Thursday, October 31, 2024

हवामान विभागाचा मोठा अंदाज!13 जिल्ह्यात मुसळधार पाऊसाची शक्यता!



महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी हा काळ पुन्हा एकदा चिंतेचा ठरू शकतो. भारतीय हवामान विभागाने (IMD) नुकताच दिवाळीच्या काळात राज्यात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. विशेषतः १ नोव्हेंबरपर्यंत राज्यातील १३ जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता असल्याचा इशारा देण्यात आला आहे. या निमित्ताने शेतकरी बांधवांसमोर नवे आव्हान उभे राहिले आहे.

सध्या राज्यातील हवामान अत्यंत विचित्र स्वरूपाचे आहे. सकाळच्या वेळी गारवा जाणवत असून दुपारच्या वेळी मात्र कडक उन्हाचा तडाखा बसत आहे. सायंकाळी पुन्हा अनेक भागांत ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. या बदलत्या हवामानामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. विशेषतः रब्बी हंगामाच्या पेरणीच्या काळात हा पाऊस शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरू शकतो.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तीन प्रमुख विभागांतील जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे:

कोकण विभाग:

  • रायगड
  • रत्नागिरी
  • सिंधुदुर्ग

मध्य महाराष्ट्र:

  • पुणे
  • सातारा
  • सांगली
  • सोलापूर
  • कोल्हापूर
  • अहिल्यानगर

मराठवाडा:

  • लातूर
  • धाराशिव
  • बीड
  • नांदेड

या सर्व जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला असून, शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मागील काळातील नुकसान

यंदाच्या वर्षी मान्सूननंतरच्या काळात बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस झाला. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. आता पुन्हा एकदा पावसाचा इशारा दिला जात असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

रब्बी हंगामावरील परिणाम

सध्या राज्यात रब्बी हंगामातील पिकांच्या पेरणीला वेग आला आहे. अनेक भागांत गहू, हरभरा आणि मका यांसारख्या पिकांची पेरणी पूर्ण झाली आहे. मात्र काही ठिकाणी अजूनही पेरणी बाकी आहे. अशा परिस्थितीत दिवाळीच्या काळात पाऊस झाल्यास:

संभाव्य धोके:

  • पेरणी न झालेल्या क्षेत्रात पेरणी विलंबित होऊ शकते
  • नुकतीच पेरणी केलेल्या पिकांना धोका
  • मातीची धूप होण्याची शक्यता
  • रोगराईचा प्रादुर्भाव वाढू शकतो

संभाव्य फायदे:

  • कोरडवाहू क्षेत्रातील पिकांना लाभ
  • भूजल पातळीत वाढ
  • पुढील हंगामासाठी जमिनीत ओलावा

शेतकऱ्यांसाठी सूचना आणि उपाययोजना

हवामान विभागाच्या इशाऱ्यानंतर

कृषी विभागाने शेतकऱ्यांसाठी काही महत्त्वाच्या सूचना जारी केल्या आहेत:

  1. काढणीस तयार असलेल्या पिकांची त्वरित काढणी करावी
  2. काढलेल्या पिकांची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी
  3. शेतातील पाण्याचा निचरा होईल याची काळजी घ्यावी
  4. पेरणीचे नियोजन हवामान अंदाजानुसार करावे
  5. रासायनिक फवारणी टाळावी
  6. पिकांवर रोग व किडींचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी योग्य ती काळजी घ्यावी

तज्ज्ञांचे मत

कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, या पावसाचा परिणाम दुतर्फी असू शकतो. जरी कोरडवाहू भागातील शेतकऱ्यांना याचा फायदा होऊ शकतो, तरीही ज्या भागात पेरणी पूर्ण झाली आहे किंवा पिके काढणीस तयार आहेत, तेथील शेतकऱ्यांनी विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे.

शासनाची भूमिका

राज्य सरकारने संबंधित जिल्ह्यांतील यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. कृषी विभाग, महसूल विभाग आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाला सज्ज राहण्यास सांगण्यात आले आहे. तसेच, शेतकऱ्यांना वेळोवेळी हवामानाची माहिती मिळावी यासाठी विशेष यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे.

सणासुदीच्या काळात अपेक्षित असलेला हा पाऊस शेतकऱ्यांसमोर नवे आव्हान उभे करत आहे. मात्र योग्य नियोजन आणि काळजी घेतल्यास नुकसान टाळता येऊ शकते. शेतकऱ्यांनी हवामान विभागाच्या सूचनांचे काटेकोर पालन करणे आणि आपल्या पिकांची योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे. यासोबतच शासकीय यंत्रणांनीही सतर्क राहून आवश्यक ती मदत करणे अपेक्षित आहे.

