Sunday, December 31, 2023

प्री- प्रायमरी स्कूलची दुकानदारी बंद.शाळा येणार कायद्याच्या चौकटीत. शाळांना घ्यावी लागणार मान्यता.अभ्यासक्रमाकडे लक्ष.


पुणे (प्रतिनिधी) राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने प्री- प्रायमरी स्कूलस साठी कायद्याचा मसूदा तयार केला असून येत्या शैक्षणिक वर्षांपासून त्यांची अंमलबजावणी सुरू केली जाणार आहे. आठ दिवसांपूर्वीच हा मसूदा राज्य शासनाकडे सादर करण्यात आला आहे. तसेच येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात त्यास मंजूरी घेण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे राज्यातील सर्व पूर्व प्राथमिक शाळा कायद्याच्या चौकटीत येणार असून या शाळांना आता मान्यता घ्यावी लागणार आहे,असे राज्याचे शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली व राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने पुण्यात 50 व्या राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.याबाबतची माहिती देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेनंतर सुरज मांढरे यांनी पत्रकारांशी संवाद साधतांना ही माहिती दिली. दरम्यान, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात पूर्व प्राथमिक वर्गांचा विचार झाला आहे.मात्र, या वर्गांना मान्यता देण्याबाबत व त्यांचा अभ्यासक्रम निश्चित करण्याबाबत कोणतीही नियमावली नाही.यासंदर्भात

सूरज मांढरे म्हणाले, देशातील इतर आठ राज्यांनी तयार केलेल्या प्री- प्रायमरी स्कूल विषयक कायद्याचा अभ्यास 50 हून अधिक तज्ञ व्यक्तींच्या समितीने केला आहे. समितीच्या बैठकांमध्ये झालेल्या चर्चेतून महत्त्वाच्या बाबी विचारात घेऊन महाराष्ट्रासाठी कायद्याचा मसूदा तयार केला आहे. त्यामुळे लवकरच  कायदा अस्तित्वात येणार असून पूर्व प्राथमिक शाळांसाठी नियमावली व अभ्यासक्रम निश्चित केला जाणार आहे. मात्र, शैक्षणिक संस्थांना विनाकारण त्रास होणार नाही यांचीही  काळजी घेण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना या शाळांमध्ये काय शिकवले जाते, याकडे सर्वाधिक लक्ष दिले जाईल. कारण तीन ते सहा वर्ष हे मुलांच्या शिक्षणासाठी खूप महत्त्वाचे आहेत. 

बहुतांश पूर्व प्राथमिक शाळा चांगल्या असल्या तरी काही शाळा या टाईम पास सेंटर आहेत.आई- वडील दोघेही नोकरीला असल्यामुळे त्यांच्यासाठी प्री- प्रायमरी स्कूल हे एक प्रकारे पाळणाघरच आहे. पालक मुलांना तासंतास या शाळांमध्ये सोडून जातात. मात्र, हे अमानविय आहे.परंतु,त्याबाबतचा कायदा आल्याने सर्व काही योग्य पध्दतीने व नियमानुसार होईल,असेही मांढरे म्हणाले. 

बीड जाळपोळप्रकरणी आतापर्यंत ३०७ आरोपींना अटक; पोलिस अधीक्षकांची माहिती.


मुंबईः(प्रतिनिधी) दोन महिन्यांपूर्वी बीडमध्ये जाळपोळीच्या घटना घडल्या होत्या. या प्रकरणी पोलिसांचे अटकसत्र सूरुच असून ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. जाळपोळ प्रकरणात आतापर्यंत ३०७ आरोपींना अटक केल्याची माहिती बीडच्या एसपींनी दिली.

बीडमध्ये ३० ऑक्टोबर रोजी माजलगाव येथे आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरी जाळपोळ करण्यात आलेली होती. त्याला कारण होतं त्यांनी मराठा आरक्षण आणि मनोज जरांगे पाटील यांच्याविषयी केलेलं वादग्रस्त विधान. त्यानंतर सायंकाळच्या दरम्यान बीड शहरामध्ये जाळपोळीच्या घटना सुरु झाल्या.

यामध्ये सुरुवातीला राष्ट्रवादी भवन जाळण्यात आलं, त्यानंतर माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचं कार्यालय, शिवसेना जिल्हाप्रमुखांची कार्यालयं, आमदार संदीप क्षीसागर यांचं घर, छगन भुजबळ यांचे कार्यकर्ते सुभाष राऊत यांचं हॉटेल; असं एकापाठोपाठ एक जाळपोळीच्या घटना घडल्या.

हे प्रकरण हिवाळी अधिवेशनात गाजलं होतं. आमदार प्रकाश सोळंके आणि आमदार संदीप क्षीरसागर यांनी जाळपोळीच्या घटनेचा आणि मराठा आंदोलकांचा संबंध नसल्याचं म्हटलं होतं. ही घटना राजकीय द्वेषातून झाल्याचंही त्यांनी नमूद केलं. त्यामुळे या घटनेमागे नेमकं कोण आहे, हे तपासण्याचं आव्हान पोलिसांसमोर आहे.

बीड जोळपोळीच्या घटनेमध्ये पोलिस विनाकारण मराठा समाजाच्या तरुणांना त्रास देत असल्याचा आरोप होतोय. त्यामुळे मनोज जरांगे पाटलांनी वारंवार शासनाकडे मागणी करत, निरापराध तरुणांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी केली. शिवाय बीडच्या पोलिस अधीक्षकांचीही त्यांनी भेट.

आता या प्रकरणी ३०७ आरोपींना अटक केल्याची माहिती रविवारी पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी दिली. ठाकूर म्हणाले की, आम्ही इतर फरार आरोपींनाही लवकरच अटक करणार आहोत. ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. जाळपोळीच्या अनुषंगाने पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर अटकसत्र केलेलं असून बरेच आरोपी फरार आहेत. यापुढे अशा घटना घडू नयेत, यासाठी बीड पोलिस दलातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना आवश्यक सूचना केलेल्या आहेत; अशी माहिती एसपींनी दिली.

रामपुरी येथे लिंबराज महाराज यांच्या यात्रेला विविध धार्मिक कार्यक्रमाने 1 जानेवारी पासून सुरवात.

रामपुरी (प्रतिनिधी) - गेवराई तालुक्यातील मौजे रामपुरी येथे लिंबराज महाराज यांचा यात्रा उत्सव 1 जानेवारी म्हणजेच नविन वर्षापासून सुरवात होत आहे. हा यात्रा महोत्सव सात दिवस चालतो. 1 जानेवारी ला मौजे रामपुरी येथे अखंड हरिनाम सप्ताह सुरूवात होणार आसुन या अखंड हरिनाम सप्ताचे सुरूवात हभप रूपाली दिदि सवणे यांच्या उपस्थीत रामायण चालु होत आहे.किर्तनाचे खालील प्रमाणे किर्तनकार महाराज आहेत,दिनांक 1 जानेवारी सोमवार हभप सुधाकर महाराज वाघ श्री क्षेत्र पैठण यांचे संध्याकाळी किर्तनाचा कार्यक्रम. 2 जानेवारी ला हभप शिवदास महाराज शास्त्री माजलगाव यांचे संध्याकाळी किर्तन. 3 जानेवारी ला हभप आर्जुन महाराज खामगावकर [ मंगळवार शिक्षण संस्था महाकाळा ] 4 जानेवारी हभप युवराज महाराज देशमुख [आळंदी देवाची ] 5 जानेवारी ला हभप अशोक महाराज पंIचाळ [गुरूजी आळंदी ] 6 जानेवारी हभप ज्ञानेश्वर महाराज राऊत [ श्री क्षेत्र सोनगड गणोरी ] 7 जानेवारी हभप गुलाब महाराज खालकर [ श्री स्वामी मोहनानंद आश्रम आर्वीया प्रमाणे वरिल कार्यक्रम आयोजीत केलेले आहेत.

गुंतवणुकीचा कालावधी संपला.तरी पैसे परत मिळेना.दामदुपटीच्या आमिषाने अनेकांची फसवणूक.


उदगीर (प्रतिनिधी): शहरातील बिदर रोडवरील तुळजाई ॲग्रोटेक कार्पोरेशन लि. नावाने व्यवसाय करणाऱ्या आस्थापनेमधील कर्मचाऱ्यांनी गुंतवणूकदारांना आकर्षक व्याजदर व दामदुपटीचे प्रलोभन दाखवून सन २०१२ मध्ये गुंतवणूक करण्यास सांगितले. गुंतवणुकीचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर पैसे परत मागितले असता फिर्यादीस व गावातील इतर गुंतवणूक करणाऱ्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली. याप्रकरणी दोघांविरुद्ध फसवणुकीसह अन्य कलमान्वये ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत ग्रामीण पोलिसांनी सांगितले, शहरातील बिदर रोडवरील तुळजाई ॲग्रोटेक कार्पोरेशन लि. नावाने स्थापना असलेल्या कंपनीत तुम्ही रोख रक्कम ठेवी म्हणून गुंतवा. त्यावर तुम्हाला आकर्षक व्याजदर व दामदुपटी एवढी रक्कम पुढील सहा वर्षांत परत येईल, असे प्रबोधन दाखवून फिर्यादीकडून रोख रकमा ठेव म्हणून स्वीकारले. आश्वासन दिल्याप्रमाणे २०१२ मध्ये फिर्यादी व गावातील काही जणांनी ठेवी ठेवल्या. त्याची मुदत २०१८ मध्ये पूर्ण झाली. त्यानंतर पैसे परत मागण्यासाठी गेले असता फिर्यादी व गावातील गुंतवणूक करणाऱ्यांना पैसे परत न देता उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली.

याप्रकरणी अनिल शिवाजीराव खुदमपुरे (रा. मुदळ ता. कमलनगर, जि. बिदर) यांच्या तक्रारीवरून आरोपी बालाजी बिराजदार (रा. उदगीर) व संजय उद्धवराव राठोड (रा. वडगीर, पोस्ट सवरमाळ) यांच्याविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुरुवारी रात्री विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक देवकते हे करीत आहेत.

विविध प्रलंबित मागण्यांसाठी रेशन दुकानदार उद्यापासून बेमुदत संपावर.

 

पुणे (प्रतिनिधी) विविध प्रलंबित मागण्यांसाठी देशपातळीवरील ऑल इंडिया फेअर प्राईस शॉप डिलर्स फेडरेशनने पुकारलेल्या बेमुदत बंदमध्ये अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार

व किरकोळ केरोसीन परवानाधारक महासंघाने उडी घेतली आहे. त्यामुळे येत्या एक जानेवारीपासून पुण्यासह महाराष्ट्रातील रेशनदुकानदार बेमुदत संपावर जाणार आहेत.

रेशन दुकानदारांना मार्जिन इन्कम गॅरंटी ५० हजार करा, मार्जिन मनी ३०० रुपये करा, टू जी ऐवजी फोरजी मशीन द्या, कालबाह्य नियम बदला, आनंदाचा शिधा कायमस्वरुपी राबवून कांदा. 

चणाडाळ, तूरडाळ, मूगडाळ या वस्तू रेशन दुकानात उपलब्ध करा यासारख्या मागण्यांसाठी हे आंदोलन पुकारण्यात आले आहे.

त्यासाठी पुण्यासह महाराष्ट्रातील रेशन दुकानदार संपावर जाणार आहेत, असे पुणे शहर रेशन दुकानदार संघटनेचे अध्यक्ष गणेश डांगी यांनी सांगितले.

राज्यात सुमारे ५३ हजार रास्त भाव दुकानदार आहेत. त्यांच्या प्रलंबित न्याय हक्क मागण्यांसंदर्भात केंद्र आणि राज्य सरकार उदासीन आहे. आंदोलन आणि मोर्चाची सरकारकडून दखल घेतली नाही.

महासंघाच्या निवेदनाची दखल घेत सरकारने सचिवांच्या अध्यक्षतेखाली हिवाळी अधिवेशन काळात नागपूरला पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यात केवळ आश्वासने देण्यात आली

मात्र निर्णय झाला नाही. त्यामुळे महासंघाच्यावतीने नाईलाजास्तव ऑल इंडिया फेअर प्राईस शॉप डीलर्स फेडरेशनने एक जानेवारीपासून पुकारलेल्या संपात सहभाग होण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

या आंदोलनात राज्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदारांनी सहभागी होण्याचे आवाहन महासंघाकडून करण्यात आले आहे.

