Wednesday, September 29, 2021

सोनपेठ तालुक्यातील बलात्कार प्रकरणी व बंजारा समाजाच्या मागण्या बाबत ना.विजय वडेट्टीवार यांना राष्ट्रीय बंजारा परिषदेचे निवेदन.


बीड (प्रतिनिधी) - परभणी जिल्हा सोनपेठ तालुक्यातील डिघोळ तांडयावरील अल्पवयीन बंजारा मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणातील व गेवराई तालुक्यातील भेंडटाकळी तांड्यावरील संदिप चव्हाण खुन प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा द्यावी, खटला जलदगती न्यायालयात चालवावा तसेच माजलगाव धरणाला माजी मुख्यमंत्री माहानायक वसंतरावजी नाईक यांचे नाव सन्मानपूर्वक देऊन नाईक साहेबांचा गौरव करावा,या प्रकरणी राज्य सरकारने त्वरित ठोस निर्णय घ्यावेत या मागण्यांचे निवेदन राज्याचे ओबीसी कल्याण तथा मदत व पुनर्वसन मंत्री ना.विजय वडेट्टीवार यांना राष्ट्रीय बंजारा परिषदेच्या वतीने देण्यात आले आहे.  राष्ट्रीय महासचिव तथा माजी जिल्हा परिषद प्रा.पी.टी.चव्हाण यांनी ना. विजय
 वडेट्टीवार यांच्या सोबत सविस्तर चर्चा करुन निवेदन दिले आहे.
बीड येथे आयोजित ओबीसी व्हिजेएनटींचा आरक्षण बचाव निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला होता,या मेळाव्यात मुख्य मार्गदर्शक म्हणून ना.वडेट्टीवार मंचावर उपस्थित होते, तेव्हा बंजारा समाजाच्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
निवेदनात खालील जिव्हाळ्याच्या मागण्यांच्या समावेश करण्यात आला आहे.१९९० चा शासननिर्णय लागु करुन ५०० लोकसंख्या असलेल्या तांडा वाडी वस्तीवर स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन कराव्यात 
 .देशातील १५ कोटी बंजारा समाज बांधवांची मातृभाषा असलेल्या गोरबोलीचा केंद्राच्या आठव्या सुचीत समावेश करून राजभाषेचा दर्जा देण्यात यावा, प्रत्येक तांड्यावर मुख्यमंत्री सडक योजनेतून डांबरी रस्ते तयार करण्यात यावे, प्रत्येक तांड्यावर पिण्याचे पाणी,अंतर्गत सिमेंट रस्ता,नाली,स्मशानभूमी बांधकाम करण्यात यावे, स्वतंत्र मतदान केंद्र, वाचनालय,व्यायाम- शाळांना मंजुरी देण्यात यावी,गोरगरीब निराधारांना घरकुल योजनेचा लाभ द्यावा,आरोग्य उपकेंद्र,विद्युत पुरवठा (डीपी) ना मंजुरी देण्यात यावी. सांस्कृतिक सभागृह बांधण्यात यावे इत्यादी मुलभूत सुविधा तांड्यावर खासबाब ंम्हणून उपलब्ध करून देण्यात याव्यात अशा मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. राज्यसरकार कडून बंजारा समाजाच्या रास्त मागण्या सोडविण्यासाठी नक्कीच सकारात्मक निर्णय घेतला जाईल,असे आश्वासन मंत्री ना.विजय वडेट्टीवार यांनी दिले आहे.
निवेदनावर बाजीराव राठोड, कृष्णा राठोड, संजय चव्हाण, सुशांत पवार,प्रकाश राठोड, सुरेश पवार,पवन जाधव, एकनाथ आडे,बाळू राठोड,सुंदरसिंग महाराज, अंकुश राठोड,विजय चव्हाण,गोरख पवार, सुरेश चव्हाण, राजाभाऊ चव्हाण,पापा चव्हाण यांच्या स्वाक्षरी आहेत.

राष्ट्रवादीच्या बीड शहर सचिव पदी विशाल वाघमारे यांची निवड.


* पदाला न्याय देण्याचे काम करणार......

 बीड (प्रतिनिधी) आमदार संदीप क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली व नेतृत्वावर विश्वास ठेवून बीड शहरात राष्ट्रवादी काँग्रेस वाढविण्याच्या दृष्टिकोनातून संघटनात्मक बांधणी व युवकांची मोठी फळी जोडण्या साठी, भविष्यात येणाऱ्या नगरपरिषद, पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये पक्षवाढीसाठी म्हणून  आमदार संदीप क्षीरसागर यांचे निष्ठावान कार्यकर्ते तथा युवा उद्योजक विशाल वाघमारे यांची शहर सचिव पदी निवड करण्यात आली त्यांना नियुक्ती पत्र  मान्यवर च्या उपस्थित मध्ये  देण्यात आले, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या बीड शहर सचिव पदी नियुक्ती करण्यात आली, त्यांच्या निवडीमुळे निश्चितपणे राष्ट्रवादी काँग्रेस बीड शहरात संघटनात्मक बांधणी व युवकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे भविष्यात पक्ष जी जबाबदारी दिली ती पार पाडण्याची आपली तयारी आहे असे त्यांनी बोलताना सांगितले.
यावेळी उपस्थित मा.आ.सुनिल दादा धांडे, मा.आ.सय्यद सलिम, तर बाळासाहेब गुजर, शहराध्यक्ष,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बीड, पंकज बाहेगव्हाणकर, जिल्हाअध्यक्ष राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस,नगरसेवक आमेर शेख , नगरसेवक जयतुला खान,अजय सुरवसे,अरुण कांबळे,अमोल धनवे,भारत कांबळे,वैभव सरोदे,भैय्या वाघमारे,आदी पदाधिकारी उपस्थित होते.

मतदार यादीत तुमचं नाव नाही का? किंवा नसेल तर. निवडणुक आयोगाची विशेष मोहिम.


मुंबई |स्थानिक स्वराज्य  संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या दृष्टीने १ ते ३० नोव्हेंबर २०२१ या कालावधीत पात्र नागरिकांना मतदार यादीत नावे नोंदविण्याची आणि मृत, दुबार अथवा स्थलांतरीतांची नावे वगळण्याची चांगली संधी आहे. त्याबाबत विधानसभा मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाच्या निमित्ताने जिल्हाधिकारी व महानगरपालिका आयुक्तांनी समन्वयाने व्यापक व प्रभावी जनजागृती मोहीम राबवावी, असे निर्देश राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी दिले.