लोकनेते सुंदरराव सोळंके सहकारी साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांवर ऐन दिवाळीत उपासमारीची वेळ.सहा महिन्यांचे वेतन थकले.


माजलगाव (प्रतिनिधी) तेलगाव येथील लोकनेते सुंदरराव सोळंके सहकारी साखर कारखान्यात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचे वेतन मागील सहा महिन्यांपासून थकले आहे. यामुळे ऐन दिवाळीत या कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.

तेलगाव येथे कै. सुंदरराव सोळंके यांनी ३२ वर्षांपूर्वी कारखान्याची उभारणी केली होती. मागील ३० वर्षे हा कारखाना सुरळीत चालला होता. अनेक वर्षे कधीही कर्मचाऱ्यांचे वेतन थकलले नव्हते. परंतु मागील दोन वर्षांपासून या कारखान्यातील कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर होत नसल्याच्या तक्रारी आहेत. मागील ६ ते ७ महिन्यांपासून येथील सर्व कर्मचाऱ्यांचे वेतन थकले आहे.

मागील तीन-चार महिन्यांत वेगवेगळे सणउत्सव असतानादेखील या कर्मचाऱ्यांना वेतन मिळू शकलेले नाही. सध्या दिवाळीचा सण सुरू असतानादेखील या कर्मचाऱ्यांना केवळ दोनच महिन्यांचे वेतन देण्यात आले. यामुळे सर्व कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर पसरला आहे. सहा महिन्यांपासूनची उसनवार, इतरांची देणी द्यायची कशी अन् सण साजरा करायचा कसा? असा सवाल कर्मचारी, कामगार करीत आहेत. तसेच मागील दहा महिन्यांपासून वर्तमानपत्रांच्या जाहिरातीची बिलेदेखील थकलेली आहेत.

एकीकडे मागील ३२ वर्षांत या कारखान्याने एकही हंगाम गाळपाविना बंद ठेवलेला नव्हता. याचा विक्रम असल्याचे सांगत कारखान्याचे चेअरमन, संचालक मंडळ, कर्मचारी ढोल बडवत असतात. या कारखान्याकडे साखर, इथेनॉल, बग्यास, वीज निर्मिती मोठ्या प्रमाणात होत असताना यातून मिळणारा पैसा जातो कुठे असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.

मुख्य कार्यकारी संचालकांचा हेकेखोरपणा?. 

काही महिन्यांपूर्वी या कारखान्यात रुजू झालेले मुख्य कार्यकारी संचालक हे येथील कर्मचारी, शेतकरी, सभासदांच्या समस्या, त्यांच्या प्रश्नांचे निरसन करत नसून त्यांचीच बॉसगिरी सहन करावी लागते, अशा तक्रारी ऐकावयास मिळतात. यामुळे कर्मचारीदेखील वैतागले असल्याचे बोलले जाऊ लागले आहे.

दोन महिन्यांचे वेतन केले.

या कारखान्याच्या कर्मचाऱ्यांचे वेतन देणे मागील सहा महिन्यांपासून थकले होते. परंतु दोन दिवसांपूर्वीच दोन महिन्यांचे वेतन कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहेत.- रवींद्र बडगुजर, मुख्य कार्यकारी संचालक, सोळंके सहकारी साखर कारखाना, तेलगाव.

शेतकऱ्याकडून दोन हजार रुपयांची लाच घेताना तळेगाव सज्जाच्या तलाठ्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई


बीड (प्रतिनिधी) शेतकऱ्याकडून दोन हजार रुपयांची लाच घेताना तळेगाव सज्जाच्या.तलाठ्याविरोधात बीडच्यालाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी कारवाई केली. यावेळी पैसे घेण्यापूर्वी तलाठी आपल्या खासगी कार्यालयाच्या बाहेर आला. आपल्याला पाहू नये, यासाठी एसीबीचे पथक चक्क काटेरी झुडपात लपले. एका अधिकाऱ्याने तर मनोरुग्ण असल्याचीही नक्कल केली. शेवटी सापळा यशस्वी करूनच हे पथक परतले.

