Monday, October 21, 2024

सिग्नलमध्ये बिघाड करून रेल्वे थांबविली प्रवाशांना लुटण्याचा प्रयत्न. चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी.

गंगाखेड (प्रतिनिधी) : रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांना लुटण्यासाठी ग्रामीण भागातील वडगाव रेल्वे स्थानकावरील सिग्नलमध्ये बिघाड करून काकीनाडा ते शिर्डी रेल्वे पुन्हा वडगाव स्टेशनवर थांबविल्याची घटना शनिवार रोजीच्या मध्यरात्री म्हणजेच रविवार रोजीच्या पहाटे घडली आहे. या घटनेत प्रवाशांचे साहित्य चोरीस गेल्याची माहिती अद्याप पर्यंत मिळाली नसली तरी ही आधुनिक पद्धतीचा वापर करणाऱ्या चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी रेल्वेच्या प्रवासी वर्गातून होत आहे.
रेल्वे प्रवाशांजवळील रोख रकमेसह दागिने, मोबाईल सारख्या मौल्यवान वस्तू लुटण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून चोरट्यांनी आधुनिक पद्धतीचा वापर करून ग्रामीण भागातील रेल्वे स्थानकाजवळील सिग्नलमध्ये बिघाड करून आड जंगलात  रेल्वे थांबवून लुटायची नवीन युक्ती आखत प्रवाशांना लुबाडल्याच्या घटना या पूर्वी वडगाव स्टेशनं ते गंगाखेड दरम्यान व गंगाखेड ते पोखर्णी रेल्वे स्थानका दरम्यान घडल्या आहेत. काकीनाडा येथून शिर्डीकडे जाणारी रेल्वे क्रमांक १७२०६ ही रेल्वे पुढील प्रवासाठी शनिवार रोजी मध्यरात्री परळी येथून निघाली असता अज्ञात चोरट्यांनी वडगाव रेल्वे स्थानकात प्रवेश करण्यासाठी असलेल्या सिग्नलमध्ये तांत्रिक बिघाड करून रविवार २० ऑक्टोबर रोजीच्या अंदाजे १:३० वाजेच्या सुमारास औटर सिग्नलवर आड जंगलात रेल्वे थांबवून प्रवाशांना लूबाडण्याचा प्रयत्न केला.
रेल्वेमध्ये असलेल्या  रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांमुळे मोठी अनुचित घटना घडली नसली तरी मात्र काही प्रवाशांच्या साहित्याची चोरी झाल्याची प्राथमिक माहिती असून सिग्नलमध्ये दुरुस्ती केल्यानंतर रेल्वे पुढे रवाना झाली आहे. सुमारे ४५ मिनिटांपेक्षा अधिक वेळ ही रेल्वे आड जंगलातच थांबून होती. घटनेची माहिती समजताच रेल्वेचे लोहमार्ग उपविभागीय पोलीस अधिकारी लोहकरे व लोहामार्ग स्था. गु. शा. चे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत गंभीरराव आदींनी घटनास्थळी भेट देऊन सुरक्षे संबंधी आवश्यक त्या सूचना दिल्या. यावेळी लोहमार्ग परळी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघमोडे, पोलीस उपनिरीक्षक कांबळे, अंमलदार संजय भेंडेकर, अनंत कांबळे, कोंडीराम सातपुते आदी पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment