोळसर प्रवृत्तीचे असल्याने किंवा रस्ता चुकल्याने दरीत पडले असावेत, अशी प्राथमिक शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. मात्र, एकाच ठिकाणी दोन मृतदेह वेगवेगळ्या वेळी आढळल्याने परिसरात विविध चर्चांना उधाण आले आहे. पोलीस उपनिरीक्षक देवीदास सातव आणि सोपान येवले या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.


Thursday, January 29, 2026

राजकारणात रोखठोक बोलणारा निर्णया वर ठाम राहणारा आणि जनतेसाठी काम करणारा नेता म्हणून अजितदादा पवार यांची ओळख - सौ वर्षा मगर

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ज्येष्ठ नेते अजितदादा पवार यांच्या विमान अपघाताची धक्कादायक बातमी  समजताच संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. राजकीय मतभेदांपलीकडे जाऊन सर्वसामान्य जनतेशी थेट संवाद साधणारा, रोखठोक स्वभावाचा आणि जे बोलेल ते करून दाखवणारा नेता आपण गमावला, अशा भावना सर्व स्तरातून व्यक्त केल्या जात आहेत.अजितदादा पवार हे आपल्या स्पष्टवक्तेपणा, कठोर निर्णयक्षमता आणि प्रशासकीय अनुभवासाठी ओळखले जात होते. सामान्य माणसाच्या प्रश्नांवर थेट भूमिका घेऊन काम करणारा नेता म्हणून त्यांची राज्यभरात ओळख होती. सिंचन, पायाभूत सुविधा, शेती, विकासकामे यामध्ये त्यांनी घेतलेले निर्णय आजही स्मरणात राहतील. 
या दुःखद घटनेनंतर कांतीकारी साथी चे मुख्यसंपादक व जय महाराष्ट्र महिला संघटनाच्या अध्यक्षा सौ. वर्षा मगर  आई साहेब जिजाबाई सेवा संस्थेच्या वतीने श्री हनुमंत मगर यांनी अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी बोलताना सौ वर्षा मगर  म्हणाले की, “राजकारणात रोखठोक बोलणारा, निर्णयावर ठाम राहणारा आणि जनतेसाठी काम करणारा नेता म्हणून अजितदादा पवार यांचे योगदान मोठे होते. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.” यावेळी संस्थेचे व संघटनेचे सर्व सदस्य उपस्थित होते. श्रद्धांजली अर्पण करताना त्यांनी ईश्वरचरणी दिवंगत आत्म्यास शांती लाभो तसेच पवार कुटुंबीयांना व समर्थकांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो, अशी प्रार्थना केली. 

Wednesday, January 28, 2026

पालकमंत्री अजितदादांनी बारामतीनंतर परळीवर प्रेम केलं.


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमानाचा अपघातात  मृत्यू झाला आहे. जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी अजित पवार बारामतीमध्ये येत असताना अजित पवारांचा हा अपघाती मृत्यू झाला. अजित पवार यांच्या निधनानंतर महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे. या घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील सर्व बडे नेते बारामतीत दाखल झाले आहेत. अजित पवार यांच्या निधनानंतर कार्यकर्त्यांना अश्रू आनावर झाल्या आहेत. आज आमचा सह्याद्री कोसळला आहे. बारामतीनंतर अजित पवार यांनी परळीवर प्रेम केल्याच्या भावना परळीमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या आहेत. 

 अपघात नेमका कसा झाला?


1. सकाळी 8.10 मिनिटं

मुंबईतून लियरजेट 45 XR विमानाचं उपमुख्यमंत्री अजित पवारांचं बारामतीकडे उड्डाण झालं. त्यामध्ये अजितदादांसह पाच जणांचा समावेश होता.

2. सकाळी 8.40 मिनिटं

विमान बारामती एअरस्ट्रीपच्या अगदी जवळ होतं, त्यावेळी विमानात काही तांत्रिक बिघाड झाला.

3. सकाळी 8.46 मिनिटं

तांत्रिक बिघाडामुळे वैमानिकाचं विमानावरचं नियंत्रण सुटलं आणि बारामतीतील गोजुबावी परिसरातील शेतात विमान कोसळलं. त्यामध्ये अजित पवारांसह सर्व जणांचा मृत्यू झाला. 

विमानात कोण कोण होते?


अजित पवार
विदीप जाधव
पिंकी माळी
कॅप्टन सुमित कपूर
कॅप्टन शांभवी पाठक 

विमान अपघाताचा घटनाक्रम

पुणे-बारामती परिसरात दाट धुके, दृश्यमानता अत्यंत कमी होती.  
बारामतीचे विमानतळ लहान आहे आणि त्याच्याकडे ILS (Instrument Landing System) सुविधा नाही.  
त्यामुळे पायलटला मॅन्युअल लँडिंग करावी लागली.  
विमानाने रनवेवर थेट प्रवेश केला नाही, तर मोठा वळसा घेतला.  
याचा अर्थ पहिला लँडिंग प्रयत्न रद्द (aborted) केला गेला.  
धुक्यात रनवेवर (align) करणे कठीण झाले.  
दुसरा लँडिंग प्रयत्न केला गेला.  
याचवेळी पायलटने MAYDAY कॉल जारी केला.  
DGCAच्या सूत्रांनुसार, हे टेबल-टॉप रनवे आहे.  
लँडिंगदरम्यान विमान रनवेच्या कडेला कोसळले.  
सुमारे 100 फूट उंचीवर विमानाचा तोल गेला.  
रनवेपर्यंत पोहोचण्याआधीच विमान जमिनीवर आदळले.
विमान जमीनीवर आदळल्यावर मोठा स्फोट झाला, त्यानंतर अनेक लहान स्फोट झाले.
 त्यानंतर विमानात भीषण आग लागली.
आगीमुळे तात्काळ बचावकार्य शक्य झाले नाही.
अपघाताचा तपास चालू आहे, DGCA अहवालानंतर अंतिम कारण निश्चित होईल.

राजकारणात स्पष्टवक्तेपणाची मोठी पोकळी निर्माण झाली” - अभयकुमार ठक्कर

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) रोखठोक निर्णयक्षम व जनसामान्यांची कामे करणाऱ्या नेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ज्येष्ठ नेते अजितदादा पवार यांच्या विमान अपघाताची धक्कादायक बातमी आज सकाळी समजताच संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. राजकीय मतभेदांपलीकडे जाऊन सर्वसामान्य जनतेशी थेट संवाद साधणारा, रोखठोक स्वभावाचा आणि जे बोलेल ते करून दाखवणारा नेता आपण गमावला, अशा भावना सर्व स्तरातून व्यक्त केल्या जात आहेत.
अजितदादा पवार हे आपल्या स्पष्टवक्तेपणा, कठोर निर्णयक्षमता आणि प्रशासकीय अनुभवासाठी ओळखले जात होते. सामान्य माणसाच्या प्रश्नांवर थेट भूमिका घेऊन काम करणारा नेता म्हणून त्यांची राज्यभरात ओळख होती. सिंचन, पायाभूत सुविधा, शेती, विकासकामे यामध्ये त्यांनी घेतलेले निर्णय आजही स्मरणात राहतील, असे अनेकांनी सांगितले.
या दुःखद घटनेनंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने परळीचे नेते तथा माजी नगराध्यक्ष अभयकुमार ठक्कर यांनी अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी बोलताना ठक्कर म्हणाले की, “राजकारणात रोखठोक बोलणारा, निर्णयावर ठाम राहणारा आणि जनतेसाठी काम करणारा नेता म्हणून अजितदादा पवार यांचे योगदान मोठे आहे. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.”
श्रद्धांजली अर्पण करताना त्यांनी ईश्वरचरणी दिवंगत आत्म्यास शांती लाभो तसेच पवार कुटुंबीयांना व समर्थकांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो, अशी प्रार्थना केली. परळी शहर व परिसरातही या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त करण्यात येत असून अनेक राजकीय, सामाजिक कार्यकर्त्यांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत.

Tuesday, January 27, 2026

परळी वैजनाथ नगरपरिषद विषय समित्यां च्या सभापतींची निवड.भाजपा तीन शिव सेना शिंदे गटाला एक. तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला एक पद.

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) परळी वैजनाथ नगरपरिषदेच्या विविध विषय समित्यांच्या सभापतीपदांच्या निवडी आज पार पडल्या या निवडीमध्ये भारतीय जनता पार्टीला तीन शिवसेना शिंदे गटाला एक तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला एक पदे मिळाली आहेत.या निवडीत शिक्षण समितीच्या सभापतीपदी योगेश मेनकुदळे, बांधकाम समितीवर प्रा. पवन मुंडे, महिला व बालकल्याण समितीवर अंजली माळी, आरोग्य व स्वच्छता समितीवर प्राजक्ता कराड तर पाणीपुरवठा समितीच्या सभापतीपदी जयश्री गीते यांची निवड करण्यात आली.
परळी नगरपरिषद ही “ब” वर्ग नगरपरिषद असून कायद्यानुसार विषय समित्यांची रचना करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस व महायुतीची नगरपरिषदेत सत्ता असून या निवडीमुळे नगरपरिषदेच्या प्रशासकीय कामकाजाला गती मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
परळी वैजनाथ नगरपरिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेस व महायुतीची एकहाती सत्ता असून नगराध्यक्षा व उपनगराध्यक्षा ही दोन्ही पदे राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहेत. त्यामुळे विषय समित्यांच्या सभापती पदांच्या निवडीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते.

दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूलमध्ये प्रजा सत्ताक दिन उत्साहात साजरा प्राचार्य डॉ.श्रीकांत पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण

परळी (प्रतिनिधी) दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूल येथे भारतीय प्रजासत्ताक दिना निमित्त शाळेचे प्राचार्य डॉ.श्रीकांत पाटील सर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला.
भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळेचे प्रेरणास्थान मार्गदर्शक मा. श्री. किरण गित्ते साहेब  IAS सचिव :सार्वजनिक बांधकाम ,आरोग्य ,उद्योग , कुटुंबकल्याण ,माहिती तंत्रज्ञान पर्यटन विभाग त्रिपुरा सरकार , विवेकानंद युथ वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्षा सौ. उषाताई किरण गित्ते यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी शाळेचे प्राचार्य डॉ. श्रीकांत पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले यावेळी DWPS वंडरलैंडच्या मुख्याध्यापिका स्वप्नाली टाले मॅडम  उपस्थित होते.दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूलचे विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी स्वागत गीत, देश भक्तीपर गीतांवरील नृत्यांनी  हा सोहळा उत्साहात साजरा केला .
यावेळी DWPS वंडरलँडच्या मुख्याध्यापिका स्वप्नाली टाले  मॅडम व सर्व शिक्षक ,शिक्षीका, शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते.