रेशन बंद आंदोलनामध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन आपली दुकाने बंद ठेवावीत. या काळात दुकानदारांनी आपापल्या दुकानातील ई-पॉस मशीन कार्यान्वित करू नयेत.

तसेच कोणत्याही प्रकारे धान्याची उचल आणि वितरण करू नयेत, असे पुणे शहर रेशन दुकानदार संघटनेचे अध्यक्ष गणेश डांगी यांनी सांगितले.

 

बीडच्या नागरिकांसाठी ‘अभय’ योजना. मुद्रांक विभागाकडून लाभ घेण्याचे आवाहन.


बीड (प्रतिनिधी) शासनाने मुद्रांक शुल्क व दंड सवलत अभय योजना लागू केली आहे. ३१ मार्चपर्यंत असलेल्या योजनेचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन करण्यात आले. या योजनेमध्ये ता. एक जानेवारी १९८० ते ३१ डिसेंबर २००० या कालावधीत नोंदणी दाखल केलेले किंवा न केलेले दस्त यांच्या बाबतीतील शासनास देय होणाऱ्या तथा वसुलीपात्र संपूर्ण मुद्रांक शुल्क आणि त्यावर लागू होणाऱ्या दंडामध्ये सूट असेल, अशी माहिती मुद्रांक जिल्हाधिकारी अशोक आटोळे यांनी दिली.

ता. एक जानेवारी १९८० ते डिसेंबर २००० या कालावधीतील दस्तांसाठी योजनेच्या पहिल्या टप्प्यात देय होणारी मुद्रांक शुल्काची रक्कम एक लाखापर्यंत असल्यास मुद्रांक शुल्क व दंडाची संपूर्ण माफी तसेच देय होणारी मुद्रांक शुल्काची रक्कम एक लाखाच्यावर असल्यास मुद्रांक शुल्कात ५० टक्के सवलत व दंडाची संपूर्ण माफी असेल. तर, योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात देय होणारी मुद्रांक शुल्काची रक्कम एक लाखापर्यंत असल्यास मुद्रांक शुल्कात व दंडामध्ये ८० टक्के कपात असेल.

तसेच देय होणारी मुद्रांक शुल्काची रक्कम एक लाखाच्यावर असल्यास मुद्रांक शुल्कात ४० टक्के दंडामध्ये ७० टक्के माफी असेल. ता. जानेवारी २००१ ते ३१ डिसेंबर २०२० या कालावधीतील दस्तांसाठी योजनेच्या पहिल्या टप्प्यात देय होणारी मुद्रांक शुल्काची रक्कम २५ कोटीपर्यंत असल्यास मुद्रांक शुल्कात २५ टक्के माफी व दंडाची रक्कम ही २५ लाखांपेक्षा कमी असल्यास दंडामध्ये ९० टक्के माफी तसेच दंडाची रक्कम २५ लाखांपेक्षा जास्त असल्यास केवळ २५ लाख रुपये दंड वसूल करण्यात येईल. मुद्रांक शुल्काची रक्कम २५ कोटींपेक्षा जास्त असल्यास मुद्रांक शुल्कात २० टक्के माफी तसेच दंडात एक कोटी रक्कम स्वीकारून उर्वरित दंडाच्या रकमेत सूट मिळेल.

अक्कलकोटमध्ये नववर्षासाठी लाखो स्वामी भक्तांची मांदियाळी.दोन ते तीन लाख भाविक येण्याची अपेक्षा आहे.


सोलापूर (प्रतिनिधी): सरत्या वर्षाला निरोप देत नव्या वर्षाच्या स्वागताची तयारी सुरू असताना त्याचेच औचित्य साधून श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांच्या प्रचंड गर्दीने अक्कलकोट नगरी फुलून गेली आहे. शनिवारी सुमारे ८० हजार भाविक दाखल झाले असून उद्या ३१ डिसेंबर रोजी दोन ते तीन लाख भाविक येण्याची अपेक्षा आहे. यानिमित्ताने वटवृक्ष श्री स्वामी महाराज देवस्थानासह शेजारच्या श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या संपूर्ण यात्री निवास व भक्त निवास तसेच सर्व हाॕटेल आणि लाॕजेस भरून गेली आहेत. शहरात प्रत्येक रस्त्यावर भाविकांसह वाहनांची तुडूंब गर्दी दिसून येते. त्यामुळे मंदिरात दर्शन व्यवस्थेसह निवास आणि भोजन व्यवस्थेचा भार वाढला आहे. वाहतुकीवर नियंत्रण करताना पोलीस यंत्रणेवरही भार वाढला आहे. अक्कलकोटमध्ये निवास व्यवस्था तोकडी पडल्यामुळे भाविक सोलापुरात मुक्काम करणे पसंत करीत आहेत. त्यामुळे सोलापुरातील बहुसंख्य हाॕटेलही फुलून गेले आहेत.यानिमित्ताने अक्कलकोट व सोलापुरात मोठी आर्थिक उलाढाल होत आहे.

श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनासाठी दररोज हजारो भाविक येतात. त्यात वरचेवर भर पडत आहे. सलग शासकीय सुट्ट्यांसह दर गुरूवारी तसेच श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी, प्रकट दिन, गुरू पौर्णिमा, दत्त जयंती उत्सव काळात लाखो भाविकांची मांदियाळी पाहायला मिळते. मुंबई, ठाणे, पुणे, कोकण, मराठवाडा, विदर्भ, पश्चिम मराराष्ट्रासह शेजारच्या कर्नाटक, तेलंगणा आदी भागातून भाविकांचा ओघ अक्कलकोट नगरीत सुरू असतो.

शहरात पंधरा-सोळा वयाच्या मुलांना सुलोचन व इतर नशाचे व्यसन अनेक युवक गेले नशेच्या आहारी.


किल्लेधारूर (प्रतिनिधी) : शहरात काही निवडक भागातील पंधरा-सोळा वयाच्या मुलांना सुलोचन व इतर नशा करण्याचे व्यसन जडत असल्याचे समोर येत आहे. मोलमजुरी करणाऱ्या गरीब कुटुंबातील या मुलांकडे आई-बाबांचे दुर्लक्ष होऊन ते नशेच्या आहारी गेल्याचे दिसून येत आहे. वेळीच या मुलांकडे लक्ष देण्याची गरज आहे.

शहरातील विविध भागांतील सुलोचन आणि अन्य अमली पदार्थांची नशा करणारे अल्पवयीन मुले मोठ्या प्रमाणात फिरताना दिसून येत आहेत. हात रुमाल अथवा जुन्या कपड्यावर सुलोचन टाकून ही मुले नशा करताना दिसून येत आहेत. या मुलांच्या आई-वडिलांच्या दुर्लक्षामुळे तसेच मित्र परिवाराच्या संगतीमुळे ही मुले नशेच्या आहारी जात आहेत. सुलोचनची नशा करणाऱ्या मुलांचा आहार कमी होतो.

तसेच नशा केल्यास कसल्याही प्रकारची मानसिकता राहत नाही. शिवाय त्यांच्या प्रकृतीवर देखील विपरीत परिणाम होत आहेत. पंचरचे सुलोचन कुठल्या ही जनरल स्टेशनरीच्या दुकानात सहजतेने उपलब्ध होत असल्याने त्याचा गैरफायदा ही मुले घेत असल्याचे दिसत असून, या होणाऱ्या गैर प्रकाराकडे लक्ष देण्याची गरज आहे. दिवसेंदिवस मुलांना नशा करण्याची सवय लागत असून, याकडे युवक वळत आहे. कमी पैशात नशा होत असल्याने नशेकडे युवक लवकर वळत असल्याचे दिसत आहे.

सध्या शहरातील काही भागात नशा करणाऱ्या युवकांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. हेच युवक भविष्यात गुन्हेगारी वृत्तिकडे वळून भविष्य अंधकारात ढकलतात. यामुळे यांच्या आई- वडिलांनी वेळीच मुलांना पायबंद करणे गरजेचे आहे.

-ॲड. व्ही. ए. निंगुळे, ज्येष्ठ विधीज्ञ

मागील काही दिवसांपासून नशेखोरांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्याचे ऐकत आहोत. नशा करणाऱ्या युवकांना भविष्यात मोठी शारीरिक हानी सहन करावी लागणार आहे. दुष्परिणाम अति रागवटपणा, झोप न येणे, बेचैनी, सहन न होणे अशा प्रकारचे दुष्परिणाम असून, पाच ते सात वर्षांनी समरणशक्तीवर देखील परिणाम होऊ शकतो.हे अतिशय हानिकारक असून, वेळीच आई वडिलांनी आपल्या मुलांकडे लक्ष देण्याची गरज आहे.

-डॉ. मुजाहिद मोमीन, मानसोपचार तज्ज्ञ, जिल्हा रुग्णालय, बीड

Thursday, December 28, 2023

ॶॅड.गुणरत्न सदावर्ते यांच्या एसटी महामंडळातील अस्तित्वाला मोठा धक्का 19 पैकी 12 संचालकांचे बंड.

मुंबई (प्रतिनिधी) : प्रसिद्ध वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या एसटी महामंडळातील अस्तित्वाला फार मोठा धक्का बसला आहे. एसटी महामंडळाच्या स्टेट ट्रान्सपोर्ट को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडमध्ये महाभूकंप झाला आहे. एसटी बँकेच्या 19 पैकी 12 संचालकांनी बंड केलं आहे. त्यामुळे गुणरत्न सदावर्ते यांना मोठा धक्का बसला आहे. या बंडामुळे एसटी महामंडळातील सदावर्ते यांचं वर्चस्व खालसा झालं आहे. थेट संचालकांनीच बंड करत वेगळी चूल मांडल्याने एसटी महामंडळात एकच खळबळ उडाली आहे.

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावेळी गुणरत्न सदावर्ते यांनी आधी कर्मचाऱ्यांचं वकीलपत्र घेतलं. त्यानंतर त्यांनी या कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचं नेतृत्व केलं. त्यानंतर एसटी महामंडळाच्या निवडणुकांमध्ये आपलं पॅनलही उतरवलं. गुणरत्न सदावर्ते यांच्या पॅनलने एसटी बँकेची संचालक मंडळाचा निवडणूक लढवली. या निवडणुकीत सदावर्ते यांच्या पॅनलला 19 पैकी 12 जागांवर विजय मिळाला. मात्र, कुरबुरी काही थांबेनात. अखेर या कुरबुरीचा कडेलोट झाला.

थोडी ना थोडकी…

एसटी बँकेच्या 19 पैकी 12 संचालकांनी थेट गुणरत्न सदावर्तेंविरोधात बंड पुकारलं आहे. या सर्व संचालकांनी गुणरत्न सदावर्ते यांच्या पॅनलला जय महाराष्ट्र केल्याचं सूत्रांनी सांगितलं. हे सर्वच्या सर्व 12 संचालक ट्रॅव्हलरमधून एसटी बँकेत पोहोचले. यावेळी त्यांनी एक पत्रही आणलं होतं. या संचालकांनी एसटी महामंडळाचे अतिरिक्त संचालक बिमनवार यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांच्याकडे वेगळा गट स्थापन करत असल्याचं स्पष्ट केल्याचंं वृत्त आहे. या 12 संचालकांनी सदावर्ते यांना काडीमोड देऊन वेगळा गट स्थापन करण्याचा निर्णय घेतल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे एसटी बँकेत पुन्हा निवडणुका होणार की या गटाला मान्यता मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 

घोटाळ्याचा आरोप

स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑपरेटिव्ह बँक अर्थात एसटी बँकेत 450 कोटींचा घोटाळा झाल्याचा संचालकांचा आरोप आहे. त्यामुळे संचालकांनी हे पाऊल उचलल्याचं सांगितलं जात आहे. यापूर्वीच 14 संचालक नॉट रिचेबल झाले होते. त्यानंतर आज या संचालकांनी थेट बंडाचं अस्त्र उगारल्याने सदावर्ते यांच्यासाठी हा मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे. या निमित्ताने संचालकांचा सदावर्ते यांच्यावर विश्वास नसल्याचंही अधोरेखित झालं आहे.

सामंत यांची भेट

दरम्यान, या बाराही संचालकांनी यापूर्वी उद्योगमंत्र उदय सामंत यांची भेट घेतली होती. उदय सामंत यांची भेट घेऊन त्यांनी सामंत यांना पाठिंबा जाहीर केला होता. तर, काही दिवसांपूर्वीच गुणरत्न सदावर्ते यांनीही सपत्नीक उदय सामंत यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली होती. त्यानंतर या घडामोडी घडल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात असून राजकीय कयास लावले जात आहेत.