भारत निवडणूक आयोगातर्फे १ ते ३० नोव्हेंबर २०२१ या कालावधीत विधानसभा मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. त्यासाठी राबविण्यात येणाऱ्या मतदार जागृती अभियानाच्या तयारीबाबत मदान यांनी आज जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका आयुक्तांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे (व्हिडिओ काँफरन्सिंग) संवाद साधला.

मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे, राज्य निवडणूक आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी, कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त विजय सूर्यवंशी, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातील स्वीय सल्लागार दिलीप शिंदे आदी यावेळी उपस्थित होते.

पात्र नागरिकांनी मतदार म्हणून नावे नोंदवा

मदान यांनी सांगितले की, भारत निवडणूक आयोगातर्फे तयार करण्यात येणारी विधानसभा मतदारसंघांचीच मतदार यादी महानगरपालिका, नगरपरिषदा/ नगरपंचायती, जिल्हा परिषदा/ पंचायत समित्या व ग्रामपंचायती या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी जशीच्या तशी वापरली जाते. त्यामुळे विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाच्या कालावधीत १ जानेवारी २०२२ रोजी वयाची १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या अधिकाधिक पात्र नागरिकांनी मतदार म्हणून आपली नावे नोंदवावित. त्याचबरोबर मृत, दुबार/ समान नोंदीदेखील वगळता येतील. आवश्यक असल्यास पत्त्यात अथवा नावांत दुरूस्त्याही करता येतील. या कार्यक्रमाची माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचविणे आवश्यक आहे. त्याकरिता मुद्रित, इलेक्ट्रॉनिक व सोशल मीडियाबरोबरच विविध कल्पक बाबींचाही अवलंब करावा.

नमुना क्रमांक ७ भरून संबंधित ठिकाणी जमा करावा

देशपांडे यांनी सांगितले की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावण्याच्या दृष्टीने आताच मतदार म्हणून आपले नाव नोंदविणे आवश्यक आहे. त्याचबरोबर मतदार यादी अद्ययावत आणि अधिकाधिक बिनचूक करण्यासाठीदेखील नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने नावांमध्ये दुरूस्त्या असल्यास त्याही कराव्यात. मृतांची अथवा दुबार नावे वगळावयाची असल्यास नमुना क्रमांक ७ भरून तो संबंधित मतदार नोंदणी अधिकारी किंवा संबंधित ठिकाणी जमा करावा अथवा ऑनलाईन पद्धतीने www.nvsp.in या संकेतस्थळावर भरावा. या संकेतस्थळावर नवीन मतदार म्हणूनदेखील नाव नोंदणी करता येते.

प्रक्रिया सुलभ केल्यास नागरिकांचा चांगला प्रतिसाद

कुरुंदकर यांनी सांगितले की, आगामी काळात मोठ्याप्रमाणावर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडणार आहेत. त्यासाठी मतदार म्हणून नावे नोंदविण्याची किंवा मतदार यादीत दुरूस्त्या करण्याची ही शेवटची संधी आहे. याबाबत नागरिकांना व मतदारांना अवगत करणे आवश्यक आहे; तसेच ही सर्व प्रक्रिया अधिकाधिक सुलभ केल्यास नागरिकांचा चांगला प्रतिसादही लाभेल. त्यादृष्टीने सर्व जिल्हाधिकारी व महानगरपालिकेच्या यंत्रणांनी आतापासूनच नियोजन करावे.

तोंडात बोळा कोंबून महिलेवर बलात्कार.


नाशिक  :- देशाला हादरवून सोडणारी मुंबईतील साकीनाका येथील घटना ताजी असताना, डोंबिवलीत एका अल्पवयीन मुलीवर तब्बल 33 जणांनी अत्याचाराचा कळस गाठला आहे.या घटना ताज्या असताना, नाशिक शहरात महाराष्ट्राला हादरवणारी घटना घडली आहे. येथील एका व्यावसायिक महिलेवर नराधमाने तोंडात बोळा कोंबून आणि तिचे हात बांधून अत्याचार केला आहे. नराधम आरोपी हा सराईत गुन्हेगार असून नाशिक पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

संबंधित संतापजनक घटना नाशिक शहरातील पवननगर भागात घडली आहे. पीडित महिलेचा ब्युटीपार्लरचा व्यवसाय असून सराईत गुन्हेगारानं चाकूचा धाक दाखवून तिच्यावर बलात्कार केला आहे. पीडित महिला आपल्या पार्लरमध्ये देवाची पूजा करीत असताना, संशयित आरोपी तिच्या दुकानात शिरला.

यानंतर आरोपीनं पार्लरचा दरवाजा आतून बंद करून चाकूचा धाक दाखवत तिच्यासोबत जबरदस्ती केली आहे. नराधमाने पीडित महिलेच्या तोंडात बोळा कोंबून तिचे हात बांधत अमानुष पद्धतीने तिच्यावर अत्याचार केला आहे.

जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांचे नागरिकांना आवाहन.


बीड :- बीड जिल्हयात होत असलेल्या अतिवृष्टी मुळे विविध ठिकाणी आणि नदीकाठच्या गावात पुराच्या पाण्याचा धोका वाढला आहे. या भागातील नागरिकांना सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे.

बीड जिल्हयात 11 तालुक्यात नैसर्गिक आपत्ती मधील आपत्ती व्यवस्थापन निवारणार्थ जिल्हाधिकारी बीड येथील कार्यालयात 24 तास नियंत्रण कक्ष कार्यान्वीत केलेला आहे. त्याचा संपर्क क्र 02442-222604 असा असून मदतीसाठी जनतेने कृपया या क्रमांकाशी संपर्क साधावा.

आपल्या सभोवताली निर्माण झालेल्या पुरपरिस्थिती निर्माण झाल्यास तसेच नदीकाठी राहणाऱ्या जनतेने सतर्क राहावे आणि पुरपरिस्थिती निर्माण झाल्यास वरील क्रमाकांशी तात्काळ संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी केले आहे.