Monday, January 26, 2026

दिव्य ज्योती जागृती संस्थानतर्फे लातूर मध्ये ‘कन्या बचाओ’ जनजागृतीचा भव्य उपक्रम; ४५० महिलांचा उत्स्फूर्त सहभाग

लातूर (प्रतिनिधी) दिव्य ज्योती जागृती संस्थानतर्फे संतुलन – लिंग समानता या सामाजिक उपक्रमांतर्गत ‘कन्या बचाओ’ या विषयावर भव्य जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन सिद्धेश्वर मंदिर जवळ,  दिव्य ज्योती जागृती संस्थानच्या लातूर येथील आश्रम परिसरात करण्यात आले. या उपक्रमास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून सुमारे 450 महिलांनी हळदी-कुंकू कार्यक्रमात सहभाग नोंदवला.
कन्या बचाओ – बेटी बचाओ या प्रभावी संदेशाच्या माध्यमातून मुलींचे संरक्षण, शिक्षण, स्वाभिमान आणि उज्ज्वल भवितव्य याविषयी उपस्थितांमध्ये व्यापक जनजागृती करण्यात आली. आजही समाजात अस्तित्वात असलेल्या लिंगभेदाच्या मानसिकतेला आव्हान देत नारी-सन्मान व लिंग समानतेचा संदेश या कार्यक्रमातून प्रभावीपणे पोहोचविण्यात आला.
या कार्यक्रमाचे मुख्य उद्दिष्ट महिलांना स्व-सशक्तिकरणासाठी प्रेरित करणे, त्यांच्या अंगी असलेल्या सुप्त शक्ती, आत्मविश्वास व नेतृत्वगुणांची ओळख करून देणे, तसेच समाजात स्त्री-पुरुष समानतेची भावना दृढ करणे हे होते.कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून दामिनी पथकाच्या प्रमुख पोलीस उपनिरीक्षक (PSI) श्रीमती आरती शिरीष पोवार, मॅडम उपस्थित होत्या.
त्यांनी महिलांच्या सुरक्षेबाबत, विशेषतः महाविद्यालयीन मुलींसाठी आवश्यक असलेल्या खबरदारी, कायदे, समुपदेशन व स्वसंरक्षणाबाबत मार्गदर्शन केले. महिलांनी आत्मविश्वासाने उभे राहावे व अन्यायाविरुद्ध निर्भीडपणे आवाज उठवावा, असे त्यांनी आवाहन केले.
यावेळी ग्राहक न्यायालयात न्यायाधीश म्हणून कार्य केलेल्या श्रीमती अनघा अनिल अंधोरीकर, RSS राष्ट्रसेविका समितीच्या सदस्या, यांनी महिलांच्या कायदेशीर हक्कांबाबत मार्गदर्शन केले. तर श्रीमती जयश्री राजेश्वर हेडगे मॅडम, नर्सिंग आरोग्य अधिकारी, यांनी महिलांच्या आरोग्याविषयी सविस्तर माहिती देत नियमित तपासणी, पोषण व मानसिक आरोग्याचे महत्त्व अधोरेखित केले.सौ. समाधानताई माने यांनी जिजाऊ ब्रिगेडच्या कार्याचा उल्लेख करत महिलांनी संघटित होऊन स्वतःच्या हक्कांसाठी सजग राहण्याचे आवाहन केले.

     कार्यक्रमास नवनियुक्त लातूर महानगरपालिका नगरसेविका  सौ.आदिती अजित पाटील कवेकर मॅडम, सौ.ज्योती अवस्कर मॅडम , श्री. ऋषिकेश राजे साहेब,तसेच माजी नगरसेविका सौ.वैशाली लोंढे यादव मॅडम यांची विशेष उपस्थिती लाभली.शेवटी महिलांचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर आपल्यातील वाईट कुणाचा नाश करणे यासाठी होलिका दहन करण्यात आले.
कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन दिव्य ज्योती जाग्रती संस्थानच्या समन्वय अन्नपूर्णा भारतीजी,  लक्ष्मी भारतीजी  व धनश्री भारतजी यांनी अत्यंत शिस्तबद्ध व प्रेरणादायी पद्धतीने केले. संस्थेच्या समन्वयक अन्नपूर्णा भारतीजी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “महिलांनी बाह्य जगाकडे पाहण्याऐवजी आपल्या अंतर्गत परमेश्वराकडे पाहण्याची दृष्टी विकसित केली, तर जीवनात खरा समतोल साधता येतो.” प्रत्येक व्यक्तीच्या आत परमेश्वराचा अंश आहे आणि तो अनुभवण्याची शास्त्रशुद्ध पद्धत सर्वश्री आशुतोष महाराज यांच्या कृपेने मिळणाऱ्या ब्रह्मज्ञानाद्वारे सहज शक्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच शिक्षण व सन्मानासाठी सर्वांनी सामूहिक जबाबदारी स्वीकारण्याचा संकल्प करण्यात आला. हा उपक्रम महिलांमध्ये आत्मविश्वास, जागरूकता व सामाजिक बांधिलकी निर्माण करणारा ठरल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा. प्राचार्य अतुल दुबे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न.

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) नाथ शिक्षण संस्था संचलित यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालय येथे प्राचार्य प्रा.अतुल दुबे यांच्या हस्ते ध्वजारोहण करून भारत देशाच्या 77 व्या प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
26 जानेवारी 2026 सोमवार रोजी भारत देशाच्या 77 व्या प्रजासत्ताक (गणराज्य) दिन देशभर मोठ्या  उत्साहात साजरा करण्यात येत असून याच अनुषंगाने परळी वैजनाथ येथील नाथ शिक्षण संस्था संचलित यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालय येथे सकाळी 8:10 वाजता राष्ट्रपती महात्मा गांधी व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून तिरंगा ध्वजाचे ध्वजारोहण महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.अतुल दुबे यांच्या हस्ते करून प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या वेळी महाविद्यालयाचे  प्रा.यु.एन.फड, प्रा.ए.ए.मुंडे मॅडम, प्रा.के.एच.जायभाये, प्रा.डी.व्ही.उंबरे मॅडम, प्रा.ए.एन.खाकरे, प्रा.एस.आर.कापसे, प्रा पी.पी.तिडके मॅडम, प्रा.ए.डी.शेख, एस . बी.अष्टेकर, व्ही.एन.शिंदे,जी.व्ही.कांबळे,यु.बी.जगताप , ए.पी.जगतकर, एन. व्ही.दळवी यांच्या सह प्राध्यापक कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

कांतीकारी साथी व मगर परिवाराच्या वतीने नवनिर्वाचित नगरसेवक ॶॅड.प्रणव मराठे यांचा सत्कार.

परळी वैजनाथ (प्रतिनिधी)- परळी नगर परिषदेच्या स्वीकृत सदस्यपदी  निवड झाल्याबद्दल भाजप चे युवा नेते कुशल युवा संघटक मा.श्री.ॶॅड प्रणव प्रकाश मराठे यांचा सत्कार कांतीकारी साथी चे संपादक श्री.हनुमंत मगर व मगर परिवारा च्या वतीने शाल श्रीफळ पुष्पहार घालून करण्यात आला. 
यावेळी कांतीकारी साथीच्या मुख्यसंपादक सौ वर्षा मगर यांनी शुभेच्छा देत त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी यशस्वी वाटचालीचा विश्वास व्यक्त केला. “सामाजिक बांधिलकी जपत जनतेच्या प्रश्नांवर ठामपणे काम करणारे ॶॅड प्रणव मराठे हे युवा नेतृत्व नगरपरिषदेच्या विकासासाठी महत्त्वाचे ठरेल,”असे मत त्यांनी व्यक्त केले.
यावेळी या सत्कार समारंभास कांतीकारी साथी चे मुख्यसंपादक सौ.वर्षा मगर संपादक श्री.हनुमंत मगर. गणेश मगर रवि मगर सौ.सारीका मगर पद्मिनी मगर आदीसह जय महाराष्ट्र महिला संघटना पदाधिकारी आईसाहेब जिजाबाई सेवा संस्था सदस्य मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना नगरसेवक ॶॅड प्रणव मराठे यांनी परळी शहराच्या विकासासाठी आणि जनतेच्या प्रश्नांसाठी सक्रियपणे कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.

Sunday, January 25, 2026

कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह माजलगावात सराफा व्यापाऱ्याला एकट्यात गाठुन.शस्त्राचा धाक दाखवत ६० लाखांचे दागिने लुटले.


माजलगाव (प्रतिनिधी) शहरातील अनेक सराफा व्यापारी गावोगावी जाऊन सोन्या-चांदीचे दागिने विकण्याचे काम करतात. अशाच एका सराफा व्यापाऱ्याकडून आज(दि.२५) भर दिवसा शस्त्राचा धाक दाखवत ६० लाख रुपयांचे दागिने पळवल्याची घटना घडली आली आहे. या घनटेने शहरातील सर्व सराफा व्यापाऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.

घटना कशी घडली? 

शहरातील हनुमान चौक येथे अमोल पंढरीनाथ गायके यांचे अमोल ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. ते नेहमी आपल्या बाईकवरुन विविध गावांमध्ये जाऊन सोन्या-चांदीच्या दागिन्यांची विक्री करत असतात. आज सकाळी ९ वाजता ते घरातून निघाल्यानंतर, साडेनऊच्या सुमारास तालखेड फाटा परिसरात पोहोचले. तेथून पुढे खेर्डा गावाकडे जात असताना, त्यांच्या पाठीमागून एका चारचाकी वाहनातून अज्ञात चोरट्यांनी पाठलाग सुरू केला.

शस्त्राचा धाक दाखवून लूट

रस्त्यावर कोणीही नसल्याची संधी साधत चोरट्यांनी व्यापाऱ्याच्या बाईकसमोर आपले वाहन आडवे लावले. त्यानंतर त्यांनी दागिन्यांची बॅग देण्याची मागणी केली. व्यापाऱ्याने नकार दिल्यानंतर, चोरट्यांनी कोयता, गज यांसारखी शस्त्रे दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली. यानंतर व्यापाऱ्याच्या हातातील दागिन्यांची बॅग हिसकावून आरोपी घटनास्थळावरून तत्काळ पलायन झाले.

किती दागिने लुटले?

मिळालेल्या माहितीनुसार, गायके यांच्याकडून ३५० ग्रॅम सोन्याचे विविध दागिने (अंदाजे किंमत: ₹५० लाख) आणि  ३ किलो चांदीचे विविध दागिने (अंदाजे किंमत: ₹१० लाख), असा एकूण सुमारे ६० लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला.

पोलीस तपास सुरू

घटनेची माहिती काही क्षणांतच माजलगाव शहरात वाऱ्यासारखी पसरली. माहिती मिळताच माजलगाव ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. तसेच, तात्काळ आजूबाजूच्या पोलीस ठाण्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू असून, बीड येथील एलसीबी पथकानेही घटनास्थळी भेट देत तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत.