पत्र्याच्या शेडला लागलेली आगीत अंध वृध्देचा दुर्दैवी मृत्यू.


*पत्र्याच्या शेडला लागलेली आग एवढी भडकली की त्यामध्ये साडपलेल्या अंध वृद्धाला बाहेर पडताच आलं नाही. त्यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. 

बीड (प्रतिनिधी) जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील आलापूर येथे पत्र्याच्या शेडला अचानक आग लागली आणि घरामध्ये असलेल्या एका अंधवृद्धाचा होरपळून दुर्दैव मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अंध असलेल्या वृद्ध रामभाऊ यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. या घटनेची माहिती मिळताच दिंद्रुड पोलीस आणि प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी घटनास्थळावर पोहोचले होते आणि त्यांनी या घटनेचा पंचनामा केला आहे.

आलापूर येथील रामभाऊ शहाणे आणि रुक्मिणीबाई शहाणे हे दांपत्य गावात एका पत्राच्या शेडमध्ये राहत होते. रुक्मिणीबाई या शेतात कापूस वेचण्यासाठी गेल्या होत्या तर अंध असलेले रामभाऊ हे आजारी असल्याने ते घरातच झोपून होते. मात्र दुपारच्या वेळी अचानक त्यांच्या शेडमध्ये आग लागली आणि काही वेळातच आग एवढी पसरली की संपूर्ण घर आगेच्या भक्षस्थानी गेलं. या आगीच्या घटनेत होरपळून रामभाऊ शहाणे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

आग लागल्याची माहिती मिळताच गावकरी तात्काळ त्या ठिकाणी दाखल झाले. त्यांनी आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले, मात्र अंध असलेल्या रामभाऊ यांना स्वतःचा जीव वाचवण्यासाठी शेडच्या बाहेर येता आलं नाही. त्यामुळे आग विझवण्यापूर्वीच त्यांचा दुर्दैवी शेडमध्ये मृत्यू झाला. तर घरामध्ये दुसऱ्या खोलीत असलेल्या गॅस सिलेंडरपर्यंत आग पोहोचण्या अगोदरच गावकऱ्यांनी ही आग विझवली. त्यामुळे पुढचा अनर्थ टळला.



अहो आश्चर्यच झाले! विहिरीसह अनुदान देखील चोरीला, तत्कालीन बीडीओसह पाच जणांवर गुन्हा दाखल.



*केज येथील तत्कालीन गटविकास अधिकाऱ्यां सह सरपंच, ग्रामसेवक आणि इतर तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

बीड :(प्रतिनिधी) आत्तापर्यंत आपण अनकेदा विहीर चोरीला गेल्याच्या बातम्या ऐकल्या असतील. मात्र, बीड  जिल्ह्यात तर विहिरीसह प्रकार अनुदान देखील चोरीला गेल्याचा प्रकार समोर आला आहे. कारण, बनावट कागदपत्राच्या आधारावर प्रस्ताव तयार करून एका शेतकऱ्यांच्या नावावर मनरेगाच्या विहिरीचे 2 लाख 90 हजार रुपये उचलण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी केज येथील तत्कालीन गटविकास अधिकाऱ्यांसह सरपंच, ग्रामसेवक आणि इतर तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

अधिक माहितीनुसार, साहेबराव जाधव या शेतकऱ्यांच्या नावावर बनावट विहिरीचे कागदपत्र तयार करून जलसिंचन विहिरीचे परस्पर 2 लाख 90 हजार रुपये गटविकास अधिकाऱ्यांनी उचलले होते. त्यानंतर साहेबराव जाधव या शेतकऱ्यांच्या तक्रारीवरून गटविकास अधिकाऱ्यांसह त्यांची फसवणूक करणाऱ्या लोकांवर केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे शेतकरी साहेबराव जाधव यांना 2017 सालीच विहीर मंजूर झाली होती. मात्र, यादीमध्ये त्यांचं नाव वगळण्यात आलं होतं. पण काही दिवसांनी गटविकास अधिकारी, सरपंच, ग्रामसेवकाने संगमत करून जाधव यांच्या नावाचे बनावट दस्ताऐवज तयार केले. याच दस्तऐवजाच्या मदतीने कागदोपत्री विहीर मंजूर करून 2 लाख 90 हजार रुपयाची रक्कम परस्पर उचलण्यात आली. ही बाब शेतकऱ्याच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी केज पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. 

नेमकं काय आहे प्रकरण? 

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील शेलगाव गांजी येथील शेतकरी साहेबराव सखाहरी जाधव यांची साळेगाव शिवारातील वडिलोपार्जित सर्व्हे नंबर 166 मध्ये दोन एकर जमीन आहे. त्या वडीलोपार्जीत जमीनीत पोट खराबा क्षेत्रात पूर्वीची जुनीच 40 फुट खोल विहिर आहे. सदर विहिर ही पोट खराब क्षेत्रात असल्याने त्या विहिरीची 7/12 रेकॉर्डला नोंद नाही. या विहीरीतील पाणी हे साहेबराव जाधव व त्यांचे भाऊ वापरतात. सन 2022 मध्ये मनरेगा योजने अंतर्गत गावातील शेतकऱ्यांना जलसिंचन विहिरी मंजुर झाल्या होत्या. परंतु, साहेबराव जाधव हे विहीरीसाठी पात्र असताना देखील त्यांचे नाव मंजूर यादीत नसल्याने त्यांनी चौकशी केली. यावेळी पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी त्यांना कळविले की, त्यांच्या नावाने सन 2016-17 मध्येच विहिर मंजुर झाली होती. त्याचे 2 लाख 90 हजार रु मंजूर झालेले अनुदान वितरित झाले असल्याचे कागदपत्रे आढळून आले. त्यामुळे जाधव यांना देखील धक्का बसला. त्यामुळे त्यांनी थेट पोलिसांत धाव घेऊन गुन्हा दाखल केला आहे. 

खासगी बालवाड्यांवर आता राज्य सरकारचे नियंत्रण. येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधेयक मांडले जाण्याची शक्यता.

पुणे :(प्रतिनिधी) राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०नुसार पूर्वप्राथमिक शिक्षणात समानता आणण्यात येणार आहे. त्यासाठी खासगी बालवाड्यांची मान्यता, किमान सुविधा, अभ्यासक्रम या संदर्भात नियंत्रण आणण्यासाठीच्या नियमावलीचा मसुदा शिक्षण विभागाने तयार करून राज्य शासनाला सादर केला आहे. येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात खासगी बालवाड्यांवर नियंत्रणाचे विधेयक मांडले जाण्याची शक्यता आहे.
राज्यात शासकीय अंगणवाड्यांसह खासगी बालवाड्या अक्षरश: गल्लोगल्ली आहेत. मात्र त्यावर कोणतेही शासकीय नियंत्रण नाही. बालवाडी सुरू करण्यासाठीची मान्यात प्रक्रियाही सध्या अस्तित्त्वात नाही. मात्र राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०नुसार पूर्वप्राथमिक शिक्षण आता शिक्षणाच्या चौकटीत आणण्यात आले आहे. तसेच पूर्वप्राथमिक ते दुसरीसाठीचा राज्य स्तरावरील अभ्यासक्रमही तयार करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०ची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने आता राज्यातील खासगी बालवाड्यांवर सरकारी नियंत्रण आणण्यात येणार आहे.

शिक्षण आयुक्त सूरज मांढरे म्हणाले, की खासगी बालवाड्यांवर नियंत्रण आणण्याबाबतच्या नियमावलीचा मसुदा तयार करून काही दिवसांपूर्वी राज्य शासनाला सादर करण्यात आला. तज्ज्ञांच्या मदतीने सखोल अभ्यास करून ही नियमावली तयार करण्यात आली आहे. त्यात मान्यता प्रक्रिया, अभ्यासक्रम, किमान सुविधा यावर भर देण्यात आला आहे. खासगी बालवाड्यांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने होणाऱ्या शिक्षण प्रक्रियेत समानता आणण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. या नियमावलीचे विधेयक तयार होऊन येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडले जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर या नियमावलीची अंमलबजावणी सुरू केली जाणार आहे. 
राज्य अभ्यासक्रम आराखड्यावर  सुमारे बाराशे हरकती-सूचना राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने पायाभूत स्तरासाठीचा राज्य अभ्यासक्रम आराखडा तयार करून जाहीर केला होता. तसेच त्यावर हरकती सूचना मागवल्या होत्या. या आराखड्यावर आलेल्या सुमारे बाराशे हरकती-सूचना विचारात घेऊन आता लवकरच अंतिम आराखडा जाहीर करण्यात येणार आहे.

Wednesday, December 27, 2023

आवक-जावक नोंदवहीत उपजावक क्रमांक टाकून स्विकारलेले दीडशे शिक्षकांची मान्यता रद्द.


परभणी : (प्रतिनिधी) आवक-जावक नोंदवहीत उपजावक क्रमांक टाकून स्विकारलेले प्रस्ताव व त्यानंतर शिक्षणाधिकारी कार्यालयाने दिलेल्या जिल्ह्यातील १५४ शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक मान्यता विभागीय उपसंचालक अनिल साबळे यांनी रद्द केल्या असून संबंधित शाळा व्यवस्थापन व शिक्षणाधिकारी कार्यालयाला संबंधितांचे वेतन थांबवण्याचे आदेश देखील बजावले आहे. दरम्यान, यातील बहुतांश शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी शिक्षण उपसंचालकांच्या या आदेशास उच्च न्यायालयात धाव घेऊन स्थगिती मिळवल्याची माहिती सुत्रांनी दिली.

तत्कालीन माध्यमिक शिक्षणाधिकारी वंदना वाव्हूळ यांच्या कार्यकाळात सन २०१५ ते २०१८ या कालावधीतील आवक-जावक नोंद वहीत एका जावक क्रमांकाच्या खाली दुसरा उपजावक क्रमांक टाकून मोठ्या संख्येने शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना वैयक्तिक मान्यता देण्याचा प्रकार उघड झाला होता.

या प्रकरणी त्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षण उपसंचालक व शिक्षण संचालकांकडे देखील तक्रार करून चौकशीची मागणी केली होती. चौकशी समितीचे अध्यक्ष तथा हिंगोलीचे तत्कालीन शिक्षणाधिकारी पी. बी. पावसे यांच्या समितीने चौकशी करुन आपला अहवाल शिक्षण उपसंचालक अनिल साबळे यांच्याकडे सादर केला होता. त्यामध्ये आवक-जावक नोंदवहीत ५३ ठिकाणी उपरीलेखन व खाडाखोड केल्याचे स्पष्ट झाले होते. उपसंचालक कार्यालयाने या प्रकरणी संबंधी शाळेचे संस्थाचालक, मुख्याध्यापक, संबंधीत शिक्षक, शिक्षणाधिकारी व अन्य कर्मचाऱ्यांची सप्टेंबर २०२२ मध्ये सुनावणी घेतली होती. या सर्वांचे लेखी म्हणणे देखील घेण्यात आले होते.

त्यानंतर तब्बल वर्षभरानंतर नोव्हेंबर २०२३ मध्ये शिक्षण उपसंचालक कार्यालय याबाबतचे आदेश काढले असून डिसेंबर २०२२ मध्ये ते संबंधित शाळांना पाठवले. या आदेशात संबंधित शिक्षकांना दिलेले सर्व मान्यता आदेश अनियमित असल्याचे ठरवून ते रद्द करण्यात येऊन सेवा संपुष्टात आणण्याच्या सूचना संंबंधित व्यवस्थापनाला दिल्या आहेत. या निर्णयामुळे जिल्ह्यातील ३८ शाळेतील १५४ शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या सेवा समाप्त होणार आहेत.


त्याच बरोबर या कर्मचाऱ्यांना दिलेल्या मान्यतेच्या मुळ प्रति शिक्षणाधिकारी कार्यालयात जमा करण्याच्या देखील संस्थाचालकांना सूचना आहे. शासनाचे झालेल्या आर्थिक नुकसानीबाबत शिक्षणाधिकारी (मा.) यांनी नियमानुसार कार्यवाही करावी, असेही या आदेशात नुमद करण्यात आले आहे.

