Sunday, June 30, 2024

संत श्रेष्ठ गजानन महाराजांच्या पालखीचे अ.भा. वारकरी भजनी मंडळाच्या वतीने परळीच्या सिमेवर जोरदार स्वागत.

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) शेगाव (जि. बुलडाणा) येथून आषाढी यात्रेसाठी पंढरपूरकडे निघालेल्या संत गजानन महाराजांच्या पालखीचे दोन दिवसांच्या मुक्कामासाठी रविवारी दिनांक 30 जून रोजी सायंकाळी तीर्थक्षेत्र परळी वैजनाथ येथे आगमन झाले असता अ.भा. वारकरी भजनी मंडळाच्या वतीने संस्थापक अध्यक्ष ह भ प श्री रामेश्वर महाराज कोकाटे व त्यांच्या सहकाऱ्यांच्या वतीने श्रींचे फटाक्यांच्या आतिषबाजीत व पुष्पहार अर्पण करून जोरदार स्वागत करण्यात आले.
अखिल भारतीय वारकरी भजनी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष ह भ प श्री रामेश्वर महाराज कोकाटे व त्यांच्या सहकाऱ्यांच्या वतीने आज रविवारी संतश्रेष्ठ श्री गजानन महाराज यांच्या पालखीचे वैजनाथ नगरीच्या सिमेवर  जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी अखिल भारतीय वारकरी भजनी मंडळाच्या सर्व महिला सदस्या तसेच भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 रविवारी  या पालखीचा मुक्काम औष्णिक विद्युत केंद्र येथील श्री राम मंदिर येथे असून सोमवारी पहाटे श्रींची  पालखी मोंढा मार्केट येथील श्री संकट मोचन हनुमान मंदिर येथे विसावा घेऊन संत जगमित्र नागा मंदिरात मुक्कामी राहणार आहे.गणगण गणात बोते ज्ञानोबा तुकाराम अभंग म्हणत म्हणत श्रीची पालखी परळीकडे येत होती परळीच्या जवळ येताच वरूनराज्याने देखील आगमन केले अतिशय आनंदाच्या वातावरानात श्रीचीपालखी परळीकडे आगमन झाले विणेकरी पताके टाळकरी गायक वादक टाळ मृदंगाच्या आवाजाने मन प्रसन्न झाले वारकरी मंडळाच्या वतीने भव्य स्वागत करण्यात आले  श्रीनाथ सेवाभावी संस्थेचेअध्यक्ष यशवंतराव चव्हाण यांच्यासह भजनी मंडळाचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत श्रीचा स्वागत करण्यात आले

Saturday, June 29, 2024

जि.प.प्रा.शाळा संगम येथे शिक्षक पालक मेळावा उत्साहात संपन्न.

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) जि प प्रा शा संगम शाळेत आज दि 29 जून 24 रोजी शिक्षक पालक मेळावा नुतन परळी केंद्राचे केंद्रप्रमुख श्री  यादव पल्लेवाड,ह भ प रामेश्वर महाराज कोकाटे,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नवनाथ नागरगोजे ,मुख्याध्यापक अशोक नावंदे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
 क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
उपस्थित मान्यवर व पालकांचे स्वागत शाळेच्या वतीने करण्यात आले.प्रास्तविक मुख्याध्यापक अशोक नावंदे यांनी करताना बैठकीच्या आयोजना बाबत व विध्यार्थी लाभाच्या योजना बद्दल माहिती सांगितली .
केंद्रप्रमुख श्री पल्लेवाड यांनी शाळेच्या विकासासाठी पालकांची भूमिका महत्त्वाची आहे असे सांगितले व विध्यार्थी विविध शिष्यवृत्ती योजना बाबतची माहिती सांगून असाक्षर पुरुष,महिलांना साक्षर करण्याची जबाबदारी शाळा मुख्याध्यापक,शिक्षक यांच्यासह कुटुंबातील सदस्य यांनी घेऊन सप्टेंबर अखेर सर्वांना साक्षर करावे असे आवाहन केले.
पालकांच्या वतीने ह भ प रामेश्वर महाराज कोकाटे यांनी शाळेला सर्वोत्तपरी सहकार्य करण्याचे व असाक्षरांना वही, पेन व उजळणी पुस्तक वाटप करण्याचा मनोदय व्यक्त करून शाळेत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांचे कौतुक केले.
यावेळी  पालक मोठया संख्येने उपस्थित होते. 
मेळावा यशस्वी करण्यासाठी शाळेचे शिक्षक सर्वश्री महादेव गित्ते सर ,सुभाष कोंकेवाड सर,शिक्षिका श्रीमती कल्पना बडे मॅडम व बबिता शिंदे मॅडम यांनी परिश्रम घेतले.

