Thursday, May 29, 2025
महाराष्ट्र राज्याच्या महिला आयोगावर अध्यक्षपदी मा.निवृत्त महिला.IAS,IPS, महिलांनची नियुक्ती करावी.- डॉ.राजेश सोनुने.
वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाच्या नगरीत संतांची पावले रोखणाऱ्या काम तत्काळ थांबवा - अभयकुमार (पप्पू) ठक्कर यांचा इशारा.
अंबाजोगाई बसस्थानकात भीषण अपघात बसखाली चिरडून तरुणाचा मृत्यू.
अंबाजोगाई (प्रतिनिधी) आज गुरुवार, दिनांक २९ मे रोजी सकाळच्या सुमारास अंबाजोगाई बस स्थानकाच्या प्रवेशद्वारावर एक दुर्दैवी अपघात घडला. एमएच १४ एमएच १७०१ या क्रमांकाच्या एस.टी. बसच्या खाली येऊन एक तरुण चिरडला गेला. या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला.
मयत तरुणाचे नाव अंकुश मोरे (रा. धानोरा बु., ता. अंबाजोगाई) असे आहे. स्थानकाच्या पश्चिम प्रवेशद्वाराने आतमध्ये प्रवेश करत असताना सदरील बसने अंकुश यांस चिरडले. अपघातानंतर त्यांना गंभीर अवस्थेत स्वाराती रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणी पुढील तपास अंबाजोगाई पोलीस करत आहेत.
वाढदिवसाच्या निमित्ताने हलिमा शेख यांच्या कार्याचा आढावा. समाजकार्य लोकशाही टिकवणे हेच ध्येय- हलिमा शेख
संस्थाचालक आणी बोगस शिक्षकांची चौकशी सुरू. बीड जिल्ह्यातील संस्था चालक अडकणार?
बीड (प्रतिनिधी) बोगस शिक्षक भरती घोटाळ्यात उपसंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांपासून ते शिक्षण मंडळाच्या अध्यक्षाना अटक झाल्यानंतर आता संस्थाचालकांकडे एस आय टी ने मोर्चा वळवला आहे. ज्या ज्या संस्थेत बोगस भरती झाली त्यांची यादी तयार करण्यात आली आहे. या संस्थाचालकांना चौकशीसाठी बोलावण्यात येणार असून ज्यांना ज्यांना नोकरी मिळाली ते शिक्षक आणि कर्मचारी देखील चौकशीच्या फेऱ्यात अडकणार आहेत.
अनेक संस्थाचालकांविरोधात विशेष तपास पथकाकडे(एसआयटी) तक्रारी आल्या असून त्यांचाही तपास केला जाणार आहे.या घोटाळ्यात १०५६ नियुक्त शिक्षकांची यादी जाहीर करण्यात आली. २०१९ ते २०२५ पर्यंत गैरमार्गाने ‘शालार्थ आयडी’ तयार करून शासनाचे कोट्यवधी रुपये लाटण्यात आले. शिक्षण संस्था चालक, शिक्षण उपसंचालक आणि वेतन अधीक्षकांच्या संगनमताने लाखो रुपयांचा आर्थिक व्यवहार करून हा सर्व घोटाळा झाला.
दरम्यान मराठवाड्यात देखील मोठ्या प्रमाणात बोगस शिक्षक भरती झाल्याच्या तक्रारी आहेत. बीडच्या शिंदे आणि फुलारी या शिक्षणाधिकारी यांची चौकशी उपसंचालक यांच्यामार्फत सुरु झाली आहे. त्याचसोबत संस्थाचालक यांची देखील लवकरच चौकशी होणार आहे. या घोटाळ्यात अडकलेल्या उपसंचालक यांच्यापासून ते संस्थाचालक यांच्यापर्यंत सगळ्यांना चौकशीला सामोरे जावे लागणार आहे.
संस्थाचालकांनीही यात आर्थिक गैरप्रकार केला. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई कधी होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात होता. अनेक शिक्षक आणि त्यांच्या नातेवाईकांनी संस्थाचालकांविरोधात ‘एसआयटी’कडे तक्रारी केल्या आहेत. त्यानुसार, आता संस्थाचालकांवर कारवाईचे संकेत मिळत आहेत.