Tuesday, September 28, 2021

ना.जयंतरावजी पाटील व धनंजयजी मुंडे साहेब यांचे परळी नगरीत आगमन होताच टाळ मृदंगाच्या जय घोषात स्व.गोपीनाथरावजी मुंडे साहेब चौकात अभुतपूर्व स्वागत.


परळी वैजनाथ (प्रतिनीधी) परळी नगरीत आगमन  होताच परळी न.प. गट नेते आमचे मार्गदर्शक वाल्मिक आण्णा कराड यांच्या  सुचनेवरून भव्य सत्काराचे आयोजन  राष्ट्रवादी परिवार संवाद याञेच्या निमित्तांने  राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष तथा जलसंपदामंत्री जयंत पाटील व महाराष्ट्र राज्याचे न्याय मंञी तथा बीड जिल्हा पालकमंत्री धनंजय मुंडे साहेब यांचे अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या वतीने व संगम ग्रामपंचायत,वाघबेट ग्रामपंचायत  च्या वतीने आगळेवेगळे स्वागत वारकरी फेटा वारकरी पंचा व विठ्ठलाची मुर्ती भेट देऊन अभुतपूर्व स्वागत  करण्यात आले अखिल भारतीय वारकरी मंडळाचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष तथा संगम ग्रामपंचायत चे सरपंच वच्छालाबाई कोकाटे यांचे सुपुत्र ह.भ.प.रामेश्वर महाराज कोकाटे,व सरपंच अमर गिते  यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला उपसरपंच गंगाधर नागरगोजे व युनुस बेग ह.भ.प.गोविंद महाराज मुंडे नंदनंजकर  यांच्या  हस्ते पुष्पगुच्छ  देऊन स्वागत करण्यात आले स्व.गोपीनाथराव मुंडे साहेब चौकात वारकरी सांप्रदायाप्रमाणे पालकमंत्री व जयंत पाटील यांचे पाच हाजाराची फटाक्याची लढ लाऊन व  एक्से एकावन्न तोफांची सलामी देऊन वारकरी मंडळाच्या वतीने संगम ग्रामपंचायत सरपंच कोकाटे  व वाघबेट ग्रामपंचायत सरपंच अमर गिते  यांच्या वतीने अभुतपूर्व स्वागत केले ह.भ.प.रामेश्वर महाराज कोकाटे यांच्या पुढाकाराने स्व.गोपीनाथराव मुंडे साहेब चौकात ज्ञानोबा तुकाराम जय घोषात राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील व पालकमंत्री धनंजय मुंडे साहेबांचे स्वागत केले या स्वागतासाठी अखिल भारतीय वारकरी मंडळाचे पदाधिकारी  मोठ्या संख्येने उपस्थित होते तर संगम ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य  व वाघबेट ग्रामपंचायत सरपंच अमर गिते संगम वागबेट येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थितांचे आभार युनुस बेग यांनी मानले

गेवराईत भीषण आगीत दुकाने जळून खाक.३० लाख रूपयांचे नुकसान.

  

गेवराई (प्रतिनीधी) :- गेवराई शहरातील कोल्हेर वेसीच्या लगत असलेल्या सोनार लाईनमधील दुकानांना रात्री 2 वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. यामध्ये एक इलेक्ट्रॉनिक तसेच दोन सोनाराच्या दुकानांचा समावेश आहे. अचानक लागलेल्या आगीने पाहता-पाहता आगिने रौद्ररूप धारण केले होते.

घटनेची माहिती कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तर नगर परिषदेच्या अग्निशमन दलाच्या वतीने आग विझवण्यासाठी प्रयत्न झाले. मात्र दुकानातील सर्व वस्तू जळून खाक झाल्या आहेत. जवळपास 30 लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे.

गेवराई शहरातील कोल्हेर वेशीच्या आतमध्ये सोनार लाईन आहे. यामध्ये शिवाजी दहिवाळ, टाक यांचे सोन्याचे दुकान आहे, तर मडकर यांचे इलेक्ट्रॉनिक्सचे मोठे नुकसान झाले. दरम्यान रात्री 2 वाजण्याच्या सुमारास येथील एका दुकानामध्ये अचानक लाग लागली.

पाहता-पाहता आगीने रौद्र रूप धारण करत शेजारच्या दोन दुकाना देखील आगीच्या भक्ष्यस्थानी घेतल्या. आग लागल्याचे लक्षात येताच जवळपासच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन पोलिसांना घटनास्थळी पाचारण केले. तसेच येथील नगर परिषदेच्या अग्निशमन दलाच्या वतीने आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरु झाले. यामुळे आसपासचे अनेक दुकानाला झळ पोहचली नाही.

दरम्यान या घटनेत दुकानातील सर्व वस्तू, माल जळून खाक झाल्या आहेत. या घटनेतील मडकर यांचे इलेक्ट्रॉनिक दुकानाचे जवळपास 15 लाखांहून अधिक नुकसान झाले असल्याचे सांगितले जात असून एकूण तीन्ही दुकानाचे मिळून 30 लाखांपेक्षा अधिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

बीडमध्ये पावसाचा हाहाकार. बिंदुसरा धारण ओव्हरफ्लो, पुलावरून वाहू लागले पाणी.


बीड (प्रतिनीधी) :- डोकेवाडा व अन्य तलाव क्षेत्रात पावसाच्या पाण्याने जोर वाढल्याने बीड शहराला पाणी पुरवठा करणारे बिंदुसरा धरण पूर्णपणे भरले असून बिंदुसरा ओव्हर फ्लो झाले आहे.

त्यामुळे नदीपात्रात पाणी सोडण्यात आले असून शहरातून वाहणाऱ्या नदीला पूर आला आहे, जुने आणि नवीन बीडचा संपर्क तुटल्याने डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवलील नव्या पुलावरून वाहतूक वळवण्यात आली आहे पावसाचा जोर वाढत असताना शहरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

ग्रामीण भागासह शहरात देखील या पावसाचा फटका बसला आहे बीड शहरातून बिंदुसरा धरण क्षेत्रामध्ये काल रात्री झालेल्या पावसामध्ये धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे, शहराला जोडणारा जुना पूल आहे आणि यावरून पाणी वाहत आहे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा बंदोबस्त आहे तो मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आलेला आहे नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Monday, September 27, 2021

वाशी शहरालगत असलेल्या शेतकर्‍यांच्या शेतात पडला सोनेरी दगड.