मदन लिंबाजी वनवे (वय ४७) असे पकडलेल्या तलाठ्याचे नाव आहे. तो बीड तालुक्यातील तळेगाव सज्जा सांभाळतो. तो सज्जावर न थांबता बीडमधील खासगी कार्यालय थाटून काम करत होता. तक्रारदार यांना त्यांचे मित्राने मौजे तळेगाव येथील शेत गट क्रमांक १९२ मधील मालमत्ता क्रमांक ४३०९चे मुख्य पत्र करून दिले होते. सदर प्लॉटची ग्रामीण गुंठेवारी करण्यासाठी भोगवटादार प्रमाणपत्राची आवश्यकता असल्याने शेतकऱ्याने वनवे याच्याकडे धाव घेतली. त्यांची गरज पाहून वनवे याने तीन हजार रुपयांची लाच मागितली. याबाबत तक्रार येताच अवघ्या काही तासांत ‘एसीबी’ने सापळा लावला. तडजोडअंती दोन हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले. पंचासमक्ष हे पैसे घेताच पथकाने त्याला पकडले. त्याच्याविरोधात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. ही कारवाई पोलिस अधीक्षक संदीप आटोळे, अपर अधीक्षक मुकुंद आघाव, उपअधीक्षक शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक युनूस शेख, किरण बगाटे, पोलिस अंमलदार, भरत गारदे, हनुमंत गोरे, संतोष राठोड, अविनाश गवळी, गणेश मेहेत्रे आदींनी केली.

कारवाईआधी केली पडताळणीवनवे याची परिसरात दहशत आहे. राजकीय पुढाऱ्यांचा पाठबळ असल्याचे सांगत तो शेतकऱ्यांची अडवणूक करत होता. परंतु एका शेतकऱ्याने हिंमत करून तक्रार केली. पैसे घेऊन गेल्यावर त्याने शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यानंतर बाहेर येऊन कोणी आहे का, याची पडताळणी केली आणि मगच पैसे स्वीकारले. तोपर्यंत तक्रारदारासह पंचांनी इशारा देताच वेश बदलून फिरणाऱ्या आणि लपलेल्या पथकाने वनवेला त्याच्या बीडमधील खासगी कार्यालयातच पकडले.

दक्षता सप्ताहात पहिली कारवाईएसीबीकडून दक्षता आणि जनजागृती सप्ताह सोमवारपासून राबविला जात आहे. उपअधीक्षक शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रमही घेतले जाणार आहेत. याच सप्ताहात तक्रार आली आणि लगेच पथकाने सापळा रचून कारवाई केली.

लाचेच्या पैशांवर फटाके खरेदीवनवे याने सुरुवातीला २५ हजार मागितले. परंतु नंतर शेतकऱ्याची अवस्था पाहून तो २ हजार रुपयांवर येऊन ठेपला. याच पैशांवर तो फटाके खरेदी करणार होता. परंतु त्याआधीच एसीबीने त्याचे फटाके फोडले. यामुळे महसूल विभागात चांगलाच आवाज झाला.

सणासुदीच्या दिवसांमध्ये सासुरवाडीत राहणाऱ्या जावयाचा डोक्यात दगड घालून खून.


अंबाजोगाई (प्रतिनिधी) तालुक्यातील डोंगरपिंपळा येथे ३५ वर्षीय तरुणाचा डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. ऐन सणासुदीच्या दिवसांमध्ये ही घटना घडल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.

सचिन शिवाजी तिडके (वय ३५, रा. भोगलवाडी, हल्ली मुक्काम डोंगरपिंपळा, ता. अंबाजोगाई) येथील रहिवासी व डोंगरपिंपळा गावचे जावई आहेत. मागील एक वर्षापासून ते सासुरवाडी डोंगरपिंपळा येथे पत्नी व मुलांसोबत राहत होते. मंगळवारी रात्रीपासून सचिन तिडके हे बेपत्ता होते. बुधवारी दुपारी एक वाजता त्यांचा मृतदेह डोंगरपिंपळा शिवारात चेहऱ्यावर दगड मारून चेंदामेंदा केलेल्या अवस्थेत आढळून आला. घटनास्थळी दारूच्या बाटल्या आढळून आल्या आहेत. घटनेची माहिती मिळताच अंबाजोगाई ग्रामीण पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक घुगे व पोलिस कॉन्स्टेबल भागवत यांनी घटनास्थळी धाव घेत सचिन यांचा मृतदेह स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालय येथे शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. 

याबाबत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती. दरम्यान, सदरील खून हा सासुरवाडीतील लोकांनीच घडवून आणला असल्याचे सचिन यांच्या नातेवाइकांचे म्हणणे आहे. कारण, ते मृतदेहाजवळ गेले असता सासुरवाडीकडील लोकांनी मयताच्या नातेवाइकांना शिवीगाळ व अंगावर दगड घेऊन धावले असल्याचे सांगत आहेत. सचिन यांच्या पश्चात दोन मुले, पत्नी, आईवडील, भाऊ, भावजय असा परिवार आहे.

यंदा प्रकाशाचा उत्साह सण दोन दिवस देशभरात साजरा होतोय. अमावस्या तिथी दोन दिवस आल्यामुळे लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त कोणता याबद्दल जाणून घ्या.


(कांतीकारी साथी न्यूज) लक्ष्मी पूजेचे मुहूर्त - : प्रकाशाचा सण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. नरक चतुर्दशी झाल्यानंतर आश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्येला दिवाळी लक्ष्मीपूजन करण्यात येतं. यंदा पंचांगानुसार अमावस्या तिथी ही 31 ऑक्टोबर रोजी दुपारी 3 वाजून 12 मिनिटापासून 1 नोव्हेंबरला संध्याकाळी 5 वाजून 53 मिनिटापर्यंत असणार आहे. अशात स्थितीत लक्ष्मीपूजन करण्याबद्दल दोन प्रवाह आहे. काही धर्मशास्त्र तज्ज्ञ सांगतात 31 ऑक्टोबरला संध्याकाळी तुम्ही लक्ष्मी पूजन करायला हवं. तर काही जण अभ्यासक 1 नो

महाराष्ट्रात मराठी पंचांगानुसार 1 नोव्हेंबरला लक्ष्मीपूजन करण्यात येणाराय. तर मुंबईत 31 ऑक्टोबर आणि 1 नोव्हेंबरला लक्ष्मीपूजन होणार आहे. तुम्ही कोणत्याही लक्ष्मीपूजन करणार असाल तरी पूजनाचा शुभ मुहूर्त जाणून घ्या. 

1 नोव्हेंबरसाठी लक्ष्मीपूजन शुभ मुहूर्त  

1  नोव्हेंबरला प्रदोष काळ आणि अमावस्या तिथीही असेल. म्हणजेच 01 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 05:36 ते 06:16 पर्यंत लक्ष्मी पूजनासाठी फक्त 40 मिनिटांचा शुभ मुहूर्त असेल. 

दिवाळीतील प्रदोष कालचा सर्वोत्तम योग

प्रदोष काळातील खूप चांगला योगही गुरुवारी पाहायला मिळत आहे. दिवाळीच्या दिवशी प्रदोष काल, निशीथ काल आणि महानिषित काल यांचा शुभ संयोग आहे. धार्मिक शास्त्रानुसार दिवाळीच्या पूजेमध्ये प्रदोष कालावधी खूप महत्त्वाचा आहे. प्रदोष काळ हा घरगुती आणि व्यावसायिक कामांसाठी महत्त्वाचा आहे. 

लक्ष्मी पूजनासाठी शुभ मुहूर्त अमावस्या काळात -  संध्याकाळी 5:36 ते 6:15 पर्यंत

प्रदोष काळात लक्ष्मी पूजनासाठी शुभ मुहूर्त - संध्याकाळी 5:35 ते रात्री 08.06 पर्यंत 

दिवाळीच्या दिवशी असं करा दीपदान 


पहिले पाच दिवे प्रज्वलित केले जातील. यातील एक दिवा स्वयंपाकघरात, एक वॉशरूममध्ये, एक घराच्या उंबरठ्यावर आणि दोन दिवे पूजेच्या ठिकाणी असतील. हे असतील तेलाचे दिवे
यानंतर 11 दिवे प्रज्वलित केले जातील ज्यामुळे घर आणि पूजेचे स्थळ उजळून निघेल.
दोन दिवे अखंड असतील. यामध्ये मोहरीच्या तेलाचा दिवा आणि तुपाचा एक दिवा असेल. मोहरीचा दिवा डाव्या हाताला असेल. 