उपरी लेखन प्रकरणी जिल्ह्यातील १५४ शिक्षकांच्या सेवासमाप्तीचे छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय उपसंचालक अनिल साबळे यांनी निर्गमित केले. आदेश जिल्ह्यातील शाळांना डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात प्राप्त झाले. लगेचच या शाळा व संबधित बहुतांश शिक्षकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर येथील खंडपीठात धाव घेऊन या आदेशाला आव्हाण दिले आहे. उच्च न्यायालयाने शिक्षण उपसंचालकांच्या आदेशाला स्थगिती दिल्याची माहिती सुत्रांनी दिली.

छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडूनच संबंधित शाळांना सदरील आदेश देण्यात आलेले आहेत. त्यानुसार कारवाई करण्याची जबाबदारी मुख्याध्यापक, संबंधित व्यवस्थापनाची आहे. शिक्षण विभाग शिक्षण उपसंचालक कार्यालयाने दिलेल्या निर्देशानुसार कारवाई करेल.

परभणीच्या रस्त्यांचे भाग्य उजळणार खड्डेमय रस्त्यांपासून होणार सुटका.


परभणी (प्रतिनिधी): परभणी शहरातील रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झालेली आहे. त्यामुळे रस्त्यांवरून वाहने चालविणेही कठीण झाले आहे. मात्र, परभणीकरांचे हे कठीण दिवस संपण्याची आशा निर्माण झाली असून रस्त्यांचे भाग्य उजळण्याची शक्यता आहे. परभणीच्या रस्ते कामांसाठी गुजरातच्या कंपनीला कंत्राट मिळाले आहे. महिनाभरात कामे सुरू होण्याची आशा आहे.

फेब्रुवारी २०२२ मध्ये महानगरपालिकेने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरित केलेल्या शहरातील ६० कोटीच्या रस्ते बांधकामाची निविदा प्रक्रिया ऑगस्ट २०२३ मध्ये पूर्ण झाली आहे. शासनाकडे निविदा स्विकृती व कार्यरंभ आदेश प्रलंबित आहेत. गुजरात राज्यातील सृजन इंन्फ्रॉकॉन या कंपनीची निविदा मंजूर झाल्यामुळे शासनाकडून त्यास मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.

राज्यात महाविकास आघाडीचे शासन असताना महानगरपालिकेने शहरातील व ग्रामीण भागांंना जोडणारे रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाकडे घ्यावीत व त्या रस्त्यांचे नूतनीकरण करावे, अशी मागणी तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे केली होती. ही मागणी तात्काळ मान्य होऊन शहरातील प्रमुख रस्त्यांचे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरण करण्यात आले होते व त्यास मान्यता देखील मिळाली होती. शहर व ग्रामीण भागांना जोडणाऱ्या रस्त्यांसाठी ८० कोटींचा निधी देखील मंजूर करण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. फेब्रुवारी २०२२ मध्ये या सर्व रस्ते कामांचे उद्घाटन चव्हाण यांच्या हस्ते ठिकठिकाणी करण्यात आले होते. परंतु, त्यानंतर मात्र जून २०२२ मध्ये सत्तांतर झाले. शासनाने सर्व विभागांची कामे व निधी रोखला.

रस्त्यासाठी आंदोलने

शहरातील हे प्रमुख रस्ते असून या रस्त्यांवर प्रचंड राबता असतो. परंतु, त्याची अत्यंत दुरवस्था झालेली आहे. तीनही ऋतूत नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. खड्डेमय रस्ते, त्यामध्ये साचलेले गटारांचे पाणी, धुळ, दगडगोट्यांमुळे नागरीक त्रस्त झालेले आहे. त्यामुळे या रस्त्यांसाठी शहरात वेगवेगळ्या ठिकाणी नागरीकांनी, लोकसेवकांनी लक्षवेधक आंदोलने देखील केली आहेत. परंतु, रस्यांचा प्रश्न अद्यापही मार्गी लागलेला नाही.

नांदेड येथील सार्वजनिक बांधकाम मंडळाच्या अधीक्षक अभियंत्यांनी शहरातील या रस्तेकामांसाठी निविदा प्रक्रिया राबवली होती. किती वेळेस राबवली हा मुद्दा गौण आहे, परंतु अंतिमतः निविदाधारक एजन्सीच्या निविदेला मात्र मंजुरी मिळालेली आहे. ता. २९ ऑगस्ट २०२३ रोजी या संदर्भात अहमदाबाद (गुजरात) येथील सृजन इंन्फ्राकॉन प्रा. लिमीटेड या कंपनीला पत्र दिले आहे.

त्यामध्ये महापालिका हद्दीतील जिल्हा सामान्य रुग्णालय ते राष्ट्रीय महामार्ग ६१ पर्यंत व परभणी-जांब, आळंद, भोगाव रस्ता, अनुसया टॉकीज ते रेल्वे क्रॉसिंग पर्यंत, जायकवाडी कॅनॉल ते खंडोबा रस्ता, राष्ट्रीय महामार्ग ६१ ते गायकवाड मळा, जुना पेडगाव रोड, महाराणा प्रताप चौक ते धाररोड, मरीआई मंदिर ते कारेगा रोड, कब्रस्थान ते अक्षदा मंगल कार्यालय या एकून १३ ते १४ किलोमीटर रस्त्यांचे मजबुतीकरणासह डांबरी नूतनीकरण कऱणे, या रस्त्यांवर दुभाजकासह चार पदरी सीसी पेकर शोल्डर नाली, युटिलीटी, पथदिवे व वृक्षारोपणासह सुधारणा कराव्यात असे या पत्रात नमूद केले आहे. या कामाच्या देयकाची तसेच बँक गॅरटींच्या स्वरुपात भरणा केलेल्या बीड सेक्युरीटीचा विधीग्राह्यता कालावधीत पुढे किमान सहा महिन्यासाठी म्हणजे ता. २८ फेब्रुवारी २०२४ पर्यंत वाढ करावी, असेही या पत्रात म्हटले आहे.

महानगरपालिका अंतर्गत कामे मंजूर असून कामाची निविदा स्विकृती मंत्रालय स्तरावर आहे. सार्वजनिक बांधकाम मंडळाने अहमदाबाद येथील सृजन इंन्फ्राकॉन या कंपनीची निविदा मंजूर केली असून त्या निविदेला स्विकृती व कार्यारंभ आदेश मिळाल्यानंतर कामांना सुरुवात केली जाईल.

— बालाजी शिंदे, उपविभागीय अभियंता, सा.बां.वि. परभणी.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या.कुलगुरूंच्या दालनात मा.कुलगुरूंच्या प्रतिमा.


छत्रपती संभाजीनगर :(प्रतिनिधी) डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या स्थापनेपासून आजपर्यंत सेवा केलेल्या सर्व माजी कुलगुरूंच्या प्रतिमा कुलगुरू दालनात लावण्यात आल्या आहेत. कोणत्याही आस्थापनेत मुख्य पदावर काम केलेल्या व्यक्तींच्या नावाची यादी, प्रतिमा व कार्यकाल दिलेला असतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात माजी कुलगुरूंच्या नावांची यादी लावण्यात आलेली होती. मात्र, माजी कुलगुरूंच्या प्रतिमा लावण्यात आलेल्या नव्हत्या. ही बाब लक्षात आल्यावर सर्व कुलगुरुंच्या प्रतिमा लावण्याचे आदेश कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांनी आस्थापना विभागाला दिले.

विद्यापीठाच्या स्थापनेनंतर ६५ वर्षात विद्यापीठास १६ पूर्णवेळ कुलगुरु लाभले. मिलिंद महाविद्यालयाचे प्राचार्य असलेल्या एस. आर. डोंगरकेरी यांना पहिले कुलगुरु होण्याचा बहुमान मिळाला. नामविस्तारावेळी कुलगुरू डॉ. विठ्ठलराव घुगे होते. डॉ. बी.ए.चोपडे हे १५ वे कुलगुरू होते. तर प्राध्यापक डॉ.प्रमोद येवले हे १६ वे पूर्णवेळ कुलगुरु असून ’औषधनिर्माणशास्त्र’ विद्याशाखेतून आलेले पहिले कुलगुरु आहेत. १६ जुलै २०१९ ते ३१ डिसेंबर २०२३ असा त्यांचा कार्यकाळ आहे. विद्यापीठाचे छायाचित्रकार पंकज बेडसे यांनी या सर्व छायाचित्रांचे संपादन केले आहे. आजपर्यंतच्या सर्व १५ माजी कुलगुरु यांच्या प्रतिमा दोन दिवसांपूर्वी लावण्यात आल्या आहेत, अशी माहिती कुलसचिव डॉ.भगवान साखळे यांनी दिली.

साहित्य, संस्कृती, विज्ञान, तंत्रज्ञान, विधी आदी क्षेत्रात नावलौकिक मिळवलेल्या कुलगुरूंची परंपरा आपल्या विद्यापीठाला लाभली आहे. आजपर्यंत मला पाच विद्यापीठांच्या कुलगुरूपदी काम करण्याची संधी मिळाली. उर्वरित चारही विद्यापीठांमध्ये कुलगुरूंच्या नावासह कार्यकाळ व प्रतिमा लावण्यात आलेले आहेत. या विद्यापीठात सर्व माजी कुलगुरूंच्या प्रतिमाही सन्मानपूर्वक कुलगुरूंच्या दालनात लावण्यात आल्या आहेत.

डॉ. प्रमोद येवले, कुलगुरू


पाझर तलावात गेलेल्या जमिनीचा अधिकच्या मोबदल्यासाठी न्यायालयाचा निकालच बदलला,बीड जिल्ह्यातील घटनेने खळबळ.

बीड (प्रतिनिधी) : बीडच्या गेवराई तालुक्यातील निपाणी जवळका पाझर तलावाच्या मावेजाप्रकरणी धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पाझर तलावात गेलेल्या जमिनीच्या मोबदल्यात मावेजा मिळावा या प्रकरणी 2016 साली बीडच्या न्यायालयाने निर्णय दिला होता. मात्र, काही दिवसांनी या निकालाचे एकूण 6 पानेच बदलण्यात आल्याचे समोर आले आहे. दरम्यान, आता या प्रकरणी अज्ञात लोकांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

गेवराई तालुक्यातील निपाणी जवळका येथील पाझर तलावासाठी जमीन संपादित करण्यात आली होती. यावेळी भूसंपादन अधिकाऱ्यांनी जमिनीचा मावेजा मंजूर केला होता. मात्र, भूसंपादन अधिकाऱ्यांकडून देण्यात येणारा मावेजा तक्रारदारांना मान्य नव्हता. त्यामुळे मिळणाऱ्या नुकसान भरपाईच्या नाराजीने वाढीव मावेजा मिळावा, यासाठी न्यायालयात पाच प्रकरणे दाखल करण्यात आली होती. त्यानुसार 2 जुलै 2016  रोजी तत्कालीन सहदिवाणी न्या. व स्तर न्यायधीश साजिद आरेफ सय्यद यांनी संबंधित प्रकरणे निकाली काढली होती. मात्र, न्यायालयाने दिलेल्या निकालाच्या पानात काही दिवसांनी हस्तक्षेप करून निकालाचे सहा पानेच बदलण्यात आले. दरम्यान, सहायक सरकारी वकील यांना ही बाब लक्षात येताच त्यांनी हा प्रकार न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिला. त्यानुसार आता न्यायालयाच्या वतीने कार्यालयीन अधीक्षकांनी यांनी दिलेल्या तक्रारीवरून बीडच्या शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

असा झाला उलगडा.

न्यायालयाच्या निकालाच्या प्रतीचा कागद हा जाड असतो, मात्र बदलण्यात आलेली कागद तेवढी जाड नाहीत. सोबतच, नवीन पानावर वाढीव मावेजाची रक्कम लिहिण्यात आली होती. त्यामुळे,  सहायक सरकारी वकिलांनी या प्रकरणातील प्रमाणित प्रतींची मागणी करून पाहणी केली. यावेळी निर्णयातील पान क्रमांक 9, 10, 17, 19, 20 व 25 हे बदलल्याचे त्यांना दिसून आले. त्यामुळे निकालाच्या पानात फेरफार करून पानेच बदलण्यात आल्याचे त्यांच्या लक्षात आले. 

अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल 

दरम्यान, या सर्व घटनेची न्यायालयाने गंभीर दखल घेतली आहे. तर, जिल्हा व सत्र न्यायालयाचे अधीक्षक नरेंद्र पाठक यांच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात शिवाजीनगर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. ज्यात, भारतीय दंड संहिता 1860 अधिनियमचे कलम 34, 420, 465, 467, 468, 471 हा गुन्हा दाखल झाला आहे. तर, पोलिसांकडून पुढील तपास केला जात आहे. 

दीडशे वर्षांपूर्वीच्या आसपासच्या कुणबी नोंदी मोडी लिपीत!


केज (प्रतिनिधी)  कुणबी नोंदीचा शोध घेण्याचे काम सध्या महाराष्ट्रात सुरू आहे. भूमी अभिलेख कार्यालयात तालुक्यातील विविध गावच्या नोंदी तपासल्या जात आहेत. मोडी लिपी वाचक केज येथील कार्यालयात दोन दिवसांपासून या नोंदी तपासत आहेत. त्यामध्ये केज तालुक्यातील मौजे चंदनसावरगाव येथील जवळपास दीडशे वर्षांपूर्वीच्या आसपासच्या कुणबी नोंदी दिसून आल्या आहेत. या तपासणीत सध्या जवळजवळ 74 नोंदी जुळून आल्या आहेत.


केज येथील भूमी अभिलेख कार्यालयात सोमवारी चंदनसावरगाव येथील कुणबी नोंदी, मोडी लिपी वाचक वैभव जगताप साहेब, भूमी अभिलेख कार्यालयाचे कळेकर साहेब व त्यांच्या सर्व टिमने तपासल्या असता त्यामध्ये जवळपास 180 पेक्षा जास्त कुणबी नोंदी निदर्शनास आल्या परंतु नोंदीचे कागद काही जीर्ण झालेले असल्याने त्यापैकी सध्या जवळपास 74 नोंदी जुळून आल्या आहेत. या नोंदी तपासणीसाठी चंदनसावरगाव येथील गावकरी मोठ्या संख्येने रात्री उशिरापर्यंत भूमी अभिलेख कार्यालयात बसून होते, या नोंदीची खात्री झाल्यावर त्यांनी मोठा आनंद व्यक्त केला. यावेळी चंदनसावरगावचे प्रसिद्ध मराठा आरक्षण आंदोलक उपोषणकर्ते डिगांबर तपसे यांच्यासह संजय तपसे, बालासाहेब तपसे, दत्ता तपसे, राहुल तपसे, अनिकेत तपसे, गणेश नखाते आणि पत्रकार रामदास तपसे इत्यादींची उपस्थीती होती . मोडी लिपी वाचक वैभव जगताप साहेब व भूमी अभिलेख कार्यालयाचे कळेकर साहेब आणि त्यांच्या सर्व स्टाफने आपला पुर्ण वेळ देऊन दिवसभर व रात्री उशिरापर्यंत देखील अथकपणे केज तालुक्यातील विविध गावच्या नोंदी तपासल्या, त्याबद्दल त्यांचे मराठा समाजाकडून आभार व्यक्त करण्यात येत आहेत.

Tuesday, December 26, 2023

जिल्हा पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्या लेखी आश्वासनानंतर परळी बंद मागे.गवळी यांचे उपोषणही स्थगित.

*अप्पर पोलीस अधिक्षक कविता नेहरकर करणार कदम यांची चौकशी. 

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) बीड जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी मुक्ताराम गवळी मारहाण प्रकरणाचा तपास व चौकशी अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक कविता नेहरकर मॅडम यांच्याकडे देत असल्याचे लेखी पत्रानंतर  आजचा परळी बंद मागे घेण्यात आला आहे. तसेच  सामाजिक कार्यकर्ते तथा इंजेगावचे माजी उपसरपंच मुक्ताराम गवळी यांचे मारहाण करणाऱ्या  पो.नि. हेमंत कदम यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सुरू असलेले उपोषणही स्थगित करण्यात आले आहे. दरम्यान बंदला पाठिंबा देणाऱ्या सर्व पक्ष सामाजिक संघटना व संस्थेचे आणि कार्यकर्त्यांचे बौद्धजन संघर्ष समितीच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले आहेत.
    मंगळवार दिनांक 26 डिसेंबर रोजी बौद्धजन संघर्ष समिती परळी तालुक्याच्या वतीने परळी बंद पुकारण्यात आला आहे. या बंदला विविध पक्ष व संघटनांनी पाठिंबा दिला आहे.
      मुक्ताराम गवळी हे परळी तालुक्यातील मौजे इंजेगाव येथील बौद्ध समाजाचे सामाजिक कार्यकर्ते आहेत.तसेच अनेक वर्ष उपसरपंच होते.ते  दिनांक 19 ऑक्टोबर 2023 रोजी फिर्यादी राहुल आश्रुबा झिंजुर्डे यांच्या शेतातील सोयाबीन चोरून नेणारा विरुद्ध तक्रार दाखल करण्यासाठी त्यांच्यासोबत परळी ग्रामीण स्टेशनला गेले होते. यावेळी  तक्रार तब्बल सात ते आठ तास दाखल करून घेण्यात आली नाही.
    रात्री 9 च्या  दरम्यान पोलीस निरीक्षक हेमंत कदम हे ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये आले. त्यावेळी फिर्यादी राहुल झिंजुर्डे फिर्याद देत असतानाच हेमंत कदम यांनी मुक्ताराम गवळी यांना तू कोण, तुझी लायकी काय? माझ्यासमोर बसण्याचे तुझी लायकी नाही.असे म्हणत जातिवाचक शिवीगाळ करीत मारहाण केली. व पोलीस स्टेशनच्या बाहेर हाकलले. एवढ्यावरच न थांबता गोळ्या घालून जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी गवळी यांनी पोलिस महासंचालक औरंगाबाद, जिल्हा पोलिस अधीक्षक बीड, उपविभागीय पोलिस अधिकारी अंबाजोगाई यांना तक्रार केली.तसेच शहर पोलीस स्टेशन परळी येथे हेमंत कदम यांच्यावर मारहाणीचा गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी दिनांक 7डिसेंबर रोजी अर्ज दिला होता.
     याप्रकरणी पोलिस महासंचालक औरंगाबाद, जिल्हा पोलिस अधीक्षक बीड, उपविभागीय पोलीस अधिकारी अंबाजोगाई, उपजिल्हाधिकारी कार्यालय परळी,शहर पोलीस स्टेशन परळी यांना निवेदन दिले.दिलेल्या अर्ज, पोलीस प्रशासनाने कोणतीही कारवाई केली नाही म्हणून अखेर दिनांक 20 डिसेंबर पासून  परळी शहर पोलीस स्टेशन समोर आमरण उपोषणाला सुरुवात केली.उपोषणाला पाच  दिवस झाले परंतू प्रशासनाने दखल घेतली नाही. कोणतीही कारवाई केली नाही.त्यामुळे पोलीस निरीक्षक हेमंत कदम यांच्यावर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी बौद्ध जन संघर्ष समितीच्या वतीने मंगळवार दिनांक 26 डिसेंबर रोजी परळी बंदचे आवाहन करण्यात आले होते.
    दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी रात्री 9 वाजता लेखी पत्र दिले आहे. हेमंत कदम यांच्यावर कारवाई करण्यासाठी अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक अंबाजोगाई कविता नेहरकर यांच्याकडे तपास दिला आहे. तसेच संभाजीनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सलीम चाऊस यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या पत्रानंतर उपोषण व बंद मागे घेण्याचे विनंती केल्यानंतर उपोषण स्थगित करण्यात आल्याचे मुक्ताराम गवळी यांनी म्हटले आहे. तर आजचा बंद मागे घेत असल्याचे बहुजन संघर्ष समितीच्या वतीने म्हटले आहे. या बंदसाठी पाठिंबा देणाऱ्या सर्व पक्षांचा तसेच संघटनांचा बहुजन संघर्ष समितीच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले आहेत.
      

Monday, December 25, 2023

धक्कादायक घटना! हुंड्यासाठी विवाहिते ला जिवे मारले.सासरच्या मंडळींनी दोन्ही हात बांधून, शेततळ्यात सोडले...


पुणे (प्रतिनिधी) - पुणे ग्रामीण हुंडा देणे आणि घेणे दोन्हीही कायद्याने गुन्हा आहे. त्यामुळं यावर अंकुश बसावा यासाठी शासनाने कठोर नियम देखील केले आहेत. परंतु, आजही काही ठिकाणी अनेक मुलींचा हुंड्यासाठी छळ केला जात आहे. सुनेचा हुंड्यासाठी सासरच्या लोकांकडून छळ होण्याच्या अनेक धक्कादायक घटना आजवर समोर आल्या असून, अशीच एक भयाण घटना सुसंस्कृत आणि सुशिक्षित समजल्या जाणाऱ्या पुणे जिल्ह्यातून समोर आली आहे.

पुणे जिल्हा बारामती तालुक्यात एका तरुण विवाहितेला हुंड्यासाठी दोन्ही हात बांधून, सासरच्या मंडळींनी शेततळ्यात बुडवून मारल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. तर या संतापजनक घटनेनंतर पती, सासू, नणंद व नंणदेचा पती या चौघांवर पोलिसांनी हत्या आणि हुंडा प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद केला असून, तालुक्यातील मासाळवाडी येथील चौघांनाही पोलिसांनी अटक केली आहे. तर सुरेखा भाऊसाहेब गडदरे अस मयत विवाहितेचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लग्नात अपेक्षेप्रमाणे हुंडा मिळाला नसल्यानं सासरचे लोक सुरेखाचा शारीरिक आणि मानसिक छळ करत होते, असा आरोप आहे. बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर पोलिसांनी याप्रकरणी पती भाऊसाहेब महादेव गडदरे, सासु ठकुबाई महादेव गडदरे नणंद आशा कोकरे व तिचा पती सोनबा कोकरे या चौघां विरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. दौंड तालुक्यातील गिरिम येथील नामदेव बबन करगळ यांनी पोलिसांकडे फिर्याद दिली. 24 डिसेंबर रोजी मासाळवाडीच्या भगवान गडदरे यांच्या शेतातील शेततळ्यात त्यांची विवाहित मुलगी सुरेखा भाऊसाहेब गडदरे हिचा मृतदेह आढळून आला. संबंधित आरोपींनी घराशेजारी असलेल्या शेततळ्यामध्ये सुरेखा हिचे दोन्ही हात बांधून तिला शेततळ्यात बुडवून मारले अशी फिर्याद तिचे वडील करगळ यांनी पोलिसांकडे दिली; त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला असून, इतक्या क्रूरपणे हुंड्यासाठी सुनेला मारणाऱ्या निर्दयी आरोपींना कडक शिक्षा करावी अशी मृत मुलीच्या कुटुंबानी मागणी केली आहे. 

राज्यात अंगणवाडी सेविका व मदतनिसां चा संप सुरू.अंगणवाडीतील चिमुकल्यांना शालेय पोषण आहारातून खाऊ मिळणार! जि प शिक्षक धडे देणार ?


बीड (प्रतिनिधी) राज्यात अंगणवाडी सेविका व मदतनिसांचा संप सुरू असून चिमुकल्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.यावर तात्पुरता पर्याय म्हणून आता बचतगट किंवा शालेय पोषण आहाराच्या माध्यमातून चिमुकल्यांना आहार दिला जाणार आहे. दुसरीकडे अंगणवाड्यांमधील चिमुकल्यांना सकाळी दोन तास जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांवरील शिक्षकांनी शिकवावे, असा मार्ग काढला जात असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळत आहे.