व्यापारी व नागरिकांमध्ये भीती, रोष

या घटनेनंतर माजलगाव शहर व परिसरातील सराफा व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहर व ग्रामीण पोलीस ठाण्यांच्या हद्दीत चोरी व दरोड्याच्या घटना वाढत असल्याने, नागरिकांमध्ये पोलिसांच्या कार्यक्षमतेबाबत नाराजी व्यक्त केली जात असून, कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

केंद्र सरकारकडून २०२६ च्या पद्म पुरस्कारांची घोषणा. महाराष्ट्रातून रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा सन्मान.


नवी दिल्ली- : केंद्र सरकारकडून देशातील सर्वाेच्च पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारकडून पद्द पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. या पुरस्काराने विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांचा गौरव करण्यात येणार आहे. यामध्ये एकूण ४५ जणांना या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

या पुरस्कारांमध्ये लोकनाट्य क्षेत्रात आपले अमूल्य योगदान देणारे तमाशा कलाकार रघुवीर खेडकर तसेच कृषि क्षेत्रातील योगदानाबद्दल श्रीरंग लाड यांना २०२६ चे पद्म पुरस्कार जाहीर झाले आहेत. यासोबतच पालघरमधील वारlली संगीतकार भिकल्या लाडक्या ढिंका यांनाही पद्म पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात येणाऱ्यांची नावे : 

भगवंदास रायकर (मध्य प्रदेश)
भिकल्या लडक्या धिंडा (महाराष्ट्र)
ब्रिज लाल भट्ट (जम्मू-कश्मीर)
चरण हेम्ब्रम (ओडिशा)
चिरंजी लाल यादव (उत्तर प्रदेश)
डॉ. पद्मा गुरमेट (जम्मू-कश्मीर)
कोल्लक्कयिल देवकी अम्मा जी (केरल)
महेंद्र कुमार मिश्रा (ओडिशा)
नरेश चंद्र देव वर्मा (त्रिपुरा)
ओथूवर तिरुथानी (तमिलनाडु)
रघुपत सिंह (उत्तर प्रदेश)
रघुवीर खेडकर (महाराष्ट्र)
राजस्तापति कालीअप्पा गौंडर (तमिलनाडु)
सांग्युसांग एस. पोंगेनर (नागालैंड)
श्रिरंग देवबा लाड (महाराष्ट्र)
थिरुवरूर बख्तवसलम (तमिलनाडु)
अंके गौड़ा (कर्नाटक)
आर्मिदा फर्नांडीस (महाराष्ट्र)
डॉ. श्याम सुंदर (उत्तर प्रदेश)
गफरुद्दीन मेवर्ती (राजस्थान)
खेम राज सुंद्रीयाल (हरियाणा)
मीर हाजीभाई कसामभाई (गुजरात)
मोहन नगर (मध्य प्रदेश)
नीलेश मंडलेवाला (गुजरात)
आर एंड एस गोडबोले (छत्तीसगढ़)
राम रेड्डी ममिडी (तेलंगाना)
सिमांचल पात्रो (ओडिशा)
सुरेश हनागवाड़ी (कर्नाटक)
तेची गूबिन (अरुणाचल प्रदेश)
युनम जत्रा सिंह (मणिपुर)
बुधरी ताथी (छत्तीसगढ़)
डॉ. कुमारासामी थंगाराज (तेलंगाना)
डॉ. पुण्णियामूर्ति नटेासन (तमिलनाडु)
हैली वॉर (मेघालय)
इंदरजीत सिंह सिद्धू (चंडीगढ़)
के. पाजनिवेल (पुडुचेरी)
कैलाश चंद्र पंत (मध्य प्रदेश)
नुरुद्दीन अहमद (असम)
पोकीला लेकटेपी (असम)
आर. कृष्णन (तमिलनाडु)
एस. जी. सुशीलेम्मा (कर्नाटक)
टागा राम भील (राजस्थान)
विश्व बंधु (बिहार)
धर्मिकलाल चूनीलाल पांड्या (गुजरात)
शफी शौक़ (जम्मू-कश्मीर)

याशिवाय पद्मश्री पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून यामध्ये अंके गौडा, अर्मिदा फर्नांडीस, भगवानदास रायकर, बृजलाल भट, बुदरी ताथी, चरण हेमब्रम, चिरंजीलाल यादव यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

Saturday, January 24, 2026

पत्नीचा डोक्यात काठीने वार करून निर्घृण खून.मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचा बनाव.अंत्यसंस्काराची तयारी पोलिसांनी प्लॅनिंग उधळली.

अंबाजोगाई (प्रतिनिधी) शेतात सालगडी म्हणून काम करणाऱ्याने पत्नीचा डोक्यात काठीने वार करून निर्घृण खून केला. त्यानंतर तिचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचा बनाव रचून मृतदेह अंत्यसंस्कारासाठी गावी नेला.मात्र, बर्दापूर पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा बनाव उघड झाला.अंत्यविधीच्या पूर्वीच मृतदेहासह बनाव करणाऱ्या पतीला ताब्यात घेण्यात आले आहे.

ही खळबळजनक घटना अंबाजोगाई तालुक्यातील बर्दापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हातोला शिवारात घडली आहे. शीलाबाई सुरेश शेरफुले वय 45 वर्ष, रा. आलुरा, ता. देगलूर, जि. नांदेड असे मृत महिलेचे नाव आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुरेश शेरफुले हा हातोला येथील एका शेतकऱ्याच्या शेतात सालगडी म्हणून काम करण्यासाठी त्याच्या पत्नीसह राहत होता. मागील 3-4 दिवसांपासून तो गावाकडे जाऊ म्हणून पत्नीकडे आग्रह धरत होता, परंतु ती तयार नव्हती. याच कारणावरून दोघांत तीव्र वाद झाला असल्याची चर्चा आहे. रागाच्या भरात सुरेशने जाड भरीव काठीने शीलाबाईच्या डोक्यात एकामागून एक अनेक वार केले. या हल्ल्यात शीलाबाई रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्या आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर सुरेशने हा खून पचवण्यासाठी परिसरातील लोकांना आणि गावाकडे नातेवाईकांना शीलाबाईचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याचे खोटे सांगितले.

गुन्हा लपवण्यासाठी सुरेशने तातडीने एक क्रुझर गाडी भाड्याने केली आणि मृतदेह घेऊन थेट देगलूर तालुक्यातील आलुरा गाठले. मात्र, बर्दापूर पोलिसांना या संशयास्पद मृत्यूची गुप्त माहिती मिळाली. बर्दापूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक कांबळे यांनी वेळ न घालवता देगलूर पोलिसांशी संपर्क साधला. देगलूरचे पोलीस उपनिरीक्षक गोपाळ सूर्यवंशी यांनी तातडीने आलुरा गाव गाठले. तिथे शीलाबाईच्या माहेरच्या लोकांनाही डोक्यावरील जखमा पाहून संशय आला होता. पोलिसांनी अंत्यसंस्कारापूर्वीच मृतदेह ताब्यात घेऊन पती सुरेशला ताब्यात घेतले.

सुरेश शेरफुले हा सध्या संशयित आरोपी हा अखेर बर्दापूर पोलिसांच्या ताब्यात असून मृतदेह शवविच्छेदनासाठी अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरु असून त्यानंतर या गुन्ह्यात आणखी खुलासे समोर येतात का तसेच या घटनेमागचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकलेले नाही. या घटनेचा अधिक तपास बर्दापूर पोलीस करित आहेत.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई पात्रुड मध्ये 33 किलो गांजासह एकास अटक.

माजलगाव (प्रतिनिधी) स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने माजलगाव तालुक्यातील पात्रुड येथे सापळा रचून एका इसमाला तब्बल ३३ किलो गांजासह रंगेहाथ पकडले. या कारवाईत गांजा आणि दुचाकीसह एकूण ७ लाख ४६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

दिनांक २३ जानेवारी २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, एक इसम बजाज मोटार सायकलवरून गांजा विक्रीसाठी पात्रुड (ता. माजलगाव) येथे येत आहे. या माहितीवरून पोलीस उपनिरीक्षक सुशांत सुतळे यांच्या पथकाने पात्रुड परिसरात सापळा लावला. संशयित दुचाकी येताच पोलिसांनी अडवून झडती घेतली. त्याच्याकडे असलेल्या सॅक मध्ये ३३ किलो गांजा मिळून आला.
पकडलेल्या आरोपीचे नाव सय्यद अत्तार रहेमान सय्यद नौमान वय ३५ वर्षे, रा. परळी, जि. बीड असे आहे. आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून गांजा आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा एकूण ७ लाख ४६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपीविरुद्ध माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २७/२०२६ नुसार कलम ८ (क) आणि २० (ब) गुंगीकारक औषधी द्रव्य, मनो व्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ करत आहेत.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती चेतना तिडके, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड आणि पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पथकात पीएसआय सुशांत सुतळे, हवालदार मारोती कांबळे, सुनील अलगट, रामचंद्र केकान, गोविंद भताने, सचिन आंधळे, बिभीषण चव्हाण आणि चालक अतल हराळे यांचा सहभाग होता.

परळी येथील थर्मल च्या जागेत होणार सोलार एनर्जी प्लांट. निविदा प्रसिद्ध.


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांना विधानसभा सभागृहात दिलेल्या शब्दाची पूर्तता केली असून परळी वैद्यनाथ येथील औष्णिक विद्युत केंद्राच्या निष्कासित झालेल्या संच क्रमांक १ ते ५ च्या जागेत मेगा सोलर प्रकल्प उभारण्यास शासनाने मंजुरी दिली असून पहिल्या टप्प्यात याठिकाणी ५० मेगा वॅट वीज निर्मिती क्षमता असलेला सोलर प्रकल्प उभारण्यात येत असून त्याची निविदा महानिर्मितीने प्रसिद्ध केली आहे.

परळी येथील औष्णिक विद्युत केंद्राच्या निष्कासित झालेल्या संच क्रमांक एक ते पाच च्या रिकाम्या जागेत 350 मेगा वॅट वीज निर्मितीची क्षमता असलेला मेगा सोलर प्रकल्प उभारण्यात यावा अशी मागणी मागील अधिवेशनात धनंजय मुंडे यांनी विधानसभेत केली होती. त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांची ती मागणी मान्य करून लवकरच मेगा सोलर एनर्जी प्रकल्प उभा करण्याचा शब्द दिला होता.

या सोलार निर्मिती प्रकल्पाच्या उभारणीमुळे वीज निर्मितीसह परळी व परिसरात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती देखील होणार असून हा प्रकल्प परळीच्या विकासात एक मैलाचा दगड ठरणार आहे.

