Wednesday, November 29, 2023

अवकाळी पावसाने घेतला शेतकऱ्याचा बळी; पाली गावात वीज पडून मृत्यू.

बीड (प्रतिनिधी): राज्यात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस पडत आहे. अवकाळी पावसाने शेतकऱ्याचा बळी घेतल्याची घटना. बीड जिल्ह्यात समोर आली आहे. पाली गावात जनावरे सांभाळणाऱ्या शेतकऱ्यांच्या अंगावर वीज पडल्याने त्यांचा मृत्यू झाला. आत्माराम निवृत्ती राऊत असं मयत शेतकऱ्याचे नाव आहे.
 मयत शेतकरी आत्माराम राऊत हे आपल्या शेतामध्ये जनावरे चारत होते. या दरम्यान पावसाचे वातावरण निर्माण होऊन विजांचा कडकडाट झाला आणि वीज कोसळली. त्यामध्ये शेतामध्ये असलेल्या आत्माराम राऊत यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात मृत्यूची आकस्मिक नोंद करण्यात आली आहे.

घातपात की अपघात! बेपत्ता विवाहितेचा विहीरीत आढळला मृतदेह.


आष्टी (प्रतिनिधी) - कौटुंबिक कलह सुरू असल्याने २६ नोव्हेंबर पासून घरातून बेपत्ता झालेल्या २५ वर्षीय विवाहितेचा मृतदेह आज सकाळी त्याच्या घराजवळील विहीरीत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. कोमल श्रीकांत राऊत ( २५) असे त्या महिलेचे नाव आहे.

आष्टी तालुक्यातील साबलखेड माहेर असलेल्या कोमल हिचा काही वर्षापूर्वी धामणगांव येथील श्रीकांत कल्याण राऊत याच्याशी विवाह झाला होता.सुरवातीचे काही वर्ष सुखी संसार सुरू होता.पण नंतर सासरकडील मंडळी तिला त्रास देत असल्याने ती २६ नोव्हेंबर रोजी पहाटेच्या दरम्यान सगळे झोपेत असताना घराला बाहेरून कडी लावून बेपत्ता झाली होती. बेपत्ता झाल्याची तशी नोंद पती श्रीकांत कल्याण राऊत यांनी २७ नोव्हेंबर रोजी अंभोरा पोलिस ठाण्यात दिली. मात्र, आज सकाळी कोमल यांचा मृतदेह घराशेजारील विहीरीत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

माहिती मिळताच अंभोरा पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक महादेव ढाकणे,पोलीस उपनिरीक्षक रवि देशमाने,पोलीस हवालदार बाबासाहेब गर्जे, संतोष क्षीरसागर, लुईस पवार, पोलीस अंमलदार शिवदास केदार, अमोल शिरसाठ, अमोल ढवळे यांनी घटनास्थळी पाहणी केली. पंचनामा करण्याचे काम सुरू आहे.

मुलीचा घातपात झाल्याचा संशय.

कोमल हिला गेल्या अनेक महिन्यांपासून सासरकडील मंडळी त्रास देत होते.तिचा सारखा मानसिक त्रास केला जात होता. मृतदेह विहीरीत आढळून आल्याने घातपात झाल्याचा संशय कोमलच्या माहेरच्या नातेवाईकांनी उपस्थित केला आहे.

देवदर्शनाला जाताना कार झाडावर आदळली; चालकासह महिलेचा जागीच मृत्यू, दोघे जखमी.


आष्टी (प्रतिनिधी) : शिर्डी येथून तुळजापुरकडे देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांची कार नियंत्रण सुटल्याने भरधाव वेगात झाडावर आदळली. या भीषण अपघातात चालकासह एक महिला जागीच ठार झाली. तर दोन भावंडे गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात मंगळवारी सकाळी अकरा वाजेच्या दरम्यान आष्टी तालुक्यातील पोखरी येथे घडली.

शिर्डी येथील महिला आपल्या दोन मुलासह तुळजापुर येथे देवदर्शनासाठी आज सकाळी कारने (  क्रमांक एम.एच ०३,बी सी.६७३६ ) बीड नगर राष्ट्रीय महामार्गाने जात होत्या. दरम्यान, आष्टी मार्गे जात असताना सकाळी अकराच्या सुमारास चालकाचा स्टेअरिंग वरील ताबा सुटल्यानंतर कार रोड लगतच्या झाडावर आदळली. कारचा वेग जास्त असल्याने या भीषण अपघातात चालक रूपेश बबन भेडे, अनिता राहुल इंगोले ( ३३ ) या दोघांचा जागीच मृत्यू झाला.  तर अभय राहुल इंगोले ( १२), अनोप राहुल इंगोले ( १४, सर्व रा.शिर्डी ) हे दोघे भावंडे गंभीर जखमी झाले आहेत. नगर व जामखेड येथील रूग्णालयात या दोन भावंडावर उपचार सुरू आहेत. 

माहिती मिळताच घटनास्थळी आष्टीचे पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळस, पोलीस हवालदार काळे, वाणी साहेब, कन्हेरे यांनी भेट देत पंचनामा करत चालक व महिलेचा मृतदेह आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे.

बीडच्या जाळपोळ, तोडफोडीमागे एका शक्तीशाली व्यक्तीचा हात होता - आ.रोहित पवार

बीड (प्रतिनिधी) मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरु असलेल्या आंदोलनाला बीडमध्ये हिंसक वळण लागले होते. बीडमधील हिंसाचारात आमदारांची घरे, कार्यालये पेटवण्यात आली. आता या घटनेवरून आमदार रोहित पवार यांनी खळबळजनक दावा केला आहे. बीडच्या जाळपोळ, तोडफोडीमागे एका शक्तीशाली व्यक्तीचा हात होता असं रोहित पवारांनी वाशिम येथे संघर्ष यात्रेवेळी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.
आमदार रोहित पवार म्हणाले की, मी बीडला स्वत:गेलो होतो. या घटनेमागे एका शक्तीशाली व्यक्तीचा हात होता. सत्तेत असणार्‍या व्यक्तीचा हात होता. हिंसक आंदोलनावेळी जवळपास ७ तास पोलीस शांत बसले होते. सत्तेतला व्यक्ती आदेश देतो तेव्हा पोलीस शांत बसतात. अशावेळी तिथे जाळपोळ करत मराठा-ओबीसी समाजात वातावरण गढूळ करण्यासाठी तिथे जाळपोळ झाली.त्यामुळे बीडमध्ये जे काही घडले. त्यात लोकसभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन राजकीय द्वेषातून हे घडले असं त्यांनी म्हटलं.
त्याचसोबत जानेवारी महिन्यापासून राज्यातील विविध जिल्ह्यात अशाप्रकारे वातावरण गढूळ केले जाऊ शकते. त्यामुळे सर्व ग्रामस्थ, शहरातील लोकांना माझी विनंती आहे की महाराष्ट्र शांत ठेवणे हे सर्वसामान्यांच्या हिताचे आहे.राजकीय द्वेषातून प्रोफेशनल गुंड आणून कुणी जाळपोळ करत असेल हे समजून घेतले पाहिजे असं आवाहन आमदार रोहित पवार यांनी राज्यातील जनतेला करत सरकारवर मोठा आरोप केला आहे.
बीड हिंसाचारात आतापर्यंत २६२ जणांना अटक
मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर बीडमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या घटनेला १ महिना पूर्ण होत असून यात आतापर्यंत २६२ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. तपासात बीडमध्ये जाळपोळ, तोडफोड करणारे एकूण १० गट असल्याचं आढळले. त्यातील ६ गटाचे प्रमुख पकडले गेलेत. इतर ४ गटांचे प्रमुख पसार असून त्यांचा शोध सुरू आहे.गटातील इतर सदस्यांना अटक केली आहे. महत्त्वाच्या आरोपींपैकी पप्पू शिंदे यालाही बेड्या ठोकल्या आहेत. त्याची सध्या चौकशी सुरू आहे अशी माहिती पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी दिली आहे.
नंदकुमार ठाकूर म्हणाले की, पप्पू शिंदेकडे चौकशी सुरू असून त्यानेदेखील काही नावे सांगितली आहेत. त्याचा तपास सुरू आहे. आम्ही कुठल्याही दबावाला बळी पडणार नाही. कायदेशीरपणे निष्पक्षपाती या घटनेचा संपूर्ण तपास होत आहे. ही घटना गंभीर असून त्याचे गांभीर्य ओळखूनच पोलीस तपास करत आहे. यात कुठल्याही प्रकारे दबाव घेणार नाही. जे कुणी या घटनेत सहभागी आहेत त्यांना मुभा देणार नाही. त्यांच्यावर कडक कारवाई होणारच आहे. तपास अंमलदार या घटनेत योग्य तो निर्णय घेतील असं त्यांनी म्हटलं.

Sunday, November 26, 2023

सकल मराठा समाजाचे बॅनर अज्ञात व्यक्तीकडून फाडण्याची घटना.गावात तणाव. घटनास्थळी पोलिसांचा बंदोबस्त.



परभणी (प्रतिनिधी):
 जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील चिकलठाणा गावच्या पाटीवर लावण्यात आलेले सकल मराठा समाजाचे बॅनर अज्ञात व्यक्तीकडून फाडण्यात आल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. गावकऱ्यांनी या अशा प्रकारची कृती करणाऱ्याला तात्काळ अटक करण्यात यावी या मागणीसाठी सेलू देवगाव महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले आहे. त्यामुळे घटनास्थळी पोलिसांचा बंदोबस्त देखील वाढवण्यात आला असून, पोलीस परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. 

तर, मुद्दामहून असे कृत्य करून दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, आम्ही शांततेने वागत असताना उगाच मराठा समाजाला डिवचले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेनंतर मराठा समाजातील बांधवांनी अचानक सेलू देवगाव महामार्गावर रास्ता रोको केले आहे. त्यामुळे, महामार्गावरील वाहतूक पुर्णतः ठप्प  झाली असून, सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 

स्थानिक पोलिसांसह वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी. 

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे यांनी राजकीय नेत्यांना गावबंदी करण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे राज्यभरात गावागावात गावबंदीचे बॅनर लावण्यात आले आहे. असेच काही बॅनर परभणी जिल्ह्यातील अनेक गावात लावण्यात आले होते. तर,  सेलू तालुक्यातील चिकलठाणा येथील मराठा बांधवांनी देखील आपल्या गावात गावबंदीचे बॅनर लावले होते. मात्र, हेच  बॅनर काही अज्ञात लोकांनी फाडले असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. गावकऱ्यांनी आरोपींनी अटक करण्याची मागणी करत सेलू देवगाव महामार्गावर रास्ता रोको आंदोलन सुरु केले आहे. तर, याबाबत माहिती मिळताच स्थानिक पोलिसांसह वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहे. 

महामार्गावरील वाहतूक ठप्प...

सेलू तालुक्यातील चिकलठाणा येथील मराठा समाजाने लावलेले बॅनर फाडण्यात आल्याने मराठा समाज बांधव आक्रमक झाले आहे. त्यामुळे,  सेलू देवगाव महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे. अचानक झालेल्या या रास्ता रोकोमुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. यावेळी आंदोलकांनी महामार्गावर दुचाकी आडव्या लावून वाहनं अडवली आहे. तसेच, जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात येत आहे. त्यामुळे दोन्ही बाजूने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे पाहायला मिळत आहे. तर, पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले असून, आंदोलकांशी चर्चा सुरु आहे.