वाशी (प्रतिनीधी)- शहरालगत असलेल्या शेतात शूक्रवार दि.24 सप्टेंबर रोजी सकाळी 6 वाजेच्या दरम्यान अचानक एक सोनेरी दगड पडल्याने तर्कवितर्क लढवले जात असून घबराटीचे वातावरण तयार झाले आहे.

वाशी येथील शेतकरी प्रभु माळी हे आपल्या शेतात सकाळी भाजीपाला काढत असताना अचानक सूऽऽसू आवाज करत त्यांच्या अंदाजे सहा फुटावर एक दगड पडला.त्यांनी भांबावलेल्या अवस्थेत इकडे=तिकडे पाहिले .शेतकर्‍यांने जवळ जाऊन निरीक्षण केले असता,पडलेला दगड सोनेरी रंगाचा असून त्या ठिकाणी खड्डा पडला असल्याचे त्यांनी तहसिलदार नरसिंग जाधव यांना फोनद्वारे कळविले.

तो दगड शेतकर्‍यांने अव्वल कारकून सचिन पाटील यांच्याकडे सुपूर्द केला असून उल्कापात असल्याचे प्रथमदर्शनी सांगण्यात आले असून त्याचे वजन केले असता 2 किलो 38 ग्रॅम असल्याचेही सचिन पाटील यांनी सांगितले.पुढील तपासणीसाठी भु जल वैज्ञानिक उस्मानाबादला पाठविण्यात आला असून वरिष्ठ वैज्ञानिक बी.एम्.ठाकुर यांनी सांगितले की,हा दगड उल्कापातचा वाटतो,परंतु तपासणीनंतरच अनुमान काढण्यात येईल .घाबरण्याचे काही कारण नसून अवकाशात घडणाऱ्या घडामोडीतून असे उल्कापात पृथ्वीच्या कक्षेत आल्यामुळे असे घडत असते.

Thursday, September 23, 2021

राज्यसरकारचा महत्त्वपूर्ण! निर्णय. मुंबई वगळता सर्व महापालिकांच्या प्रभागातील नगरसेवक संख्या बदलली.पहा काय आहे निर्णय.

मुंबई - (प्रतिनीधी) राज्यमंत्री मंडळाच्या बैठकीमध्ये राज्यातील महापालिका, नगरपालिका, नगरपरिषदा आणि नगर पंचायतींबाबत राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यानुसार या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रभाग सदस्यांची संख्या बदलण्यात आली आहे. यानुसार मुंबई वगळता राज्यातील इतर सर्व महानगर पालिकांमध्ये ३ सदस्यीय प्रभाग पद्धत निश्चित करण्यात आली आहे. या सदस्यसंख्येवरून महाविकास आघाडीत मतभेद असल्याची चर्चा रंगली होती. शिवसेनेनं ४ सदस्यांची भूमिका घेतली असून राष्ट्रवादी काँग्रेसने मात्र २ सदस्यांची भूमिका घेतल्याचं सांगितलं जात होतं. मात्र, अखेर ३ सदस्यीय प्रभाग पद्धती स्वीकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भात पत्रकार परिषद घेऊन निर्णय जाहीर केला आहे. एकनाथ शिंदे यांनी जाहीर केल्याप्रमाणे, राज्यात मुंबई वगळता इतर सर्व महानगर पालिकांमध्ये ३ सदस्यीय प्रभाग रचना स्वीकारण्यात आली आहे. मुंबईत मात्र एकसदस्यी प्रभाग रचना कायम ठेवण्यात आली आहे. त्यासोबत नगरपालिका आणि नगरपरिषदांमध्ये २ सदस्यीय प्रभाग रचना तर नगरपंचायतींमध्ये एक सदस्यीय प्रभाग रचना असेल, असं यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले.

Wednesday, September 22, 2021

महात्मा गांधी जयंतीदिनी एफ एम आकाशवाणी, रेडीओ मिर्ची व लोकल रेडीओ स्टेशन केंद्र सुरू करण्यासाठी लाक्षणिक उपोषण करणार-चेतन सौंदळे

.

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) भारतातील बारा ज्योतीर्लिंगापैकी श्री.वैजनाथ पाचवे ज्योतीर्लिंग परळी वैजनाथ येथे तर महाराष्ट्रातील श्री.योगेश्वरी देवीचे प्रसिध्द मंदीर शैक्षणिक वारसा लाभलेल्या अंबेजोगाई येथे  आहे.याठिकाणी देशभरातून भाविक-भक्त व प्रवाशी मोठया प्रमाणात येतात तसेच परळी-अंबेजोगाई धार्मिक, पुरातत्व, सांस्कृतिक,
सामाजिक, एैतिहासिक, औद्योगिक व राजकीय दृष्टया मराठवाडयातील महत्तवाची शहरे आहेत परंतू याठिकाणी ईतर एफ एम केंद्राचे प्रसारण स्पष्ट ऐकू येत नाही त्यामुळे आकाशवाणी केंद्राचे एफ एम,रेडीओ मिर्ची तसेच लोकल रेडीओ स्टेशन सुरू करण्यासाठी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री ना.अनुराग ठाकुर यांना बीड जिल्हयाचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे,खासदार प्रीतमताई मुंडे यांनी शिफारस करण्याची मागणी नगरसेवक चेतन सौंदळे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

  अंबेजोगाई तालुक्यातील पिंपळा(धा.) येथील1991 साली सुरू झालेल्या उच्च शक्ती दुरदर्शन प्रक्षेपण केंद्राच्याद्वारे प्रसारीत होणारे नॅशनल व डी.डी.न्युज चॅनेल भारत सरकारने बंद केली असून तांत्रिक दृष्टया वैधता संपत असल्यामुळे उच्च शक्ती दुरदर्शन प्रक्षेेपण केंद्रही 31अॉक्टोबर 2021पासून बंद करण्याचे आदेश प्रसारभारती दुरदर्शन महानिर्देशालय,दिल्ली यांनी दि.20-09-2021च्या पत्राद्वारे दिले आहेत.