पहिल्या टप्प्यात 50 मेगा वॅट वीज निर्मिती क्षमता असलेल्या संचाची उभारणी करण्यात येणार असून याबाबतची निविदा महानिर्मितीने प्रसिद्ध केल्याने लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांनी ऊर्जामंत्री तथा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे समस्त परळीकरांच्या वतीने आभार मानले आहेत.

३ वर्षांपासून पोलिसांवर हल्ला करून पसार झालेल्या आरोपीस अखेर बेड्या.


अंभोरा (प्रतिनिधी): आष्टी तालुक्यातील अंभोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांवर हल्ला करून गेल्या तीन वर्षांपासून फरार असलेल्या बबन उर्फ संदीप सोमनाथ भोसले (वय ३८) याला अखेर बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. शुक्रवारी पहाटेच्या सुमारास पोलिसांनी पारोडी येथील त्याच्या राहत्या घरी वेढा घालून ही कारवाई केली.

अंभोरा पोलीस ठाण्यातील दोन पोलीस अंमलदार १९ मे २०२२ रोजी एका फरार आरोपीच्या शोधकामी वस्तीवर गेले होते. यावेळी बबन भोसले याच्यासह सहा जणांच्या टोळक्याने पोलिसांवर अचानक जीवघेणा हल्ला चढवला होता. या हल्ल्यात दोन अंमलदार गंभीर जखमी झाले होते. तत्कालीन पोलीस नाईक प्रल्हाद देवडे यांच्या फिर्यादीवरून आरोपी ज्ञानेश्वर गणा भोसले, बबन ज्ञानेश्वर भोसले, श्रीराम ज्ञानेश्वर भोसले, कानिफ श्रीराम भोसले, रवि दास भोसले, इतर ek अनोळखी अशा सहाजणांच्या विरोधात शासकीय कामात अडथळा आणि जीवे मारण्याच्या उद्देशाने हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील चार आरोपींना अटकही करण्यात आली होती. आता एकाला अटक करण्यात आली असून अन्य एकजण फरार आहे.

३ वर्षांचा लपाछपीचा खेळ संपला

 या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ चार आरोपींना अटक केली होती, मात्र बबन भोसले तेव्हापासून नाव आणि वास्तव बदलून पोलिसांना गुंगारा देत होता. शुक्रवारी पहाटे तो आपल्या गावी आल्याची गोपनीय माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश साळवे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने घराला वेढा घातला आणि त्याला ताब्यात घेतले. या कारवाईत अंभोरा ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मंगेश साळवे,पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत तावरे,आदिनाथ भडके,पोलिस हवालदार अतुल दाताळ, शिवदास केदार, अमोल शिरसाट, सतीश पैठणे, जयराम उबे,हरिभाऊ बांगर यांच्यासह पथकातील इतर कर्मचाऱ्यांनी मोलाची भूमिका बजावली. 

GST अधिकारी सचिन जाधवर आत्महत्या प्रकरण; "पोलिसांनो, नाटकं बंद करा संतापलेल्या नातेवाईकांचा पोलीस ठाण्यात ठिय्या.


बीड (प्रतिनिधी) "एक प्रामाणिक अधिकारी वरिष्ठ अधिकाऱ्याच्या जाचाला कंटाळून जीव देतो, आठवडा उलटूनही पोलीस केवळ 'चौकशी'चे तुणतुणे वाजवून गुन्हेगारांना पाठीशी घालतात. पोलीस अधीक्षकांचे नाव सांगून दिशाभूल करणे थांबवा. जोपर्यंत एफआयआर हातात पडत नाही, तोपर्यंत आम्ही पोलीस ठाण्याच्या दारातून हलणार नाही", असा आक्रमक पवित्रा घेत मयत जीएसटी अधिकारी सचिन जाधवर यांच्या कुटुंबीयांसह सामाजिक कार्यकर्त्यांनी शुक्रवारी सायंकाळी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मांडला. यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या आंदोलनानंतर आता बीड ग्रामीण पोलीस खरोखरच दोषी वरिष्ठ अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करणार की पुन्हा 'तारीख पे तारीख' देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पोलीस ठाण्यात 'तू तू-मैं मैं

'शुक्रवारी सायंकाळी जाधवर यांचे नातेवाईक, सामाजिक कार्यकर्ते आणि कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात धडक दिली. यावेळी पोलीस निरीक्षक अशोक मुदिराज यांच्या कक्षात पोलीस आणि आंदोलकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. "आमचा जीव गेला तरी चालेल, पण न्याय मिळाल्याशिवाय उठणार नाही", या भूमिकेवर आंदोलक ठाम होते. सुरुवातीला गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करणाऱ्या पोलिसांची लोकांचा वाढता संताप पाहून अक्षरशः धावपळ उडाली. तसेच अधिकाऱ्यांनाही घाम फुटला होता.

पोलिसांची नमती भूमिका.

पोलीस ठाण्याच्या दारातच नातेवाईकांनी ठिय्या मांडल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून अखेर पोलिसांनी नमती भूमिका घेतली आणि गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिले. मात्र, "पोलिसांच्या आश्वासनावर आमचा विश्वास नाही, जोपर्यंत एफआयआरची प्रत मिळत नाही तोपर्यंत ठाण मांडूनच बसणार", असे म्हणत रात्री ८ वाजेपर्यंत नातेवाईक ठाण्यातच बसून होते.

आरोपींना पोलिसांचे पाठबळ?

सुसाईड नोटमध्ये स्पष्ट नाव असूनही आठवडाभर पोलीस कशाची वाट पाहत होते? एकीकडे कुटुंब उघड्यावर पडले असताना पोलीस मात्र तांत्रिक चौकशीच्या नावाखाली वेळकाढूपणा करून आरोपींना पळून जाण्यासाठी किंवा पुरावे नष्ट करण्यासाठी वेळ देत आहेत का? असा गंभीर आराेप वडवणीचे माजी नगराध्यक्ष राजाभाऊ मुंडे यांनी केला.

फोनाफोनी अन् धावपळ.

पोलीस निरीक्षक अशोक मुदिराज यांच्या कक्षात माजी आ. केशवराव आंधळे यांच्यासह इतर सामाजिक कार्यकर्त्यांनी ठिय्या मांडला. गुन्हा दाखलची मागणी केली. यावेळी तपास अधिकारी सपोनि बाळराजे दराडे हे देखील उपस्थित होते. परंतु सुरुवातीला टाळाटाळ करण्यात आली. वारंवार कक्षातून बाहेर जात मुदिराज फोनाफोनी करत होते. जवळपास तासभर हा खेळ चालला. लोकांचा वाढता रोष पाहून गुन्हा दाखलचे आश्वासन देण्यात आले. तोपर्यंत बाहेर लोकांनी ठिय्या मांडला होता.

आम्हाला न्याय द्यावा.

आमची तक्रार घेतली जात नाही. सुसाईड नोट दाखवली जात नाही. त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त होत आहे. आम्हाला न्याय द्यावा, एवढीच आमची मागणी आहे.मयुरी जाधवर, मयताची पत्नी

केवळ गवगवा होताे.

सचिन जाधवर यांच्या कुटुंबाला न्याय द्यायला हवा. पोलीस चांगले आहेत, असा केवळ गवगवा होताे. पण प्रत्यक्षात वेगळेच आहे. गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत आम्ही उठणार नाहीत.संजय आंधळे, अध्यक्ष, युवा मोर्चा भाजप

Friday, January 23, 2026

मुलाच्या अपहरणाचा प्रयत्न, पतीचा अतोनात छळ'; मृत GST अधिकारी जाधवर यांच्या पत्नीचा दावा.


बीड (प्रतिनिधी) : बीड येथील वस्तू व सेवा कर (GST) कार्यालयातील अधिकारी सचिन नारायण जाधवर यांच्या मृत्यू प्रकरणाने आता वेगळेच वळण घेतले आहे. "माझे पती कधीच आत्महत्या करू शकत नाहीत, त्यांना गेल्या महिनाभरापासून प्रचंड मानसिक त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त केले गेले," असा खळबळजनक आरोप त्यांच्या पत्नी मयुरी जाधवर यांनी केला आहे. शुक्रवारी पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन त्यांनी या प्रकरणातील धक्कादायक खुलासे केले आहेत.

षडयंत्राचा संशय आणि टोकाचा छळ 

सचिन जाधवर यांनी १७ जानेवारी रोजी कपिलधारवाडी परिसरात टोकाचे पाऊल उचलले होते. त्यांच्या सुसाईड नोटमध्ये सहाय्यक आयुक्त दिलीप फाटे यांच्या नावाचा उल्लेख असल्याची माहिती समोर आली आहे. मयुरी जाधवर यांनी आरोप केला की, "केवळ ऑफिसमध्येच नाही, तर वैयक्तिक आयुष्यातही त्यांना छळले जात होते. शाळेत गेलेल्या आमच्या मुलाचे अपहरण करण्याचा प्रयत्न झाला होता. इतकेच नाही तर, कार्यालयाबाहेर त्यांच्या वाहनाला धडक देऊन त्यांना शिवीगाळ करण्यात आली होती. हे सर्व त्यांना मानसिकदृष्ट्या उद्ध्वस्त करण्यासाठीच केले गेले."

पोलिसांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न 

घटनेला आठवडा उलटूनही गुन्हा दाखल होत नसल्याने जाधवर कुटुंबियांच्या संयमाचा बांध सुटला. "आम्हाला मूळ सुसाईड नोट का दाखवली जात नाही? पोलिसांवर नेमका कोणाचा दबाव आहे?" असा रोखठोक सवाल मयुरी जाधवर यांनी उपस्थित केला. सचिन यांच्या भावानेही आरोपींवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

पोलीस ठाण्यात ठिय्या.

पोलीस अधीक्षकांच्या भेटीनंतर जाधवर कुटुंबीय आणि नातेवाईकांनी बीड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या दारातच ठिय्या मांडला. 'जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत उठणार नाही' असा आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर पोलीस प्रशासनाला नमते घ्यावे लागले. अखेर गुन्हा दाखल करून घेण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर हा ठिय्या मागे घेण्यात आला. एका कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याच्या मृत्यूमागील हे गूढ आता पोलीस तपासात कधी उलगडणार, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

आष्टीत वाळू माफियांचा हैदोस! तहसील मधून जप्त टेम्पो पळवला,कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करत अंगावर वाहन घालण्या चा प्रयत्न.