Saturday, November 25, 2023

हिंगोलीत एसटी महामंडळाची बस फोडली दुचाकीवरून आलेल्या अज्ञातांकडून दगडफेक.

हिंगोली (प्रतिनिधी): जिल्ह्यात पुन्हा एकदा एका एसटी बसवर दगडफेक करून त्याच्या काचा फोडण्यात आल्या आहेत. शुक्रवारी (24 नोव्हेंबर) रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास हिंगोली शहरा नजीक हा प्रकार समोर आला आहे. ही बस शेगावहून नांदेडकडे निघाली होती, दरम्यान, हिंगोली शहराजवळ येताच दुचाकीवरून आलेल्या अज्ञातांकडून या बसवर दगडफेक करण्यात आली आहे. सुदैवाने या घटनेत प्रवाशांना कोणतेही दुखापत झालेली नाही. तर, या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

मागील काही दिवसांपासून वेगवेगळ्या कारणांनी एसटी बसवर दगडफेक करून काचा फोडल्या जात असल्याच्या घटना समोर येत आहे. दरम्यान, हिंगोली शहरात देखील शुक्रवारी पुन्हा एकदा एका बसवर दगडफेक करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. शेगाव येथून निघालेली एम.एच. 06 एस 873 क्रमांकाची एसटी बस नांदेडकडे निघाली होती. शुक्रवारी रात्री 8 वाजेच्या दरम्यान ही बसवर हिंगोली शहरानजीक येताच तिच्या दगडफेक करण्यात आली. मात्र, सुदैवाने या घटनेत प्रवाशांना कोणतेही दुखापत झाली नाही. मात्र, बसच्या पाठीमागील काच फुटल्याने आर्थिक नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे, काच फुटून दगड आतमध्ये आल्याने जोरात आवाज झाला, आणि प्रवाशांमध्ये एकाच गोंधळ उडाला होता. 

अन् तत्काळ बस हिंगोली बसस्थानकात आणली

शेगावहून नांदेडकडे निघालेल्या एसटी बसवर हिंगोलीत दगडफेक करण्यात आली. अचानक झालेल्या या घटनेने प्रवासी घाबरून गेले होते. मात्र, बस चालक बाळासाहेब उत्तमराव पाटील व वाहक गजानन अंबादासराव देसाई यांनी तत्काळ बस हिंगोली बसस्थानकात आणली. त्यानात्र आपल्या बसमधील प्रवाशांना दुसऱ्या बसमधून रवाना केले. दरम्यान, याची माहिती मिळताच हिंगोली बसस्थानकात आगारप्रमुख सूर्यकांत थोरबोले, वाहतूक निरीक्षक एफ.एम. शेख यांनी बसची पाहणी केली. तसेच, पोलिसांत गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार,या घटनेप्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

प्रवाशांमध्ये एकाच गोंधळ उडाला...

शेगावहून  नांदेडकडे निघालेल्या एसटी बसवर हिंगोळी शहराजवळ पोहचताच दुचाकीवरून मागून आलेल्या दोन अज्ञातांकडून दगडफेक करण्यात आली. ज्यात एक मोठा आवाज आला आणि एक दगड बसच्या आतमध्ये येऊन पडला. त्यामुळे आतमध्ये बसलेल्या प्रवाशांमध्ये एकाच गोंधळ उडाला. अचानक झालेल्या या प्रकारामुळे नेमकं काय घडतय कोणालाच काही कळत नव्हते. मात्र, बस चालक बाळासाहेब उत्तमराव पाटील व वाहक गजानन अंबादासराव देसाई यांनी समयसूचकता दाखवत तत्काळ बस हिंगोली बसस्थानकात आणली. त्यामुळे प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला. 


Friday, November 24, 2023

कार्तिक पोर्णिमेनिमित्त कपीलधार जाण्याकरिता.बीड विभागाकडून 75 जादा बसेसची सोय. सामाजिक कार्यकर्ते चेतन सौंदळे यांच्या निवेदनाची दखल.

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) वैद्यनाथ ज्योतीर्लिंग क्षेत्र परळी - वैजनाथ सह जिल्हयातील विविध ठिकाणाहून 75 जादा बसेस चे नियोजन दि.25 नोव्हें ते दि.27 नोव्हें दरम्यान भाविक-भक्तांसाठी श्रीसंत मन्मथ स्वामी यांच्या संजीवन समाधीदर्शन व यात्रेनिमित्त श्रीक्षेत्र कपीलधार जाणा-या व येणा-या भाविक-भक्तांसाठी केले आहे.
अधिक(जादा) बसेसची सोय करण्याची मागणी राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज तपोनुष्ठान समिती,परळी अध्यक्ष तथा नगरसेवक चेतन सौंदळे व सर्व पदाधिकारी यांच्यावतीने राज्य परीवहन परळी आगारप्रमुख श्री.संतोष महाजन यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली होती याची दखल राज्य परीवहन विभाग,बीड यांनी घेऊन जादा बसेस नियोजना संदर्भातील लेखी पत्र चेतन सौंदळे यांना दिले आहे.
लेखी पत्रात परळी-वैजनाथ येथून 18,अंबाजोगाई-11 बीड-10,धारूर10,  माजलगांव07,गेवराई 07,पाटोदा 07,आष्टी05,अशा एकूण 75 जादा बसेसची सोय करण्यात आल्याचे नमुद केले आहे.
कार्तिक पोर्णिमादिनी श्री.संत मन्मथ स्वामी यांच्या पुण्यतिथी सोहळयानिमित्त त्यांच्या संजीवन समाधीचे दर्शन करण्याकरिता महाराष्ट्रसह ईतर राज्यातून लाखो भाविक-भक्त दर्शनासाठी श्री.वैद्यनाथ ज्योतीर्लिंग क्षेत्र परळी-वैजनाथ येथून श्री.संत मन्मथ स्वामींच्या संजीवन समाधीचे दर्शन करण्यासाठी कपीलधार किंवा तेथून प्रभू वैद्यनाथाचे दर्शन करण्याकरिता परळी येथे येतात त्यांच्या प्रवासाच्या सोयीकरिता अधिकच्या बसेस या दोन्ही तसेच विविध ठिकाणाहून सोडण्याची मागणी करण्यात आली होती त्यानुसार रा.प.विभाग,बीड यांनी नियोजन केले आहे.
सदरील जादा बससेवा सुरू केल्याबद्दल बीड जिल्हयाचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे,बीड रा.प.विभाग नियंत्रक श्री.अजय मोरे,परळी बस स्थानकाचे आगार व्यवस्थापक श्री.संतोष महाजन यांच्यासह बीड व परळी रा.प.विभागातील सर्व कर्मचारी वृंदाचे आभार व समाधान भाविक-भक्त तसेच राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज तपोनुष्ठान समितीचे अध्यक्ष चेतन सौंदळे यांच्यासह सर्व पदाधिकारी व सदस्यांच्यावतीने व्यक्त करण्यात आले आहे.
रा.प.विभागामार्फत सुरू केलेल्या बसेसचा लाभ सर्व  भाविक-भक्त व महिला-भगिणी यांनी घेण्याचे आवाहन श्री.सौंदळे यांनी केले आहे.

Thursday, November 23, 2023

कार्तिक पोर्णिमेनिमित्त परळी ते कपीलधार जाण्याकरीता ज्यादा बसेस सोडण्याची मागणी - चेतन सौंदळे

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) श्री.वैद्यनाथ ज्योतीर्लिंग क्षेत्र परळी - वैजनाथ येथून कपीलधार(मांजरसुंभा) येथे कार्तिक पोर्णिमेनिमित्त श्रीसंत मन्मथ स्वामी यांच्या संजीवन समाधीदर्शन व यात्रेनिमित्त जाणा-या व येणा-या भाविक-भक्तांसाठी अधिक(ज्यादा) बसेसची सोय करण्याची मागणी राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज तपोनुष्ठान समिती,परळी अध्यक्ष तथा नगरसेवक चेतन सौंदळे व सर्व पदाधिकारी यांच्यावतीने  राज्य परीवहन परळी आगारप्रमुख श्री.संतोष महाजन यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

 कार्तिक पोर्णिमादिनी श्री.संत मन्मथ स्वामी यांच्या पुण्यतिथी सोहळयानिमित्त त्यांच्या संजीवन समाधीचे दर्शन करण्याकरिता महाराष्ट्रसह ईतर राज्यातून लाखो भाविक-भक्त दर्शनासाठी श्री.वैद्यनाथ ज्योतीर्लिंग क्षेत्र परळी-वैजनाथ येथून श्री.संत मन्मथ स्वामींच्या संजीवन समाधीचे दर्शन करण्यासाठी कपीलधार किंवा तेथून प्रभू वैद्यनाथाचे दर्शन करण्याकरिता परळी येथे येतात त्यांच्या प्रवासाच्या सोयीकरिता अधिकच्या बसेस या दोन्ही तसेच विविध ठिकाणाहून सोडण्याची मागणी करण्यात आली.
    तसेच प्रत्येक पोर्णिमेनिमित्त कपीलधार तसेच राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज संजीवन समाधी,भक्तीस्थळ, अहमदपुर येथे थेट बससेवा सुरू केल्याबद्दल बीड जिल्हयाचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे,बीड रा.प.विभाग नियंत्रक श्री.अजय मोरे,परळी बस स्थानकाचे आगार व्यवस्थापक श्री.संतोष महाजन यांच्यासह परळी रा.प.विभागातील सर्व कर्मचारी वृंदाचे आभार व समाधान भाविक-भक्त तसेच राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज तपोनुष्ठान समितीचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते चेतन सौंदळे,  रामेश्वर कस्तुरे यांच्यासह सर्व पदाधिकारी व सदस्यांच्या वतीने व्यक्त करण्यात आले.

प्रिंट व डिजिटल मीडिया पत्रकार संघाची खेड तालुका नवनियुक्त पदाधिकारी कार्यकारणी जाहीर..!


चाकण (प्रतिनिधी) : प्रिंट व डिजिटल मीडिया पत्रकार संघाची खेड तालुका कार्यकारणी दि-२२ नोव्हेंबर २०२३ रोजी संघाचे राज्याध्यक्ष सुनील जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्हाध्यक्ष राजेंद्र काळभोर यांनी जाहीर केली आहे. खेड तालुका कार्यकारणीत अध्यक्ष म्हणून नितीन गोपीचंद सैद यांची निवड करण्यात आली आहे.

खेड तालुका प्रिंट व डिजिटल मीडिया पत्रकार संघाच्या कार्याध्यक्षपदी लहू शंकर लांडे, उपाध्यक्षपदी मनोहर किसन गोरगल्ले, सचिवपदी आशिष अण्णासाहेब ढगे पाटील तर, संघाच्या कायदेशीर सल्लागारपदी अँड. प्रितम रामदास शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. प्रिंट व डिजिटल मीडिया पत्रकार संघाच्या खेड तालुका कार्यकारणीत निवड झालेल्या पदाधिकारी यांना पुणे जिल्हाध्यक्ष राजेंद्र काळभोर यांनी नियुक्त पत्र वाटप केले.