राज्यभरातील एक लाख आठ हजार अंगणवाड्यांमधील सेविका व मदतनीस कर्मचाऱ्यांनी ३ डिसेंबरपासून बेमुदत संप पुकारला आहे. काम बंदमुळे चिमुकल्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. राज्यभरात ६० लाखांपर्यंत चिमुकली आहे. एकात्मिक बालविकास प्रकल्पाअंतर्गत (आईसीडीएस) अंगणवाड्या चालविण्यात येतात. ‘आईसीडीएस’अंतर्गत अंगणवाड्या या सर्व आरोग्य, पोषण आणि शिक्षण विषयक योजनांचे मध्यवर्ती केंद्र आहेत. मात्र, शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळावा, मानधन नको वेतन द्यावे, पेन्शन योजना लागू करावी, अशा विविध मागण्यांसाठी राज्यातील सर्वच अंगणवाडी सेविका व मदतनीस कर्मचाऱ्यांनी बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले आहे.
19 दिवसानंतरही त्यावर तोडगा निघालेला नाही. भजन, ताटी-वाटी, खर्डा भाकरी अशा वेगवेगळ्या प्रकारची आंदोलन कर्मचाऱ्यांकडून केली जात आहेत. पण, आंदोलकांच्या मागण्यांसंदर्भात अजूनही शासन स्तरावर काहीही हालचाली सुरू नसल्याने अंगणवाड्यांमधील बालकांचे नुकसान होत आहे. त्यावर आता पर्याय शोधून चिमुकल्यांना पोषण आहार व अध्यापन केले जाणार असल्याची माहिती विश्वसनिय सूत्रांनी दिली. शालेय शिक्षण विभागासोबत चर्चा करून या पर्यायाची अंमलबजावणी केली जाणार आहे.

– शालेय पोषण आहारासोबत अंगणवाड्यांमधील चिमुकल्यांना पोषण आहार देणे
– बचत गटांच्या माध्यमातून चिमुकल्यांना पोषण आहार देणे
– झेडपीच्या प्राथमिक शाळांमधील पहिली- दुसरीच्या शिक्षकांमार्फत चिमुकल्यांना दररोज दोन तास शिकवणे
अधिकाऱ्यांची बैठक, संघटनांसोबत पुन्हा चर्चा
अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या बेमुदत काम बंद आंदोलनामुळे चिमुकल्यांचे नुकसान होवू नये, यासाठी तात्पुरत्या स्वरूपात काय उपाय करता येईल, यासंदर्भात राज्यातील सर्वच जिल्ह्यांमधील अधिकाऱ्यांसोबत एकात्मिक बालविकास प्रकल्पाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची ऑनलाइन बैठक पार पडली. त्यावेळी उपाययोजनां संदर्भात चर्चा झाली, पण संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी शासनाकडून पुढच्या आठवड्यात चर्चा होणार आहे.

परळीत बजरंग बली वेताळ मंदिरात श्री दत्त जन्मोत्सव उत्साहात साजरा.

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) प्रभु वैद्यनाथ ज्योतिर्लिंग मंदिर जवळील बजरंग बली वेताळ मंदिर येथे  सोमवार दिनांक 25 डिसेंबर रोजी गाणगापूरच्या प्रथेप्रमाणे  दुपारी १२ वाजता दत्त जन्मोत्सव उत्साहात झाला.
जन्मोत्सवासाठी मंदिर फुलांनी सजवण्यात आले होते.  श्री गुरुवर्य परमपूज्य विलासनंदजी महाराज यांच्या हस्ते श्रींचे पूजन महाआरती झाली. यावेळी दर्शनासाठी परळी शहर व पंचक्रोशीतून भाविक आले होते. यावेळी हजारो भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

गाणगापूरच्या प्रथेप्रमाणे   दुपारी 12 वा. श्री बजरंग बली वेताळ मंदिर येथे दत्त जन्मोत्सव सोहळा मोठ्या भक्ती पूर्ण व उत्साहात साजरा  झाला. आज सोमवारी श्री वेताळ मंदिर येथे दत्त जन्मोत्सव निमित्त श्री विलासानंद महाराज यांच्या हस्ते गुरुंचे, पादुकांचे पूजन करण्यात आले. यावेळी महिला भजनी मंडळांनी भक्तिगीते, भजन  गायीले. दत्त जन्मोत्सव निमित्त श्री वेताळ मंदिर सुंदर व आकर्षक विद्युत रोषणाईने सजविण्यात आले होती. महाप्रसादाने दत्त जन्मोत्सवाची सांगता झाली.

Sunday, December 24, 2023

तुळजापूर औसा महामार्गावर भीषण अपघात चौघांचा जागीच मृत्यू .


लातूर (प्रतिनिधी) तुळजापूर औसा महामार्गावर भीषण अपघात झाला असून यात चौघांचा जागीच मृत्यू झाला आहे. चौघांपैकी तिघेजण जिल्हा परिषदेचे शिक्षक असल्याची माहिती समोर आली आहे.कार आणि ऊसाच्या ट्रकचा गुरुवारी मध्यरात्री भीषण अपघात झाला. अपघातात कारचा चक्काचूर झाला होता.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, लातूर जिल्ह्यातील तुळजापूर औसा महामार्गावर ऊसाचा ट्रॅक्टर आणि कारची जोराची धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की कारचं इंजिन बाजूला निघून पडलं होतं. कारमधील चौघांचा जागीच मृत्यू झाला. मध्यरात्री झालेल्या या अपघातानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

गाडीतून मृतदेह बाहेर काढून ते औसा इथल्या ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांची नावे बाबा पठान, जीएम बिराजदार, रणदिवे आणि राजू बागवान अशी असल्याचं समजते. ट्रॅक्टर चालकाबाबत माहिती समजू शकली नाही. या अपघाताची नोंद पोलीसात झाली असून अधिक तपास सुरू आहे.

केंद्र सरकारने आयपीसी आणि सीआरपी सी चे जुने कायदे रद्द. नव्या कायद्यांची पोलिसांनाच धास्ती! नवीन कलमांच्या पाठांतराची करावी लागणार कसरत.


नागपूर (प्रतिनिधी) : केंद्र सरकारने आयपीसी आणि सीआरपीसीचे जुने कायदे रद्द करून नवीन कायदे तयार केले आहेत. यामुळे अनेक कलमांमध्ये बदल होणार आहे. यामुळे पोलिसांना गुन्ह्यातील कायद्याच्या नोंदी बदलाव्या लागणार आहे. तोंडी असलेले कलम विसरून नवे कलम पाठ करावे लागणार आहे.

केंद्र सरकारने आयपीसी व सीआरपीसीचे जुने कायदे रद्द केले. त्याऐवजी नवीन कायदे तयार केले असून संसदेच्या दोन्ही सभागृहात त्यांना मंजुरीही मिळाली. त्यामुळे आता लवकरच या नवीन कायद्याच्या कलमांन्वये पोलिसांसह संबंधित प्राधिकारणाला कार्यवाही करावी लागणार आहे.

जुन्या कायद्यातील अनेक कलमात सुद्धा बदल करण्यात आला आहे. त्यामुळे पोलिसांना या नवीन कलमांच्या आधारे गुन्हा नोंद करावा लागेल. त्यामुळे पोलिसांसह वकिलांनाही नव्या कायद्याचा अभ्यास करावा लागणार आहे. कायदे मागील तारखेपासून (रेट्रॉस्पेक्टिव्ह इफेक्ट) लागू झाल्यास काही प्रकरणावर परिमाण होण्याची शक्यता आहे.

ऊस तोडीसाठी गेलेल्या मजुराचा अंघोळ करताना तलावात पाय घसरून पडल्याने बुडून मृत्यू.


आष्टी (प्रतिनिधी) ऊस तोडीसाठी गेलेल्या 26 वर्षीय मजुराचा अंघोळ करताना तलावात पाय घसरून पडल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (दि.22) संध्याकाळी उघडकीस आली.

आष्टी तालुक्यातील कडा येथील मनोज कवडे वय 26 वर्ष हा अविवाहित तरूण अहमदनगर जिल्ह्यातील अंबालिका सहकारी साखर कारखान्यावर ऊसतोडणीचे काम करतो. सध्या सिध्दटेक येथे मजूरांचा फड ऊसतोडणीसाठी आलेला आहे. दरम्यान गुरूवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास मनोज कवडे जवळच असलेल्या तलावावर एकटा अंघोळीसाठी गेला होता.अंघोळ करत असताना अचानक पाय घसरल्याने तो तलावात बुडाला. पोहता येत नसल्याने त्याचा मृत्यू झाला. मनोज उशिरापर्यंत परत न आल्याने इतर मजूरांनी त्याचा शोध घेतला. तेव्हा तलावाच्या कडेला त्याचे कपडे आढळून आले. पाण्यात बूडाल्याचा संशय येताच शुक्रवारी सकाळपासून ग्रामस्थांसह इतर पट्टीच्या पोहणाऱ्यांनी तलावात शोध मोहीम सुरू केली.शुक्रवारी सायंकाळी मृतदेह आढळून आला. रात्री उशिरा कडा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, तीन भाऊ असा परिवार आहे.

ठरले ! 20 जानेवारीपासून मुंबईच्या आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार - मनोज जरांगे पाटील


बीड (प्रतिनिधी) मराठा आरक्षणासाठी सरकारला दिलेला अल्टिमेटम 24 डिसेंबरला संपत आहे. दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी 20 जानेवारी पासून मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार असल्याची घोषणा बीड येथे झालेल्या निर्णायक इशारा सभेत केली.

मराठा समाजाची सरकार फसवणूक करत आहे. सरकारला मराठा जात संपवायची आहे. आंदोलन शांततेत करायचं हेच आपलं ब्रम्हास्त्र आहे. मराठा आरक्षण आंदाेलन शांततेच्‍या मार्गानेच सुरु राहिल. जो हिंसा करेल तो आपला नाही असेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले.


यावेळी पुढे बोलताना जरांगे पाटील म्हणाले,मराठा बांधव कोणी शेतात, बाहेर गावी असताना घरी नोटीसा दिल्या. ट्रॅक्टर घेऊ जावू नको म्हणून नोटीसा दिल्या. मग मराठा म्हणाला. मी कुठेच नाही, नोटीसा दिल्या तर मग आता सगळ्यात पुढे मी असेन. कितीही नोटीसा देऊ द्या. आंदोलन करायचे परंतू शांततेत. शांततेच्या आंदोलनात खरी ताकत आहे. आपले शांततेचे आंदोलन कोणीच रोखू शकत नाही, असे सांगत सहन कधी पर्यंत करायचे. सुरूवातीला महिनाभराचा वेळ घेतला. आता 24 डिसेंबर तारीख सांगीतली. आणखी किती दिवस तारखा सांगणार? मराठ्यांनी कधीपर्यंत वाट पहायची? असे सांगत सभेतील उपस्थित मराठा बांधवांना तारीख ठरावायची का? असा सवाल जरांगे पाटील यांनी विचारला. गाफील राहु नका, मागं पुढे पाहून पाऊल टाका, काटे- कुटे पहा असे सांगत सरकारने 24 तारखेला मराठे मुंबईत येतील म्हणून 18 तारखेपर्यंत 144 कलम लागू केले. ठिक आहे, असू द्या 20 जानेवारीला मुंबईतील आझाद मैदानावर मी अमरण उपोषणाला बसणार आहे. मला भेटायला मराठे येतील. त्यांना कसे आडवाल? असा सवाल करत मराठ्यांना कधीपर्यंत दाबून ठेवणार आहात? असा सवाल करत दिलेली 20 तारीख पटली का? तारीख बदलायची का? म्हणत उपस्थित लाखो मराठा बांधवांना जरांगे पाटील यांनी विचारणा केली. यावेळी लाखो मराठा बांधवांनी हात वर करत 20 तारखेच्या आंदोलनाला अनुमोदन दिले.
सरकारने मराठा आरक्षणप्रश्‍नी शहाणपणाची भूमिका घ्यावी, आमच्यावर डाव टाकू नये. आता आरक्षण घेतल्याशिवाय मी मागे हटणार नाही. आझाद मैदान, शिवाजी पार्क येथे आमरण उपोषण होणार आहे. फक्त मराठा समाजाला डाग लागला नाही पाहीजे, एवढी काळजी घ्यावी, मुंबईला जाण्याची जोरदार तयारी करा, असे आवाहनही या वेळी मनोज जरांगे-पाटील यांनी केले.जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणप्रश्‍नी नोव्हेंबरमध्ये सरकारला २४ डिसेंबर अल्टिमेटम दिला होता. सरकारने याबाबत अद्याप कोणताही निर्णय न घेतला नाही. यामुळे आज पुन्‍हा एकदा जरांगे-पाटील यांनी आमरण उपोषणाची घोषणा केली आहे. आता मराठा आरक्षणप्रश्‍नी निर्णय घेण्‍यासाठी राज्‍य सरकारकडे २० तारखेपर्यंत वेळ असेल, असेही जरांगे-पाटील यावेळी म्हणाले.या जाहीर सभेला मराठा बांधवांचा लाखोंचा जनसागर लोटला होता.

Friday, December 22, 2023

मनोज जरांगे पाटील यांची इशारा सभेची जय्यत तयारी. मोठ्या संख्येने मराठा बांधव एकत्रित होणार.