अनेक शाळांमध्ये संस्थांचालकांचे नातेवाईक नोकरीला आहेत. तसेच, वरिष्ठ शिक्षकांना खालच्या पदावर ठेवून नातेवाईकांना पदोन्नती दिली गेली आहे. हा अधिकार संस्थाचालकांना असतो. याचा गैरफायदा घेण्यात आल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे, काही शिक्षकांचा पैशांसाठी छळ सुरू असून त्यांचे वेतन रोखण्यात आल्याच्याही तक्रारी आहेत.
शालार्थ आयडी घोटाळ्याचा ‘एसआयटी’कडून कसून तपास सुरू असून अटकेत असलेले चिंतामण वंजारी, वैशाली जामदार, आणि लक्ष्मण मंघाम यांची कारगृहात रवानगी करण्यात आली.
Wednesday, May 28, 2025
महात्मा ज्योतीबा फुले शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार स.पतसंस्थाच्या संचालकपदी रवि मगर पाटील यांची बिनविरोध निवड.
Monday, May 26, 2025
दहावी बोर्ड परिक्षेत घवघवीत यश संपादन.कु.भक्ती कैलास रिकीबे हिचा सत्कार
बातमी का छापली म्हणत पत्रकारांना धमकी देणाऱ्या आ.बाबुराव कदमांवर गुन्हा दाखल करा –जिल्हाध्यक्ष अशोक होळकर
पाचशेच्या बनावट नोटा चलनात आणण्या चा प्रयत्न करणाऱ्या दोघांविरुध्द कारवाई.
बालाप्रसाद बाहेती रा.गेवराई (लाड गल्ली)नासेर शेख रा.बोधेगाव जि.अहिल्यानगर अशी आरोपीची नावे आहेत.बालाप्रसाद बाहेती याने चलनातील दहा रुपयांच्या ख-या नोटा देत नासेर शेख याच्याकडून विस हजार रुपयांच्या पाचशे रुपयांच्या बनावट नोटा घेतल्या. त्या नोटा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी चलनात वापरत असल्याचा प्रकार काल धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील गेवराई बायपास रस्त्यावर असलेल्या एका पेट्रोल पंपावर उघडकीस आला. पोलीस हवालदार राजु भिसे यांच्या तक्रारीवरून आरोपी बालाप्रसाद बाहेती व नासेर शेख याच्याविरुद्ध गेवराई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास एपीआय दिपक लंके हे करित आहेत.
Sunday, May 25, 2025
तात्पुरता मातीच्या भरावाचा केलेलाूपुल रविवारी दुपारी दुरूस्त केला अन् सायं काळी पुन्हा वाहून गेला!वाहनधारकांची मोठी अडचण.
आष्टी (प्रतिनिधी) - बीड-अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावरील साबलखेड चिंचपुर या १७ किलोमीटर अंतराचे रखडलेले काम मागील अनेक महिन्यांपासून संथ गतीने सुरू आहे. शेरी बुद्रुक येथील नदीवरील पुलाचे काम सुरू असल्याने तात्पुरता मातीच्या भरावाचा केलेलाूपुल शनिवारी दुपारी वाहून गेला. दुरूस्ती करून २२ तासानंतर पुन्हा दुरूस्त करून वाहतूक सुरळीत केली, पण सायंकाळी नदीला आलेल्या पाण्याने पूल पुन्हा वाहून गेल्याने वाहनधारकांची मोठी अडचण निर्माण झाली आहे.
आष्टी तालुक्यातील साबलखेड ते चिंचपुर हा १७ किलोमीटर अंतराचा रस्ता रखडल्याने काही महिन्यांपुर्वी राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून या रस्त्याचे काम सुरू झाले.पण हे काम अंत्यत संथ गतीने सुरू असल्याने शेरी बुद्रुक नदीवर नवीन पुल उभारण्याचे काम सुरू असल्याने याठिकाणी नळकांडी वापरून तात्पुरता मातीचा भराव टाकून वाहनाची पर्यायी व्यवस्था केली होती.