यावेळी संघाचे राज्याध्यक्ष सुनील जगताप, कार्याध्यक्ष जनार्दन दांडगे, सचिव संदीप बोडके, खजिनदार विजय काळभोर, सल्लागार तुळशीराम घुसाळकर, प्रभाकर क्षीरसागर, विश्वनाथ केसवड आदि मान्यवर उपस्थित होते.

 ·  राज्यापातळीवर प्रिंट व डिजिटल मीडिया पत्रकार बांधवासाठी ताकतीने काम करणारा संघ म्हणून प्रिंट व डिजिटल मीडिया पत्रकार संघ राज्यात काम करत आहे. याच संघाच्या माध्यमातून खेड तालुक्यातील पत्रकार बांधवांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी आम्ही आमच्या पदाचा वापर करणार आहे. तालुक्यात कोणताही पत्रकार कोणत्याही संघात असुदयात आमच्या संघाच्या माध्यमातून त्या पत्रकार बांधवाला सर्वतोपरी मदत करण्याचा आमचा मानस असणार आहे.

नितीन सैद, नवनियुक्त अध्यक्ष खेड तालुका..   

Wednesday, November 22, 2023

श्रीक्षेत्र कपिलधार कडे निघालेल्या विविध दिंड्यांचे वैद्यनाथ मंदिर परिसरात जोरदार स्वागत.

परळी वैजनाथ (प्रतिनिधी)  येथे श्री वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाच्या मंदिरात श्रीक्षेत्र कपिलधार येथील मन्मथ माऊलींच्या दर्शनासाठी निघालेल्या पायी दिंड्यांचे आज आगमन झाले. गडगा,बीचकुंदा ,वेलुर व इतर ठिकाणचे भाविक दाखल झाले आहे. विविध ठिकाणच्या पायी दिंडीतील भाविकांनी वैद्यनाथ मंदिरासमोर हर हर महादेव ,श्री मन्मथ स्वामी की जय घोष करीत रिंगण सोहळा केला.
फटाक्यांची आतिषबाजी करीत बीचकुंदा (तेलंगणा) येथील पायी दिंडीतील भाविकांनी पाऊले खेळल्याने भक्तीमय वातावरण तयार झाले..या दिंडीचे चंद्रकांतआप्पा बुरांडे यांनी स्वागत केले.  शिवाचार्य महाराजांसह भक्त हर हर महादेव, गुरूराज माऊली, श्री मन्मथ स्वामी की जय अशा घोषणा देत वैजनाथ मंदिरात पोहोचले व प्रभू वैद्यनाथाचे त्यांनी दर्शन घेतले .पदयात्रेत प्रत्येकाच्या गळ्यात भगवा रुमाल व झेंडा होता. 
यावेळी प्रवीण थोटे , सामाजिक कार्यकर्ते चेतन सौंदळे, पत्रकार संजय खाकरे,  संदीप चौधरी, सदानंद चौधरी, सोरडगे, नंदकिशोर शेटे, नाईकवाडे, कैलास भिमाशंकरअप्पा रिकीबे, गोदावरी चौधरी, सौ.चेतना गौरशेटे व इतर भाविक उपस्थित होते. यावेळी आरती झाली. विविध ठिकाणच्या दिंडीतील भाविकांनी श्री प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेतले. श्री वैद्यनाथमंदिर परिसरातील व्यापार्‍यांनी ही दिंडीचे स्वागत केले

यंदा लालपरी जोरात.एसटी महामंडळाला विक्रमी उत्पन्न ; एका दिवसात ३७.६३ कोटी रुपये एसटीच्या तिजोरीत जमा.

मुंबई :(प्रतिनिधी) यंदाच्या दिवाळीत प्रवाशांनी एसटीला पसंती दिली आहे. त्यामुळे एसटीच्या उत्पन्नाचा नवा विक्रम झाला आहे. २० नोव्हेंबर रोजी एसटी महामंडळाच्या इतिहासातील विक्रमी उत्पन्नाची नोंद झाली असून या एका दिवसात राज्यातून ३७ कोटी ६३ लाख रुपयांची कमाई झाली. यापूर्वी १६ नोव्हेंबर रोजी ३५ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. तर, गेल्या २० दिवसांत एसटीचे उत्पन्न ५१० कोटी रुपयांपर्यंत पोहचले आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदाही एसटीच्या भाडेवाढीत १० टक्क्यांची वाढ करण्यात आली होती. मात्र तरीही प्रवाशांनी एसटीकडे पाठ न फिरवता प्रतिसाद दिला आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवनिमित्त राज्य सरकारने ७५ वर्षे पूर्ण झालेल्या ज्येष्ठांना एसटीतून मोफत प्रवासाची सवलत दिली आहे. तसेच ६५ ते ७५ वर्षांच्या ज्येष्ठांना आणि महिलांना तिकीटदरात ५० टक्के सवलत दिली आहे. त्यामुळे एसटीसाठी महिला, ज्येष्ठ नागरिकांची संख्या वाढली आहे. दिवाळीनिमित्त प्रवाशांच्या सोयीसाठी एसटीकडून जादा बस फेऱ्या चालवण्यात आल्या. त्या गाडय़ांना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे एसटीने उत्पन्नाचा विक्रम रचला. १ ते २० नोव्हेंबर दरम्यान एसटीचे उत्पन्न ५१० कोटी रुपये झाले. तर, ८ ते २० नोव्हेंबर या कालावधीत ३९० कोटी रुपये उत्पन्न मिळाले. महसूल वाढीसाठी दिवाळीच्या हंगामात सर्व बस प्रकारच्या तिकीट दरात सरसकट १० टक्के भाडेवाढ केली होती. सध्या केलेली भाडेवाढ ८ ते २७ नोव्हेंबर या कालावधीत लागू असेल. त्यानंतर नेहमीप्रमाणे तिकीट दर लागू होतील.

लातूरच्या ट्युशन एरियामध्ये पोलिसांचे मोठं कोम्बिग ऑपरेशन; 33 जणांवर कारवाई.

लातूर :(प्रतिनिधी) लातूर येथील ट्युशन एरियात पोलिसांनी कोम्बिग ऑपरेशन केले. चार पोलीस ठाण्याचे 55 पेक्षा जास्त पोलीस कर्मचाऱ्यांनी हे कोंबिंग ऑपरेशन पार पाडलं. यामध्ये 10 पोलीस अधिकारी आणि 45 पोलीस कर्मचारी वाहनांचा ताफा यांनी एकत्रित येत लातूर येथील ट्युशन एरियामध्य कारवाई केली. यामध्ये 33 लोकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.

संपूर्ण राज्यामध्ये लातूर शहर शैक्षणिक पॅटर्नसाठी ओळखला जातो. राज्यभरातून हजारो विद्यार्थी येथे शिक्षणासाठी येत असतात. लातूर येथील ट्युशन एरियामध्ये यामुळे विद्यार्थ्यांची प्रचंड गर्दी होत असते. याच ठिकाणी काही असामाजिक तत्त्व सक्रिय झाली आहेत. 

नशेच्या आहारी जाणारे विद्यार्थी, चोरी करणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. गुंडगिरी करणे, मुलींची छेड काढणे, या भागांमध्ये विनाकारण फिरत राहणे आदी अशा स्वरूपाचे गुन्हे इथे नित्यनेमाने घडत असतात. या भागातील असामाजिक तत्त्वांवर वचक बसावा यासाठी लातूर शहरातील पोलिसांनी एकत्रित येत ही कारवाई केली आहे. 

शिवाजीनगर पोलीस ठाणे, गांधी चौक पोलीस ठाणे, एमआयडीसी पोलीस ठाणे आणि विवेकानंद पोलीस ठाणे येथील अधिकारीनी यात सहभाग घेतला होता. या कोंम्बिग ऑपरेशन दरम्यान या भागांमध्ये विनाकारण फिरणारे आणि गुंडगिरी करणाऱ्या 33 लोकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. 

ट्युशन एरिया मध्ये अशा स्वरूपाची ही पहिलीच कारवाई असल्यामुळे या भागात सातत्याने गुंडगिरी करणाऱ्यामध्ये दहशत निर्माण झाली आहे. या कोम्बिग ऑपरेशन मागचा उद्देश हा संपूर्ण राज्यातून शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना भयमुक्त वातावरणात त्यांच्यातील शैक्षणिक गुणवत्ता विकसित करता यावी हा आहे.

बीडमधील आणखी एक अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक बुडाल्याची अफवा, अचानक सर्व शाखा बंद, ठेवीदारांमध्ये खळबळ.

  • बीड जिल्ह्यातील साईराम अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक बुडाल्याची अफवा
  • बँकेच्या मुख्य शाखेसमोर ठेवीदारांची मोठ्या प्रमाणात गर्दी
  • साईराम अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचे सर्वेसर्वा पळून गेल्याची चर्चा

बीड (प्रतिनिधी) : 
बीड जिल्ह्यातील साईराम अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक ही गेल्या काही दिवसांपासून बंद झाली आहे. ठेवीदार पैसे काढण्यास गेले असता मागील पंधरा दिवसांपासून उडवा उडवीची उत्तरं दिल्याने संशयाचे वातावरण निर्माण झाले. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ही बँक बंद असल्याने आणि बँकेचे सर्वेसर्वा शाहीनाथ परभणे यांचे निवासस्थानही बंद आहे, तसेच त्यांच्या इतर मालमत्तांनाही टाळे असल्याने ठेवीदारांचा संशय आणखीनच वाढला.
बीड जिल्ह्यात गेल्या काही दिवसात जिजाऊ माँ साहेब पतसंस्था, परिवर्तन किंवा इतर काही पतसंस्था यामध्ये मोठ्या प्रमाणावर घोटाळे झाल्याने या पतसंस्था बंद झाल्या आहेत.बीड शहरातील माळीवेस भागात मुख्य शाखा असलेल्या साईराम अर्बन या पतसंस्थेच्या मुख्य शाखेसह सर्वच शाखा बंद असल्याने ठेवीदारांनी मुख्य शाखेसमोर गर्दी केली आहे. हजारो ठेवीदारांच्या कोट्यवधी रुपयांच्या ठेवी आहेत.

नुकतंच बीड जिल्ह्यातील ज्ञानराधा बँकेचा प्रकरण ताजे असतानाच आता पुन्हा बीडची साईराम अर्बन को-ऑपरेटिव बँक देखील वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. कारण साईराम को-ऑपरेटिव बँकच्या आतापर्यंत अकराहून अधिक शाखा आहेत. आणि या सर्वच्या सर्व शाखा एकाच वेळेला बंद झाल्याने ग्राहक आणि ठेवीदारांमध्ये खळबळ उडाली आहे. यामध्ये या बँकेचे सर्वेसर्वा शाहीनाथ परभणी हे देखील फरार असल्याने आता ही बँकदेखील पळून गेल्याची नागरिक चर्चा करत आहेत.

परभणे व्हिडीओच्या माध्यमातून आले समोर

या प्रकरणी बँकेचे सर्वेसर्वा शाहीनाथ परभणे यांनी एक व्हिडीओ प्रसारित करत आपली बाजू मांडली आहे. गेल्या १३ वर्षांपासून साईराम बँक सुरळीत सेवा देत आहे. मात्र, मागील दोन महिन्यांपासून बँकेसमोर अडचणी वाढू लागल्या. तसेच आजपर्यंत जवळपास ४० कोटी रुपये खातेदारांना वाटप केले असल्याचे परभणे यांनी म्हटले आहे. मात्र, काल काही शाखांमध्ये कॅश कमी असल्याने खातेदारांमध्ये संभम्र निर्माण झाला. खातेदारांनी मला थोडा वेळ द्यावा मी खातेदारांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही असे परभणे यांनी म्हटले आहे. 

Tuesday, November 21, 2023

राज्याच्या पोलिस खात्याची मोठी बातमी. तब्बल १९ पोलिस अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या.


मुंबई (प्रतिनिधी) राज्याच्या पोलिस खात्यात पुन्हा एकदा मोठी खांदेपालट करण्यात आली आहे. एकाच वेळी तब्बल १९ पोलिस अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये जालन्याचे पोलीस अधीक्षक तुषार अधिकारी यांचा देखील समावेश आहे. दोषी यांची राज्य गुन्हे अन्वेषण (सीआयडी) विभागात बदली करण्यात आली आहे.

जालन्यातील अंतरवाली सराटी गावात मराठा आंदोलकांवर लाठीहल्ला केल्यानंतर तुषार दोषी यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले होते. मात्र, आता त्यांची थेट गुन्हे अन्वेषण विभागात बदली करण्यात आली आहे. यावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी सरकारला प्रश्न देखील विचारला आहे.
तुषार दोषी यांना पोलीस दलात बढती देऊन, राज्य सरकारने त्यांना मराठ्यांवर लाठीहल्ला केल्याचं बक्षीस दिलं आहे का? असा खोचक सवाल जरांगे यांनी उपस्थित केला आहे. दुसरीकडे पुणे सायबर गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांची नागपूर येथे नागरी हक्क संरक्षण विभागात पोलिस अधीक्षकपदी बदली करण्यात आली आहे.

विशाल सिंगुरी, पोलिस अधीक्षक- नक्षल विरोधी अभियान (पोलिस अधीक्षक- अमरावती ग्रामीण).

संजय बारकुंड, पोलिस अधीक्षक धुळे (पोलिस अधीक्षक, महाराष्ट्र पोलिस अकादमी, नाशिक).

श्रीकांत धिवरे, पोलिस अधीक्षक लोहमार्ग पुणे (पोलिस अधीक्षक धुळे).

प्रीतम यावलकर, पोलिस अधीक्षक, सायबर मुंबई (अतिरिक्त अधीक्षक, सोलापूर ग्रामीण).

कविता नेरकर, अतिरिक्त अधीक्षक अंबाजोगाई (पोलिस अधीक्षक सायबर मुंबई)

दिनेश बारी, पोलिस अधीक्षक सीआयडी (पोलिस अधीक्षक फोर्स वन मुंबई).

गणेश शिंदे, अतिरिक्त अधीक्षक लोहमार्ग पुणे (पोलिस उपायुक्त अमरावती).

अनुज तारे, अतिरिक्त अधीक्षक गडचिरोली (पोलिस अधीक्षक वाशीम).

नवनीत कुमार कॉवत, अतिरिक्त अधीक्षक धाराशिव (पोलिस उपायुक्त छत्रपती संभाजीनगर).

मोक्षदा पाटील, पोलिस अधीक्षक लोहमार्ग, छत्रपती संभाजीनगर (समादेशक, राज्य राखीव पोलिस बल-८ मुंबई).

अशोक बनकर, अतिरिक्त अधीक्षक गोंदिया (प्राचार्य पोलिस प्रशिक्षण केंद्र जालना).

माधुरी केदार, अतिरिक्त अधीक्षक नाशिक ग्रामीण (अतिरिक्त अधीक्षक लोहमार्ग पुणे).

चंद्रकांत गवळी, अतिरिक्त अधीक्षक जळगाव (प्राचार्य गुप्तचर प्रशिक्षण शाळा, नाशिक).

हिम्मत जाधव, अतिरिक्त अधीक्षक सोलापूर ग्रामीण (पोलिस उपायुक्त मुंबई).

शशिकांत सातव अतिरिक्त अधीक्षक अमरावती (पोलिस उपायुक्त नागपूर).

अशोक नखाते, प्राचार्य (अतिरिक्त अधीक्षक जळगाव).

विक्रम साळी, पोलिस अधीक्षक नागरी हक्क संरक्षण नाशिक (अतिरिक्त अधीक्षक अमरावती ग्रामीण) .

बीड जाळपोळ प्रकरणात मोठी बातमी आरोपींमध्ये 17 अल्पवयीन मुलांचा समावेश.


बीड (प्रतिनिधी) महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आता सरकारला आरक्षण देण्यासाठी नवी डेडलाईन दिली आहे. मात्र काही दिवसांपूर्वी जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू असताना, या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याची देखील घटना घडली होती. याचा सर्वाधिक फटका हा बीड जिल्ह्याला बसला. बीड जिल्ह्यात नेत्यांच्या घरांवर हल्ले करण्यात आले, तसेच एसटी बसही फोडण्यात आल्या आता या जाळपोळ प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. बीडमध्ये जाळपोळ केलेल्या घटनेतील आरोपींमध्ये 17 अल्पवयीन मुलांचा समावेश असल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी आतापर्यंत या प्रकरणात तब्बल 191 आरोपींना ताब्यात घेतलं आहे. तर 300 पेक्षा जास्त लोकांची ओळख पटली असून, त्यांचा शोध पोलिसांकडून सुरू आहे. दरम्यान, एवढ्या गंभीर घटनेत शाळा, कॉलेजची मुले आढळून आल्यानं त्यांच्या करिअरचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांकडे वेळीच लक्ष देण्याची गरज असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे बीडमध्ये आंदोलनाला हिंसक वळण लागल्याची घटना घडली होती. आंदोलकांनी माजलगावमध्ये आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरावर हल्ला केला. त्यानंतर बीडमध्येही क्षीरसागर यांच्या घरावर हल्ला करण्यात आला होता. एसटी बसही फोडण्यात आल्या होत्या. या घटनेत मोठं नुकसान झालं. आतापर्यंत या प्रकरणात 191 आरोपींना ताब्यात घेण्यात आलं आहे. त्यापैकी 17 आरोपी हे अल्पवयीन असल्याची माहिती समोर आली आहे.

संत मन्मथस्वामी संजीवन समाधी सोहळा निमित्त नागापुर ते कपीलधार 47 व्या दिंडी सोहळ्याचा आज प्रारंभ.

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) कार्तिक पोर्णिमा व श्री मन्मथस्वामी यात्रेनिमित्त दरवर्षी नागापुर ते श्रीक्षेत्र कपीलधार पदयात्रा आयोजित करण्यात येते. यावर्षी 47 व्या वर्षीही ही परंपरा अखंडीत राहणार असून श्री गुरू ष.ब्र.108 राष्ट्रसंत डॉ शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपुरकर यांच्या प्रेरणेने व श्री गुरु ष.ब्र.108 शंभुलिंग शिवाचार्य महाराज मठ संस्थान अंबाजोगाई यांच्या नेतृत्वाखाली ग्राम दैवत श्री नागनाथ मंदिर नागापुर येथुन मंगळवारी (ता.21) सकाळी 10:00 वाजता निघणार आहे. श्रीक्षेत्र कपीलधार येथे श्री मन्मथस्वामी यात्रा महोत्सव दरवर्षी कार्तिक पोर्णिमेच्या निमित्ताने आयेाजित करण्यत येतो. नागापुर ते श्री क्षेत्र कपिलधार 47 वी पदयात्रा आयोजित करण्यात आली आहे. मंगळवारी (ता.21) सकाळी दहा वाजता नागापुर येथुन पदयात्रा निघुन परचुंडी येथे दुपार व गुरुकुल खामगाव येथे मुक्कामी राहणार आहे. बुधवारी (ता.22) दुपारचे प्रसाद भोपा येथे व मुक्काम बाबी तांडा येथे असणार आहे. गुरुवारी (ता.23) वडवणी येथे दुपारचे प्रसाद असुन हनुमान मंदिर घाटसावळी येथे मुक्काम असणार आहे. शुक्रवारी दुपारचे प्रसाद शिवणी येथे असुन श्रीक्षेत्र अवधुत दत्त देवस्थान कोल्हारवाडी फाटा बीड येथे मुक्काम असणार आहे. शनिवारी (ता.25) नागनाथ मंदिर पाली येथे दुपारचे प्रसाद असुन श्रीक्षेत्र कपिलधार येथे मुक्काम असणार आहे. रविवारी श्री क्षेत्र कपिलधार येथे गणपतअप्पा सौंदळे यांच्यावतीने नाष्टयाची सोय असणार आहे. नागापुर ते श्रीक्षेत्र कपिलधार पदयात्रेत भाविक भक्तांनी मोठया संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन समस्त विरशैव समाज नागापुर यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Monday, November 20, 2023

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरू निवडीची प्रक्रिया वादात ? पुण्यातील पाच उमेदावर शर्यतीत


छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी)  डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरू निवडीची प्रक्रिया सुरू झाली असून मुलाखतीसाठी निवडण्यात आलेल्या २४ उमेदवारांमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ५ उमेदवारांचा समावेश आहे. मात्र, गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या व्यक्तींची नावे कुलगुरू पदाच्या मुलाखतीसाठी निवडण्यात आल्यामुळे ही निवड प्रक्रिया वादात सापडण्याची शक्यता सूत्रांकडून वर्तवली जात आहे.

विद्यापीठाचे विद्यमान कुलगुरू डॉ.प्रमोद येवले यांचा कार्यकाल येत्या 31 डिसेंबर रोजी पूर्ण होत आहे.त्यामुळे नवीन कुलगुरू निवडीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. एआयसीटीईचे माजी अध्यक्ष  डॉ. अनिल सहस्त्रबुद्धे यांच्या अध्यक्षतेखाली कुलगुरू शोध समिती स्थापन करण्यात आली. या समितीचे सदस्य सचिव उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्रग्रस्तगी आहेत. समितीकडे प्राप्त झालेल्या १०० अर्जांपैकी २४ जणांचे अर्ज छाननीनंतर शॉर्टलिस्ट करण्यात आले आहेत. त्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ.मनोहर चासकर, भौतिकशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. संजय ढोले, बायोटेक्नॉलॉजी विभागाचे डॉ.राजू गच्छे, भौतिकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ.संजय जाडकर, विलास खरात यांचा समावेश आहे. येत्या २९ नोव्हेंबर रोजी या उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जाणार आहेत.त्यातून अंतिम मुलाखतीसाठी पाच उमेदवार निवडले जाणार आहेत. 

निवड समितीने २४ उमेदवारांची यादी शॉर्टलिस्ट केली असली तरी त्यात अवैध गुणवाढ प्रकरणात कलम ४२० चा गुन्हा दाखल असलेल्या प्राध्यापकांचा समावेश आहे.तसेच परीक्षा विभागाच्या कामात अनियमितता करणाऱ्या व्यक्तीचा समावेश असल्याने निवड समितीने शॉर्टलिस्ट केलेल्या नावांबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. तसेच यापूर्वी मुंबई ,पुणे, गोंडवाना आदी  विद्यापीठांच्या कुलगुरू निवड यादीत शॉर्टलिस्ट झालेल्या उमेदवारांची नावे मराठवाडा विद्यापीठाच्या यादीतून वगळण्यात आली आहेत. त्यामुळे निवडीबाबत नेमके कोणते निकष लावले जातात, अशी चर्चा शिक्षण वर्तुळात केली जात आहे.
---------------------
 कुलगुरू शोध समितीने मुलाखतीसाठी निवड केलेल्या उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे : 


प्रा. हिरेंद्र सिंग, प्रा.विलास खरात, प्रा.सतीश शर्मा, प्रा.राजीव गुप्ता, प्रा.सुभाष कोंडवार, डॉ.एस के सिंग डॉ.गणेशचंद्र शिंदे, डॉ.विजय फुलारी प्रा.संजय चव्हाण, प्रा.राजेंद्र काकडे प्रा.भारती गवळी, प्रा.इंद्रप्रसाद त्रिपाठी , डॉ.अनिल चांदेवार, वरिष्ठ प्रा.ज्योती जाधव, डॉ. दत्तात्रय गायकवाड, डॉ.मनोहर चासकर, प्रा.राजेंद्र सोनकवडे, प्रा.उदय अन्नापुरे प्रा.अशोक महाजन,प्रा. संदेश जाडकर, प्रा.राजू गच्छे,प्रा. डॉ. संजय ढोले, डॉ.सतीश पाटील,प्रा. प्रमोद माहुलीकर ,

राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज तपोअनुष्ठान समितीच्या वतीने श्रीक्षेत्र परळी वैजनाथ ते कपीलधार पायी दिंडी सोहळयाचे स्वागत.

परळी वैजनाथ  (प्रतिनिधी) वसुंधरारत्न राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपुरकर यांच्या 82 व्या तपोअनुष्ठान समितीच्या वतीने कार्तिक पोर्णिमा व श्री मन्मथस्वामी यात्रेनिमित्त श्रीक्षेत्र परळी वैजनाथ ते कपीलधार पायी दिंडी सोहळा श्री गुरू वेदांताचार्य, शिवाचार्यरत्न पुरस्कृत ष.ब्र.108 सिध्दलिंग शिवाचार्य महाराज साखरखेर्डा यांच्या मार्गदर्शनाखाली आज श्री वैजनाथ नगरी परळी येथून निघालेल्या पायी दिंडीचे स्वागत मोठ्या उत्साहात करण्यात आले.
श्री गुरुलिंग स्वामी मंदिर बेलवाडी येथे विश्वस्त तथा वैजनाथ देवस्थानचे विश्वस्त श्री.विजयकुमार मेनकुदळे व राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपुरकर यांच्या 82 व्या तपोअनुष्ठान समितीच्या वतीने अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते नगरसेवक चेतन सौंदळे यांच्या हस्ते व सर्व सदस्यांच्या उपस्थितीत श्री गुरू वेदांताचार्य,शिवाचार्यरत्न पुरस्कृत ष.ब्र.108 सिध्दलिंग शिवाचार्य महाराज  साखरखेर्डेकर,ष.ब्र 108 सिध्दचैतन्य महाराज यांचे पूजन करून आशीर्वाद घेतले. 
आज सोमवार दि.20 नोव्हेंबर रोजी श्री.गुरूलिंग स्वामी मंदिर,बेलवाडी येथून श्री सिद्धलिंग शिवाचार्य महाराज साखरखेर्डेकर यांच्या मार्गदर्शनाखाली शेकडो भाविक भक्तांच्या उपस्थितीत हा पायी दिंडी सोहळा श्रीक्षेत्र कपिलधार कडे ढोल ताशांच्या गजरात व गुरुराज माऊली मन्मथ स्वामी की जय च्या जयघोषात श्रीक्षेत्र कपिलधार कडे रवाना झाला आहे.
  रविवार दि.26 नोव्हेंबर रोजी कपीलधार येथे ही दिंडी पोहोचणार आहे. 
  या कार्यक्रमास  श्रावणमास तपोनुष्ठान समितीचे अध्यक्ष चेतन सौंदळे,उपाध्यक्ष चंद्रकांत उदगीरकर,पारायण प्रमुख दयानंद चौधरी,प्रसिद्ध व्यापारी वैजनाथअप्पा कोल्हे,कार्याध्यक्ष शाहूराव ढोबळे,रमेशअप्पा सपाटे,माजी नगरसेवक,सोमनाथ निलंगे वैजनाथ बागवाले,अनिल अष्टेकर,गिरीष बेंबळगे,सचिव संतोष पंचाक्षरी,नंदकुमार खानापुरे,अशोक नावंदे, सोमनाथ गोपनपाळे,सदानंद चौधरी, ओमप्रकाश बुरांडे,संजय खाकरे,वैजनाथ निलंगे,वैजनाथ शेटे,अॅड.गिरीष नरवणे, चंदूअप्पा हालगे,मकरंद नरवणे,सचिन काटकर, जगदीश मिटकर,रवी मिसाळ,अरविंद चौधरी, प्रा.अमर आलदे,कैलास रिकीबे,राजाभाऊ हलकंचे, रमेश चौधरी सर,उमाकांत काळे,गजानन हालगे,बाबासाहेब शिगे, रमेश काळे,प्रकाश खोत,संतोष चौधरी,चंद्रशेखर फुटके,वैजनाथ चौधरी, विश्वनाथअप्पा लव्हराळे,डॉ.योगीराज बर्दापुरे,संदीप तिळकरी सर,चंद्रकात अंदुरे,शिवशंकर नाईक,शिरीष सलगरे, अनिल चौधरी, नागेश अलबिदे,मन्मथ नरवणे, कपील चौधरी,शिवदीप चौंडे,संदीप चौधरी,मनोज बेंबळगे,संतोष जुजगर,अमोल घेवारे,रत्नेश बेलुरे,निरंजन गौरशेटे,अविनाश चौधरी, सतीश कापसे,नंदूअप्पा शेटे,अशोकअप्पा झाडे, जगदीश महागांवकर,आदेश हलकंचे,संजय कोरे व सर्व समाज समाजबांधवांचे योगदान आहे.

Sunday, November 19, 2023

भाऊबीजसाठी बहिणीला घ्यायला गेलेल्या भावाचा अपघात मृत्यू झाला.


छत्रपती संभाजीनगर शहरातील पैठण रोडवरच्या कांचनवाडी परिसरात हा अपघात झाला आहे. संभाजीनगरातील कांचनवाडी परिसरात राहत असलेल्या बहिणीला भाऊबीजेसाठी घेऊन जाण्यासाठी केशव विठ्ठल भिसे (वय २३) आणि सुरेश परदेशी गुरुजी (वय ७५, रा. बालम टाकली) यांचा अपघातात मृत्यू झाला आहे. दुचाकीने संभाजीनगर शहरात येत असताना टँकर व २ दुचाकीचा अपघात झाला. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे.

भाऊबीजची अखेरची आठवण. 

भाऊबीजनिमित्ताने बहिणीला घेऊन जाऊ या उद्देशाने केशव भिसे हा बहिणीच्या घरी आला होता. परंतु भाऊबिजेच्या दिवशीच भावाला हिरवल्याचे दुःख बहिणीवर ओढवले आहे. यामुळे आपल्या लाडक्या भाऊरायासोबतची यंदा अखेरची भाऊबीज ठरली आहे.

कष्टाचे खातो म्हणणाऱ्या भुजबळांनी फर्नांडिस कुटुंबाचे घर हडपले त्याची दयनीय अवस्था केली - अंजली दमानिया


मूंबई (प्रतिनिधी) सांताक्रुझ पश्चिम येथील छगन भुजबळांची इमारत ही फर्नांडिस कुटुंबाच्या जागेवर बांधली असून या कुटुंबाला एकही पैसा भुजबळांनी दिला नाही. गेल्या अनेक वर्षापासून फर्नांडिस कुटुंब त्यांच्या न्यायहक्कासाठी लढतंय परंतु भुजबळांकडून कुठलीही दाद मिळत नाही.कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. ४८ तासांत कुटुंबाला पैसे न मिळाल्यास भुजबळांच्या घरासमोर आंदोलन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी दिला आहे.

अंजली दमानिया म्हणाल्या की, गेल्या दीड वर्षापासून आम्ही फर्नांडिस कुटुंबासाठी लढतोय, आम्ही एफआयआर केली. छगन भुजबळांचे मी प्रक्षोभक भाषण ऐकल्यानंतर तळपायाची आग मस्तकात गेली. तुमचं खातो का, मी माझ्या कष्टाचे खातो असं विधान त्यांनी केले. काल जे भुजबळ बघितले त्यांच्यात इतका जोर कुठून आला? नेमकं कुठल्या कष्टाचे खातायेत ते दाखवण्यासाठी आज मी भुजबळांचे घर मीडियाला दाखवणार होते. जे त्यांचे घर नसून हे फर्नांडिस कुटुंबाचे लुटलेले घर आहे. १९९४ मध्ये फर्नांडिस कुटुंब त्यांचा एक छोटा बंगला होता. तो बंगला पुनर्विकासासाठी रहेजा यांना दिला असं त्यांनी सांगितले. या बंगल्याऐवजी बिल्डरकडून ५ फ्लॅट फर्नांडिस कुटुंबाला मिळणार होते. परंतु ते फ्लॅट या कुटुंबाला मिळाले नाहीत. तो जो बंगल्याचा प्लॉट होता तो समीर भुजबळांच्या परवेज कन्ट्रक्शनला परस्पर विकला गेला. ज्यादिवशी बंगला बुलडोझरनं पाडला त्यानंतर कुटुंब समीर भुजबळांना एकदा नव्हे हजारवेळा भेटले. तरीही आजतागायत या कुटुंबाला १ रुपयाही नुकसान भरपाई मिळाली नाही. सांताक्रुझ पश्चिमेला ती जी टोलेजंग इमारत आहे. जे ते कष्टाचे असल्याचे बोलतात, हा लुटलेला होता. फर्नांडिस कुटुंबाचा बंगला पाडून मोठी इमारत बांधलीय. त्या ९ व्या मजल्यावर स्विमिंग पूल बनवलंय. जिथे भुजबळ कुटुंब पोहते. हे या कुटुंबाचे पैसे आहेत. आजतागायत कुटुंबाला पैसे मिळाले नाहीत असा आरोप दमानिया यांनी केला.

त्याचसोबत मी सुप्रिया सुळेंना हे पाठवले, ३० सेकंदात त्यांचा फोन आला. माणूस पाठवून या कुटुंबाची पडताळणी केली. अक्षरश: या कुटुंबाची दयनीय परिस्थिती आहे. ७८ वर्षाची बाई ३ दिव्यांग मुलांना एकटं सांभाळते. ती उद्या गेली तर उद्या या मुलांना कुठे ठेवायचा हा त्यांचा प्रश्न आहे. दीड वर्ष झाले तरी समीर भुजबळ टोलवाटोलवी करत होते. जानेवारी महिन्यात साडे ८ कोटी देतो म्हणून सांगितले परंतु त्यानंतर भाजपात जाणार असल्याचे कळाल्यानंतर हे पैसे थांबवले. तुमच्याकडे इतका पैसा आहे पण या कुटुंबाला न्याय हवा अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली.