   त्यामुळे याठिकाणी पायाभूत सुविधा,जागा तसेच आवश्यक कर्मचारी संख्या उपलब्ध असल्यामुळे आकाशवाणी केंद्राचे एफ एम-रेडीओ मिर्ची व लोकल रेडीओ स्टेशन सुरू करून तांत्रिक दृष्टया लागणारे साहित्य उपलब्ध करून द्यावे तसेच अशाप्रकारचे केंद्र सुरू केल्यास स्थानिक कलाकारांच्या प्रतिभेला वाव मिळून हक्काचे व्यासपीठ मिळेल व मराठवाडयातील बीड,लातूर,उस्मानाबाद,परभणी,नांदेड जिल्हयातील लाखो लोकांना व प्रवाशी पर्यटकांना एफ एम केंद्राद्वारे सादर होणा-या कार्यक्रमाचा लाभ घेता येईल.
त्यामुळे यास तातडीने मान्यता देवून आकाशवाणी केंद्राचे एफ एम,रेडीओ मिर्ची तसेच लोकल रेडीओ स्टेशन सुरू करावे याकडे दूर्लक्ष केल्यास म.गांधी जयंती निमित्त 2 अॉक्टोबर रोजी उच्च शक्ती दुरदर्शन केंद्र पिंपळा(धा.)येथे एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण सुरू करणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते नगरसेवक चेतन सौंदळे यांनी दिली आहे.

Tuesday, September 21, 2021

श्री.भास्करराव जोशी (उखळीकर) यांचे निधन.

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) श्रीराम मंदिरचे पुजनसेवासाधक तथा उखळी बु.येथील  प्रतिष्ठीत व परिसरातील सर्वपरिचित व्यक्तीमत्व श्री. भास्करराव नरहरराव जोशी (उखळीकर) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्युसमयी ते ७२ वर्षे वयाचे होते. त्यांच्या  पार्थिवावर उखळी (बु.) येथे  बुधवार दि.22 सप्टेंबर रोजी सकाळी 9.30 वा अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले,एक मुलगी,सुना,नातवंडे असा मोठा परिवार आहे.
         श्री.भास्करराव जोशी (उखळीकर) हे अतिशय धार्मिक, मनमिळाऊ, संयमी व कुटुंबवत्सल म्हणून परिचित होते. सर्वदूर परिचय, धार्मिक, पौरोहित्य क्षेत्रात जीवनभर कार्यरत होते.त्यांचा दांडगा जनसंपर्क होता.जोशी (उखळीकर) परिवाराचा आधारवड म्हणून त्यांची ओळख आहे. परभणी समाज कल्याण विभागाचे निरीक्षक दिनकरराव जोशी, पत्रकार प्रा.रविंद्र जोशी, प्रसिद्ध भागवत कथा प्रवक्ते हभप बाळु (सुरेंद्र) महाराज उखळीकर यांचे ते वडील होत. गेल्या पंधरा दिवसांपासून लातुर येथे त्यांच्यावर उपचार सुरू होते.या उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने धार्मिक, सांस्कृतीक, विविध स्तरातुन शोकभावना व्यक्त होत आहेत.
      *आज अंत्यसंस्कार*
              दरम्यान,श्री.भास्करराव जोशी (उखळीकर)तयांच्या  पार्थिवावर मुळगावी उखळी (बु.) येथे  आज बुधवार दि.22 सप्टेंबर रोजी सकाळी 9.30 वा अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Friday, September 17, 2021

सिरसाळा येथे कँबिनेट मंत्री नवाब मलिक यांची धावती भेट, उपसभापती जानिमियाँ कुरेशी यांनी केले स्वागत,


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- तालुक्यातील सिरसाळा येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा महाराष्ट्र राज्याचे कँबिनेट मंत्री नवाब मलिक यांनी सिरसाळा येथे धावती भेट दिली असता पंचायत समिती उपसभापती जानिमियाँ कुरेशी यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. 
           राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते, परभणीचे पालकमंत्री तथा केबिनेट मंत्री नवाब मलिक हे सोनपेठ दौऱ्यावरून सिरसाळा मार्गे मुंबईकडे जात असताना आज शुक्रवार दि.17 सप्टेंबर रोजी परळी मतदारसंघातील सिरसाळा येथे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांचे अत्यंत विश्वासू तथा पंचायत समिती उपसभापती जानिमियाँ कुरेशी यांनी त्याचे स्वागत केले. यावेळी परळी पंचायत समितीचे उपसभापती जनेमिया कुरेशी व त्याचे सहकारी व आदीं मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती.

स्वराज्य ध्वज यात्रेचे भद्रावती येथे भव्य स्वागत.

भद्रावती (प्रतिनीधी) :- कर्जत जामखेड चे युवा आमदार व राज्याचे उद्धोन्मुख नेतृत्व रोहित पवार यांच्या नेतृत्वात देशातील सगळ्यात लांब उंच व हिंदवी स्वराज्याचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या भगव्या ध्वजाचे भद्रावती जैन मंदिर येथे  जंगी स्वागत करण्यात आले.
स्वागताला राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश प्रतिनिधी मुनाज शेख , असंघटित कामगार जिल्हा अध्यक्ष फय्याज शेख , राष्ट्रवादी युवक काँग्रेस विधानसभा अध्यक्ष अभिजित कुडे , महीला शहर अध्यक्ष भद्रावती साबिया देवगडे  युवक शहर उपाध्यक्ष सूरज भेले , चंद्रपूर तालुका अध्यक्ष राहुल आवडे , पियूष भोगेकर, रोशन कोमरेडीवार, निलेश जगताप , सौरभ घोटेकर यांच्यासह मोठया प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते.  छत्रपती शिवाजी महाराजांनी सुस्वराज्याचा स्थापनेकरिता जिकरीने खर्ड्याजवळ शिवपटन किल्ला काबीज केला होता. या कील्ह्याजवळ हिंदवी स्वराज्याची शेवटाची लढाई झाली होती. शत्रूला धूळ चारत आपल्या शुर मावळ्यांनी त्यावर भगवा फडकाविला होता.
या कील्ह्याच्या आवारात प्रेरणा, ऊर्जा देणारा भव्य स्वराज्य ध्वज स्तंभ उभारण्यात येत आहे दसऱ्याच्या मुहूर्तावर या स्वराज्य ध्वजाची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. तत्पूर्वी महाराष्ट्रसह देशातील विवीध महत्वाच्या ७४ धार्मिक ,आध्यात्मिक स्मारके गडकिल्ले आदी ठिकाणीं ध्वजाचे पूजन होणारं आहे .१२ हजार किलोमीटर सुस्वराज्य यात्रा प्रवास करणार आहे .७४ प्रेरणास्थान ,३७ दिवस,३६ महाराष्ट्रतील जिल्हे  आणि देशातील ६ राज्य असा ध्वजाचा प्रवास राहणार आहे.
*स्वराज्य ध्वजाचे महत्व* 
स्वराज्य ध्वज लाल व पिवळ्या रंगाच्या मिश्रणातून तयार झालेला  भगवा रंगाचा आहे. तो ऊर्जा, भक्ती ,शक्ति आणि आनंदाचे प्रतिक मानले जाते हिंदवी स्वराज्याची विजयाची शेवटची लढाईला नगर जिल्हयातील कर्जत– जामखेड मधील शिवपत्तन किल्ल्याभोवती झाली . त्यामुळे इथे या यात्रेचा समारोप होणार आहे.