शनिवारी झालेल्या पावसाने दुपारी हा पुल खचल्याने वाहतूक वळविण्यात आली.राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून रविवारी दुपारी परत पुलाची दुरूस्ती करून दुपारी वाहतूकीसाठी खुला केला.पण सायंकाळी नदीला आलेल्या पाण्याने पुन्हा पूल वाहून गेल्याने वाहन धारकांची मोठी अडचण निर्माण झाल्याने पुन्हा पहिल्या मार्गावरून वाहतूक वळविण्यात आली. एखाद्याचा जीव गेल्यावर राष्ट्रीय महामार्ग विभाग योग्य व्यवस्था करेल का? असा सवाल शिवक्रांती सेनेचे युवक प्रदेश अध्यक्ष दिपक सोनवणे यानी उपस्थित केला आहे.
राज्यात दररोज ३२ विवाहितचा होतोय छळ, ग्रामीणपेक्षा शहरात अधिक घटना.
बीड (कांतीकारी साथी) सासरच्या छळास कंटाळून पुण्यातील वैष्णवी हगवणे या विवाहितेने आत्महत्या केली. सासरच्या लोकांना राजकीय पार्श्वभूमी असल्याने या प्रकरणाची राज्यभरात चर्चा होत आहे, परंतु याच वैष्णवीप्रमाणे दररोज ३२ महिलांचा पती आणि सासरच्या लोकांकडून छळ होत आहे. १ जानेवारी २०२२ ते २२ मे २०२५ या १,२३७ दिवसांत राज्यात तब्बल ३९ हजार ६६५ गुन्हे पोलिस दप्तरी नोंद झाले आहेत. चार भिंतीच्या आत विवाहितांचा दम कोंडत असल्यानेच त्या आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत असल्याचे अनेक घटनांवरून समोर आले आहे.
मुंबई, पुणे शहरांत जास्त छळ
विवाहितांचा मुंबई, पुणे या मोठ्या शहरांमध्येच जास्त छळ होत असल्याचे समाेर आले आहे. हा छळ असाह्य होताच, त्यांनी पोलिस ठाणे गाठत सासरच्यांविरोधात तक्रार दिली.
सर्वाधिक गुन्हे कोठे दाखल
मोठ्या शहरांमध्येच विवाहितांचा छळ अधिक होत आहे. यात बृहन्मुंबईत सर्वाधिक ४१२, अहिल्यानगर जिल्ह्यात १९६, बीड २४३, छत्रपती संभाजीनगर २८८, धुळे १८१, जालना १८०, नागपूर १२१, नांदेड १७५, नाशिक २३७, पुणे २२९ या ठिकाणी जास्त गुन्हे दाखल आहेत. ही आकडेवारी १ जानेवारी ते २२ मे २०२५ या दरम्यानची आहे.
कोणत्या कारणांसाठी छळ
घर, प्लॉट, व्यवसाय, वाहन, कर्ज फेडण्यासाठी माहेरहून पैसे घेऊन ये, अशा विविध कारणांसाठी विवाहितांचा चार भिंतीत सासरच्या लोकांकडून छळ केला जात आहे. काही घटनांमध्ये तर हुंडा कमी दिला होता, तो आता घेऊन ये, असे म्हणत छळ केला जात आहे.
आधी लव्ह, आता हेट
आकर्षणातून तरुण, तरुणी प्रेमात पडतात. त्यानंतर, कुटुंबाला विश्वासात न घेता प्रेमविवाह करतात, परंतु काही दिवसांतच त्यांचे बिनसते. किरकोळ कारणांवरून खटके उडतात. यातून विवाहिता पोलिस ठाणे गाठत तक्रार देते. असे गुन्हेही अनेक ठाण्यात दाखल आहेत. आगोदर लव्ह आणि आता हेट, अशी अवस्था त्यांची झाली आहे.
भरोसा सेलही कमी पडतो
काही विवाहिता सासरच्यांनी छळ केल्यानंतर भरोसा सेलकडे धाव घेतात. येथे त्यांना वारंवार बोलावून घेत समुपदेशन केले जाते. काही प्रकरणांत तडजोड होते, परंतु काहींत सासरचे लोक नांदविण्यास नकार देतात. अशा वेळी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होतो. भरोसा सेलही त्यांच्यापुढे हात जोडतो.
