Monday, May 27, 2024

परळीत चेंबरी विश्रामगृह समोरील घटना अज्ञात वाहनाने दोन दुचाकींना चिरडले; दोघांचा जागीच मृत्यू एक गंभीर जखमी.


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) येथील थर्मल रोडवर रविवारी रात्री ७.३० वाजेच्या दरम्यान भरधाव अज्ञात चरचाकीने दोन दुचाकींना चिरडले. यात एका दुचकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर दुसऱ्या दुचकीवरील एकजण गंभीर जखमी आहे. कॉन्ट्रॅक्टर सय्यद अब्दुल जब्बार ( 60, रा - बरकत नगर) आणि कामगार अजय जमूनाराव चौधरी ( 45,  रा.परळी) अशी मृतांची नावे आहेत. 

शहरातील थर्मल रोडवरील चेंबरी विश्रामगृह समोरील रस्त्यावर रविवारी रात्री एका अज्ञात चारचाकी वाहन भरधाव वेगात जात होते. याचवेळी थर्मल रोडवरून परळीकडे एका दुचाकीवर बरकत नगर येथील कॉन्ट्रॅक्टर सय्यद अब्दुल जब्बार आणि कामगार अजय जमूनाराव चौधरी हे दोघे जात होते. साडेसात वाजेच्या सुमारास दोघांच्या दुचकीला भरधाव वेगातील अज्ञात चारचाकी वाहनाने चिरडले. या भीषण अपघातात दोघांचाही जागीच मृत्यू झाला. तर याच ठिकाणी अन्य एक दुचाकीस्वार देखील गंभीर जखमी अवस्थेत आढळून आला. त्याच्यावर अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. धडक कोणत्या वाहनाने दिली हे मात्र अद्याप स्पष्ट झाले नाही. या प्रकरणी पुढील तपास संभाजीनगर ठाण्याचे पोलीस करीत आहेत.

तपास सुरू आहे परळीच्या थर्मल रोडवर मोटरसायकलवरिल दोघांचा मृत्यू झाला आहे. तर एक मोटरसायकलस्वार जखमी झाला आहे. परंतु नेमका अपघात कश्यामुळे झाला हे पोलीस तपासात निष्पन्न होईल-उस्मान शेख ,पोलीस निरीक्षक संभाजीनगर पोलीस ठाणे परळी

ज्ञानराधा मल्टिस्टेट को ऑप सोसायटीचे सुरेश कुटे,अर्चना कुटे यांच्यासह इतरांवर कलम 420 नुसार गुन्हा दाखल.


बीड (प्रतिनिधी) येथील ज्ञानराधा मल्टिस्टेट को ऑप सोसायटी मध्ये ठेवलेल्या नऊ लाख आणि 13 लाख रुपये वेळेत परतून देता फसवणूक केल्याप्रकरणी सुरेश कुटे,अर्चना कुटे यांच्यासह इतरांवर कलम 420 नुसार गुन्हा दाखल झाला आहे. कुटे हे फरार असल्याचा आरोप ठेवीदारांनी केला आहे.

बीडमधील ज्ञानराधा मल्टीस्टेट को.ऑप.क्रे.सो.च्या गलथान कारभाराचा फटका संपूर्ण मराठवाड्याला बसला आहे. लाखो ठेवीदार अडचणीत आले आहेत. कुटे दाम्पत्य केवळ वेळ मारून नेत आहेत आणि ठेवीदारांना पुढच्या तारखा देत आहेत. मात्र ठेवीदारांचा संयम अखेर तुटला. आज नऊ लाखाच्या ठेवीची मुदत संपूनही ठेवी परत मिळत नसल्याने सेवानिवृत्त प्रा.महादेव मन्मथअप्पा आंधळकर यांच्या तक्रारीनंतर ज्ञानराधासह कुटे दाम्पत्य आणि कर्मचार्‍यांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ज्ञानराधा मल्टीस्टेट आठ महिन्यापासून बंद आहे. लाखो ठेवीदार अडचणीत आले आहे. संयमाचा बांध तुटत आहे. मल्टीस्टेटचे मालक कुटे दाम्पत्य केवळ फेसबुकच्या माध्यमातून तारखांवर तारखा देवून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न करत आहेत. प्रत्येक वेळी नविन तारीख दिली जात आहे. संपूर्ण बीड जिल्हाच ज्ञानराधामुळे अडचणीत आला आहे. अखेर आज महादेव मन्मथअप्पा आंधळकर यांच्या फिर्यादीवरून नऊ लाख रूपयाच्या ठेवी मिळत नसल्याने सुरेश कुटे, अर्चना सुरेश कुटे, वाय.व्ही.कुलकर्णी, नारायण शिंदे यांच्यावर शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान हा गुन्हा दाखल करण्यासाठी जेव्हा ठेवीदार हे  बीड शहर पोलीस ठाण्यात गेले तेव्हा अर्ज द्या,वरीष्ठ अधिकाऱ्यांना विचारल्यावर सांगतो अशी उडवाउडवीची उत्तरे दिली गेली.जेव्हा ठेवीदार पोलीस अधीक्षक ठाकूर यांच्याकडे गेले तेव्हा शहर पोलिसांनी हा गुन्हा दाखल करून घेतला.

याच फिर्यादीमध्ये प्रतापसिंह ठाकूर यांचे देखील 13 लाख रुपये न देता फसवणूक केल्याची नोंद करण्यात आली आहे.

परळीच्या निवासी मुकबधीर विद्यालयाला वादळी वाऱ्याचा फटका; 60 फुट भिंत कोसळली.

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) परळी वैजनाथ जवळील संगम येथील प्रज्ञा निकेतन शिक्षण संस्था संचलित निवासी मूकबधिर विद्यालयाचे काल  दि. २६ मे रोजी आलेल्या वादळात मोठे नुकसान झाले आहे. या वादळात  60 फूट भिंत कोसळली आहे. यामुळे शाळेचे मोठे नुकसान झाले असून प्रशासनाने लक्ष देऊन नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी निवासी मूकबधिर विद्यालयाच्या वतीने करण्यात आली आहे.
रविवार दिनांक 26 मे रोजी दुपारी पाच वाजेच्या दरम्यान परळी शहर असं संपूर्ण तालुक्यात मोठे वादळी वारे आले होते. या वादळी वाऱ्याचा फटका प्रज्ञा निकेतन शिक्षण संस्था संचलित निवासी मूकबधिर विद्यालयाला बसला. मूकबधिर विद्यालयाची साठ फूट लांब भिंत कोसळली. यामुळे शाळेचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान प्रशासनाने याकडे लक्ष देऊन पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी प्रज्ञा निकेतन शिक्षण संस्था संचलित निवासी मूकबधिर विद्यालयातील मुख्याध्यापक व शिक्षक वृंदांनी केली आहे.