छगन भुजबळांनी फेटाळले आरोप
अंजली दमानिया यांच्या आरोपावर छगन भुजबळ म्हणाले, आम्ही कुणाचेही घर लाटले नाही. याबाबत कोर्टात केस सुरू आहे. कोर्ट जो निकाल देईल तो निकाल आम्हाला मान्य आहे. परंतु हे नाटक त्यांना आजच का करायचे सुचले. जेव्हा ओबीसींची मोठी लढाई सुरू झाली तेव्हा हे पुढे आले. ही सगळी नाटके मला माहिती आहे. त्यांना त्यांचे नाटक लखलाभ होवो अंजली दमानिया ताई आहेत, मी अधिक बोलणार नाही. हे सुपारी घेऊन बोलणारे यांच्याविषयी जास्त बोलणे योग्य नाही असं म्हणत भुजबळांनी आरोप फेटाळले.

Saturday, November 18, 2023

बेकायदा बैलांच्या झुंजी लावणं अंगलट २४ ग्रामस्थांविरुद्ध गुन्हा दाखल,



लातूर  (प्रतिनिधी) बेकायदा बैलांच्या झुंजी लावणे कोराळी (त. निलंगा) गावकऱ्यांच्या चांगलेच अंगलट आले असून, याबाबत कासार शिरसी पोलिस ठाण्यात २४ ग्रामस्थांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसांनी सागितले, निलंगा तालुक्यातील कोराळी येथे गावकऱ्यांनी न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करून बैलांच्या झुंजी लावल्या. अशा झुंजी लावणे हे बेकादेशीर असून, याबाबत न्यायालयाने थेट बंदी घतली आहे. मात्र, हा बंदी आदेश डावलून कोराळी शिवारात ग्रामस्थांनी बैलांच्या झुंजी लावल्या. याबाबतचे चित्रीकरण गावातील उत्साही कार्यकर्त्यानी केले. त्यानंतर झुंजीच्या फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल केले. या फोटो आणि व्हिडिओने बेकायदा झुंजीचा प्रकार समोर आला. पोलिसांनी हा व्हिडिओ पाहून, त्यात कैद झालेल्या ग्रामस्थांची यादी करून कारवाईला सुरुवात केली. या प्रकरणाची तातडीने गंभीर दखल घेतली.

याबाबत कासार सिरसी पोलिस ठाण्यात एकूण २४ ग्रामस्थांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेकायदा अशा प्राण्याच्या झुंजी कोणी लावल्या, त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे, असे पोलिसांनी सांगितले.

बीड जिल्ह्यातील आकराही तालुक्यात पाणी टंचाई भासणार तब्बल ९५६ गावे पाणी टंचाईग्रस्त.

बीड (प्रतिनिधी) जिल्ह्यात यंदा पाऊस न झाल्याने दुष्काळ जाहीर झालाय. अशात पाणी टंचाईचे ढग आतापासून अधिक गडद बनत चालले आहेत. त्यामुळे यंदा जिल्ह्यातील आकराही तालुक्यात पाणी टंचाई भासणार आहे. तर या ११ तालुक्यातील तब्बल ९५६ गावे पाणी टंचाईग्रस्त म्हणून जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांनी घोषित केली आहेत
या गावांसाठीचा आराखडा तयार करून राज्य शासनाला पाठविला जाणार आहे. त्यानुसार सरकाररडून आर्थिक तरतूद केली जाणार आहे. असे असले तरी पावसाअभावी शेतकऱ्यांसह नागरिकांसमोर पाण्याचं मोठं संकट उभं ठाकलंय.

दरम्यान कोणत्या तालुक्यातील किती गावे टंचाईग्रस्त म्हणून घोषित केलेत?

1) अंबाजोगाई - १०७

2) आष्टी - ३६

3) बीड - १८९

4) धारूर - ६९

5) गेवराई - १५५

6) केज - ६६

7) माजलगाव - ७६

8) परळी - १०४

9) पाटोदा - ५७

10) शिरूर कासार - ७७

11) वडवणी - २५

असे एकूण ९५६ गावे पाणी टंचाईग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आली आहेत.

एकाच रात्री चोरट्यांनी दोघांची घरं फोडली. पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल.


अंबेजोगाई /(प्रतिनिधी) अंबाजोगाई शहरातील अंबिका सोसायटी या भागात गुरुवार व शुक्रवारच्या (दि.१६ व १७) रात्री अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून ३ लाखात रुपये लंपास केले. या घटनेचा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून तपास सुरू आहे.

घटनेची माहिती अशी, की अंबिका सोसायटीतील विजय चांगदेव नाळपे हे गुरुवारी सायंकाळी घराला कुलूप लावून गावी गेले होते. याच काॅलनितील लालासाहेब बरकते हेही गावाकडे गेले होते. या दोन्ही घरांना कुलूप असल्याची संधी साधत शुक्रवारी भल्या पहाटे चोरट्यांनी या दोन्ही घरांचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. या चोरीत बरकते यांच्या घरात त्यांना मौल्यवान वस्तू सापडल्या नाहीत, मात्र डाॅ. नाळपे यांच्या घरातील कपाटात ठेवलेले रोख ३ लाख रुपये घेऊन चोरट्यांनी पोबारा केला.

सकाळी या घटनेची माहिती कळताच पोलिस निरिक्षक विनोद घोळवे यांनी घटनास्थळी पोचून माहिती घेतली. पोलिस उपअधिक्षक अनिल चोरमले यांनीही घटनेची माहिती घेतली. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून तपास सुरू केला होता. दरम्यान डाॅ. विजय नाळपे यांनी दिलेल्या तक्रारीवरून येथील शहर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.

Friday, November 17, 2023

दै.मराठवाडा साथीचा दिवाळी 2023 चा अंक प्रभु वैजनाथ चरणी अर्पण.

परळी वैजनाथ (प्रतिनिधी)- बारा ज्योतिर्लिंगापैकी  पाचवे ज्योतिर्लिंग असलेले प्रभू श्री वैद्यनाथाच्या चरणी लोकप्रिय दैनिक मराठवाडा साथीचा दीपावली 2023 चा अंक श्री वैजनाथ मंदिरातील श्री अशोक पुजारी यांच्या हस्ते ठेवण्यात आला.*
*यावेळी वैद्यनाथ देवल कमिटीचे विश्वस्त राजेश देशमुख अवलोकन करताना दिसत असून यावेळी दैनिक महाराष्ट्र टाइम्सचे छत्रपती संभाजीनगर आवृत्तीचे उपसंपादक आशिष चौधरी, दैनिक लोकमतचे वार्ताहर संजय खाकरे, पत्रकार अनंत कुलकर्णी, इंजि. देशपांडे साहेब,  संतोष जुजगर आदी उपस्थित होते.*

Thursday, November 16, 2023

मस्साजोग, चिंचोलीमाळी दुष्काळग्रस्त यादीत तात्काळ घ्या !अन्यथा अमर उपोषणाला बसणार - रोहन गलांडे


केज (प्रतिनिधी) केज तालुक्यात यावर्षी जून पासून पावसाळ्याच्या अखेरपर्यंत पावसाने दांडी मारली त्यामुळे संपूर्ण केज तालुका दुष्काळाच्या छायेत आला आहे परंतु नुकतीच शासनाने जाहीर केलेल्या दुष्काळग्रस्त महसूल मंडळांमध्ये केज तालुक्यातील दोन महसूल मंडळांना वगळल्यामुळे शेतकऱ्यांची तीव्र नाराजी सरकारवर झालेली पहावयास मिळत आहे.

दि. ३१ ऑक्टोबर रोजी जाहीर केलेल्या शासन निर्णयाद्वारे या आधीच दुष्काळग्रस्त तालुक्यांचा यादीत काही तालुक्यांचा तालुक्यातील महसूल मंडळांचा समावेश करण्यात आला होता तसेच पुन्हा काही आठ तालुक्यातील ५२ महसुली मंडळांचा दुष्काळ यादीत नव्याने समावेश करण्यात आला मस्साजोग, चिंचोलीमाळी दोन महसुली मंडळे वगळली तरी शासनाकडून शेतकऱ्यांना न्यायाची अपेक्षा असून यामध्ये केज तालुक्यातील केज, युसुफ वडगाव, हनुमंत पिंपरी, होळ, विडा, बनसारोळा ,नांदुरघाट या महसूल मंडळांचा समावेश केला असला तरी मसाजोग, चिंचोली माळी, हे दोन महसूल मंडळांना मात्र या दुष्काळग्रस्त मंडळाच्या यादीतून सरकारने वगळले आहे.अत्यल्प प्रमाणात पाऊस झाल्याने शेतकरी अगोदरच मेटाकुटीला आलेला आहे. 

शासनाने दुष्काळग्रस्त यादी जाहीर केली परंतु काही महसूल मंडळावर मात्र शासनाने जाणून बुजून अन्याय केला की काय? असा प्रश्न आता येथील शेतकऱ्यांना भेडसावत आहे. कारण संपूर्ण केज तालुक्यात कुठेच समाधानकारक पाऊस नसताना दोन मंडळे यामधून वगळलीच कसे ? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे.विहीर बोल चे पाणीही आता अगदी मृतावस्थेत गेल्यामुळे काही दिवसांवरच शासनाला आता गावोगावी टँकर सुरू करण्याची वेळ येऊ शक्ते, एवढा कठीण दुष्काळ यावर्षी येणार असल्याचे चित्र दिसत आहे. मग या दोन महसूल मंडळातील शेतकऱ्यांच्या शेतात अतिवृष्टी कशी काय होऊ शकते? की यामध्ये कोणी राजकारण करण्याचा केविलवाना प्रयत्न करत आहे अशी चर्चा ही आता शेतकरी वर्गामध्ये होताना दिसत आहे.

सरकार कडून शेतकऱ्यांच्या अपेक्षा जून पासून अध्यापपर्यंत पावसाळा संपला तरी पाऊस आलाच नाही. त्यामुळे शेतकरी हैरान झाला असून हातात यावर्षीचे उत्पन्नही त्यांना काहीच मिळले नाही. त्यातच दुष्काळग्रस्तांच्या यादीतून मस्साजोग, चिंचोली माळी या महसूल मंडळातील शेतकऱ्यांना अपेक्षा आहेत की सरकारने दुष्काळग्रस्तांमध्ये या महसूल मंडळाचा समावेश करून तात्काळ अग्रीम रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करावी अन्यथा अमरउपोषणाला बसणार आहे अशा इशारा रोहन गलांडे पाटील यांनी निवेदनाद्वारे शासनाला दीला आहे

यावेळी निवेदनावर स्वाक्षऱ्या चिंचोली माळी ग्रामपंचायत सदस्य बालाजी राऊत,राम राऊत यांच्या आहेत तरी प्रशासनाने निवेदनाची दखल घेऊन मस्साजोग ,चिंचोली माळी दुष्काळ ग्रस्त यादीत तात्काळ समाविष्ट करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.


केज - कळंब रोडचे निकृष्ट काम. पेट्रोल पंपाजवळचा पुल झाला धोक्याचा अनर्थ होण्याची शक्यता. गुत्तेदाराचे दुर्लक्ष. तातडीने दुरुस्तीची मागणी.


केज (प्रतिनिधी) केज - कळंब रस्त्यावरील आता पेट्रोल पंपाजवळच्या पुलाचा झाला तमाशा सुरू केज कळंब हा रस्ता नव्याने तयार करण्याचे काम आणखी पुर्ण झाले नाही तोपर्यंतच या कामाचा तमाशा सुरू झाला आहे. काही दिवसांपूर्वीच साळेगाव शिवारातील पुल खचला होता तर आता केज शिवारातील पुल खचला आहे. पुलावर एक दिड फुटाचा खड्डा पडला असून पुलावर टाकलेल्या छताचे गज उघडे पडले आहेत. यामुळे टु व्हिलर आणि थ्री व्हिलर रिक्षा यांच्या करीता या पुलावर मोठा धोखा निर्माण झाला आहे.


याच रस्त्यावर असलेल्या साळेगाव शिवारातील बोबडेवाडी फाट्यावर असलेल्या पुलाचाही मागील काळात मोठा प्रोब्लेम झाला होता. अनेक दिवस त्या पुलाचाही यामुळे तमाशा झाला होता . थोड्या प्रकाराकडे तेव्हासुद्धा संबंधित गुत्तेदाराने लक्ष न दिल्याने मोठ्या प्रमाणावर पुल उखडला गेला होता आणि त्यातील लोखंडी रॉड बाहेर आले होते यामुळे अनेक अपघात झाल्याने माध्यमांनी हा विषय मांडल्यानंतर प्रशासनाने धोका विचारात घेऊन रात्रभर पुलावर खडा पहारा दिला होता व पुलाची दुरुस्ती केली होती. या पुलाचाही तसाच तमाशा सुरू झाला आहे. अजून काही दिवसांनी हे उघडं पडलेले गज तुटून बाहेर पडतील यामुळे अनेकांना धोखा होऊ शकतो. पुलावर पडलेले हे भगदाड काही दिवसांनी डेंजर रुप धारण केल्याशिवाय राहणार नाही. याकरीता संबंधित यंत्रणेने केज शिवारातील कमल पेट्रोल पंपाजवळच्या पुलाची तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी केली जात आहे.

शहरातील मुख्य रस्त्यावरील नवीन पोल बॅनर लावण्यासाठी की कुत्रे मुतण्यासाठी ? … नागरीकांचा प्रश्न.

केज  (प्रतिनिधी) केज शहरातील मुख्य रस्त्यावर असलेल्या डिव्हाडरवर दोन्ही बाजूंनी ये जा करणार्यांना विविध बॅनर्स ठळकपणे दिसावेत म्हणूनच की काय मोठ्या तत्परतेने केज शहरात मुख्य रस्त्यावर नवीन खांबे उभे करून देण्यात आले आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून त्यावर असलेल्या दिव्यांचा अद्यापही प्रकाश पडला नाही. शहरवासीयांना वाटलं होतं की दिवाळीच्या निमित्ताने तरी हे दिवे लागतील परंतु लागलेच नाहीत
यामुळे हे नवीन पोल फक्त बॅनर लावण्यासाठी की कुत्रे मुतण्यासाठी आहेत असा प्रश्न नागरीकांना पडला आहे.
केज शहरामध्ये चारी दिशांना मोठे रस्ते झाले असल्याने चारी बाजूंनी त्यामध्ये डिव्हायडर तयार करण्यात आले आहेत आणि त्यामध्ये थोड्या थोड्या अंतराने अनेक लाईटचे खांबे उभे करण्यात आले आहेत.
या खांब्यामुळे व रस्त्यामुळे शहराच्या सौंदर्यात मोठी भर पडली आहे. केज शहराचं रुपडं यामुळे सुंदर दिसू लागले आहे. परंतु गेल्या कित्येक महिन्यांपासून पुर्व पश्चिम असलेल्या मुख्य रस्त्यावर उभे केलेल्या खांब्यांवर लाईट लागलीच नाही. शहरवासीयांना वाटलं होतं की या दिवाळीच्या निमित्ताने तरी या रस्त्यावर असलेल्या डिव्हाडरवरच्या खा़ंब्यावर लाईट लागेल परंतु लाईट काही लागलीच नाही. खांबे उभे करण्याचे काम संपलेले आहे. त्यावर बल्प बसवलेले आहेत. वायरींग झाली आहे मग तरीही उजेड का पाडला जात नाही म्हणून लोकांमध्ये चर्चा आहे. मग हे पोल गडबडीने फक्त बॅनर लावण्यासाठीच उभे केले आहेत की काय असा सवाल उपस्थित केला जात आहे. 

Wednesday, November 15, 2023

बीड हिंसाचाराशी संबंध नसलेल्या मराठा तरूणांना अटक, सत्तेचा गैरवापर टाळा, अन्यथा…”, जरांगे-पाटलांचा सरकारला इशारा.


बीडमधील जाळपोळ प्रकरणात संबंध नसलेल्या मराठा समाजातील तरूणांना अटक केली जात आहे. सत्तेचा गैरवापर गोरगरिब तरूणांवर करू नका. अन्यथा बीड आणि महाराष्ट्रातील समाज शांत बसणार नाही, असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी सरकारला दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू मंगेश चिवटे यांनी दिवाळीनिमित्त जरांगे-पाटील यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. यानंतर जरांगे-पाटील प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

“बीडमधील जाळपोळ प्रकरणात संबंध नसलेल्या तरूणांना अटक करण्यात येत आहे. सात हजार लोकांची यादी काढल्याची माहिती मिळाली आहे. मराठ्यांच्या मुलांवर अन्याय करू नका. कितीही दबाव टाकला, खोटे गुन्हे दाखल केले तरी आंदोलन मोडीत निघणार नाही. आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही घाबरणार आणि खचणारही नाही,” असं जरांगे-पाटलांनी म्हटलं.

*लक्ष्य करून जातीवाद निर्माण केला जातोय”

“बीड, नांदेड, कुर्डूवाडी, परभणी, हिंगोली, लातूर येथील तरूणांना अटक केली जात आहे. त्याबाबत चिवटे यांना माहिती दिली. साखळी उपोषण करणाऱ्या मराठा समाजातील कार्यकर्त्यांना अटक केली जात आहे. लक्ष्य करून जातीवाद निर्माण केला जातोय. घटनात्मक पदावर असलेल्या ओबीसी नेत्यांनी विनाकारण मराठा समाजातील तरूणांना अटक करण्याचे निर्देश दिलेत,” असा आरोपाही जरांगे-पाटलांनी केला.

आमच्यावरील अन्याय मोडीत काढू”

“सत्तेचा गैरवापर गोरगरिबांच्या मुलांवर करू नका. अन्यथा बीड जिल्ह्यातील सर्व समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. कारण, आमच्यावर अन्याय होत असेल, तर बीड आणि महाराष्ट्रातील समाज शांत बसणार नाही. आम्ही शांततेत आंदोलन करणार, पण आमच्यावरील अन्याय मोडीत काढू,” असा इशाराही जरांगे-पाटलांनी सरकारला दिला.


हिवाळी अधिवेशनात बीडमधील जाळपोळ अन् घरावरील हल्ल्यावर प्रश्न उचलणार -आ.संदीप क्षीरसागर


बीड (प्रतिनिधी) | बीड मधील ३० ऑक्टोबर रोजी झालेली जाळपोळ परिस्थिती पाहण्यासाठी रोहित पवार बीडमध्ये आले होते. त्यावेळी त्यांनी पाडवा बीडमध्ये करण्याचे सांगितले होते. त्यामूळे आज ते बीडमध्ये होते. जाळपोळीच्या घटनेवर बोलताना संदीप क्षीरसागर म्हणाले, बीडची जाळपोळ घटना दुर्दैवी होती. कट रचून हा प्रकार घडविण्यात आला. या घटनेत माझं घर आणि राष्ट्रवादी भवन जाळण्यात आले. सात आठ तास जाळपोळ सुरू होती. प्रशासन गप्प का होते? हा माझा प्रश्न आहे. सरकारने याचे उत्तर दिले पाहिजे, असे संदीप क्षीरसागर यांनी म्हटले. मुख्यालयासमोर माझं घर होत, पोलीस घटनास्थळी होते, तरीही पोलीस गप्प होते, यांचं कारण मला कळलं नाही. महाराष्ट्रातील ही पहिलीच घटना आहे. याचा मास्टर माईंड अद्याप फरार आहे. मास्टर माईंड हा राजकीय आहे. मास्टर माईंड कोण आहे हे पोलिसांना माहिती आहे. पोलिसांनी तत्काळ तपास करून त्याला अटक करावी, अशीही मागणी त्यांनी केली.

Tuesday, November 14, 2023

शिंदे सरकारचा आदेश राज्यातील ‘या’ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या.

मुंबई (प्रतिनिधी)  राज्यात सोमवारी ५ आयएएस अधिकाऱ्यांची बदली झाली आहे. शिंदे सरकारने विविध विभागात कार्यरत असलेल्या आएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश सोमवारी अर्थात १३ नोव्हेंबरला दिले आहेत. शिंदे सरकारच्या आदेशात अधिकारी आशीष शर्मा, प्रवीण पुरी, दीपक तावरे, विकास पानसरे आणि अमन मित्तल यांच्या नावाचा सामावेश आहे.

राज्यातील ५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

१. उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव IAS आशीष शर्मा यांची (1997) राज्य कर (GST) मुंबई येथे आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

२. सहसचिव, पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागाचे (मंत्रालय) सहसचिव IAS प्रवीण पुरी (2011) यांची अपंग व्यक्तींसाठी आयुक्त, पुणे म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

३. महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक IAS दीपक तावरे (2013) यांची कर्मचारी राज्य विमा योजनाचे आयुक्त (मुंबई) म्हणून करण्यात आली आहे

४. अहमदनगर जिल्हा जात पडताळणी समितीचे अध्यक्ष IAS विकास पानसरे यांची कोकण विभागाचे (मुंबई) अतिरिक्त विभागीय आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

५. महाराष्ट्र पेट्रोकेमिकल्स कॉर्पोरेशन लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक IAS अमन मित्तल यांची पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागाच्या (मंत्रालय) उपसचिवपदी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 


ड्युटीवरील पोलिसांसमोर फराळ घेऊन स्वत: एसपी नंदकुमार ठाकूर झाले 'हजर'.