रस्त्यात तलाव की तलावात रस्ता.उखर्डा ते उखर्डा पाटी रस्त्याची दयनीय अवस्था. रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करावी - अभिजित कुडे

वरोरा (प्रतिनिधी) तालुक्यातील उखर्डा ते उखर्डा पाटी रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था  झाली आहे, रस्त्यात तलाव की तलावात रस्ता हा प्रश्न निर्माण झाला आहे.  संपूर्ण रस्त्यात खड्डे पडले असून प्रवास करणे अवघड झाले आहे.  लोकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो आहे.  पावसाळा सुरू झाला आहे त्यामुळे रस्त्यातील खड्ड्यांचे तलावाचे स्वरुप प्राप्त झाले आहे.  या रस्त्याच्या मागणी साठी झाडे लावा आंदोलन,  भजन आंदोलन करण्यात आले अनेक निवेदन देवून देखील या गेंड्याच्या कातडीच्या  प्रशासनाला  जाग आली नाही.
 अनेक आंदोलन करून निवेदन देऊन निराशा पदरी पडले आहेत.  लोकांमधे प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे.  बांधकाम विभाग कुंभ करण झोपेत आहे.  रात्रीच्या वेळी अनेक अपघात घडत आहेत.  गेल्या 4 वर्षापासून रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे.  निवेदन दिले आंदोलन केले त्या नंतर तात्पुरती मलमपट्टी करण्याचा प्रयत्न केला पण पुन्हा रस्त्याला तलावाचे स्वरुप प्राप्त झाले आहे  . ग्रामीण भागातील लोकांचा जीव मुठीत धरून प्रवास  करावा लागतो आहे. लाजिरवाणी बाब आहे की अजून देखील प्रशासनाला गांभीर्य लक्षात घेता आले नाही. तात्काळ रस्त्याचे काम करावे अन्यथा बांधकाम विभागाला कुलूप लावून आंदोलन करणार असा इशारा युवासेना विधानसभा प्रमुख अभिजीत कुडे यांनी दिला आहे. लोकांचा संयम संपला असून जनता त्रस्त झाली आहे हतबल झाले आहेत. रस्त्यात खड्डे पडले नसून ते तलाव झाले आहे.  3,4 फुट खोल खोल खड्डे पडले आहेत. या रस्त्याचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ रस्त्याची दुरुस्ती करावी अन्यथा शिवसेना आक्रमक भूमिका घेवून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा अभिजित कुडे यांनी दिला.

Friday, June 28, 2024

नीट पेपर फुटी प्रकरण : आरोपी जलील पठाणचा उदगीरात एक कोटीचा बंगला शासकीय नोकरी चे दिव्यांग प्रमाणपत्रही बोगस?



लातूर(प्रतिनिधी) : 'नीट' परीक्षा घोटाळा प्रकरणी अटकेतील आरोपी जलील पठाण यानं लातूरच्या उदगीर शहरातील जळकोट रोड परिसरात एक कोटी रुपयांचा बंगला सहा महिन्यापूर्वीच बांधला आहे. तर शासकीय नोकरीत बढतीसाठी त्यानं जोडलेलं कर्णबधीर असल्याचं दिव्यांग प्रमाणपत्रही आता संशयाच्या भोवऱ्यात अडकलं आहे. याची गंभीर दखल घेत या प्रमाणपत्राच्या सखोल चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

जलील पठाण जिल्हा परिषदेकडून निलंबित 

'नीट' पेपर फुटीच्या प्रकरणात एटीएसनं अटक केलेला लातूरच्या कातपूर जिल्हा परिषद शाळेचा मुख्याध्यापक जलील पठाण हा 2009 मध्ये जिल्हा परिषद शिक्षक म्हणून शासकीय सेवेत भरती झाला. काही वर्षानंतर त्यानं लातूर जिल्ह्यात बदली करून घेतली. प्रथमतः अहमदपूर आणि नंतर लातूर तालुक्यातील कातपूर इथं मुख्याध्यापक म्हणून रुजू होता. नांदेडच्या एटीएसनं त्याला अटक करताच लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांनी त्याला निलंबित केलं. त्याचा पदभार काढून घेण्यात आला. निलंबन काळात त्याला निलंगा पंचायत समितीमध्ये हजेरी देण्यास सांगितलं आहे.

कर्णबधीर प्रमाणपत्र बोगस असल्याची शक्यता 

आरोपी पठाण यानं शासकीय नोकरीत भरतीसाठी कर्णबधीर असल्याचं पुणे जिल्हा शल्यचिकित्सकांची स्वाक्षरी असलेलं प्रमाणपत्र जोडलं आहे. हे प्रमाणपत्र बोगस असल्याचा संशय अधिकाऱ्यांना असून ते प्रमाणपत्र पुणे येथील विभागीय आयुक्तांकडे पाठवण्यात आलं आहे. त्याचा अहवाल दोन दिवसात येणार असल्याचं विश्वसनीय सूत्रांनी सांगितलं आहे.

पठाणचा एक कोटीचा बंगला 

उदगीर शहरातील जळकोट रोडवर आरोपी जलील पठाण याच्या मालकीच्या जागेतील तीन मजली इमारत सहा महिन्यापूर्वीच बांधून पूर्ण झाली. दुसरा मजला रिकामा असून तिसऱ्या मजल्यावर दोन भाडेकरु राहतात. आरोपी जलील पठाण हा मूळचा देवणी तालुक्यातील विजयनगर येथील रहिवासी असून गावी त्याची शेती आहे. त्याचे वडील उमरखान पठाण यांनी गावातच चार म्हशी पाळल्या असून ते दुग्ध व्यवसाय करतात. तर जलीलचे चार भाऊ गावातच राहतात.

गुन्हा दाखल झाल्यापासून पठाण फरार 

लातूर शहरातील एसटी वर्कशॉप समोरील कॉलनीत आरोपी जलील पठाण एका अपार्टमेंटमध्ये मुलाबाळांसह राहतो. परंतु गुन्हा दाखल झाल्यापासून जलीलची पत्नी मुलं गायब आहेत. जलील पठाणची दोन्ही मुलं वार्षिक 90 हजार रुपये शुल्क असलेल्या महागड्या शाळेत शिक्षण घेत असल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.