Sunday, May 26, 2024

उपक्रमशील शिक्षका सौ.संध्या नागुरे (चौधरी) यांना राज्यस्तरीय सेवा सन्मान पुरस्कार प्रदान.

परळी वैजनाथ (प्रतिनिधी)  येथील विद्यावर्धिनी विद्यालयाच्या शिक्षिका सौ. संध्या नागुरे (चौधरी) यांना महाराष्ट्र शिक्षक पॅनलतर्फे राज्यस्तरीय सेवा सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात आला.
विद्यावर्धिनी प्राथमिक विद्यालय परळी वैजनाथ येथील उपक्रमशील शिक्षका सौ. संध्या विश्वनाथ नागुरे यांना महाराष्ट्र शिक्षण पॅनल (एमएसपी) च्या वतीने राज्यस्तरीय आदर्श शिक्षक सेवा सन्मान पुरस्कार नाशिक येथील गुरूदक्षिणा हॉलमध्ये शुक्रवारी आयोजित विशेष कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले.मराठी चित्रपट अभिनेत्री किशोरी शहाणे, कवी अनंत राऊत, शिक्षण फाऊंडेशनचे अध्यक्ष दीपक चामे यांच्या हस्ते त्यांना गौरविण्यात आले.
शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील बहुमूल्य योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. विद्यार्थ्यांच्या  सुप्तगुणांना वाव देऊन गुणवत्तेच्या सार्वत्रिकिकरण्यासाठी, राष्ट्रनिष्ठा समाजनिष्ठा ज्ञाननिष्ठा विद्यार्थी निष्ठेपाई कार्य करणार्‍या शिक्षक शिक्षकांचा नाशिक येथे 24 मे रोजी आयोजित सोहळ्यात सन्मान करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र शिक्षक पॅनल बीड जिल्हा जिल्हा समन्वयक वैशाली अकुस्कर (बुरांडे) यांची प्रमुख उपस्थिती होती.
सौ संध्या नागूरे मॅडम या विद्यार्थीप्रिय शिक्षिका म्हणून सुपरिचित आहेत. त्यांनी 2006 पासून तिसरी व सहावी वर्गासाठी एमटीएस स्पर्धा परीक्षेचे आयोजन करून मोलाची कामगिरी बजावली आहे. विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षेसाठी प्रेरणा देत असतात. शालेय स्तरावरील विविध सांस्कृतिक कार्यक्रमात मुलांचा सहभाग वाढवून आपल्या शाळेसाठी विविध पारितोषिके मिळून दिली आहेत. मुलांना आनंददायी पद्धतीने शिक्षण देणे हा प्रामाणिक उद्देश राहिला असून गरजू मुलांना विविध शैक्षणिक साहित्याची वाटप करून त्यांना नेहमी प्रोत्साहन करत असतात. कोविड काळातही आधुनिक तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करून मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात कायम ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. या सर्व कार्याची दखल घेऊन सदरील पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. सदरील पुरस्कार प्राप्त झाल्यामुळे सौ संध्या नागुरे मॅडम यांचे विविध क्षेत्रातील व्यक्तींकडून अभिनंदन होत आहे.

Wednesday, May 22, 2024

मोठी बातमी! चालू शैक्षणिक वर्षापासून मुलींना उच्चशिक्षण मोफत.राज्यभरातील 642 कोर्सेसचा समावेश.





मुंबई (प्रतिनिधी) : इयत्ता बारावीनंतर उच्चशिक्षण घेणाऱ्या राज्यभरातील २० लाख मुलींना शासनाच्या माध्यमातून आता मोफत शिक्षण मिळणार आहे. त्यात अभियांत्रिकी, मेडिकल, फार्मसीसह तब्बल ६४२ कोर्सेसचा समावेश असून त्यासाठी राज्य शासन दरवर्षी १८०० कोटी रुपयांचा भार उचलणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी याच शैक्षणिक वर्षापासून (२०२४-२५) होणार आहे.

इयत्ता बारावीनंतर कुटुंबाच्या आर्थिक अडचणींमुळे अनेक हुशार मुलींना मधूनच शाळा सोडून द्यावी लागते. दुसरीकडे पुढील उच्च शिक्षणाचा खर्च परवडत नसल्याने अनेक पालक बारावीनंतरच मुलींचा विवाह लावून देतात. त्यामुळे इयत्ता बारावीनंतर उच्चशिक्षण घेणाऱ्या मुलींची संख्या कमी होत असल्याची वस्तुस्थिती आहे. मात्र, आता त्यावर राज्य सरकारने ठोस मार्ग शोधला असून उच्चशिक्षणातील तब्बल ६४२ कोर्सेसचे शुल्क शासनातर्फेच भरले जाणार आहे.

मुलींच्या शिक्षणाची टक्केवारी वाढावी, उच्चशिक्षणाचा खर्च परवडत नाही म्हणून बालविवाह लावून देण्याचा प्रकार थांबणार आहे. राज्य शासनाचा हा निर्णय केवळ मुलींसाठीच लागू असणार आहे. विद्यापीठाशी संलग्नित उच्च महाविद्यालयांमधील तब्बल २० लाख मुलींसाठी हा निर्णय ऐतिहासिक ठरणार आहे. हुशार असूनही आर्थिक अडचणींमुळे उच्चशिक्षण घेता येत नव्हते ही अडचण आता कायमचीच दूर होणार आहे.

शासनाच्या नवीन निर्णयानुसार

  • अंदाजे उच्च महाविद्यालये

  • ५,३००

  • उच्चशिक्षण घेणाऱ्या मुली

  • २० लाख

  • निर्णयातील कोर्सेस

  • ६४२

  • शैक्षणिक शुल्काची रक्कम

  • १८०० कोटी

उपसमितीचा निर्णय, आता कॅबिनेटमध्ये अंतिम मोहोर

राज्यातील उच्चशिक्षण घेणाऱ्या जवळपास २० लाख मुलींना ६४२ कोर्सेस पूर्णपणे मोफत शिकण्याची संधी मिळणार आहे. या कोर्सेसची अर्धी फी सध्या शासनाच्या माध्यमातून भरली जाते, पण आता संपूर्ण शुल्क राज्य शासनच भरणार आहे. त्यासंबंधीचा निर्णय यापूर्वीच मंत्रिमंडळाच्या उपसमितीत झाला आहे. आता कॅबिनेटमध्ये त्यावर अंतिम निर्णय होणार असून लोकसभेची आचारसंहिता संपल्यानंतर पहिल्याच कॅबिनेटमध्ये हा निर्णय होणार आहे. त्यामुळे चालू शैक्षणिक वर्षापासूनच त्याची अंमलबजावणी होईल, अशी माहिती वरिष्ठ सूत्रांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली.

निकालानंतर प्रवेशावेळी फी भरावी लागणार का?

इयत्ता बारावीचा निकाल उद्या (मंगळवारी) जाहीर होणार असून त्यानंतर उच्चशिक्षणासाठी प्रवेश घेण्याची लगबग सुरू होईल. अनेकदा प्रवेश घेतानाच शैक्षणिक शुल्क भरावे लागते. पण, आचारसंहितेनंतर होणाऱ्या पहिल्याच कॅबिनेटमध्ये ‘मुलींना उच्चशिक्षण मोफत’चा अंतिम निर्णय होणार असल्याने मुलींना प्रवेश देखील मोफच मिळेल हे निश्चित आहे. पण, हा निर्णय कोणत्या मुलींसाठी (जात संवर्ग) लागू असेल व त्यासाठी उत्पन्नाची अट किती असेल, यासंबंधीचा निर्णय त्या कॅबिनेटमध्येच होईल, असे सांगितले जात आहे.

यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालया ची यशाची परंपरा कायम.बारावी परीक्षेचा 92.06 टक्के निकाल!

  

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) नाथ शिक्षण संस्था संचलित यशवंतराव चव्हाण विज्ञान, कला व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाने बारावीच्या निकालात घवघवीत यश संपादन केले आहे.
 राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने इयत्ता बारावीच्या फेब्रुवारी-मार्च 2024 परीक्षेचा निकाल मंगळवार रोजी जाहीर झाला असून  या निकालात  परळी वैजनाथ येथील नाथ शिक्षण संस्था संचलित यशवंतराव चव्हाण विज्ञान, कला व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले असुन.
महाविद्यालयाचा निकाल हा 92.06% इतका लागला आहे विज्ञान शाखेचा निकाल 97.02 टक्के कला शाखेचा निकाल 76.92 टक्के वाणिज्य शाखेचा निकाल 87.50 टक्के इतका लागला आहे. 
या निकालात महाविद्यालयातुन

           *विज्ञान शाखेतुन*  

प्रथम- चि.अघाव शिवम विजय -      80.33% ,
प्रथम- कु.नागरगोजे वैष्णवी  दयाराम- 80.33%
द्वितीय - चि.शेख शहानवाज शेख 80.17%,
तृतीय-कु.कराड गायत्री उद्धव -      79.17%

         * कला शाखेतुन*

 प्रथम-कु.व्यंकटकर मनिषा नारायण -   77.67%,
द्वितीय-कु. उकिर्डे सविता बाबुराव       64.83.%,
तृतीय -कु.सातपुते वर्षा रोहिदास      59.00%,

         *वाणिज्य शाखेतुन*

प्रथम-चि. फड श्याम रामकिशन - 75.33%,
द्वितीय -कु.कदम तनुश्री नरसिंग - 64.83%,
 तृतीय-चि. रेवले सोमेश्वर पांडुरंग - 59.00%

महाविद्यालयातील यश संपादन केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन नाथ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा कृषी मंत्री महाराष्ट्र राज्य ना.धंनजयजी मुंडे साहेब, सचिव सौ.राजश्री वहिनी मुंडे सहसचिव प्रदीपजी खाडे,महाविद्यालयाच्या  प्राचार्य प्रा.अतुल दुबे यांच्या सह सर्व प्राध्यापक व कर्मचारी यांनी केले आहे.

Sunday, May 19, 2024

बीडच्या तिरुमला उद्योगसमूहाचे प्रमुख सुरेश कुटेंच्य यांच्या वर अखेर गुन्हा नोंद.

बीड (प्रतिनिधी) बीडच्या तिरूमला उद्योगसमूहाचे प्रमुख सुरेश कुटेंच्या अडचणीत वाढ झाली आहे. एकीकडे ज्ञानराधा मल्टिस्टेट बँकेने 21 मे पासून ठेवीदारांच्या ठेवी परत देण्याचं आश्‍वासन दिले आहे तर दुसरीकडे आज ज्ञानराधावर माजलगावमध्ये दोन गुन्हे नोंद करण्यात आले आहे. यामध्ये एका गुन्ह्यात 3 लाख 80 रुपयांची फसवणूक तर दुसऱ्या गुन्ह्यात 1 लाख 10 हजार रुपयांची फसवणूक झाल्याप्रकरणी सुरेश कुटे यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तिरूमला उद्योग समूह याच मल्टीस्टेट बँकेत पैसे अडकल्यामुळे अडचणीत सापडला आहे.

गेल्या सात महिन्यांपासून ज्ञानराधा मल्टीस्टेट बँकेमध्ये कोट्यवधी रुपयांच्या ठेवी अडकल्या आहेत आणि  हजारो  ठेवीदार गेल्या सात महिन्यांपासून ठेवी परत मिळतील या आशेवर आहेत. आज माजलगाव शहर पोलीस ठाण्यामध्ये सुरेश कुटे यांनी फसवणूक केल्याप्रकरणी दोन ठेवीदारांनी वेगवेगळे दोन गुन्हे नोंद केले आहेत. यामध्ये तीन लाख 80 हजार रुपये हा पहिला गुन्हा तर दुसऱ्या गुन्ह्यात एक लाख 10 हजार रुपयांची फसवणूक झाल्याप्रकरणी दुसरा गुन्हा माजलगाव पोलीसात नोंद झाला आहे. हे दोन्ही गुन्हे नोंद झाल्यामुळे सुरेश कुटे यांच्या अडचणी वाढल्याचे दिसतं.

तिरुमला ग्रुपवर आयकर विभागाच्या धाडी . 

बीड येथील तिरुमला उद्योग समूहाच्या कार्यालयावर आयकर विभागाने 10 ऑक्टोबर 2023 रोजी धाडी टाकल्या होत्या. तिरूमला उद्योग समूहाच्या विविध पाच शहरातील कार्यालयावर या धाडी टाकण्यात आल्या होत्या. बीड, पुणेसोलापूर, फलटण, औंगाबादमधील तिरूमला उद्योग समूहाच्या कार्यालयांवर आयकर विभागाने कारवाई करत अनेक कागदपत्रे जप्त केली होती.  

सुरेश कुटे आणि अर्चना कुटे यांचा गेल्या वर्षी भाजप प्रवेश. 

महाराष्ट्रामधील एक प्रमुख उद्योग समूह म्हणून ओळख असलेल्या बीडमधील तिरुमला (Tirumala) उद्योग समूहाचे प्रमुख सुरेश कुटे आणि अर्चना कुटे यांनी गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. खाद्यतेल, दुग्ध जन्य पदार्थ , हेअर ऑईल , वाहनांचे सुटे पार्ट ,पेंड उद्योगातील प्रमुख नाव म्हणून बीडचा तिरुमला ग्रुप ओळखला जातो.