लक्ष्मीपूजन साहित्य (Lakshmi Pujan Sahitya) 

लक्ष्मीपूजनकरिता काय साहित्य लागतं याविषयी आपण जाणून घेऊयात 

लक्ष्मी मातेचा फोटो किंवा मूर्ती
गणपती बाप्पाचा फोटो किंवा मूर्ती
कुबेराचा फोटो किंवा मूर्ती
नाणी किंवा नोटा
दागिने किंवा चांदीची नाणी
एक कोरीवही घ्यावी त्यावर कुंकवाने ओम काढावा किंवा स्वस्तिक काढावा. 
चौरंग किंवा पाठ 
लाल रंगाचे कापड 
पाणी
तांदूळ 
गंध 
पंचामृत
हळद, कुंकू 
अक्षदा 
फुले 
विड्याची पाच पाने 
झाडू
लाह्या बताशे

लक्ष्मीपूजन विधी 

लक्ष्मीपूजन विधी करण्याकरिता सर्वप्रथम देवघरामध्ये एक चौरंग ठेवावा त्यावर लाल कापड अंथरून घ्यावा. त्यावर उजव्या बाजूला कळस मांडावा त्या कळसांमध्ये पाच विड्याची पाने टाकावी, एक रुपयाची नाणी टाकावे आणि कळसाच्या वर नारळ ठेवावा त्या नारळाची शेंडी वर असली पाहिजे. आपण जो चौरंग घेतला आहे, त्या चौरंग वर मध्यभागी तांदुळाची रास करावी.  त्यावर गणपती, कुबेर, लक्ष्मी यांची मूर्ती किंवा फोटो ठेवावा. जर तुमच्याकडे काहीच नसेल तर सुपारी ठेऊ शकतात. त्यानंतर चौरंगावर जागा शिल्लक असेल त्या जागेमध्ये हिशोबाची वही आणि पेन ठेवावी तसंच पैसे नाणी ठेवावे. त्यानंतर चौरंगाची हळद कुंकू लावून पूजा करून घ्यावी. फराळ आणि लाह्या बताशे यांचा नैवेद्य दाखवावा. झाडूला लक्ष्मी मानतात म्हणून नवीन झाडूची पूजा केली जाते. 

सत्ताधारी महायुतीला फटका बसणार मराठा,मुस्लिम आणि दलित एकत्र.जरांगे पाटलांची नवी खेळी.

अंतरवली सराटी (प्रतिनिधी) महाराष्ट्राच्या राजकारणात गुरुवारी मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मोठी घोषणा केली. राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीत मराठा, मुस्लिम आणि दलितांचे कॉम्बीनेशन होणार आणि सत्ता परिवर्तन निश्चित घडणार अशी माहिती जरांगे पाटील यांनी दिली.
मुस्लिम समाजाचे प्रमुख मोलाना नोमानी आणि आनंदराज आंबेडकर यांनी अंतरवली सरटी येथे जाऊन पाटील यांच्यासोबत बैठक घेतली. या नंतर पत्रकार परिषदेत बोलताना जरांगे पाटील यांनी राज्याच्या राजकारणात नव्या समीकरणाची घोषणा केली.
यावेळी बोलताना जरांगे म्हणाले कि, राज्यात मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सत्ताधारी गंभीर नाहीत. आरक्षणाच्या मुद्द्यावर आम्ही अनेक आंदोलने केली. मात्र सरकारला घाम फुटला नाही.
येणाऱ्या निवडणुकीत मराठा,मुस्लिम आणि दलित हे तिघे मिळून सत्ताधाऱ्यांना खाली खेचतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी नोमानी यांनी आपण जरांगे पाटलांसोबत आहोतअशी माहिती दिली.
जरांगे पाटील यांनी राज्यात हा नवा प्रयोग केल्याने याचा सत्ताधारी महायुतीला फटका बसणार अशी चिन्हे आहेत.

Sunday, October 27, 2024

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा उमेदवार. परळीत देशमुख तर माजलगाव मध्ये जगताप!


मुंबई (प्रतिनिधी) राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने बीड जिल्ह्यातील परळी मधून धनंजय मुंडे यांच्या विरोधात काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांना तर माजलगाव मधून माजी आ बाजीराव जगताप यांचे सुपुत्र मोहन जगताप यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दरम्यान उमेदवारी मिळण्याच्या आशेवर पक्षात प्रवेश करणारे रमेश आडसकर यांना उमेदवारी ना मिळाल्याने आश्चर्य व्यक्त होतं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आज तिसरी यादी जाहीर केली. शरद पवार गटाकडून परळीच्या जागेबाबत सस्पेन्स होता मात्र रविवारी जाहीर झालेल्या यादीमध्ये काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. दरम्यान माजलगाव मधून रमेश अडसकर यांना उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा होती. परंतु पवार गटाने धक्कादायक निर्णय घेताना मोहन जगताप यांच्या नावाला पसंती दिली आहे.