Thursday, September 16, 2021

पवनराजे अर्बन निधी बँकेत शिवसेना तालुका प्रमुख व्यंकटेश शिंदे यांच्या हस्ते श्री गणरायाची आरती संपन्न.

परळी वैजनाथ (प्रतिनिधी ) पवनराजे अर्बन निधी बँकेत आज दि 16 सप्टेंबर रोजी,, श्री गणरायाची आरती  करतांना शिवसेना तालुका प्रमुख व्यंकटेश शिंदे यांच्या हस्ते करण्यात आली.
गुरुवार दिनांक 16 सप्टेंबर रोजी  शिवसेना तालुका प्रमुख व्यंकटेश शिंदे आणि शिवसेना जेष्ठ नेते सतिष जगताप यांच्या हस्ते श्री गणरायाची आरती करण्यात आली
यावेळी पवनराजे अर्बन निधी बँकेचे अध्यक्ष प्रल्हाद सावंत, उपाध्यक्ष बालासाहेब हंगरगे पाटील, सचिव गोविंदराव भरबडे, शिवसेना युवा तालुका प्रमुख संतोष चौधरी संचालक बाळासाहेब पोरे, प्रल्हाद काळे, गोविंदराव मुंडे,म आरफोदीन तांबोळी,मयुर जिरगे, रामेश्वर भोसले, ज्ञानेश्वर सातपुते, सचिन भरबडे, सोनाली वैराळे, वैजयंती माला घवले, विनायक राठोड,अजय जोशी, कार्यालयीन कर्मचारी सोमनाथ चाटे, सत्य प्रकाश कराड, शिल्पा मराठे,मयुरी शिंदे,पवन खाते, राहुल लिखे, यांच्या सह सर्व संचालक मंडळ कर्मचारी उपस्थित होते.

Sunday, September 12, 2021

पत्रकार संरक्षण कायद्याची कठोरपणे अंमलबजावणी करावी- एस. एम. देशमुख


* अ. भा. मराठी पत्रकार परिषदेच्या शिष्टमंडळाने घेतली गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट.

पुणे  ( प्रतिनीधी) पत्रकार संरक्षण कायद्याची कठोरपणे अंमलबजावणी करावी आणि पत्रकारावर गुन्हा दाखल करण्यापुर्वी त्याची सत्यता वरिष्ठ अधिकारयांमार्फत तपासावी अशी मागणी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या शिष्टमंडळाने आज गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे केली.

एस.एम.देशमुख यांच्या नेतृत्वाखाली परिषदेच्या शिष्टमंडळाने आज दिलीप वळसे पाटील यांची मंचर येथे भेट घेतली.. शिष्टमंडळात परिषदेचे कार्याध्यक्ष शरद पाबळे, पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष सुनील लोणकर आणि परिषदेचे माजी विभागीय चिटणीस डी. के. वळसे पाटील यांचा समावेश होता.

गृहमंत्र्यांशी चर्चा करताना एस. एम.देशमुख यांनी राज्यात पुन्हा एकदा पत्रकारांवरील हल्ले मोठ्या प्रमाणात वाढल्याचे सांगितले.. गेल्या दोन दिवसात मुंबई, चाकुर, श्रीगोंदा आदि ठिकाणी पत्रकारांवर हल्ले झाले आहेत.. या प़करणील हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्याचा मागणी एस.एम.देशमुख यांनी केली.

राज्यात पत्रकारांवर खोटे गुन्हे दाखल करून पत्रकारांची कोंडी करण्याच्या घटना वाढीस लागल्या आहेत..एक सत्य बातमी दिल्यामुळे केज येथील पत्रकारांवर खोटा गुन्हा दाखल केल्याचे देशमुख यांनी वळसे पाटील यांच्या निदर्शनास आणून दिले.. पत्रकारांवर गुन्हा दाखल करण्यापुर्वी त्याची सत्यता वरिष्ठ अधिकारयांमार्फत तपासून पहावी अशी मागणी देखील शिष्टमंडळाने केली..वरील मागण्यांसंदर्भात दिलीप वळसे पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद देत योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले.

पत्रकारांचे पेन्शन, आणि अन्य प़श्न प़लंबित आहेत. पत्रकारांना कोरोना फ़न्टलाईन वर्कर म्हणून जाहीर करावे आणि ज्या १५५ पत्रकारांचे कोरोनानं निधन झालं आहे अशा सर्व पत्रकारांच्या नातेवाईकांना १० लाख रूपयांचे अनुदान द्यावे आदि मागण्या सातत्यानं सरकारकडे केल्या जात आहेत. परंतू या संबंधी कोणताच निर्णय होत नसल्याने आपण पुढाकार घेऊन मुख्यमंत्र्यांसोबत बैठक लावावी अशी विनंती वळसे पाटील यांच्याकडे केली असता, मुख्यमंत्र्यांशी बोलून अशी बैठक लावण्याचे आश्वासन त्यांनी शिष्टमंडळास दिले. जवळपास अर्धा तास ही बैठक झाली.

पवनराजे अर्बन निधी बँकेत. ह भ प रामेश्वर महाराज कोकाटे व अतुल दुबे यांच्या हस्ते श्री गणरायाची आरती.