उद्योजक सुरेश कुटे हे बीड जिल्ह्यातील मोठं प्रस्थ आहे. उद्योग क्षेत्रातून त्यांनी जगभरामध्ये बीड जिल्ह्याचे नावलौकिक केलं. 'द कुटे ग्रुप'मुळे बीड जिल्ह्यात बेरोजगारांना नोकऱ्या मिळाल्या आहेत. समूहाच्या व्यवस्थापकीय संचालिका अर्चना कुटे यांच्या पुढाकारानं महिलांना नोकऱ्यांची संधी निर्माण करून दिली आहे. 

सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट प्रकरण बीड पोलिसांकडून ४२ जणांवर कारवाई.


बीड (प्रतिनिधी) सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट टाकून दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न काही लोकांकडून केला जात आहे. अशाच लोकांचा शोध घेऊन बीड पोलिसांकडून कारवाया केल्या जात आहेत. शनिवारपर्यंत ४२ लोकांवर कारवाई करण्यात आली. त्यांना पोस्ट काढून टाकायला लावत पोलिसांनी नोटीसही बजावली. तसेच यानंतर वादग्रस्त पोस्ट केल्यास थेट गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला आहे.

जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीचा प्रचार आणि मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. परंतू त्यानंतर सोशल मीडियावरून वातावरण तापू लागले आहे. काही लोक आक्षेपार्ह पोस्ट टाकत असल्याने वाद होऊ लागले आहेत. चार दिवसांपूर्वीच केज तालुक्यातील नांदुरघाट येथे एका पोस्टमुळे दोन गटात दगडफेक झाली. यात अनेकजण जखमी झाले. २०० पेक्षा अधिक लोकांवर गुन्हाही दाखल झाला. त्यानंतर इतर ठिकाणीही निवडणूक कारणावरून वाद झाले आहेत. हे वाढते वाद पाहता पोलिसांनी शांततेचे आवाहन केले आहे. तसेच सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट टाकू नये, समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती, राजकीय नेते, दोन समाजात तेढ निर्माण होईल असे वक्तव्य करू नये, असे सांगितले आहे. असे असतानाही काही लोकांनी वादग्रस्त पोस्ट केल्या होत्या. त्यांचा शोध घेऊन पोलिसांनी त्यांना सीआरपीसी १०७, १०९, १०८, १४९ अन्वये प्रतिबंधात्मक कारवाया केल्या आहेत. तसेच त्यांना पोलिस ठाण्यात बोलावून घेत समज देण्यात आली. याच अनुषंगाने पाच दिवसांपूर्वी युसूफ वडगाव पोलिस ठाण्यात गुन्हाही दाखल झालेला आहे

Saturday, May 18, 2024

राजस्थानी मल्टीस्टेटची मुख्य शाखा कार्यालय सिल. चेअरमन, संचालक मंडळावर गुन्हे दाखल करा'.ठेवीदार आक्रमक.


परळी वैजनाथ (प्रतिनिधी): येथील राजस्थानी मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या संचालक मंडळावर फसवणुकीचे गुन्हे दाखल करावेत या मागणीसाठी परळी येथील ठेवीदारांच्या शिष्टमंडळाने आज शहर पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षकांची भेट घेतली. फसवणूक प्रकरणी 25 एप्रिल रोजी दाखल केलेल्या तक्रारी अर्जावरून संचालक मंडळावर कारवाई करावी असा आग्रह ठेवीदारांनी धरला आहे.

येथील राजस्थानी मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे चेअरमन चंदुलाल बियाणी व संचालक मंडळांनी मुदतीनंतर ही ठेवीदारांचे पैसे परत केले नाहीत . गेल्या आठ महिन्यापासून राजस्थानी मल्टीस्टेटच्या परळीतील पाच शाखा बंद आहेत व चेअरमन चंदुलाल बियाणी व संचालक मंडळ गायब झाले आहे. त्यांचा मोबाईल ही बंद येत आहे.त्यामुळे ठेवीदारांनी येथील तहसील कार्यालयासमोर काही दिवसांपूर्वी उपोषण केले तसेच राजस्थानी मल्टीस्टेटच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली परंतु अद्यापही ठेवीदारांना पैसे मिळाले नसल्याने ठेविदार संतप्त झाले आहेत. 

शनिवारी राजस्थानी मल्टीस्टेटच्या संचालका विरोधात गुन्हे दाखल करावेत अशी मागणी परळीचे पोलीस निरीक्षकाकडे केली आहे. शुक्रवारी लातूर येथील आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस अधिकाऱ्यांनी राजस्थानी मल्टीस्टेटच्या मोंढा भागातील मुख्य शाखेला सिल ठोकले आहे. तसेच अरुणोदय मार्केटमधील शाखेला भेट दिली आहे अशी माहिती ठेवीदार सेवकराम जाधव यांनी शनिवारी दिली. लातूर पोलीस ठाण्यातही लातूर येथील एका ठेवीदारांनी संचालक मंडळाच्या विरोधात तक्रार दाखल केल्यावरून गुन्हे दाखल केले आहेत.  या गुन्ह्याच्या तपासासाठी लातूर आर्थिक शाखेचे पोलीस परळीत येऊन गेले. दरम्यान, आज सकाळी परळी येतील ठेवीदारांच्या शिष्टमंडळाने राजस्थानी मल्टीस्टेटच्या संचालक मंडळ विरुद्ध कारवाई करण्याच्या मागणीसाठी शहरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार ससाणे यांची भेट घेतली. 

तपास करू. 

या प्रकरणाचा तपास करून संचालकाविरुद्ध पुढील कारवाई करण्यात येईल. - राजकुमार ससाणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक, परळी 

अनेक ठेवीदार अडचणीत. 

विश्वासाने पैसे गुंतवले असून मुदतीनंतरही पैसे परत मिळाले नाहीत. चेअरमन व संचालक भेटत नाहीत ते परळीतून निघून गेले आहेत. त्यामुळे दाद कुणाकडे मागावी असा प्रश्न पडला आहे. अनेक ठेवीदारांना विविध आर्थिक अडचणीला तोंड द्यावे लागत आहे.- रमेश कोमवार, ठेवीदार, परळी

बिअर व दारु पाजून ड्रग्सचे इंजेक्शन देऊन दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार.! मुख्य आरोपी फरार.


खेड (प्रतिनिधी) राज्यात महिला आणि मुलींवरील अत्याचारच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत असून, विशेत: मागील काही महिन्यात पुणे जिल्ह्यात अनेक धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. अशीच एक धक्कादायक घटना पुन्हा: एकदा पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातून समोर आली आहे.