बीड (प्रतिनिधी) उद्या 23 डिसेंबर रोजी बीड मधील पाटील मैदानावर मनोज जरांगे पाटील  यांची सभा होणार आहे. याच पार्श्वभूमीवर विशेष पोलीस महानिरीक्षक ज्ञानेश्वर चव्हाण, पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी सभास्थळी आढावा घेतला आहे. सभेच्या अनुषंगाने पोलीस प्रशासन आणि मराठा समन्वयकांमध्ये चांगला समन्वय आहे. ज्या बाबी महत्त्वाच्या वाटल्या त्यावर चर्चा झालीय. सभेसाठी येणाऱ्या आणि महामार्गावरील प्रवाशांना कुठलीही अडचण निर्माण होऊ नये या दृष्टीने नियोजन करण्यात आले आहे. वाहतुकीत बदल देखील करण्यात आलेला आहे. सभेच्या दिवशी या मार्गावर जड वाहतूक बंद केली जाईल केवळ अत्यावश्यक वाहनांनाच महामार्गावरून मार्ग मिळणार आहे. तर उपद्रवी लोकांवर लक्ष असल्याचे देखील विशेष पोलीस महानिरीक्षकांनी सांगितले.

तीन टन खिचडी, ट्रकभर केळी अन् चार लाख पाण्याच्या बाटल्या अशी आहे सभेची तयारी

उद्या बीडमध्ये मनोज जरांगे पाटील यांची इशारा सभा आहे. याच सभेची जय्यत तयारी सुरू झाली आहे. उद्या मोठ्या संख्येने मराठा बांधव एकत्रित येणार आहेत. त्यामुळे आयोजकांनी मोठी तयारी केली आहे. उद्या येणाऱ्या मराठा बांधवांसाठी तब्बल तीन टन खिचडी करण्यात येणार आहे. तर चार लाख पाणी बॉटल्स आणि एक ट्रक केळी वाटप करण्यात येणार आहे. उद्या होणारी सभा ऐतिहासिक होणार आहे. अगदी शांततेत ही सभा पार पडणार असल्याचा विश्वास समन्वयकांनी व्यक्त केला आहे.

भगव्या पताकांनी मैदान सजले

जरांगे पाटील यांची इशारा सभा आहे. त्याच निमित्ताने पाटील मैदान सज्ज झाले आहे. जरांगे यांची उद्या रॅली आहे त्याच पार्श्भूमीवर बीड शहर भगव्या पताक्याने सजवण्यात आले आहे. शहरातील सर्वच महापुरुषांच्या पुतळ्याचे सजावट करण्यात आले आहे. धुळे रस्त्यावरील पाटील मैदानात भव्य सभा होणार आहे.

जरांगे पाटलांनी दिलेला अल्टीमेटम 24 डिसेंबरला संपणार

24 डिसेंबर रोजी मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिलेला अल्टीमेटम संपणार आहे. त्यापूर्वी 23 डिसेंबर रोजी बीडमध्ये जरांगे पाटलांची इशारा सभा आयोजित करण्यात आली आहे . सोलापूर रोडवरील पाटील मैदानावर 100 एकर परिसरात ही सभा होणार आहे. या सभेतून जरांगे पाटलांचा इशारा नेमका सरकारला काय असणार? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. उद्या दुपारी दोन वाजता सभेला सुरुवात होणार आहे.

मराठा समाजातील विद्यार्थ्यांना हायकोर्टाचा मोठा दिलासा.! EWS मधून नियुक्त्या मिळण्याचा मार्ग मोकळा...


मुंबई (प्रतिनिधी) मागील अनेक वर्षापासून प्रतीक्षेत असलेल्या मराठा समाजातील विद्यार्थ्यांना; आर्थिक मागास वर्गातून (EWS) मधून नियुक्त्या मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कारण SEBC चं आरक्षण रद्द झाल्यानंतर MAT नं रोखलेल्या पदांची भरता आता करता येईल. यामुळे 408 उमेदवारांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिलाय. जवळपास 2019 पासून या नियुक्त्या रखडल्या होत्या. महाराष्ट्र लोकसेवा आयोग, वनसेवा, कर सहाय्यक, पीएसआय, कनिष्ठ अभियंता, इतर पदांसाठी या नियुक्त्या करण्यात येणार आहे. यामुळे 3 हजार 485 उमेदवारांना नियुक्त्या मिळणार आहेत.

एसईबीसी आणि ईडब्ल्यूएस आरक्षणाचे प्रकरण हे उच्च न्यायालायात प्रलिंबित होते. या प्रवर्गातून या विद्यार्थ्यांना दहा टक्के आरक्षणाची तरतूद करण्यात आली होती. परंतु  हे प्रकरण न्यायालयामध्ये असल्यामुळे या विद्यार्थ्यांच्या नियुक्त्या रखडल्या होत्या. त्यासाठी विद्यार्थ्यांनी उपोषणाचा देखील पवित्रा घेतला होता. पण आता पण आता हायकोर्टाने या नियुक्त्या EWS मधून करण्याचे निर्देश दिले असल्याने, आता या नियुक्त्या कधीपर्यंत होणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. 

न्यायालयाच्या निकालानंतर चंद्रकांत पाटील यांचे सूचक ट्विट...

मराठा समाजातील ३ हजार ४८५ उमेदवारांचा नोकरीचा मार्ग मोकळा झाला असून या उमेदवारांना EWS मधून नियुक्त्या दिल्या जाणार आहे. उच्च न्यायालयाच्या या निकालाने उमेदवारांना दिलासा मिळाला आहे. याच पार्श्वभूमीवर मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी सरकार प्रयत्नशील असेल अशी ग्वाही देतो.…

कै.त्र्यंबक आसरडोहकर प्रतिष्ठानचा पत्रकारिता पुरस्कार बाबा देशमाने यांना जाहीर.

अंबाजोगाई (प्रतिनिधी) येथील कै.त्र्यंबक आसरडोहकर प्रतिष्ठानचा दरवर्षीप्रमाणे दिला जाणारा मानाचा उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार यंदा बाबा श्रीहरी देशमाने यांना जाहीर झाला आहे. 
बाबा देशमाने हे मूळचे दिंदुड जवळच्या चाटगाव येथील राहणारे असून मुंबईहुन प्रकाशित होणाऱ्या 'आरोग्यदुत' चे संपादक आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संस्थेच्या वतीने 'आरोग्यदूत' प्रकाशित केले जाते. बाबा देशमाने यांनी अनेक वर्तमानपत्रांत उपसंपादक पदावर कार्य केले आहे. बीड जिल्ह्यातील या तरुण पत्रकाराने गोव्यात जाऊन पत्रकारिता केली आहे. 
त्र्यंबक आसरडोहकर प्रतिष्ठानच्या वतीने दिला जाणारा  हा ११ वा पुरस्कार आहे. या पूर्वी सय्यद दाऊद, श्रावणकुमार जाधव, दत्ता देशमुख, बाळासाहेब गाठाळ, गोविंद शेळके, अतुल कुलकर्णी, संदीप सोनवळकर, विद्या गावंडे. कलीम अजीम, शुभम खाडे यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. या पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम आणि स्मृती चिन्ह, शाल, श्रीफळ असे आहे  
हा पुरस्कार 20 जानेवारी रोजी मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येईल, असे प्रतिष्ठानच्या अध्यक्षा किरण आसरडोहकर यांनी सांगितले.

केदारपिठाचे जगदगुरू श्री.भीमाशंकरलिंग महास्वामीजींचे निर्भीड पत्रकार संतोष जुजगर यांनी घेतले आशिर्वाद.

परळी वैजनाथ (प्रतिनिधी)  श्रीक्षेत्र केदारपिठचे जगद्गुरु श्री श्री श्री 1008 भीमाशंकरलिंग शिवाचार्य महास्वामीजी हे आज परळी शहरात बारा ज्योतिर्लिंगापैकी एक प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेण्यासाठी आले होते. याप्रसंगी त्यांचा शुभ आशीर्वाद परळीचे निर्भीड पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते श्री.संतोष जुजगर यांनी घेतले.
यावेळी यावेळी वैद्यनाथ देवल कमिटीचे सचिव बाबासाहेब देशमुख सर, विश्वस्त अनिलराव तांदळे, अशोक स्वामी,मठपती गणेश स्वामी , सामाजिक कार्यकर्ते अश्विन मोगरकर, राजेंद्र ओझा, कमलाकरआप्पा हरेगावकर, महादेवअप्पा ईटके, मनोज एस्के, संतोष चौधरी, अ‍ॅड.मनोज संकाये, मंगलनाथ बँकेचे व्यवस्थापक गजानन हालगे, पत्रकार संजय खाकरे, संतोष जुजगर,  रमेश चौंडे, सुशील हरंगुळे, उमेश टाले, विनोद बांगर, शिरीष स्वामी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

निवडणूक आयुक्त निवडीच्या समितीतून सरन्यायाधीशांना वगळले!लोकसभेत नवं विधेयक मंजूर.


नवी दिल्ली - संसदेचे हिवाळी अधिवेशन वादळी ठरले असून विरोधी पक्षातील खासदारांचे ऐतिहासिक निलंबन करण्यात आले.आतापर्यंत या अधिवेशनात लोकसभा व राज्यसभेतील एकूण 146 खासदारांना निलंबित करण्यात आल्याने भाजपाला आव्हान देणाऱ्या विरोधकांचा आवाज कमकुवत झाला आहे.

याचवेळी सरकारकडून एक वादग्रस्त विधेयक मंजूर करण्यात आले आहे.निवडणूक आयुक्त निवडीच्या समितीतून सरन्यायाधीशांना वगळणार विधेयक लोकसभेत मंजूर करण्यात आलं.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभेत भारतीय न्याय संहिता (द्वितीय सुधारणा) (एनबीएस-२०२३), भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (द्वितीय सुधारणा) (बीएनएसएस-२०२३) व भारतीय साक्ष (द्वितीय सुधारणा) (बीएस-२०२३) अशी तीन विधेयके सादर केली आणि मंजूरही करण्यात आली.आता मोदी सरकारने केंद्रीय निवडणूक आयुक्तांच्या निवड प्रक्रियेतून सरन्यायाधिशांना वगळून ते विधेयक मंजूर केले आहे. ‘मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्त विधेयक गुरुवारी लोकसभेत मंजूर करण्यात आले. यामुळे पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे

केंद्रीय निवडणूक आयुक्त  निवडण्यासाठी समितीची रचना जाहीर झाली केली होती. मात्र, या समितीच्या रचनेत केंद्र सरकारने महत्त्वाचा बदल करत सरन्यायाधीशांना या समितीतून वगळले आणि ज्येष्ठ कॅबिनेट मंत्र्यांचा त्यात समावेश केला. त्यानंतर 10 ऑगस्ट रोजी हे विधेयक सादर करण्यात आले होते. राज्यसभेत आवाजी मतदानाने हे विधेयक मंजूर करण्यात आल्यानंतर आता संसदेच्या हिवाळी अधिवेशनात हे विधेयक मंजूर करण्यात आले. केंद्रीय निवडणूक आयुक्त निवडीच्या समितीतून सरन्यायाधीशांना वगळण्यात आल्याने मुख्य निवडणूक आयुक्त सत्ताधाऱ्यांच्या मुठीत राहतील, असा आक्षेप विरोधकांनी घेतला होता.

केंद्रीय निवडणूक आयोगात निवडणूक आयुक्त नियुक्त करण्यासाठी निवड समिती स्थापन करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. यासंदर्भात दाखल याचिकेवर मार्चमध्ये झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने  हे निर्देश दिले होते. या निकालात न्यायालयाने पंतप्रधान, विरोधी पक्षनेते आणि सरन्यायाधीशांचा या समितीत समावेश असेल असेही स्पष्ट केले होते.केंद्र सरकारकडून केंद्रीय निवडणूक आयोग आयुक्त ठरवण्यासाठी समितीची रचना जाहीर करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी केंद्रीय निवडणूक आयोगात निवडणूक आयुक्त नियुक्त करण्यासाठीच्या समितीत 3 जण असतील हे स्पष्ट केले होते. यात पंतप्रधान, विरोधी पक्षनेता आणि सरन्यायाधीशांचा समावेश होता. पण नंतर केंद्र सरकारने न्यायालयाच्या निर्देशात मोठा बदल केला आणि सरन्यायाधीशांना वगळून ज्येष्ठ कॅबिनेट मंत्र्याचा त्यात समावेश केला.