आष्टी (प्रतिनिधी): बीड जिल्ह्यातील आष्टी तहसील कार्यालयातून वाळू माफियांनी चक्क जप्त केलेला वाळूचा टेम्पो पळवून नेल्याची खळबळजनक घटना गुरुवारी रात्री घडली. तहसीलदार वैशाली पाटील या रजेवर जाताच संधी साधून ६ ते ८ जणांच्या टोळीने कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करत हा प्रताप केला आहे. कायद्याचे रक्षण करणाऱ्या तहसीलच्या आवारातच ही घटना घडल्याने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

नेमका थरार काय? तहसीलदार वैशाली पाटील यांनी काही दिवसांपूर्वी अवैध वाळू वाहतूक करणारा एक टेम्पो पकडून तहसील कार्यालयात लावला होता. गुरुवारी वैशाली पाटील रजेवर गेल्या आणि प्रभारी तहसीलदार म्हणून विनोद रणविरे यांनी पदभार घेतला. रात्री ८:३० च्या सुमारास ६ ते ८ वाळू माफिया तहसील कार्यालयाच्या पाठीमागील भिंतीवरून आत शिरले. त्यांनी तिथे कर्तव्यावर असलेल्या दोन कोतवालांना धक्काबुक्की करत हुज्जत घातली.

जीवावर बेतणारा प्रसंग.

माफियांनी जप्त केलेला टेम्पो चालू करून तो पळवण्यास सुरुवात केली. यावेळी कर्मचाऱ्यांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्या अंगावर वाहन घालण्याचा प्रयत्न करण्यात आला. माफियांच्या या दहशतीमुळे कर्मचारी बाजूला झाले आणि त्यांनी टेम्पो पळवून नेला. माफियांचा दुसरा एक ट्रक पळवण्याचा प्रयत्न मात्र फसला.

सीसीटीव्ही आणि पोलिसांत तक्रार.

या सर्व घटनेचा थरार तहसील कार्यालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असण्याची शक्यता आहे. या प्रकरणाची माहिती तात्काळ नायब तहसीलदार आणि जमाबंदी विभागाला देण्यात आली आहे. प्रभारी तहसीलदार विनोद रणविरे यांनी या घटनेला दुजोरा दिला असून, संबंधित गुंडांवर कठोर गुन्हे दाखल करण्यासाठी पोलिसांना पत्र देण्यात येणार असल्याचे  सांगितले. आता या प्रकरणातील आरोपींना पोलीस कधी बेड्या ठोकतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

परळीत संत शिरोमणी मन्मथ स्वामी जन्मोत्सव उत्साहात संपन्न.तीन दिवसीय परमरहस्य पारायण प्रवचन सोहळ्याची भक्तिभावात सांगता.


परळी वैजनाथ (प्रतिनिधी)  वीरशैव लिंगायत समाज व श्री मन्मथ स्वामी जन्मोत्सव समिती, परळी वैजनाथ यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या श्री संत शिरोमणी मन्मथ स्वामी जन्मोत्सवा निमित्ताच्या तीन दिवसीय परमरहस्य पारायण प्रवचन सोहळ्याची शुक्रवार, दिनांक 23 जानेवारी रोजी मोठ्या भक्तिभावात व उत्साहात सांगता झाली. कार्यक्रमाच्या प्रारंभी श्री ष.ब्र.108 गुरु सिद्धचैतन्य शिवाचार्य महाराज साखरखेर्डेकर यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या प्रभू श्री वैद्यनाथ व संतश्री गुरूलिंग स्वामी यांचे दर्शन घेवून पूजा व आरती केली.
येथील श्री संत गुरूलिंग स्वामी मठ संस्थान( बेलवाडी) येथे बुधवार, दिनांक 21 जानेवारीपासून या धार्मिक कार्यक्रमास प्रारंभ झाला होता. समारोपाच्या दिवशी शुक्रवारी सकाळी श्री ष.ब्र.108 गुरु सिद्धचैतन्य शिवाचार्य महाराज साखरखेर्डेकर यांची मान्यवरांच्या हस्ते पाद्यपूजा करण्यात आली. यानंतर झालेल्या धर्मसभेत मार्गदर्शन करताना त्यांनी संत शिरोमणी मन्मथ स्वामी यांच्या जीवनकार्यावर सखोल प्रकाश टाकला. भक्ती, त्याग, समाजसमता व मानव कल्याणाचा संदेश देणारे संत मन्मथ स्वामी यांचे विचार आजच्या समाजासाठी दीपस्तंभासारखे असून त्यांचे कार्य वीरशैव परंपरेला दिशा देणारे व कालातीत असल्याचे त्यांनी नमूद केले. 
तरुण पिढीने संतांच्या विचारांतून जीवनमूल्ये आत्मसात करावीत, असे आवाहनही त्यांनी केले. समाजाचे संघटन वाढविणे ही काळाची गरज असून एकमेकांना साथ देणे आवश्यक आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. दुपारी ठीक 12 वाजून 21 मिनिटांनी श्री संत शिरोमणी मन्मथ स्वामी यांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ‘श्री मन्मथ स्वामी’च्या जयघोषाने परिसर भक्तिमय झाला. यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून त्याने तीन दिवसीय परमरहस्य पारायणाची सांगता झाली. याच कार्यक्रमात श्री ष.ब्र.108 गुरु सिद्धचैतन्य शिवाचार्य महाराज यांच्या शुभहस्ते परळी नगरपालिका निवडणुकीत वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीने बहुमताने विजयी झालेल्या नगरसेविका सौ. जयश्री शंकर अप्पा मोगरकर, योगेश विजयकुमार मेनकुदळे व नितीन माणिकअप्पा बागवाले यांचा शाल, श्रीफळ व स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तसेच दैनिक लोकमतचे वार्ताहर संजय खाकरे, संतोष जुजगर, प्रतीक सदानंद चौधरी, महेश निर्मळे, सुयोग गुळवे यांच्यासह विविध भजनी मंडळांच्या पदाधिकार्‍यांचाही विशेष सत्कार करण्यात आला. 
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सुरेशचंद्र चौधरी यांनी केले, तर आभार प्रदर्शन अ‍ॅड. मनोज संकाये यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन अ‍ॅड.फुटके यांनी केले. शशीशेखर चौधरी, गिरीश संकाये, रमेश चौधरी, मकरंद नरवणे, अनिल चौधरी, गजानन हालगे, बाळासाहेब चौधरी, संदीप चौधरी, कैलास भीमाशंकरअप्पा रिकीबे, चंद्रप्रकाश हालगे, अशोक झाडे, राहुल निर्मळे, लहु हालगे,रत्नेश बेलुरे, निरंजन गौरशेट्टे, महेश नरवणे, गणेश विडेकर,शिधु बागमारे,कैलास बेलुरे,आमोल नखाते, विशाल नरवणे, अविनाश चौधरी परांडकर सह इतर कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. या तीन दिवसीय धार्मिक कार्यक्रमास परळी शहरासह पंचक्रोशीतील वीरशैव लिंगायत समाजातील महिला-पुरुष व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी झाल्याबद्दल समस्त वीरशैव लिंगायत समाज, परळी वैजनाथ यांच्या वतीने समाधान व्यक्त करण्यात आले.

परळी वैजनाथ येथे शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांना सर्वपक्षीय अभिवादन.बाळासाहेब ठाकरेंची विचार धारा तरुण पिढीसाठी प्रेरणादायी- सौ. पद्मश्री धर्माधिकारी.

*८० टक्के समाजकारणाच्या विचारातूनच शिवसेना बळकट-शिवसेना नेते अभय कुमार ठक्कर. 

परळी वैजनाथ (प्रतिनिधी): हिंदु हृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त परळी वैजनाथ येथे शिवसेना माजी नगराध्यक्ष अभयकुमार  ठक्कर यांच्या मार्गदर्शनाखाली हिंदुहृदयसम्राट जयंती उत्सव समितीच्या वतीने शुक्रवार दिनांक 23 जानेवारी रोजी भव्य सर्वपक्षीय अभिवादन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
राणी लक्ष्मीबाई टॉवर चौक येथे सकाळी दहा वाजता परळीच्या नगराध्यक्षा सौ.पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी, भाजप ज्येष्ठ नेते दत्तापा ईटके गुरुजी , माजी नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते अभयकुमार ठक्कर , राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) ज्येष्ठ नेते प्रा.डॉ.मधुकर आघाव, राष्ट्रवादी काँग्रेस (S.P) ज्येष्ठ नेते बाळासाहेब देशमुख, शिवसेना (शिंदे गट)तालुका प्रमुख व्यंकटेश शिंदे, वैद्यनाथ मंदिराचे विश्वस्त राजेशजी देशमुख, न.प. गट नेते वजना सोळंके,रघुवीर देशमुख, अँड.अरुण पाठक, वैद्यनाथ बँक संचालक प्रकाश जोशी, प्रा.विनोद जगतकार,रवींद्र परदेशी, माजी उपराध्यक्ष सुरेश टाक, नरसेवक योगेश मेनकुदळे,राज पांडे, अँड.प्रणव मराठे शहर प्रमुख वैजनाथ माने, मनसे तालुका अध्यक्ष श्रीकांत पाथरकर, वंचित आघाडीचे नेते मिलिंद घाडगे, गोपाळ आंधळे, शहरातील प्रतिष्ठित व्यापारी शांतीलाल जैन,बंडू गरुड, नंदकिशोर तोतला, नंदकिशोर बियाणी यांच्या सह करीम शेख,अश्विन मोगरकर, नितीन समशेट्टी,गौतम साळवे, प्रा.शंकर कापसे,महादेव ईटके, अजय चौधरी, श्याम तोष्णीवाल, दत्ता सावंत, नागनाथ पवार, डी.के.माने, दत्ता दहिवाळ, किशोर केंद्रे, रमेश भोयटे,दिलीप जोशी, सौ.चित्राताई देशपांडे,यांच्या हस्ते शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी धूप-दीप व पुष्पहार अर्पण करून त्यांच्या स्मृतींना भावपूर्ण अभिवादन करण्यात आले.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना नगराध्यक्षा सौ. पद्मश्री धर्माधिकारी म्हणाल्या की, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची विचारधारा ही तरुण पिढीला राष्ट्रसेवा, समाजसेवा आणि आदर्श जीवनाची प्रेरणा देणारी आहे. त्यांच्या कार्यातून सर्वांनी शिकण्याची गरज आहे असे त्या म्हणाल्या.
याप्रसंगी शिवसेना नेते अभयकुमार  ठक्कर यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, गोरगरिबांची व सर्वसामान्यांची सेवा करणे आणि तमाम हिंदू बांधवांचे संरक्षण करणे या उद्देशानेच शिवसेनाप्रमुखांनी शिवसेनेची स्थापना केली. ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण हा दिलेला मंत्र आजही शिवसैनिकांसाठी दिशादर्शक आहे. याच विचारधारेतून शिवसेना महाराष्ट्रात वटवृक्षासारखी वाढली. प्रत्येक शिवसैनिकाने समाजकार्यात स्वतःला झोकून देऊन गरजूंना मदत केली, तरच शिवसेनाप्रमुखांचा खरा उद्देश सफल होईल आणि पक्षप्रमुख मा. उद्धव ठाकरे साहेबांचे हात अधिक बळकट होतील असे ते म्हणाले.
कार्यक्रमादरम्यान “जय भवानी, जय शिवाजी”, “शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे अमर रहे”, “तुमचं आमचं नातं काय, जय भवानी जय शिवराय”, “जय महाराष्ट्र” अशा गगनभेदी घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.
या सर्वपक्षीय अभिवादन सोहळ्यास परळी शहरातील विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, व्यापारी, नागरिक तसेच शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हिंदुहृदयसम्राट जयंती उत्सव समितीचे माजी नगरसेवक रमेश चौंडे, प्रा. अतुल दुबे, मोहन परदेशी, श्रीनिवास सावजी, धनंजय मिश्रा, संजय कुकडे, अभिजित देशमुख, पापा सिंग ठाकूर, संजय वानरे,किशन बुंदिले, बबन ढेंबरे, शुभम ठाकूर, अमित कचरे, सचिन दराडे, सुरेश परदेशी, मनिष जोशी, योगेश घेवारे, विजय पवार, योगेश जाधव,  कृष्णा बेदरकर, बाळासाहेब देशमुख , विष्णु मुंडे आदींनी परिश्रम घेतले.