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) येथील पवनराजे अर्बन निधी बँकेत आज रविवार दिनांक 12 सप्टेंबर रोजी श्री गणरायाची आरती ह भ प रामेश्वर महाराज कोकाटे व अतुल दुबे सर यांच्या हस्ते करण्यात आली.
आज रविवारी पवनराजे अर्बन निधी बँकेत अ.भा. वारकरी मंडळाचे विभागीय अध्यक्ष ह भ प रामेश्वर महाराज कोकाटे व भारतीय विद्यार्थी सेनेचे बीड जिल्हा प्रमुख प्रा अतुल दुबे सर यांच्या हस्ते श्री गणरायाची आरती करण्यात आली. यावेळी पवनराजे अर्बन बॅंकेचे अध्यक्ष प्रल्हाद सावंत, उपाध्यक्ष बालासाहेब हंगरगे पाटील, सचिव गोविंद भरबडे, संचालक बाळासाहेब पोरे ,प्रल्हाद काळे,गोविंद मुंडे,म आरेफोद्यीन तांबोळी, मयुर जिरगे,रामेश्वर भोसले,ज्ञानेश्वर सातपुते,सचिन भरबडे, सोनाली वैराळे,वैजंयतीमाला घवले,विनायक राठोड, अजय जोशी, कार्यालीयन कर्मचारी सोमनाथ चाटे,सत्यप्रकाश कराड,शिल्पा मराठे,मयुरी शिंदे,पवन खाते,राहुल लिखे यांच्यासह सर्व संचालक मंडळ कर्मचारी उपस्थित होते.

मंदिर खुली करण्यासाठी आता नव्या आंदोलनाची घोषणा!



कांतीकारी साथी न्युज | मंदिरे खुली करण्याच्या मागणीसाठी काही दिवसांपूर्वी राज्य सरकारला आंदोलनाचा इशारा देणाऱ्या ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या समर्थकांनी आता नव्या आंदोलनाची घोषणा केली आहे. देवस्थान जमिनीच्या ‘रेकॉर्ड ऑफ राईट्स’ला पुजार्‍यांच्या असलेल्या नोंदी रद्द करण्यासाठी पीपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसदच्या वतीने काळी आई मुक्तिसंग्राम करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती संघटनेचे निमंत्रक अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी दिली. अण्णा हजारे यांच्या समर्थकांच्या या दोन्ही संस्था आहेत. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या एका निकालाची राज्यात अंमलबजावणी करण्यासाठी हे आंदोलन सुरू करण्यात येणार आहे.
यासंबंधी अ‍ॅड. गवळी यांनी सांगितलं की, ‘सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती हेमंत गुप्ता आणि न्यायमूर्ती ए. एस. बोपन्ना यांच्या खंडपीठाने एक निवाडा दिला आहे. मंदिराने देवस्थानच्या मालकीच्या जमिनीवर पुजारी किंवा देवासाठी काम करणार्‍या कोणाचीही नावे रेकॉर्ड ऑफ राईटला कब्जेदार, सदरी आणि मालक सदरी ठेवता येणार नसल्याचं न्यायालयाने म्हटलं आहे. यामुळे महाराष्ट्रातील हजारो गावांमधील लाखो एकर जमीन मंदीर आणि देवाचे मालकीचे पुजार्‍यांच्या नावावरून काढून त्या देवाच्या नावावर करण्यासाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे.

‘मध्य प्रदेश सरकारने दाखल केलेल्या अपिलावर हा निवाडा नुकताच झाला आहे. या निवाड्याचा फायदा महाराष्ट्रातील हजारो देवस्थानांना होणार आहे. देवस्थानच्या जमिनीवर पुजारी आणि इतर लोक स्वत:च्या नोंदी करून मालकाप्रमाणे वागत आहेत. तर देवस्थानला दिवाबत्ती करण्यासाठी सुद्धा पैसा मिळत नसल्याची वस्तुस्थिती आहे. त्यामुळे या संघटनांतर्फे तातडीने गावांमधील कर्त्या ग्रामस्थांना संघटित करून हे आंदोलन चालवले जाणार आहे. यापुढे पुजारी फक्त नोकर किंवा व्यवस्थापकाच्या स्वरूपात मंदिरात राहू शकणार आहेत. त्यामुळे देवस्थानच्या मालकीच्या जमिनीवर पुजार्‍यांची मालकी आणि ताबा यापुढे राहणार नाही. तर देवस्थानची मालकी आणि देवस्थानचा ताबा या जमिनीवर राहणार आहे. भारतीय संविधानाचे कलम १४१ नुसार सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निवाडा हा संपूर्ण भारतातील देवस्थान जमिनींना लागू होतो,’ असं गवळी यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, महाराष्ट्रातील जमिनी या देवस्थान वतन स्वरूपाचे असल्यामुळे त्याला कूळ कायदा लागत नाही. परंतु पुजारी आणि त्यांच्या वारसांनी अशा हजारो एकर जमिनीची विल्हेवाट आतापर्यंत लावली व कोट्यवधी रुपये बेकायदेशीरपणे मिळवले. तर संपूर्ण गावाला वेठीस धरले आहे, अशी भूमिकाही गवळी यांनी मांडली आहे.या आंदोलनासाठी ऍड. कारभारी गवळी, अशोक सब्बन, ज्ञानदेव काळे, सुधीर भद्रे, शाहीर कान्हू सुंबे, विठ्ठल सुरम यांनी पुढाकार घेतला आहे.

निवडणुकीचा रणसंग्राम रंगणार स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीस स्थगिती नाही !

 

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीस स्थगिती नाही !

नवी दिल्ली – ओबीसी आरक्षणाच्या कारणावरून पुढे ढकलण्यात आलेला निवडणूक कार्यक्रम स्थगित करण्यास सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेवर सुनावणी करताना स्थगिती देण्यास न्यायालयाने नकार दिल्याने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार हे नक्की झाले आहे .

ओबीसी आरक्षण रद्द झाल्यामुळे होणाऱ्या पोटनिवडणुका कोरोनामुळे पुढे ढकलण्याचा राज्य सरकारचा विनंतीवजा आदेश गैरलागू असल्याचेही न्यायालयाने सांगितल्याने सरकारची मोठी गोची झाली आहे.