केंद्र सरकारने ‘केंद्रीय निवडणूक आयुक्त नियुक्ती व सेवास्थिती-2023’ हे विधेयक (Bill) पावसाळी अधिवेशनात 10 ऑगस्ट रोजी संसदेत आणले होते. मंगळवारी राज्यसभेत विधेयक आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आले होते. या विधेयकावर टीकेची झोड उठवतानाच विरोधी पक्षांनी सभात्याग केला होता. त्यामुळे हे विधेयक मंजूर होऊ शकले. आता लोकसभेत सत्ताधारी पक्षाचे बहुमत असल्याने येथेही मंजुरीसाठी काही अडचणी आल्या नाहीत

बीडची पाणीपुरवठा यंत्रणा कोलमडली. जिल्हा न्यायाधीशांनी न प.ला दाखवला आरसा.


बीड (प्रतिनिधी) शहरामध्ये न.प.च्या पाणीपुरवठा यंत्रणा कोलमडली असून तब्बल पंधरा पंधरा दिवस पाणी येत नाही मात्र न.प. प्रशासन पाणी पुरवठा सुरळीत असल्याचं सांगते.परंतू आता पाणी पुरवठ्याच्या बाबतीत जिल्हा न्यायाधीशांनीच न.प. करभाराला आरसा दाखविला आहे.

पंधरा पंधरा दिवस नळाला पाणी येत नाही आणि टँकरने देखील पाणीपुरवठा होत नाही, त्यामुळे जिल्हा न्यायालयात दुर्गंधी पसरली असून रोगराई पसरण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे पत्रच जिल्हा न्यायाधीशांनी बीड पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना दिले आहे. कमी अधिक फरकाने प्रत्येक सार्वजनिक इमारत आणि संपूर्ण शहराचीच परिस्थिती अशीच आहे.
बीड नगर पालिकेवर प्रशासक राज असल्याने शहरवासीयांना त्याची मोठी किंमत चुकवावी लागत आहे. सारे काही अधिकारी भरोसे असून त्यांना विचारणारे कोणीच नसल्याने पाणीपुरवठा आणि स्वच्छता या महत्वाच्या बाबींकडे देखील नगरपालिकेचे दुर्लक्ष होत आहे. बीड शहरात आज घडीला पंधरा दिवस उलटून गेले तरी पाणी येत नाही. त्यामुळे ज्यांना नगरपालिकेच्या पाणीपुरवठ्यावरच अवलंबून राहावे लागते त्यांचे मोठे हाल होत आहेत. अनेकांना पाणी विकत घेऊनच आपले भागवावे लागत आहे. यासंदर्भाने अनेकदा ओरड झाली मात्र प्रत्येकवेळी नगरपालिका प्रशासन पंधरा दिवस पाणी येत नसल्याचा दावा खोडताना दिसत आलेले आहे. आम्ही आठ दिवसाला पाणी देतो, मात्र लोक उगीच ओरडतात अशी भूमिका नगरपालिका प्रशासनाने घेतलेली असतानाच आता खुद्द जिल्हा न्यायाधीशांनीच नगरपालिकेला पाणीपुरवठ्याबाबत आरसा दाखविला आहे.
बीडच्या जिल्हा न्यायाधीशांनी नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना पत्र लिहिले असून यात जिल्हा न्यायालयाच्या इमारतीत पंधरा पंधरा दिवस नळाला पाणी येत नाही. तसेच टॅंकरने पाणी पुरवठा करायला सांगूनही नगरपालिका तसा पुरवठा करीत नाही. त्यामुळे न्यायिक अधिकाऱ्यांचे निजी कक्ष ,वकील, कर्मचारी व पक्षकार यांच्यासाठी असलेल्या स्वच्छतागृहामध्ये पाण्याअभावी दुर्गंधी पसरत आहे, तसेच त्यामुळे रोगराई पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही असे म्हटले आहे. जिल्हा न्यायालयाच्या इमारतीसाठी आणि न्यायिक अधिकाऱ्यांच्या निवासस्थानाची टँकरने पाणीपुरवठा करण्याचे पत्र न्यायाधीशांनी दिले आहे.
जी परिस्थिती आज जिल्हा न्यायालय परिसरात आहे, तीच अवस्था शहरात सर्वत्र आहे. शहरवासीयांना पाणियासाठी रोज पैसे मोजावे लागत आहेत. जिल्हाधिकारी करायचाय , मध्यवर्ती प्रशासकीय इमारत यासह सामाजिक न्यायभवन , जिल्हापरिषद आदी इमारतींमध्ये पाण्याची अवस्था भीषण आहे, ठिकठिकाणी नागरिक पाणीटंचाईचा सामना करीत आहेत, त्यांच्यासाठी बोलायचे कोणी हा देखील प्रश्न आहेच. आता खुद्द न्यायाधीशांनीच आरसा दाखविल्यानंतर तरी नगरपालिका प्रशासन जागे होणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे.

परळी वैजनाथ येथे मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सव व सचित्र दर्शन सोहळा संपन्न.

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) - डिसेंबर रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सव व सचित्र दर्शन सोहळा मराठवाडा मुक्ती दिवस व एकता दिनाचे औचित्य साधून दि.वा. सेवा संस्थान परळी यांच्या वतीने भव्य आयोजन आर्य वैश्य मंगल कार्यालय येथे आयोजित केले होते त्या प्रसंगी हैद्राबाद संस्थानच्या लढ्यात बलिदान दिलेले, शुरविरांचे दर्शन,भारतीय लढ्यातील सेनानी यांचे दर्शन व अनेक शूरवीरांचा इतिहास नवीन पिढीसाठी ज्ञात व्हावा म्हणून त्यात परळीचे पहिले आमदार मा वामनराव देशमुख चित्रनगर मध्ये ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी मा दत्तात्रय दहीवाळ गुरुजी यांचे नावाने भव्य व्यासपीठ उभारले होते. सचित्र दर्शन सोहळ्याचे उद्घाटन हे ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी मा. लक्ष्मणराव बोंदर, व सौ पार्वतीबाई ल. बोंदर यांच्या शुभहस्ते  करताना  मा राजेसाहेब देशमुख मा बाजीराव धर्माधिकारी हे लाभले होते. 
या कार्यक्रमास व्याख्याते म्हणून मा डॉ सुरेशचंद्र चौधरी आणि मा श्री विश्वंभर पाठक यांनी मार्गदर्शनपर व्याख्यान दिले या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मा प्रा डॉ विजयकुमार देशमुख, शिवाजीराव पाटील अंधोरीकर, विजयाताई दहीवाळ, सुधीर फुलारी, विकासराव डूबे, विजय अवस्थी, तुळशीराम पवार, वैजनाथ सोळंके हे सर्व प्रमुख पाहुणे म्हणून लाभले होते तसेच उपस्थित सर्व मान्यवरांनी आपले विचार मांडले तसेच ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी लक्ष्मणराव बोंदर यांनी मराठवाडा मुक्ती संग्रामातील संपूर्ण थरार सांगितला. हे चित्र प्रदर्शन पाहण्यासाठी परळीकरासह विविध शाळेमधील विद्यार्थी यांनी सहभाग नोंदवला होता. कार्यक्रमाचे निवेदन हे वैशालीताई रुईकर यांनी तर कार्यक्रमाचे कल्पक नियोजन हे सुनीलकुमार जठार, ॲड वैजनाथ वांजरखेडे, जी एस. सौंदळे, शालिनी दहिवाळ, यांनी केले.

पेट्रोल टाकून दोन दुकाने जाळली ?


नेकनूर (प्रतिनिधी) तालुक्यातील लिंबागणेश येथे गुरुवारी ् मध्यरात्री साडे बाराच्या सुमारास बसस्थानका जवळील चंद्रकांत आवसरे यांचे श्री गणेश शुज सेंटर आणि औदुंबर नाईकवाडे यांचे ईश्वरभारती कॅफे सेंटर जळुन खाक झाले असून ही दोन्ही दुकाने पेट्रोल टाकून जाळण्यात आले असल्याचा संशय दुकानदारांनी व्यक्त केला आहे.

या घटनेची माहिती मिळताच मध्यरात्री नेकनुर पोलिस स्टेशनचे सपोनि विलास हजारे व त्यांच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली असून पुढील तपास सुरू आहे. मध्यरात्री साडे बारा वाजता लिंबागणेश बसस्थानका जवळ चंद्रकांत आवसरे यांचे श्री गणेश शुज सेंटर दुकान असुन मध्यरात्री लागलेल्या आगीत दुकान जळुन खाक झाले. यामध्ये अंदाजे 4 लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचे आवसरे यांचे म्हणणे आहे. तसेच याच वेळी औदुंबर नाईकवाडे यांचे शेजारीच ईश्वरभारती कॅफे सेंटर दुकानातील हजार लिटरचे दोन डि फ्रीज,एसी फ्रीज, कुलर, आणि फर्निचर आदी एकुण ३ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. सदरील दोन्ही दुकानं पेट्रोल टाकून जाळ्याचा दुकानदार औदुंबर नाईकवाडे, चंद्रकांत आवसरे यांनी संशय व्यक्त केला आहे.

औदुंबर नाईकवाडे व चंद्रकांत आवसरे यांनी ही दुर्घटना शॉर्ट सर्किट ने झालेली नसून जाणीवपूर्वक कोणीतरी पेट्रोल टाकून जाळले असा संशय व्यक्त केला आहे.

Thursday, December 21, 2023

मनोज जरांगे पाटील शनिवारी बीडमध्ये सभा, महामार्ग वाहतुकीस बंद.जाणून घ्या पर्यायी मार्ग.


बीड (प्रतिनिधी) मराठा आंदाेलक मनोज जरांगे पाटील यांच्या निर्णायक इशारा सभेच्या पार्श्वभूमीवर बीडमध्ये धुळे – सोलापूर महामार्गासह बीड-परळी महामार्ग वाहतुकीसाठी बंद राहणार आहे.

येत्या 23 डिसेंबरला प्रवाशांनी सकाळी 8 ते रात्री 9 वाजेपर्यंत महामार्ग बंद राहणार असल्याची नाेंद घ्यावी. वाहनधारकांनी पर्यायी महामार्गाचा अवलंब करावा असे आवाहन पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी केले आहे.

मनोज जरांगे पाटील यांची 23 डिसेंबरला बीडमध्ये निर्णायक इशारा सभा होत आहे. या सभेच्या पार्श्वभूमीवर धुळे- सोलापूर महामार्गासह बीड-परळी या महामार्गावर 23 डिसेंबरला सकाळी 8 ते रात्री 9 वाजेपर्यंत सभेची वाहने, रुग्णवाहिका, अग्निशामक वाहने वगळून अन्य वाहनांना बंदी घालण्यात आली आहे.

असा आहे पर्यायी मार्ग

– छत्रपती संभाजीनगर- बीड- धाराशिव या मार्गावरील वाहतूक छत्रपती संभाजीनगर, पैठण, खरवंडी, शिरूर, पाटोदा, धाराशिव किंवा छत्रपती संभाजी- नगर, गढी-माजलगाव, तेलगाव, धारूर, केज, मांजरसुंबा या पर्यायी मार्गाने करता येईल.

– धाराशिव- बीड- गेवराई- जालना या मार्गावरील वाहतूक धाराशिव, मांजरसुंबा केज, धारूर, तेलगाव, माजलगाव जालना या मार्गाने करता येईल.

– धाराशिव- बीड- छत्रपती संभाजीनगर या मार्गावरील वाहतूक धाराशिव, मांजरसुंबा, पाटोदा, खरवंडी, पैठण, संभाजीनगर किंवा मांजरसुबा, पाटोदा, शिरूर कासार, पाथर्डी, पैठण, छ. संभाजीनगर अशी राहील.

– जालना- बीड- अहमदनगर या महामार्गावरील वाहतूक जालना, गेवराई, मादळमोही या मार्गाने असेल.

– माजलगाव- तेलगाव- बीड – धाराशिव या मार्गावरील वाहतूक माजलगाव, तेलगाव,धारूर, केज, मांजरसुंबा, धाराशिव अशी असेल.

– परळी तेलगाव- बीड या मार्गावरील वाहतूक परळी, तेलगाव, माजलगाव, बीड या मार्गाने होणार आहे.