अवैधरित्या मुरूम उत्खनन करून मुरुम वाहतूक करणारे टिप्पर पकडले. अडीच लाख रुपयांचा दंड.


केज (प्रतिनिधी) : अवैधरित्या मुरूम उत्खनन करून वाहतूक करणारे टिप्पर मुरुमासह होळ (ता. केज) येथे अंबाजोगाईचे उपविभागीय अधिकारी दीपक वजाळे यांनी बुधवारी दुपारी पकडले. महसूल अधिकाऱ्यांनी हे टिप्पर आणून तहसील कार्यालयात लावले असून टिप्पर मालकास दोन लाख ५० हजार रुपयांचा दंड करण्यात आला आहे. अशी माहिती तहसीलदार राकेश गिड्डे यांनी दिली.

अंबाजोगाईचे उपविभागीय अधिकारी दीपक वजाळे हे प्रशासकीय कामानिमित्त बुधवारी दुपारी केजला तहसील कार्यालयात येत होते. होळ येथून येत असताना वाटेत मुरूम भरून चाललेले टिप्पर (ओ. डी. १० वी ८९४८) त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी टिप्पर चालकास टिप्पर थांबण्यास सांगितले.

त्यानंतर टिप्परमध्ये मुरूम आढळून आल्याने त्यांनी सदरचे टिप्पर हे ताब्यात घेण्याचे आदेश दिले. तहसीलदार राकेश गिड्डे यांनी तलाठी, मंडळ अधिकऱ्यांसह जाऊन मुरुमाचे टिप्पर ताब्यात घेऊन तहसील कार्यालयात आणून लावले.

दरम्यान, टिप्पर चालक आणि मालकाने कुठल्याही प्रकारची रॉयल्टी न भरता अवैधरित्या मुरूम उत्खनन करून मुरूम भरून वाहतुक केल्याचे स्पष्ट झाल्याने संबंधित टिप्पर मालकास दोन लाख ५० हजार रुपयांचा दंड करण्यात आला आहे. संबंधित टिप्पर मालक चनई (ता. अंबाजोगाई) येथील असल्याचे चालकाने सांगितले.

मा.मंत्र्यांच्या कुटुंबातील पाच जण जिल्हा परिषदेच्या मैदानात.जिल्ह्याच्या राज कारणात मोठी चर्चा.


परभणी (प्रतिनिधी):  स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये घराणेशाहीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, परभणी जिल्हा परिषद निवडणुकीत माजी मंत्री, भाजपचे ज्येष्ठ नेते सुरेश वरपुडकर यांच्या कुटुंबातील तब्बल पाच जण वेगवेगळ्या राजकीय पक्षांकडून निवडणूक लढवत असल्याने जिल्ह्याच्या राजकारणात मोठी चर्चा रंगली आहे. भाजपकडून मुलगा, सून आणि पुतण्या, उबाठा शिवसेनेकडून मुलगी तर काँग्रेसकडून आणखी एक पुतण्या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने ही निवडणूक विशेष लक्षवेधी ठरत आहे.

नुकत्याच पार पडलेल्या नगर परिषद व महानगरपालिका निवडणुकांमध्ये नेत्यांच्या घरातील अनेक उमेदवार मैदानात उतरल्याचे चित्र पाहायला मिळाले होते. आता तेच चित्र जिल्हा परिषद निवडणुकीतही स्पष्टपणे दिसून येत आहे. परभणीतील भाजपचे माजी आमदार आणि माजी मंत्री सुरेश वरपुडकर हे जिल्ह्यातील प्रभावी व ज्येष्ठ नेते मानले जातात. काही महिन्यांपूर्वी त्यांनी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला असून, महापालिका निवडणुकीत त्यांच्यावर निवडणूक प्रमुख म्हणून महत्त्वाची जबाबदारीही सोपवण्यात आली होती. आता जिल्हा परिषद निवडणुकीतही त्यांची भूमिका महत्त्वाची असणार आहे.

 कुटुंबातील पाच जण विविध पक्षांकडून निवडणूक रिंगणात

याच पार्श्वभूमीवर त्यांच्या कुटुंबातील पाच जण विविध पक्षांकडून निवडणूक लढवत असल्याने राजकीय वर्तुळात तसेच सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे. सुरेश वरपुडकर यांचे चिरंजीव समशेर वरपुडकर हे सिंगणापूर जिल्हा परिषद गटातून भाजपकडून निवडणूक लढवत आहेत. तर त्यांची पत्नी प्रेरणा वरपुडकर या दैठणा गटातून भाजपच्या उमेदवार म्हणून मैदानात उतरल्या आहेत. तसेच वरपुडकर यांचे पुतणे बोनी वरपुडकर हे लोहगाव गटातून भाजपकडून निवडणूक लढवत आहेत.

 मुलगी ठाकरेंच्या शिवसेनेकडून रिंगणात

दुसरीकडे, सुरेश वरपुडकर यांच्या कन्या सोनल देशमुख या उबाठा शिवसेनेकडून झरी जिल्हा परिषद मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. त्यांनी उबाठा शिवसेनेचे आमदार राहुल पाटील यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे एका बाजूला भाजप, तर दुसऱ्या बाजूला उबाठा शिवसेना असा थेट सामना एकाच कुटुंबात पाहायला मिळत आहे.

पुतणे काँग्रेसकडून लढताय निवडणूक 

याहूनही विशेष म्हणजे, लोहगाव गटातूनच सुरेश वरपुडकर यांचे दुसरे पुतणे अजित वरपुडकर हे काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवत आहेत. अजित वरपुडकर आणि सुरेश वरपुडकर यांचे राजकीय मतभेद सर्वश्रुत असून, याआधीही दोघांमध्ये फारसे सख्य नसल्याची चर्चा होती. तसेच बोनी वरपुडकर यांचे वडील विजय वरपुडकर आणि सुरेश वरपुडकर यांच्यातही पूर्वी मतभेद होते. मात्र जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरेश वरपुडकर आणि विजय वरपुडकर यांच्यात अलीकडे काहीसे समेटाचे सूर दिसून येत असल्याची चर्चा आहे.

 सोशल मिडीयावर चर्चांना उधाण

एकाच कुटुंबातील पाच सदस्य वेगवेगळ्या पक्षांतून जिल्हा परिषद निवडणूक लढवत असल्याने सोशल मिडीयावर याबाबत जोरदार चर्चा रंगली आहे. घराणेशाही, पक्षनिष्ठा आणि स्थानिक राजकारण या सर्व मुद्द्यांवरून परभणी जिल्ह्यातील ही निवडणूक सध्या सर्वाधिक चर्चेचा विषय ठरत असून, मतदार काय निर्णय देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अंभोरा पोलिसांनी दाखवली विलक्षण कार्यतत्परता.चोरीला गेलेला मोबाईल अवघ्या एक तासांत शोधला.


अंभोरा (प्रतिनिधी): "पोलिस केवळ गुन्हेगारांचा बंदोबस्त करत नाहीत, तर ते गरिबांचे अश्रू पुसण्याचे कामही करतात," याचा प्रत्यय बीड जिल्ह्यातील अंभोरा पोलीस ठाण्यात आला. उदरनिर्वाहासाठी सिल्लोड (छत्रपती संभाजीनगर) येथून आष्टी तालुक्यात मजुरीसाठी आलेल्या एका मजुराचा मोबाईल चोरीला गेला होता. पोलिसांनी अत्यंत संवेदनशीलतेने तांत्रिक तपास करत अवघ्या तासाभरात तो मोबाईल शोधून दिला आणि मजुराच्या चेहऱ्यावर पुन्हा हास्य फुलवले.

नेमकी घटना काय? सिल्लोड येथील रहिवासी अब्दुल रेहमान पठाण हे पोटाची खळगी भरण्यासाठी आष्टी तालुक्यातील सुलेमान देवळा येथे मजुरीसाठी आले आहेत. बुधवारी दुपारी जेवण केल्यानंतर त्यांचा मोबाईल चोरीला गेला. हातावर पोट असलेल्या अब्दुल यांच्यासाठी मोबाईल म्हणजे आपल्या गावी असलेल्या कुटुंबाशी संपर्काचा एकमेव दुवा होता. तोच हरवल्याने ते अत्यंत हवालदिल झाले होते.

पोलिसांची 'सुपरफास्ट' कामगिरी. 

गुरुवारी सकाळी अब्दुल यांनी अंभोरा पोलीस ठाणे गाठले आणि सहायक पोलीस निरीक्षक मंगेश साळवे यांच्याकडे आपली कैफियत मांडली. घटनेचे गांभीर्य आणि तक्रारदाराची परिस्थिती ओळखून पोलिसांनी क्षणाचाही विलंब न लावता तांत्रिक माहितीच्या आधारे तपास सुरू केला. आश्चर्य म्हणजे, अवघ्या एका तासाच्या आत पोलिसांनी चोरीला गेलेला मोबाईल शोधून काढला आणि तो अब्दुल रेहमान यांच्या हाती सुपूर्द केला.