खेड पोलीस स्टेशन अंतर्गत ओळखीचा फायदा घेऊन, 2 अल्पवयीन मुलींना विश्वासात घेत त्यांना 3 युवकांनी ड्रगचे इंजेक्शन देऊन, त्यांना लॉजवर नेऊन बिअर आणि दारू पाजत रात्रभर अत्याचार केल्याची घटना घडली आहे.

याप्रकरणी 3 आरोपींविरोधात खेड पोलीसांनी पॉस्को कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला असून, दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. परंतु, या घटनेतील मुख्य सुत्रधार फरार असल्याचे सांगण्यात येत आहे.

फरार असलेला प्रमुख आरोपी हा ड्रग पुरवणारा सुत्रधार असल्याची माहिती देण्यात आलीय. तर त्याच्याकडून आत्तापर्यंत किती जणांना ड्रग पुरवले? याबाबतीत पोलिस माहिती घेत आहेत. मंगळवारी (दि १४ मे) रात्री हा प्रकार घडला आहे. बुधवारी सकाळी नशेत सदर पीडित तरुणी झिंगून घरी परत आल्या असता; पालकांच्या लक्षात ही बाब आल्याने आणि प्रकरणाचे गांभीर्य ओळखून त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. पोलीसांनी पॉस्को कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला असून, दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. यातील एक आरोपी युवक अल्पवयीन असल्याचे सांगण्यात येत आहे.

धक्कादायक प्रकार बीडच्या नामांकीत महाविद्यालयात कर्मचाऱ्याकडूनच मुलींची छेडछाड ! प्रशासनाकडून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न.


बीड ( प्रतिनिधी) - मराठवाडा शिक्षण प्रसारक संस्थेच्या बीड येथील बलभीम महाविद्यालयात कर्मचाऱ्याकडूनच विद्यार्थिनींची छेडछाड होत असल्याचा प्रकार घडला आहे.मात्र महाविद्यालय प्रशासनाने यावर कोणतीही कारवाई न करता मौन बाळगले आहे.

मराठवाड्यात सर्वदूर शिक्षण संस्थांचे जाळे पसरलेल्या मराठवाडा शिक्षण प्रसारक संस्थेचे बीड येथे सर्वात जुने बलभीम महाविद्यालय आहे.अकरावी ते पोस्ट ग्रॅज्युएट पर्यंत या ठिकाणी हजारो विद्यार्थी शिक्षण घेतात.अनेक उच्चपदस्थ अधिकारी या महाविद्यालयाने घडवले आहेत.

उच्च दर्जाचे शिक्षण आणि गुणवत्तेची हमी असल्याने शहरासह आसपासच्या भागातील विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेतात.मात्र या महाविद्यालयात गेल्या काही महिन्यात विद्यार्थिनीच्या छेडछाडीच्या घटना समोर आल्या आहेत.

महाविद्यालयात नोकरीस असलेल्या एका कर्मचाऱ्यांकडून काही विद्यार्थिनींना जाणीवपूर्वक त्रास दिला जात असल्याचे उघडकीस आले आहे. चार महिन्यांपूर्वी एका कर्मचाऱ्याबाबत तक्रार प्राप्त झाल्यानंतर त्या कर्मचाऱ्याला सक्तीने स्वेच्छा निवृत्ती देण्यात आली होती.

दरम्यान एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात संपलेल्या शैक्षणिक वर्षात शेवटच्या दिवशी एका कर्मचाऱ्याबाबत एका मुलीने लेखी तक्रार प्राचार्य यांच्याकडे केली.त्यावर स्टाफ मिटिंग मध्ये चर्चा देखील झाली.लेखी तक्रार आल्याने त्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी उपस्थितांनी मागणी केली. 

परंतु आज घडीला दीड महिना उलटून गेला तरीदेखील त्या कर्मचाऱ्यांवर कुठलीच कारवाई झालेली नाही.या प्रकरणाची माहिती संस्थेच्या पदाधिकाऱ्यापर्यंत न जाऊ देण्याची खबरदारी प्राचार्य व इतरांनी घेतल्याची चर्चा आहे.एका एवढ्या मोठ्या महाविद्यालयात जर मुलीच्या छेडचडीचे प्रकार होत असतील आणि त्यावर प्रशासन पांघरून घालणार असेल तर विद्यार्थी सुरक्षीत आहेत असा दावा करणे योग्य आहे का ?असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Friday, May 17, 2024

वैद्यनाथ मंदिर परिसरात अपघात रोखण्या साठी गतिरोधक बसवा अन्यथा शिवसेना स्टाईल आंदोलन-अभयकुमार ठक्कर

परळी वैजनाथ (प्रतिनिधी)  पंचम ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर  येथील रस्त्यावरून अत्यंत वेगाने मोठमोठी वाहने जात असल्यामुळे अपघातांमध्ये वाढ झाली असून, या ठिकाणी गतिरोधक बसवण्याची मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते तथा माजी नगराध्यक्ष अभयकुमार ठक्कर व त्यांच्या सहकार्‍यांनी केली आहे. पंधरा दिवसात गतिरोधक न बसवल्यास  आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.
निवेदनात म्हटले आहे की, पंचम ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ प्रभूंच्या दर्शंनासाठी देशभरातून भाविक भक्त मोठया प्रमाणात दर्शनासाठी दररोज येत असतात. सध्या उन्हाळी सुट्टी असल्याने भाविकांची संख्या अधिक प्रमाणात वाढली आहे. या रोडवरून मोठमोठी वाहने वेगात वाहने धावत आहेत. या मार्गावरून येणारी वाहने वैद्यनाथ मंदिर परिसरात एकत्र येऊन समोरासमोर येत आहे. त्यामुळे अपघाताची परिस्थिती ओढवत आहे. परळी नगर परिषदेने याकडे त्वरीत लक्ष देवून या ठिकाणी गतिरोधक बसवावेत अन्यथा शिवसेना स्टाईल आंदोल करण्यात येईल असाही इशारा श्री अभयकुमार ठक्कर यांच्यासह मोहन परदेशी, माजी शहर संघटक संजय कुकडे, किशन बुंदिले, संजय सोमाणे, अमित कचरे,लक्ष्मण मुंडे, योगेश घेवारे आदींंनी दिला आहे.

बंद सिग्नलमुळे वाहतूक कोंडी.ज्योतिर्लिंग वैद्यनाथ मंदिरसमोरही वाहतुक विस्कळीत पी वन, पी टू पार्किंगचा प्रयोग पुन्हा सुरू करावा.