११ महिन्यांत ३,३४३ गुन्हे
१ जूलै २०२४ पासून ते आतापर्यंत अनेक महिलांचा छळ झाला आहे. यातील काहींच्या हाताची तर मेहंदी निघण्याआधीच त्यांचा छळ सुरू झाला होता. मागील ११ महिन्यांत छळाचे ३,३४३ गुन्हे राज्यात नोंद आहेत.
अशी आहे आकडेवारीवर्षे - गुन्हे
२०२२ -११,९८२२०२३ - ११,७७०२०२४ - ११,१७७२२ मे २०२५ - ४,७३६
Saturday, May 24, 2025
अत्यंत दुर्दैवी काळरात्र ! सर्पदंशाने दोन सख्या भावंडांचा झोपेतच मृत्यू, कोयाळ गावावर शोककळा.
धारूर (प्रतिनिधी) : धारूर तालुक्यातील कोयाळ गावात २४ मे रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडलेल्या एका दुर्दैवी घटनेने संपूर्ण गावाला हादरवून सोडले आहे. मुंडे कुटुंबातील दोन निष्पाप चिमुकल्यांचा सर्पदंशामुळे मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली.
प्रदीप मधुकर मुंडे यांची सात वर्षांची मुलगी कोमल आणि पाच वर्षांचा मुलगा शिवम हे रात्री झोपेत असताना त्यांच्या अंगावर साप आला. सर्पदंश झाल्यानंतर दोघांची प्रकृती झपाट्याने खालावली. तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच दोघांचाही मृत्यू झाला.
या घटनेमुळे संपूर्ण कोयाळ गावावर शोककळा पसरली आहे. मुंडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावकऱ्यांच्या डोळ्यांत अश्रू तरळले आहेत. सर्पदंशामुळे एका कुटुंबातील दोन निष्पाप जीवांचा गेलेला बळी सर्वत्र हळहळ निर्माण करणारा आहे.
Friday, May 23, 2025
दीर्घकाळ एकाच तालुक्यात कार्यरत ११ तलाठ्यांना आष्टी तालुक्यातून बदला.आष्टी तहसीलदारांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र.
आष्टी (प्रतिनिधी) : आष्टी तालुक्यात काही तलाठी हे १४ वर्षांपासून एकाच तालुक्यात कार्यरत आहेत, तसेच काही कर्मचारी याच तालुक्यातील रहिवासी आहेत. यामुळे काम करताना तक्रारी वाढत आहेत. वारंवार त्यांची सज्जा बदलण्याकरिता नागरिक, तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी यांचा दबाव वाढत आहे. त्यामुळे ६ वर्षांपेक्षा अधिक सेवा झालेल्या तलाठ्यांची तालुक्याबाहेर बदली करावी, असे पत्र तहसीलदार वैशाली पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. यावरून ११ तलाठ्यांच्या बदल्या होणार आहेत. यामुळे ठाण मांडलेल्या तलाठ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
तलाठ्यांसह काही कर्मचारी हे दीर्घकाळ एकाच तालुक्यात कार्यरत आहेत, तसेच ते स्थानिक आहेत. यामुळे त्यांच्या कामावर विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे तालुक्यातील एकूणच कामावर परिणाम होत आहे. या कर्मचाऱ्यांना वारंवार नोटीस देण्यात आलेली आहे. तरीही त्यांच्या कामामध्ये कोणतीच सुधारणा होत नाही, तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घोषित होण्याची शक्यता नाकारता येत नाही, यामध्ये स्थानिक कर्मचारी काम करत असल्याने तक्रारी मोठ्या प्रमाणात येण्याची शक्यता आहे. नवीन भरतीमध्ये आलेला तलाठी वर्ग हा त्यांचेच अनुकरण करत आहे. या सर्व परिस्थितीचा विचार करता ६ वर्षे सेवा पूर्ण झालेल्या तलाठ्यांची तालुक्याच्या बाहेर बदली करावी, असे पत्र आष्टीच्या तहसीलदार पाटील यांनी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांना पाठविले आहे.
यापूर्वी बदल्या का नाहीत?