बीड (प्रतिनिधी) : एरव्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर पोलिस कर्मचाऱ्यांना सॅल्युट ठोकून 'हजर' व्हावे लागते. मात्र, रविवारी (ता. १२) पोलिसांनी अगदी वेगळे चित्र अनुभवले. पोलिस कर्मचारी आपल्या कर्तव्यस्थळी असताना खुद्द पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर दिवाळी फराळ घेऊन त्यांच्यासमोर 'हजर' झाले. पोलिस अधीक्षकांनी दिवाळी फराळाचे 'गोड गिफ्ट' हाती ठेवल्यामुळे पोलिसही आनंदून गेले.
संवेदनशिल जिल्ह्यात नेहमीच काही ना काही घडते. त्यामुळे पोलिस  दलावर प्रचंड तणाव असतो. त्यात मागचे दोन महिने आणि विशेषत: मागचा पंधरवाडा जिल्हा पोलिस दल व शहर पोलिसांसाठी आव्हानात्मक गेला. मराठा आरक्षणाचे आंदोलन, जाळपोळ व दगडफेकीच्या अनेक घटना घडल्या होत्या. त्यामुळे गुन्हे, त्यात गंभीर कलमे आणि मग संशयितांची धरपकड. त्यात राजकीय नेत्यांच्या एकामागून एक चकरा असल्याने त्यांनाही संरक्षण पुरविणे असे अनेक आव्हाने जिल्हा पोलिस दलाने पेलले.
त्यात कर्मचाऱ्यांचा सिंहाचा वाटा आहे. आता परिस्थिती पुर्वपदावर आली आहे. प्रत्येकजण आपापल्या कुटूंबियांसोबत दिवाळी साजरी करत आहे. मात्र, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस बांधवांना मात्र आपल्या कर्तव्यावर हजर रहावे लागत आहे. रविवारी पोलिस आपापल्या कर्तव्यस्थळी ड्युटी करत असताना सहाजिकच आपण कुटूंबियांसोबत नाहीत याची पुसटशी खंत मनात असणारच. पण, त्यांच्या कुटूंबाचे प्रमुख असलेले पोलिस अधीक्षक स्वत: त्यांच्यासाठी व कुटूंबियांसाठी फराळ घेऊन पोचले.

पोलिस कुटुंबियांनाही फराळ

दरम्यान, शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, सुभाष रोड, अण्णाभाऊ साठे पुतळा चौक, नगर नाका, बार्शी नाका आदी प्रमुख ठिकाणी कर्तव्यावर असलेल्या पोलिसांना फराळ वाटप केल्यानंतर नंदकुमार ठाकूर यांनी पोलिस कुटूंबियांची पोलिस कॉलनी गाठली. त्यांच्या कुटुंबियांनाही फराळ आणि मुलांना फटाके दिले.



ऐन दिवाळीत पोलिसांनी केली धरपकड; बीड जाळपोळ प्रकरणात 181 जणांची दिवाळी जेलमध्ये.


बीड (प्रतिनिधी): काही दिवसांपूर्वी  जिल्ह्यात मराठा आरक्षणाच्या आंदोलनालात घुसून काही अज्ञात लोकांनी राजकीय नेत्यांच्या घरी आणि कार्यालयात जाळपोळ केल्याची घटना समोर आली होती. त्यामुळे या प्रकरणात पोलिसांकडून गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले होते. तर, बीड पोलिसांनी आरोपींची ओळख पटवून आतापर्यंत 181 जणांना बेड्या ठोकल्या आहे. यातील काही जण पोलिस कोठडीत, तर काही कारागृहात आहेत. त्यामुळे या आरोपींना दिवाळी  जेलमध्ये साजरी करण्याची वेळ आली आहे. विशेष म्हणजे या घटनांमध्ये पोलिसांनी आणखी 400 जणांची ओळख पटवली आहे. 

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांचे आंतरवाली सराटीत उपोषण सुरु असतानाच, 30 व 31 ऑक्टोबर रोजी बीडमधील आंदोलक आक्रमक झाले. पाहता पाहता शहरात जाळपोळ सुरु झाली. राष्ट्रवादी भवन, माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे, भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, बीआरएसचे दिलीप गोरे यांची कार्यालये पेटवून देण्यात आली. माजलगाव येथील नगरपालिकेसह आमदार प्रकाश सोळुंके,  आमदार संदीप क्षीरसागर यांचे राहत्या घरांना आग लावण्यात आली. या प्रकरणी पोलिसांकडून 307 सारखे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी आरोपींची ओळख पटवत त्यांना अटक करण्याची मोहीम राबवली आहे. ज्यात आतापर्यंत 181 जणांना बेड्या ठोकण्यात आले आहे. 

ऐन दिवाळीत पोलिसांची धरपकड. 

शांततेत चाललेल्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला बीडमध्ये हिंसक वळण लागले होते. अचानक सुरु झालेल्या जाळपोळीत कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे याची गंभीर दखल पोलिसांनी घेतली आहे. पोलिसांनी घटनेचे व्हिडिओ आणि सीसीटीव्हीच्या माध्यमातून हल्लेखोरांची ओळख पटवली आहे. ज्यात आतापर्यंत 500 पेक्षा अधिक लोकांची ओळल पटली आहे. विशेष म्हणजे पोलिसांनी आतापर्यंत 100 पेक्षा अधिक लोकांना अटक करून जेलमध्ये तर काहींना न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे. तसेच अजूनही पोलिसांची धरपकड सुरूच आहे. ऐन दिवाळीत पोलिसांची धरपकड सुरु असल्याने अनेकांनी शहर सोडले आहे. मात्र, या सर्व आरोपींना शोधून इतर जिल्ह्यात जाऊन पोलीस त्यांना ताब्यात घेत आहे. 

आमच्यासाठी फक्त गुन्हेगार आरोपीच...

दरम्यान, विशेष समाजातील तरुणांना जाणीवपूर्वक अटक करून जेलमध्ये टाकण्यात येत असल्याचा आरोप बीड पोलिसांवर करण्यात येत आहे. मात्र, यावर पोलिसांनी देखील आपली भूमिका स्पष्ट केली आहे. "बीड जाळपोळ प्रकरणात हल्लेखोरांची ओळख पटवूनचं प्रत्येक आरोपी ताब्यात घेतला जात आहे. उपलब्ध असलेले व्हिडिओ आणि सीसीटीव्हीत कैद झालेल्या हल्लेखोरांची ओळख पटवली जात आहे. त्यानंतर अटकेची कारवाई होत आहे. त्यामुळे जाळपोळ करणारे कोणत्या समाजाचे आहे हे आमच्यासाठी महत्वाचे नसून, आमच्यासाठी आरोपी हा आरोपीच आहे हे महत्वाचे असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. 

Sunday, November 12, 2023

सामाजिक कार्यकर्ते भीमाशंकर नावंदे यांचा स्तुत्य उपक्रम.सामाजिक बांधिलकी जोपासत वंचितांची दिवाळी केली साजरी.


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) आपल्या सभोवतालच्या समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो. याच समाजातील गरीब घटकांसाठी आपल्याच आनंदातील काही क्षण त्यांच्यासाठी देणाऱ्या भावनेतून ‘त्यांनी’ केली वंचित, गरजू आणि दीनदुबळ्यांची दिवाळी गोड... दिवाळीच्या लखलखाटात गोरगरिबांची दिवाळी मात्र अंधारात चाचपडत साजरी होते. मात्र त्यांनाही काही क्षण गोड-धोड खाऊन, लखलखाट जाणवावा यासाठी परळी तालुक्यातील मौजे परचुंडी येथील सामाजिक कार्यकर्ते तथा प्रेस फोटोग्राफर भीमाशंकरअप्पा नावंदे यांनी स्वःखर्चातून हा उपक्रम  आज 12 नोव्हेंबर रोजी लक्ष्मीपुजनाच्या दिवशी राबविला आहे.त्यांच्या या कार्याचे सर्वस्तरातून कौतूक होत आहे.

दिवाळी म्हटली की गोड-धोड पदार्थ, नवीन कपडे, मिठाई, लखलखाट, फटाके हे सर्व डोळ्यासमारे येत असते. मात्र आपल्याच सभोवताली अनेक वंचित, गरीब, होतकरु लोक असतात की त्यांना एकवेळचे जेवणासाठी कसरत करावी लागते. त्यामुळे दिवाळी साजरे करणे त्यांच्या आवाक्याच्या बाहेर असते. त्यांनीही वाटत असते की आपणही काहीतरी गोड खावे, नवीन कपडे घालावे मात्र त्यांच्या नशिबी नेहमीच अंधार असतो. यामुळेच मौजे परचुंडी येथील सामाजिक कार्यकर्ते तथा प्रेस फोटोग्राफर भीमाशंकरअप्पा नावंदे यांनी स्वःखर्चातून सामाजिक बांधिलकीचे भान जपत अशा गरजुंना कपडे, मिठाईचे वाटप केले. 

देणाऱ्यांना देत जावे, घेणार्याने घेत जावे या उक्तीप्रमाणेच परळी तालुक्यातील मौजे परचुंडी येथील सामाजिक कार्यकर्ते भीमाशंकरअप्पा नावंदे यांनी स्वःखर्चातून  आजपर्यंत अनेक उपक्रम राबवून अनेक लोकांच्या चेहर्यावरच्या हास्याचे कारण ते बनत आहेत. सणोत्सवाच्या दिवशी कामावर असलेल्या गरीब व होतकरु लोकांना व ज्येष्ठांना उत्सवाचा आनंद लुटता यावा यासाठी त्यांनी हा उपक्रम राबविला. 
मौजे परचुंडी येथील गरीब कुटूंबातील सुमारे 40 कुटुंबांना साडी, गरा,मैदा,साखर, चनादाळ, पामतेल इ  प्रकारचे साहित्य तसेच एक भेटवस्तु देण्यात आली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते भीमाशंकर नावंदे,युवा क्रिकेटपटू भूषण नावंदे,सरपंच सौ मीनाताई गुरूलिंग नावंदे,व्यंकट गडदे पाटील,सुभाष नावंदे,गुरूलिंग नावंदे,सुनील नावंदे,बलभीम थोरात,बाबुराव थोरात कमलाकर नावंदे, गणेश पत्रावळे यांच्या हस्ते हे साहित्य वाटप करण्यात आले.त्यांच्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्वस्तरातून कौतुक होत असून त्यांनी एक आदर्श उपक्रम राबविला असल्याचे अनेकांनी म्हटले आहे.

Thursday, November 9, 2023

स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतिगृहात कर्मचाऱ्याची गळफास घेत आत्महत्या.


अंबाजोगाई (प्रतिनिधी) येथील स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतिगृहात कर्मचाऱ्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली.

वैजनाथ अनंत काळे असं गळफास घेतलेल्या तृतीय श्रेणी कर्मचाऱ्याच नाव आहे. वैजनाथ अनंत काळे हे गेली 25 वर्षांपासून येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या पी जी बॉईज वसतीगृहातील तृतीय श्रेणी कर्मचारी या पदावर कार्यरत होते वैजनाथ काळे हे आज सकाळी नेहमीप्रमाणे ड्युटी साठी वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरात आले. आपल्या सहकाऱ्यांशी गप्पा मारुन ते वसतिगृहाकडे गेले. वसतिगृहात कार्यरत असलेल्या इतर कर्मचाऱ्यांशी त्याने गप्पा मारल्या आणि फ्रेश होण्यासाठी ते वसतिगृहाच्या रूममध्ये गेले. बराच वेळ झाला तरी ते आले नाही हे पाहून इतर कर्मचाऱ्यांनी त्या रुमचा दरवाजा उघडला असता त्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. सदरील घटनेची माहिती संबंधित कर्मचाऱ्यांनी तातडीने वरीष्ठ अधिकारी व सुरक्षा विभागाला दिली. या प्रकरणी पोलीसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. मात्र मयत वैजनाथ काळे यांनी आत्महत्या नेमकी कोणत्या कारणामुळे केली हे अजून स्पष्ट झाले नाही. पुढील तपास पोलीस करीतआहेत.