निवडणूक आयोगाने याबाबत सर्वोच्च न्यायालयात अहवाल देताना राज्य सरकारने निवडणुका पुढे ढकलण्याची विनंती केली असल्याचे सांगितले. यावर न्यायमूर्ती ए. एम. खानविलकर यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली असता निवडणुकीचे वेळापत्रक ठरविण्याचा राज्य सरकारला कोणताही अधिकार नसल्याचे खंडपीठाने स्पष्ट केले.

मार्च महिन्यात दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्यात राज्य सरकारचा आदेश अडथळा ठरू शकत नाही, असेही खंडपीठाने आदेशात म्हटले आहे. निवडणूक पुढे ढकलण्यासाठीचा राज्य सरकारचा निर्देश रद्द करतानाच याबाबत दिलेल्या आदेशाच्या अंमलबजावणीचा अहवाल सहा आठवड्यांत सर्वोच्च न्यायालयाला द्यावा, असे खंडपीठाने सांगितले आहे.

ओबीसी आरक्षण मर्यादा 50 टक्क्यांच्या वर गेल्याने वाशीम, धुळे, अकोला, नंदुरबार, पालघर या जिल्ह्यातील जिल्हा परिषद तसेच तसेच पंचायत समितीमधील ओबीसी मतदारसंघातील निवडी 4 मार्च 2021 रोजी सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्या होत्या. शिवाय या जागांसाठी नव्याने निवडणुका घेण्याचे आदेश देण्यात आले होते.

त्यानुसार निवडणूक आयोगाने तयारी केली होती. पालघर वगळता इतर जिल्ह्यांत कोरोनाची साथ कमी असल्याने तेथे निवडणूक जाहीर करण्यात आली.87 जिल्हा परिषद गट आणि 119 पंचायत समिती येथे पोटनिवडणुका घेण्यासाठीचे वेळापत्रकही ठरविले.मात्र राज्य सरकारने कोरोनाचे कारण देत सदर निवडणुका पुढे ढकलण्याची विनंती राज्य निवडणूक आयोगाकडे केली होती.

आता यावर न्यायालयाने दिलेल्या आदेशामुळे निवडणूक होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे 

Saturday, September 11, 2021

सौ.वर्षा सुयश ललवाणी यांनी केले खडतर जैनधर्मीय 11 उपवास.


भुसावळ - (प्रतिनीधी) येथील श्री श्रावक संघाचे माजी कोषाध्यक्ष मदनलाल ललवाणी व कोटेचा महिला महाविद्यालयाचे माजी प्रभारी प्राचार्य प्रा. डॉ. डी .एम. यांची सून सौ वर्षा सुयश ललवाणी यांनी परम पुज्य आचार्य देव विजय प्रभाकर सुरीश्वरजी म.सा. व प.पु. साध्वी प्रज्ञाप्ताश्रीजी,अमितमालाश्रीजी,रत्नशिलाश्रीजी, विनम्रयशाजीश्री यांच्या अनुकंपा व आशिर्वादाने जैनधर्मीय 11 खडतर उपवास केले असून पूर्णाहुती निमीत्त अनुमोदन सोहळा इंटरनॅशनल भक्ती संगीत सम्राट विनीत गेमावत यांच्या उपस्थितीत  संपन्न होणार आहे! त्या ऊच्चशिक्षीत (M.E) असुन त्यांनी प्रथमताहाच अकरा उपवास केले ! त्यांच्या या धार्मिक अनुष्ठानाबद्यल श्री. श्रावक संघ भुसावळ ,श्री श्रावक संघ ठाणा, जैन युवक मंडळ, संयुक्त सेवा महिला मंडळ, नवकार ग्रुप,सखी सहेली ग्रुप,श्री राजस्थान श्वेतांबर मुर्तीपुजक जैन संघ,श्री त्रुषभदेव महाराज जैन धर्म टेंपल एण्ड ज्ञाती ट्रस्ट,पांडव ग्रुप व तसेच अनेक मान्यवरांनी  अभिनंदन केले आहे!भुसावळातील ललवाणी परीवार हा सदैव तपस्या व धार्मिक कार्यात अग्रेसर असतो असे स्वाध्यायी,जैन कान्फरन्स दिल्ली चे ज्ञानप्रकाश योजनेचे माजी अध्यक्ष प्रेमचंद कोटेचा यांनी प्रतीपादन केले!

Saturday, September 4, 2021

प्रा.डी .एम ललवाणी यांना "राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार" जाहीर.

 भुसावळ - ( प्रतिनीधी )  येथील श्रीमती प क कोटेचा महीला महाविद्यालया चे माजी प्रभारी प्राचार्य व प्राध्यापक यांना जळगाव येथील राजनंदिनी बहुउद्देशीय संस्थेतर्फे "राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार" जाहीर करण्यात आल्याचे संस्थेच्या अध्यक्षा संदीप वाघ यांनी कळविले आहे. प्राध्यापक ललवाणी यांनी अनेक सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक,अध्यात्मीक कार्यात सहभाग घेतला असून आपल्या 32 वर्षांच्या सेवेत त्यांनी अनेक विद्यार्थीनी उपयोगी उपक्रम पार पाडले आहेत.स्व.कपुरचंदजी कोटेचा व्याख्यानमाला, जैन संघटना ऊपक्रम,कर्मचारी पतपेढी हि त्यांच्या कार्याची मैलाची दगड ठरली आहेत.  लवकरच कोणत्याही शिक्षकाने आजतागायत न केलेलं कार्य म्हणजे आपल्या विद्यार्थिनींच्या कार्यावर पुस्तक लिहिण्याचं त्यांचा मानस असून हे पुस्तक लवकरच प्रकाशित होण्याच्या मार्गावर आहे. त्यांनी त्यांनी आपल्या आयुष्यात अनेक चढउतार पाहिले असून अनेक दुःखद प्रसंगांना सुद्धा ते सामोरे गेले आहेत . त्यांनी समाजाविषयी व शैक्षणिक विषयी आपली नाळ मात्र कधीच सोडली नाही. लवकरच ते स्वतःच्या गो शाळेला सुद्धा वाहून घेणार आहे. त्यांच्या अशा अनेक बहुविध कार्याचा सन्मान म्हणून संस्थेने त्यांची राज्यस्तरीय आदर्श शिक्षक म्हणून निवड केली आहे हा पुरस्कार त्यांना लवकरच मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येईल.