वैशाली पाटील यांच्या पत्राने महसूलमधील बदल्यांचा सावळागोंधळ लक्षात आला आहे. स्वग्राण आणि नियमानुसार ६ वर्षांत बदली होणे अपेक्षित असतानाही यापूर्वीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी बदली का केली नाही? असा प्रश्न आहे. यावरून तलाठ्यांनी राजकीय वशिला लावून आपल्या बदल्या थांबविल्याचा संशय आहे. त्यांना कोणत्या राजकीय नेत्यांचे अभय आहे, असा प्रश्नही उपस्थित होत आहे.
तलाठी - कार्यकाळ.
एस.एम. केमधरणे - १४ वर्षे ८ महिने.एस.एम. दगडखैर - १० वर्षे ११ महिने नंदा शिंदे - ९ वर्षे ७ महिने जी.के.गावडे - ९ वर्षे ७ महिने,छाया मेश्राम - ८ वर्षे ५ महिने जगदीश राऊत - ७ वर्षे ४ महिने आय. एच. शेंदूरकर - ७ वर्षे ६ महिने प्रवीण बोरुडे - ६ वर्षे १० महिने डी.यू. अनारसे - ९ वर्षेबी.एस. कवळे - ९ वर्षे ६ महिने,बाळू बनगे - १२ वर्षे
बीड पोलिस अधीक्षकांचा आदेश . प्रशासकीय कार्यासह इतर निकष वापरून जिल्ह्यातील ६०६ पोलिसांच्या बदल्या एलसीबीतून १५ काढले.
बीड (प्रतिनिधी) पोलिसांच्या बदल्या म्हटले की, राजकीय लोकांचा हस्तक्षेप आलाच. बीडमध्ये तर हे नित्याचेच झाले होते; परंतु यावेळी पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांनी वशिलेबाजीवाल्यांना थेट दूरचा रस्ता दाखविला आहे. प्रशासकीयसह इतर निकष वापरून जिल्ह्यातील ६०६ कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. वर्षानुवर्षे एलसीबीत ठाण मांडलेल्याही १५ कर्मचाऱ्यांचाही यात समावेश आहे. आता विनंती बदल्यांची प्रक्रिया सुरू असून पुढील आठवड्यात चालक अंमलदार व अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार आहेत.
मार्च महिन्यात बदलीस पात्र कर्मचाऱ्यांचे अर्ज मागविण्यात आले होते. त्याप्रमाणे मागील आठवड्यापासून बदल्यांची प्रक्रिया राबविण्यात आली. सर्व निकष वापरून जिल्ह्यातील ६०६ पोलिस कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश गुरुवारी पहाटे काढण्यात आले. यात वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी, तालुक्यात ठाण मांडलेल्या कर्मचाऱ्यांची उचलबांगडी करण्यात आली. यावेळी कोणताही राजकीय दबाव किंवा वशिला लावणाऱ्यांचा विचार न करता अधीक्षकांनी ही प्रक्रिया राबविली. पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात बदल्या करून नवा विक्रमही केला आहे. सर्व बदल्या पारदर्शक झाल्याचा दावा पोलिसांकडून केला जात आहे.
बदल्यांसाठी कोणते निकष?
स्वग्राम, एकाच ठिकाणी पाच वर्षे, एकाच उपविभागात १२ वर्षे नोकरी केलेल्यांच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत.
पदानुसार झालेल्या बदल्या.
सहायक फौजदार - १४२हवालदार - २५४पोलिस नाईक/शिपाई - २१०
साहेब, आमची बदली थांबवा.
गुरुवारी सकाळी बदल्यांचे आदेश निघताच दुपारच्या सुमारास काही कर्मचाऱ्यांनी पोलिस अधीक्षकांची भेट घेण्यासाठी रांगा लावल्या. आम्हाला बीडमध्येच द्या, बदलीचे ठिकाण सोयीचे नाही, स्वत: किंवा नातेवाईक आजारी आहेत, आम्हाला ये-जा करण्याची सोय नाही, मुलगा/मुलगीच आजारी असते, अशी विविध कारणे सांगून बदली थांबविण्यासाठी अनेक कर्मचारी आले होते. यात काही महिलांचाही समावेश होता; परंतु त्यांना अधीक्षकांनी भेट नाकारल्याची माहिती आहे. आधी बदलीच्या ठिकाणी रुजू व्हा आणि मग अर्ज करा. त्यावर विचार केला जाईल, असे म्हणाल्याचे सूत्रांनी सांगितले.