आनंदाश्रूंनी मानले आभार 

मोबाईल हातात मिळताच अब्दुल रेहमान यांना आपले अश्रू अनावर झाले. त्यांनी हात जोडून पोलिसांचे आभार मानले. "अंभोरा पोलीस ठाणे नागरिकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असून, मजुराच्या चेहऱ्यावरचे समाधान हेच आमच्या कामाचे खरे फलित आहे," अशी भावना सपोनि मंगेश साळवे यांनी यावेळी व्यक्त केली. या कारवाईमुळे अंभोरा पोलिसांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

परळी आगारात एस.टी.चा ‘इंधन बचत मासिक उपक्रम’ उत्साहात साजरा. इंधन बचतीतून महामंडळ सक्षम होईल - प्रा. अतुल दुबे

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, बीड विभागाच्या वतीने आज परळी आगारामध्ये ‘इंधन बचत मासिक सण २०२६’ हा उपक्रम उत्साहात राबविण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी परळी आगाराचे माननीय आगारप्रमुख श्री. सोनवणे साहेब होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून युवा नेते प्रा. अतुल दुबे सर उपस्थित होते.
कार्यक्रमात बोलताना प्रा. अतुल दुबे यांनी इंधन बचतीचे महत्व विशद केले. “एस.टी. महामंडळ हे राज्याच्या जनतेचे जीवनवाहिनी आहे. चालक, वाहक व यांत्रिक कर्मचारी यांनी इंधन बचतीकडे कटाक्षाने लक्ष दिल्यास महामंडळ आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम होईल. छोट्या-छोट्या उपाययोजनांतून मोठी बचत साध्य होऊ शकते,” असे प्रतिपादन त्यांनी केले. तसेच कर्मचाऱ्यांच्या शिस्तबद्ध कार्यशैलीचे त्यांनी कौतुक केले.
यावेळी परळी आगाराचे कार्यशाळा अधिक्षक श्री. गर्कल साहेब, श्री. चिंदाले साहेब, श्री. दराडे साहेब, ई-बस विभागाचे शिवाई राठोड सर, इंगळे सर यांच्यासह परळी आगारातील चालक, वाहक, यांत्रिक व अन्य कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमास उपस्थित असलेल्या महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी, प्रमुख पाहुणे व सर्व कर्मचाऱ्यांचे गोविंद ढाकणे यांच्याकडून चहा देऊन स्वागत करण्यात आले व सर्वांचे गोड तोंड करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्री. रोहन आघाव यांनी केले. कार्यक्रमास अधिकारी, प्रमुख पाहुणे व कर्मचारी उपस्थित राहिल्याबद्दल आयोजकांच्या वतीने सर्वांचे शतशत मनःपूर्वक आभार मानण्यात आले.

Thursday, January 22, 2026

जिल्हा रुग्णालयात वयोवृद्ध आजारी रुग्णाला उर्मटपणाची वागणूक देत चक्क सोनोग्राफी सेंटरचे दार लावून गेले. रुग्णां मध्ये संताप.


बीड (प्रतिनिधी): जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या वयोवृद्ध आजारी रुग्णाला उर्मटपणाची वागणूक देत चक्क सोनोग्राफी सेंटरचे दार लावून गेल्याचा प्रकार समोर आला आहे. याचा व्हिडीओही समाज माध्यमावर व्हायरल झाला असून या प्रकारावर संताप व्यक्त केला जात आहे. जिल्हा रुग्णालयातील कर्मचारी अगोदरच वेळा पाळत नसल्यामुळे रुग्णांमध्ये संताप आहे. त्यातच बुधवारी घडलेल्या प्रकारामुळे जिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना माणुसकी हरवली आहे का असा सवाल उपस्थित केला जात आहे. तसेच संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी होते आहे.

सोनोग्राफी करण्यासाठी गेलेल्या वयोवृद्ध पेशंट आजी तिसऱ्या मजल्यावर अॅडमिट होत्या. त्यांना डॉक्टरांनी सोनोग्राफी करण्यास सांगितले. जिल्हा रुग्णालयातील लिफ्ट बंद असल्यामुळे तिसऱ्या मजल्यावरून काही सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांना उचलून खाली आणले. 

सेंटरचा दरवाजा बंद करून कर्मचारी गेले

त्या वयोवृद्ध आजी सहा वाजण्यापूर्वीच सोनोग्राफी सेंटरसमोर आल्या. मात्र, सोनोग्राफी सेंटर मधील महिला कर्मचाऱ्याने पावणे सहा वाजताच दरवाजा बंद केला. समोर ती वयोवृद्ध महिला खाली झोपली असतानाही तिच्याकडे लक्ष न देता सोनोग्राफीचा दरवाजा बंद केला गेला.

त्यावर जाब विचारला असता त्या कर्मचाऱ्याकडून आजीच्या नातेवाईकांशी उर्मटपणाची भाषा करण्यात आली. समोर आजी असतानाही दरवाजा बंद करून ती महिला निघून गेली. या घटनेचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत असून त्यामुळे बीड जिल्हा रुग्णालयातील कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

दरम्यान, या प्रकरणात आपण चौकशी केली असून कर्तव्यात कसूर करणाऱ्या परिचारिकेसह डॉक्टरची चौकशी करून कारवाई केली जाईल अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक सतीशकुमार सोळंके यांनी दिली.

“कलेक्टरकडे जा, मंत्र्याकडे जा, मला फरक पडत नाही”: तहसिलदारांचे वादग्रस्त वक्तव्य. हुकूमशाही कारभारा विरोधात महसूल कर्मचाऱ्यांचा बंद.


कडा (प्रतिनिधी) आष्टी तहसिलदार वैशाली पाटील यांच्या कथित हुकूमशाही, दडपशाही व अपमानास्पद वर्तणुकी विरोधात आष्टी तालुक्यातील सर्व ग्राम महसूल अधिकारी व मंडळ अधिकाऱ्यांनी सामूहिक रजेवर जाण्याचा निर्णय घेतला आहे. तहसिलदारांची बदली होईपर्यंत कोणतेही कामकाज न करण्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे.

उपविभागीय अधिकारी यांना दि.२० जानेवारी २०२६ रोजी सादर करण्यात आलेल्या निवेदनात कर्मचाऱ्यांनी गंभीर आरोप केले आहेत. निवेदनानुसार, तहसिलदार पाटील या वारंवार अपमानास्पद, अर्वाच्य भाषेत बोलून मानसिक छळ करीत असून अधिकाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दि.१९ जानेवारी रोजी तहसील कार्यालयात झालेल्या बैठकीदरम्यान ग्राम महसूल अधिकारी प्रवीण शिंदे यांनी बाहेरील गुंड प्रवृत्तीच्या दोन व्यक्तींना बैठकीत आणून गोंधळ घातला.बैठकीदरम्यान अर्वाच्य भाषेत शिवीगाळ, दमदाटी व मारहाणीची धमकी देण्यात आली. हा सर्व प्रकार तहसिलदार व नायब तहसिलदार यांच्या समोर घडूनही, तहसिलदारांनी संबंधित गुंडांची बाजू घेत कर्मचाऱ्यांनाच दमदाटी केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

“माझी कुठेही तक्रार करा, कलेक्टरकडे जा किंवा मंत्र्याकडे जा. माझं कोणी काही करू शकत नाही", असे वक्तव्य करत कर्मचाऱ्यांना अपमानित करण्यात आल्याचे निवेदनात नमूद आहे. “नोकरी सोडून द्या, तुम्ही नोकरीस लायक नाही, जनावरांसारखे आहात,” अशा शब्दांत वारंवार मानसिक छळ केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

आठवड्यातून किमान पाच दिवस बैठका घेतल्या जात असल्याने प्रत्यक्ष जनतेची कामे खोळंबत असून, काही मोजक्या ‘मर्जीतील’ अधिकाऱ्यांना वगळता इतर सर्वांना लक्ष्य केले जात असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे. ग्राम महसूल अधिकारी व मंडळ अधिकाऱ्यांना शिपाई दर्जाहूनही खालची वागणूक दिली जात असल्याचेही निवेदनात म्हटले आहे.

दि.१६ जानेवारी रोजी तालुका कार्यकारिणी निवडीदरम्यान झालेल्या चर्चेनंतर तहसिलदार अधिक आक्रमक झाल्याने सूडभावनेतून त्रास वाढवला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच १७ जानेवारी रोजी झालेल्या बैठकीत महिला कर्मचारी उपस्थित असताना अर्वाच्य भाषेचा वापर केल्याने संतापाची लाट उसळली.

तहसिलदारांची बदली होईपर्यंत व संबंधित अधिकाऱ्यावर योग्य कारवाई होईपर्यंत सामूहिक रजा आंदोलन मागे घेतले जाणार नाही,असा इशारा देत आष्टी तालुक्यातील ३७ ग्राम महसूल अधिकारी व मंडळाधिकारी आंदोलनात सहभागी झाले आहेत. निवेदनावर अध्यक्ष अशोक सुरवसे यांच्यासह सर्व अधिकाऱ्यांच्या सह्या आहेत.

शिवकुमार केदारी यांचे भाचे सुयोग गुळवे यांची नागपूर मनपात Tax Collector पदी नियुक्ती.

पिंपरी-चिंचवड (प्रतिनिधी) काळेवाडी येथील चि. सुयोग सुनिता प्रताप गुळवे यांची नागपूर महानगरपालिका (महसूल विभाग) अंतर्गत Tax Collector पदी यशस्वी निवड झाली आहे.
नागपूर महानगरपालिका मार्फत ऑक्टोबर 2025 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला असून, या परीक्षेसाठी तब्बल ७७०० पेक्षा अधिक उमेदवार बसले होते. अत्यंत चुरशीच्या या स्पर्धेत चि. सुयोग गुळवे यांनी गुणवत्तेत ५ वा क्रमांक मिळवत दैदीप्यमान यश संपादन केले आहे.
स्पर्धा परीक्षेची तयारी करताना चि. सुयोग यांनी अनेक वर्षे सातत्याने परिश्रम, चिकाटी आणि संयम दाखवला. अपयशांवर मात करत, ध्येयाशी प्रामाणिक राहून केलेल्या कठोर मेहनतीचे आज हे फळ मिळाले आहे. त्यांच्या या यशामुळे केवळ गुळवे कुटुंबाचेच नव्हे तर संपूर्ण नातेवाईक, मित्रपरिवार व समाजाचा मान अभिमानाने उंचावला आहे.
चि. सुयोग यांच्या या उज्ज्वल यशाबद्दल त्यांच्या आई-वडिलांचे मार्गदर्शन, कुटुंबीयांचे पाठबळ आणि गुरूजनांचे योगदान मोलाचे ठरले आहे. आज त्यांचे व त्यांच्या कुटुंबाचे अनेक वर्षांचे स्वप्न पूर्ण झाले असून, सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
परळी वैजनाथ येथील शिवकुमार केदारी यांचा तो भाचा असून, “आम्हा सर्वांना चि. सुयोग यांच्या यशाचा मनापासून अभिमान आहे. त्यांची पुढील वाटचाल अधिक उज्ज्वल व्हावी,” अशा शब्दांत केदारी कुटुंबियांनी भावना व्यक्त केल्या.
चि. सुयोग सुनिता प्रताप गुळवे यांना या घवघवीत यशाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन व भावी कारकिर्दीसाठी हार्दिक शुभेच्छा! 🌸✨

राज्यातील महानगरापालिका मधील महापौर पदासाठी चे आरक्षण जाहिर.