परळी वैजनाथ (प्रतिनिधी)  वाहतूक नियमांचे पालन होत नसल्याने शहरातील वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे. परिणामी, वाहतूक कोंडीची समस्या कमी होण्याऐवजी वाढतच चालली आहे. वाहतूक कोंडीला काही प्रमाणात का होईना आळा बसवा यासाठी शहरातील राणी लक्ष्मीबाई टॉवर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ.शामाप्रसाद मुखर्जी येथे उभारण्यात आलेले सिग्नल बंद असून, नागरिक सिग्नल बंद असल्याने नियम पाळत नसल्याचे पहावयास मिळत आहे. पंचम ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर परिसरातही सिग्नल बसवावेत व पी वन, पी टू पार्किंगचा प्रयोग पुन्हा सुरू करावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अ‍ॅड.मनोज संकाये यांनी केली आहे.
शहरातील अरुंद रस्ते, त्यावर फेरीवाले, छोटे-मोठे व्यावसायिक व वाहन धारकांनी केलेले अतिक्रमण, वाहतूक नियमांची पायमल्ली यामुळे परळी शहरातील वाहतूक समस्या जटील बनली आहे. नागरिक जागा मिळेल तिथे दुचाकी व अन्य वाहने उभी करत आहेत. मोंढा मार्केट, राणी लक्ष्मीबाई टॉवर चौक, स्टेशन रोड, छत्रपती शिवाजी महाराज चौक, वैद्यनाथ मंदिर परिसर या भागात रोजच वाहतुकीचा खोळंबा होत आहे. शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी शहर वाहतूक शाखेने तात्काळ लक्ष देवून या ठिकाणी वाहतूक सुरळीत करावी अशीही मागणी केली आहे.  काही वर्षांपूर्वी शहरात सुरू करण्यात आलेला पी वन, पी टू पार्किंगचा प्रयोग सध्या बंदच असल्याचे दिसून येत आहे.
त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूने दुचाकी व चारचाकी वाहने उभी राहत आहेत. विशेषतः बाजारात दुचाकी वाहनांमुळे रस्ता अरुंद होत आहे.  शहर वाहतूक शाखेने पाठपुरावा करून वाहतूक सिग्नल पुन्हा सुरू करावेत तसेच शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी नागरिकांनीही वाहतूक नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.

१ कोटींची रोकड, किलोभर सोने; निलंबित पीआय हरिभाऊ खाडेकडे सापडले घबाड.


बीड प्रतिनिधी): गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी एका बिल्डरला एक कोटी रूपयांची लाच मागितली होती. त्यातील पहिला हप्ता पाच लाख रूपये खासगी इसमाच्या माध्यमातून घेण्यात आले. याप्रकरणी बीडच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिस निरीक्षकासह सहायक फौजदार आणि खासगी इसमाविरोधात गुन्हा दाखल झाला होता. यातील निरीक्षक आणि एएसआय फरार आहेत.

बीडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी रात्री घर झडती घेतली असता खाडे यांच्या बीड मधील किरायच्य घरात रोख एक कोटी आठ लाख रुपये, १० तोले सोने, साडे पाच किलो चांदी आणि सहा ठिकाणच्या प्रॉपर्टी चे कागदपत्रे सापडले आहेत. पोलीस उप अधीक्षक शंकर शिंदे यांनी ही माहिती दिली.

हरिभाऊ खाडे पोलिस निरीक्षक आणि सहायक फौजदार आर.बी.जाधवर असे निलंबीत केलेल्यांची नावे आहेत. हे दोघेही आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत आहेत. बीडमधील जिजाऊ मल्टीस्टेटच्या गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी एका बिल्डरला खाडे यांनी १ कोटी रूपयांची लाच मागितली होती. त्यासाठी जाधवर यांनी प्रोत्साहन दिले होते. ठरलेल्या रकमेपैकी पहिला हप्ता पाच लाख रूपये घेताना खासगी इसम कुशल जैन याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले होते. त्यानंतर खाडे आणि जाधवर हे दोघेही फरार झाले होते. त्यांच्याविरोधात गुन्हाही दाखल झाला आहे. त्यानंतर लगेच अधीक्षक ठाकूर यांनी या दोघांनाही सेवेतून निलंबीत केले आहे.

जाधवरच्या घरात २५ तोळे सोने.

सहायक फौजदार जाधवर यांच्या घरात तब्बल २५ तोळे सोने सापडले आहे. तसेच रोख १८ हजार एवढी रक्कम मिळाली आहे. ती सर्व जप्त केली आहे.

Thursday, May 16, 2024

एक कोटीची लाच मागणारा पोलिस निरीक्षक हरिभाऊ खाडे, सहायक फौजदार जाधवर निलंबीत.


बीड ( प्रतिनिधी) गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी एका बिल्डरला एक कोटी रूपयांची लाच मागितली होती. त्यातील पहिला हप्ता पाच लाख रूपये खासगी इसमाच्या माध्यमातून घेण्यात आले. याप्रकरणी बीडच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिस निरीक्षकासह सहायक फौजदार आणि खासगी इसमाविरोधात गुन्हा दाखल झाला होता. यातील निरीक्षक आणि एएसआय फरार आहेत. परंतू पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी या दोघांनाही निलंबीत केले आहे.

हरिभाऊ खाडे पोलिस निरीक्षक आणि सहायक फौजदार आर.बी.जाधवर असे निलंबीत केलेल्यांची नावे आहेत. हे दोघेही आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत आहेत. बीडमधील जिजाऊ मल्टीस्टेटच्या गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी एका बिल्डरला खाडे यांनी १ कोटी रूपयांची लाच मागितली होती. त्यासाठी जाधवर यांनी प्रोत्साहन दिले होते. ठरलेल्या रकमेपैकी पहिला हप्ता पाच लाख रूपये घेताना खासगी इसम कुशल जैन याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले होते. त्यानंतर खाडे आणि जाधवर हे दोघेही फरार झाले होते. त्यांच्याविरोधात गुन्हाही दाखल झाला आहे. त्यानंतर लगेच अधीक्षक ठाकूर यांनी या दोघांनाही सेवेतून निलंबीत केले आहे.

जाधवरच्या घरात २५ तोळे सोने.

सहायक फौजदार जाधवर यांच्या घरात तब्बल २५ तोळे सोने सापडले आहे. तसेच रोख १८ हजार एवढी रक्कम मिळाली आहे. ती सर्व जप्त केली आहे.

खाडेचे घर सील, न्यायालयातून घेणार परवानगी.

हरिभाऊ खाडे हे बीडमध्ये किरायाच्या घरात राहत होते. ते पुण्याला असल्याने घर बंद होते. पोलिसांनी ते सील केले असून बाहेर पोलिस कर्मचारी नियूक्त केले आहेत. घर झडतीसाठी न्यायालयात परवानगी मागण्यात आली आहे.

पुढील कारवाई करू. 

लाच प्रकरणातील पोलिस निरीक्षक आणि कर्मचारी या दोघांनाही निलंबीत केले आहे. आता पुढील कारवाई होईल.- नंदकुमार ठाकूर, पोलिस अधीक्षक बीड

सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट.नांदुरघाट मध्ये दोन गटांत तुफान दगडफेक महिले सह तिघे जखमी.गावात तणावपूर्ण शांतता.


केज (प्रतिनिधी) सोशल मीडियावर टाकलेल्या वादग्रस्त पोस्टवरून दोन गट आमने-सामने आले. क्षणात एकमेकांच्या घरावर तुफान दगडफेक केली. यामध्ये एका महिलेसह तिघे जण जखमी झाले आहेत. ही घटना बुधवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास केज तालुक्यातील नांदुरघाट गावात घडली. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच केजसह जिल्ह्यातील पोलिसांची कुमक गावात पोहोचली. रात्री उशिरापर्यंत गावात तणावपूर्ण शांतता होती.

गावातील एका व्यक्तीने सोशल मीडियावर पोस्ट टाकली. ही पोस्ट वादग्रस्त असल्याने दुसऱ्या गटातील लोक आक्रमक झाले. बोलता बोलता वाद वाढत गेला आणि हाणामाऱ्या झाल्या. त्यानंतर नांदुरघाटसह आजूबाजूच्या गावांतील लोक नांदुरघाटमध्ये पाेहोचले. त्यानंतर दोन गटांत तुफान दगडफेक झाली. यामध्ये एका व्यक्तीच्या डोक्याला दगड लागला असून त्याला दोन टाके पडले आहेत. तसेच महिलेच्याही नाकाला गंभीर जखम झाली आहे. तिसरी व्यक्ती किरकोळ जखमी झाली आहे. 

या सर्वांवर नांदुरघाटच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच केजचे सहायक पोलिस अधीक्षक कमलेश मिणा, पोलिस निरीक्षक प्रशांत महाजन हे फोर्स घेऊन गावात पोहोचले. बळाचा वापर करत जमाव पांगवला. त्यानंतर गावासह परिसरातील गावातील नागरिकांशी संवाद साधून वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. रात्री ११ वाजेपर्यंत गावात पोलिसांची मोठी फौज होती. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणाची पोलिसांत नोंद झाली नव्हती. गावात तणावपूर्ण शांतता होती.

सोशल मीडियावर टाकलेल्या पोस्टवर दोन गट समोरासमोर भिडले. दगडफेकही झाली. माहिती मिळताच फोर्ससह गावात पोहोचलो. दगडफेकीत एका महिलेसह तिघे किरकोळ जखमी आहेत. सध्या गावात फोर्स असून शांततेचे आवाहन केले आहे.-प्रशांत महाजन, पोलिस निरीक्षक, केज

Wednesday, May 15, 2024

बीडमध्ये नशेच्या गोळ्या, औषधी पकडली; २६ हजाराचा मुद्देमाल जप्त, शहर पोलिसां ची कामगिरी.गुन्हा दाखल


बीड (प्रतिनिधी) पोलिसांना पाहताच विक्रीसाठी आणलेल्या नशेसाठीच्या गोळ्या,औषधी जागेवरच सोडून तरूणाने पळ काढल्याची घटना शहराच्या जुना बाजार भागात घडली. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बीड शहरामध्ये औषधी, गोळ्या नशेचे द्रव्य म्हणून विकणाऱ्यांवर कारवाईचे आदेश पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी दिले होते.

दरम्यान शेख नासीर शेख बशीर नामक इसम जुना बाजार भागामध्ये गुपचूपपणे नशेच्या गोळ्या आणि औषधी विकत आहे आणि तो नॅशनल उर्दू स्कूलसमोर मुद्देमाल घेऊन थांबल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार तातडीने शहर ठाण्याच्या पोलिसांनी छापा टाकला. पोलिसांना पाहून मुद्देमाल जागेवरच सोडून तो पळून गेला. छापा टाकण्यासाठी औषध निरिक्षक जीवन दत्तात्रय जाधव बीड यांची मदत घेण्यात आली आणि त्यांच्या तक्रारीवरून एनडीपीएस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अप्पर पोलिस अधीक्षक सचिन पांडकर, उपविभागीय पोलिस अधिकारी विश्वंभर गोल्डे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर ठाण्याचे पोलिस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ, पोलिस अंमलदार बाळासाहेब शिरसाट, मनोज परजणे, अशफाक सय्यद, शहेनशहा सय्यद, अयोध्या डोके, सुशेन पवार यांनी केली.

कुठून आणली गोळ्या, औषधी ? पोलिस करणार तपास

या कारवाईत अल्प्राझोलम आणि कोडींग फॉस्फेट नावाचे खोकल्याचे औषध असलेला साठा जप्त करण्यात आला. पाच हजारपेक्षा जास्त गोळ्या आणि शंभरपेक्षा जास्त बाटल्या खोकल्याच्या समाविष्ट होत्या. जवळपास २६ हजार रूपयांचा हा मुद्देमाल आहे. ही औषधी कोठून आणली याचा शोध घेण्यात येणार असून ज्यांनी ही औषधी पुरवली त्यांनाही प्रमुख आरोपी करण्यात येणार आहे. तसेच यास मदत करणारे सर्वांना आरोपी करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

जिजाऊ मल्टीस्टेट घोटाळ्यात आरोपी न करण्यासाठी १ कोटींची लाच.एक अटकेत, पोलीस निरीक्षक फरार.

आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हरिभाऊ खाडे, हवालदार आर.बी.जाधवर आणि खासगी व्यापारी कौशल प्रवीण जैन (रा.बीड) अशी आरोपींची नावे आहेत. बीडमधील जिजाऊ मल्टीस्टेचा प्रमुख बबन शिंदे याने पांगरी राेडवर शाळा बांधली होती. त्याच्या बांधकामासाठी लागणारे साहित्य तक्रारदाराने दिले होते. त्याचे पैसेही तक्रारदाराला शिंदे याने दिले. परंतू ठेविदारांनी गुन्हा दाखल केल्यानंतर याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे गेला. त्यात बँक स्टेटमेंटमधून पैसे तक्रारदाराच्या खात्यावर गेल्याचे दिसले. त्याप्रमाणे पोलिस निरीक्षक खाडे यांनी दोघांना बोलावून घेतले. 

तुम्हाला या गुन्ह्यात आरोपी करत नाही, त्याच्या बदल्यात प्रत्येकी ५० लाख रूपये असे १ कोटी रूपये लाचेची मागणी केली. चार महिन्यांपासून खाडे हे त्यांना त्रास देत होते. अखेर १३ मे रोजी रात्री उशिरा बीडच्या लाचलुचपत प्रतिबंधक पथकाकडे तक्रार केली. त्यानंतर १४ मे रोजी खात्री केली. १५ मे रोजी पैसे घेऊन तक्रारदार गेला. यावर खाडे याने आपण पुण्याला आलो असून जैन या व्यापाऱ्याकडे पैसे देण्यास सांगितले. जैनने पैसे स्विकारताच एसीबीने त्याला पकडले. त्यानंतर खाडे आणि हवालदार जाधवर यांचा शोध सुरू केला. परंतू रात्री उशिरापर्यंत ते मिळून आले नव्हते. ही कारवाई बीडचे उपअधीक्षक शंकर शिंदे, भारत गारदे, अमोल खरसाडे, अविनाश गवळी, हनुमंत गोरे, सुरेश सांगळे, अंबादास पुरी आदींनी केली.

Tuesday, May 14, 2024

लोकसभा निवडणुकीनंतर मोबाइल युजर्सला धक्का; प्लॅनच्या किंमती वाढवण्याच्या तयारीत.


लोकसभा निवडणुकीनंतर कोट्यावधी मोबाइल युजर्सला धक्का बसण्याची शक्यता आहे. रिपोर्ट्सनुसार, टेलिकॉम कंपन्या मोबाइल टॅरिफ प्लॅनच्या किंमती वाढवण्याच्या तयारीत आहे. या किंमती 25 टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता आहेय. यामुळे कंपन्यांचा महसूल वाढणार आहे.

ब्रोकरेज फर्म अ‍ॅक्सिस कॅपिटलच्या एका रिपोर्ट्सनुसार, कंपन्यांनी 5G सुविधेत मोठी गुंतवणूक केली आहे. अशातच कंपन्यांना त्यांना होणारा नफा याकडे अधिक लक्ष देत आहे. रिचार्ज प्लॅनच्या किंमतीत केवळ शहरातच नव्हे ग्रामीण भागातही वाढल्या जाऊ शकतात. रिपोर्ट्सनुसार, पोस्टपेड आणि प्रीपेड प्लॅन देखील आधीच्या किंमतीपेक्षा अधिक महाग होऊ शकतात. दुसऱ्या बाजूला इंटनेट प्लॅनच्या किंमतीही वाढू शकतात.

नफ्यात वाढ होण्यासाठी रिचार्ज प्लॅनच्या किंमती वाढणार
मीडिया रिपोर्ट्सनुसार, मोबाइल रिचार्ज प्लॅनमध्ये वाढ करण्यामागील कारण प्रति युजरच्या मागे महसूलात वाढ करण्याचे आहे. सध्या टेलिकॉम कंपन्यांचा प्रति युजर महसूल फार कमी आहे. याचा अर्थ असा होतो की, मोबाइल कंपन्या प्रत्येक युजरसाठी पैसे खर्च करत असतली तरीही समाधानकारक कमाई होत नाहीये. याच कारणास्तव टेलिकॉम कंपन्या आपल्या रिचार्ज प्लॅनमध्ये 25 टक्के वाढ करण्याची शक्यता आहे.

किती रुपयांनी महागणार रिचार्ज प्लॅन?
रिचार्ज प्लॅनमध्ये 25 टक्क्यांनी वाढ झाल्यास सर्वसामान्यांना याचा मोठा फटका बसणार आहे. तुम्ही प्रत्येक महिन्याला 200 रुपयांचा रिचार्ज करत असल्यास त्यात 50 रुपयांची अधिक वाढ होईल. याचा अर्थ असा होतो की, 200 रुपयांच्या रिचार्जसाठी 250 रुपये मोजावे लागणार आहेत. याशिवाय 1 हजार रुपयांच्या रिचार्जमध्ये 250 रुपयांपर्यंत वाढ होईल.

मूळ किंमतीत वाढ
मीडिया रिपोर्ट्सनुसार, रिचार्ज प्लॅनमध्ये वाढ केल्यास टेलिकॉम कंपन्यांच्या मूळ रिचार्जच्या किंमती वाढल्या जाणार आहेत. एअरटेल कंपनीच्या मूळ किंमतीत 29 रुपयांपर्यंत वाढ होऊ शकते. दुसऱ्या बाजूला जिओमध्ये 26 रुपयांची वाढ होऊ शकते. रिपोर्ट्सनुसार, टेलिकॉम कंपन्यांनी वर्ष 2019 आणि 2023 दरम्यान रिचार्ज प्लॅमध्ये तिप्पट वाढ केली आहे.

सासू रागावल्याने सुनेकडून भयंकर कृत्य; दोन चिमुकल्यांना विष पाजले, स्वतःही केले प्राशन.दोन्ही मुलांचा मृत्यू, आईची प्रकृती स्थिर.


अंबाजोगाई (प्रतिनिधी) 'स्वयंपाक जास्त का केला' याचा सासूने जाब विचारल्याचा राग मनात धरून विवाहितेने पोटच्या दोन्ही चिमुकल्यांना विषारी द्रव पाजले. त्यानंतर स्वतः विषारी द्रव प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेत दोन्ही मुलांचा मृत्यू झाला असून विवाहितेवर उपचार सुरू आहे. पतीच्या फिर्यादीवरून पत्नीविरोधात बर्दापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना अंबाजोगाई तालुक्यातील बर्दापूर येथे शुक्रवारी रात्री घडली.

कौशल्या भीमराव दोडतले (वय २३, रा. टेकडी गल्ली, बर्दापूर) असे विवाहितेचे नाव आहे. शुक्रवारी रात्री पती भीमराव निवडणुकीच्या सभेला गेला होता. यावेळी घरात असलेल्या सासूने स्वयंपाक जास्त का केलास असे कौशल्याला विचारले. याचा राग धरून कौशल्याने मुलगा कार्तिक (वय २) आणि मुलगी प्रांजल (वय ३) यांना खोलीत नेले. तिथे दोन्ही मुलांना विषारी द्रव पाजले. सभा संपून भीमराव घरी आल्यानंतर आईने त्याला कौशल्या रुसून खोलीत बसल्याचे सांगितले. भीमराव खोलीत गेला असता मुलांच्या नाकाला फेस आल्याचे दिसले. त्यावर मुलांच्या नाकाला व्हॅसलिन लावल्याचे कौशल्याने सांगितले.

परंतु, मुलांच्या नाकातून रक्त येत असल्याने आणि मुले काहीच हालचाल करत नसल्याने भीमरावने मुलांना खांद्यावर घेत बाहेर आणले. आरडाओरडा करून गल्लीतील लोकांना बोलावले. यावेळी कौशल्याने वरच्या खोलीत जाऊन विषारी द्रव प्राशन केले. भीमराव आणि शेजाऱ्यांनी तिघांनाही लातूर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासून कार्तिक आणि प्रांजल यांना मयत घोषित केले. तर, कौशल्यावर उपचार असून तिची प्रकृती स्थिर आहे. भीमराव दोडतले यांच्या फिर्यादीवरून पत्नी कौशल्यावर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पीएसआय ठाकूर करत आहेत.