मुंबई (प्रतिनिधी)-राज्यातील 29 महापालिका मधील महापौर पदासाठी चे आरक्षण जाहिर झाले आहे. मुंबई महापालिका सर्वसाधारण साठी तर ठाणे महापालिका अनुसूचित जाती साठी आरक्षित झाली आहे. 

महाराष्ट्रात १५ जानेवारीला मतदान पार पडले होते. त्यानंतर १६ जानेवारीला निकाल जाहीर झाला आहे. या सोडतीमुळे अनेक महापालिकांमध्ये कोणत्या पक्षाचा महापौर बसणार याचे चित्र आता स्पष्ट झाले आहे.

या आरक्षण सोडतीमुळे राज्यातील अनेक मोठ्या शहरांमधील सत्तेची समीकरणे पूर्णपणे बदलणार आहेत. विशेषतः महिला आरक्षणामुळे अनेक दिग्गज नेत्यांना आपल्या प्रभागातील नियोजनात मोठे बदल करावे लागणार आहेत.

आरक्षणाचे सविस्तर गणित

मंत्रालयात झालेल्या या सोडतीनुसार 29 महापालिकांचे वर्गीकरण खालीलप्रमाणे करण्यात आले आहे

  • अनुसूचित जाती (SC) : 3 महापालिका
  • अनुसूचित जमाती (ST): 1 महापालिका (कल्याण-डोंबिवली)
  • इतर मागासवर्गीय (OBC): ८ महापालिका
  • सर्वसाधारण (खुला प्रवर्ग): १७ महापालिका

या आरक्षण सोडतीमुळे अनेक राजकीय गणिते बदलणार असून, विशेषतः महिला आरक्षणाने अनेक दिग्गज नेत्यांच्या प्रभागातील समीकरणे आव्हानात्मक ठरणार आहेत.

Wednesday, January 21, 2026

पत्नीच्या अनैतिक संबंधाला व सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या सततच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या.

केज (प्रतिनिधी): बीड जिल्ह्याच्या केज शहरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे,पत्नीचे अनैतिक संबंध आणि सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या सततच्या त्रासाला कंटाळून एका ४०वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली असून या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.
या बाबत मिळालेली माहिती अशी की, केज शहरातील दोन मुलांची आई असलेल्या महिलेचे एका परजातीतील युवका सोबत अनैतिक संबंध होते या विषयावर पती पत्नीत नेहमी वाद होत होते, शिवाजी जाधव यांच्या पत्नी मनीषाचे केज येथील मयूर पाटील देशमुख या एका अविवाहित तरुणाशी मागील एक वर्षा पासून अनैतिक सबंध होते.

मनीषा हिला तिचा प्रियकर मयूर देशमुख पाटील याने केज येथील धारूर रोड येथे एक खोली भाड्याने करून दिली होती. तिथे ते दोघे आणि अश्रूबा पासून झालेल्या दोन मुलांसह मनिषा आणि तिचा प्रियकर मयूर देशमुख पाटील हे एकत्र पती-पत्नी प्रमाणे राहत होते.

आश्रुबा जाधव हा त्याची पत्नी राहत असलेल्या धारूर रोड भागातील तिच्या खोलीवर गेला तेव्हा त्याला त्याची पत्नी मनिषा जाधव आणि मनिषा हिचा प्रियकर मयूर देशमुख पाटील यांनी त्याला धक्काबुक्की करून जातीवाचक शिवीगाळ केली. तसेच मनिषा आणि तिचा प्रियकर मयूर देशमुख पाटील यांनी त्याला तेथून हाकलून दिले होते. तसेच त्याला मारहाण करून जीवे मारण्याची देखील धमकी दिली असल्याचे फिर्यादीत सांगण्यात आले आहे आणि या कारणावरून आश्रुबा जाधव याने पत्नी मनिषा, तिचा प्रियकर मयूर देशमुख पाटील आणि सासू मंगल भारत खाडे यांच्या शारीरिक व मानसिक त्रासाला आणि पत्नीच्या अनैतिक संबंधाला कंटाळून शेवटी काल दुपारी राहत्या घरी हाउसिंग कॉलनी येथील घराच्या लोखंडी अँगला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली.
घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी त्याला केज येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

या प्रकरणी मयत आश्रूबा जाधव यांचे भाऊ युवराज जाधव यांच्या तक्रारी वरून केज पोलिस ठाण्यात मयूर प्रताप पाटील देशमुख, मयताची पत्नी मनिषा जाधव आणि सासू मंगल भारत खाडे यांच्या विरुद्ध गु र नं २८/२०१६ ॲट्रॉसिटीचे कलम ३(१)(आर),३(१)(एस),३(२)(व्ही ए), ३(व्ही) भा न्या सं १०८,११५(२),३५१(२),३५२,३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी सहाय्यक पोलिस अधीक्षक व्यंकटराम हे तपास करीत असल्याचे सांगण्यात आले आहे.

ठाकरे गटाच्या वतीने परळीत 23 जानेवारी ला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जन्म शताब्दी निमित्त सर्वपक्षीय अभिवादन सभा नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन.

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) : विश्वहिंदू हृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी निमित्त परळी शहरात शुक्रवार, दिनांक 23 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता भव्य सर्वपक्षीय अभिवादन सभेचे आयोजन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.
ही अभिवादन सभा परळी वैजनाथ येथील राणी लक्ष्मीबाई टॉवर चौक येथे आयोजित करण्यात आली असून, या कार्यक्रमास परळी शहरासह पंचक्रोशीतील सर्व शिवप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.
स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिकांवर तसेच महाराष्ट्रातील तमाम जनतेवर अपार प्रेम होते. “२० टक्के राजकारण आणि ८० टक्के समाजकारण” हे त्यांचे ब्रीदवाक्य आजही समाजाला दिशा देणारे असून, त्यांचे विचार आजही कोट्यवधी शिवसैनिकांच्या मनात जिवंत आहेत.
त्यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने आयोजित या सर्वपक्षीय अभिवादन सभेद्वारे बाळासाहेबांच्या विचारांना व कार्याला सामूहिक आदरांजली अर्पण करण्यात येणार आहे. त्यामुळे परळी शहर व पंचक्रोशीतील नागरिकांनी या अभिवादन सभेस आवर्जून उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

जीएसटी अधिकारी आत्महत्या प्रकरण: दिलीप फाटेंना कोणाचे ‘संरक्षण’? सुसाइड नोट असूनही पोलिसांची दिरंगाई.

बीड (प्रतिनिधी) येथील वस्तू व सेवा कर विभागाचे अधिकारी सचिन नारायण जाधवर (३५) यांनी सहायक आयुक्त दिलीप फाटे यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची ‘सुसाइड नोट’ जाधवर यांच्या खिशात सापडूनही अद्याप फाटे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल न झाल्याने पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे. ही घटना घडून चार दिवस उलटले आहेत. पोलिसांकडून आरोपीला वेळ देऊन एकप्रकारे ‘संरक्षण’ दिले जात असल्याचा आरोप आता होऊ लागला आहे.

नातेवाइकांकडे बोट दाखवून पोलिसांचे हात वर

नातेवाईकांनी अद्याप तक्रार दिली नाही,’ असे कारण पुढे करून पोलिस वेळ मारून नेत आहेत. मात्र, काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मते, मृताजवळ सापडलेली चिठ्ठी हाच ‘मृत्यूपूर्व जबाब’ मानून पोलीस स्वतः फिर्यादी होऊन गुन्हा दाखल करू शकतात. असे असतानाही पोलिसांची टाळाटाळ संशयास्पद वाटत आहे. दरम्यान, पोलिस आता जाधवर आणि फाटे यांचे मागील एक वर्षाचे कॉल रेकॉर्ड तपासणार आहेत.

बीड नगरपालिकेचे कर्मचारी अविनाश धांडे यांनी पालिकेच्या छतावरच गळफास घेतला होता. त्यांच्या मोबाइलमध्ये डीपीओ संभाजी वाघमारे, तत्कालीन मुख्याधिकारी नीता अंधारे, उपमुख्याधिकारी सम्राट कदम, विश्वंभर तिडके व चंदू काळे यांच्या त्रासाचा उल्लेख होता. मात्र, पोलिसांनी नातेवाइकांची तक्रार नसल्याचे कारण सांगत कोणावरही कारवाई न करता हे प्रकरण थंड बस्त्यात टाकले आहे. त्यामुळे येथेही पोलिसांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली.

तपास सुरू आहे.

नातेवाईक पोलिस अधीक्षक यांची भेट घेणार आहेत. ते तक्रार देण्यासाठी येणार आहेत, असे समजले. परंतु मी शासकीय कामानिमित्त अंबाजोगाईला आलो आहे. चौघांची चौकशी झाली असून आणखी काही लोकांची करत आहोत. पंचनामाही झाला आहे. सर्व तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.- बाळराजे दराडे, सहायक पोलिस निरीक्षक, बीड ग्रामीण

धक्कादायक घटना! आईने खेळायला जाऊ न दिल्याच्या रागातून गळफास घेऊन आत्महत्या.

नेमकी घटना काय? रविवारची सुट्टी असल्याने सकाळी १० वाजेच्या सुमारास प्रतीकचा एक मित्र त्याला खेळण्यासाठी घरी बोलवायला आला होता. मात्र, बाहेर ऊन असल्याने आईने प्रतीकला, "आता ऊन आहे, ४ वाजल्यानंतर खेळायला जा," असे म्हणत मित्रासमोर हटकले. या गोष्टीचा राग प्रतीकच्या मनाला इतका लागला की, त्याने आई-वडिलांच्या बेडरूममध्ये जाऊन आतून कडी लावून घेतली आणि पंख्याला गळफास लावला. आई स्वयंपाकघरात कामात व्यस्त असल्याने तिचे बेडरूमकडे लक्ष गेले नाही. दुपारी दीडच्या सुमारास जेवणासाठी त्याला उठवायला गेल्यावर दरवाजा उघडला नाही. शेजाऱ्यांच्या मदतीने दरवाजा तोडला असता प्रतीक जमिनीवर कोसळलेल्या अवस्थेत आढळला. त्याला तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र वाटेतच त्याची प्राणज्योत मालवली. रविवारी रात्री उशिरा क्रांतीनगर स्मशानभूमीत त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

विद्यालयावर शोककळा महिना भरातील दुसरी घटना.
धक्कादायक बाब म्हणजे, ज्या शाळेत प्रतीक शिकत होता, त्याच शाळेतील तनुजा चाटे या ९ वीच्या विद्यार्थिनीनेही २८ डिसेंबर रोजी आत्महत्या केली होती. एकाच वर्गातील दोन विद्यार्थ्यांनी महिन्याभराच्या अंतरात टोकाचे पाऊल उचलल्याने शिक्षक आणि पालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. मुलांच्या मनातील हा वाढता राग आणि नैराश्य आता चिंतेचा विषय ठरत आहे.