एलसीबीतील १५ जण बदलले.
स्थानिक गुन्हे शाखा ही विशेष शाखा आहे. येथे येण्यासाठी आतापर्यंत अनेकांनी वशिले लावले होते. त्यानुसार त्यांना यापूर्वी पोस्टिंगही मिळाली होती. काही जण परळीहून थेट एलसीबीत बसले होते. यात शाखा प्रमुखांचाही समावेश होता. आ. सुरेश धस यांनी यावर आरोपही केले होते. आता याच शाखेतील १५ कर्मचाऱ्यांना बदलले आहे. अद्याप त्यांच्या ठिकाणी नवीन कोणीही दिलेले नाही.
२०० जणांचा विनंती अर्ज.
प्रशासकीय बदल्यानंतर आता विनंती बदल्यांची प्रक्रिया सुरू झाली आहे. यात जवळपास २०० कर्मचाऱ्यांनी अर्ज केले आहेत. त्यांना विशेष शाखांसह सोयीचे पोलिस ठाणे दिले जाणार आहे. ही प्रक्रिया गुरुवारी सुरू होती.
शाखांना कर्मचारी देणे बाकी.
एलसीबी, सायबर पोलिस ठाण्यांसह इतर शाखांमधील कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत; परंतु त्यांच्या ठिकाणी अद्याप नवे कर्मचारी दिले नाहीत. विनंती बदल्यांमधील लोकांना या ठिकाणी नियुक्ती मिळू शकते. एलसीबीसाठी आगोदर केलेल्या कामाचे मूल्यांकन तपासले जाणार आहे.
चालकांच्याही होणार बदल्या.
चालक अंमलदार यांच्याही बदल्या होणार आहेत. ही प्रक्रिया पुढील आठवड्यात राबविली जाणार आहे.
ठाणेदारांची होणार उचलबांगडी.
जिल्ह्यातील काही ठाणेदार वादग्रस्त ठरले होते. त्यांच्यासह इतर अधिकाऱ्यांच्याही बदल्या केल्या जाणार आहेत. एकदा बाहेरचे अधिकारी बदलून आले की सर्वांची सांगड घालून बदल्या केल्या जाणार आहेत. यात काही ठाणेदार बदलले जाणार असून आतापर्यंत विशेष शाखा किंवा बाजूला बसलेल्या अधिकाऱ्यांना संधी दिली जाणार आहे. ही प्रक्रियाही पुढील आठवड्यात होणार आहे.
घराचा दरवाजा तोडून घरात घुसून धारदार शस्त्राच्या धाक दाखवून लाखोंचे दागिने व रोकड लुटली.
केज (प्रतिनिधी) तालुक्यातील माळेगाव येथील नवीन प्लॉटवरील वसाहतीत राहणाऱ्या आण्णा कोंडीबा चाळक यांच्या घराचे दार गुरुवारी पहाटे 3 वाजण्याच्या दरम्यान तोडून तोंडाला कपडा बांधलेल्या चौघांनी घरात प्रवेश केला. चोरट्यांनी पती, पत्नीला चाकूचा धाक दाखवून नगदी रोख 74 हजारासह एकूण 4 लाख 44 हजार रुपयांचे दागिने व ऐवज लुटला.
केज तालुक्यातील माळेगाव येथील प्लॉटवरील नवीन वसाहतीतराहणारे आण्णा कोंडीराम चाळक हे शेतकरी आपल्या घरात कुटुंबियांसह झोपले होते. गुरुवारी पहाटे तीन वाजण्याच्या दरम्यान घराचे दार तोडून 25 ते 30 वयोगटातील चार अनोळखी तरुण तोंडाला रुमाल बांधून घरामध्ये घुसले. धारदार शस्त्राचा आण्णा चाळक व त्यांच्या पत्नीला धाक दाखवून कपाटात ठेवलेले एक तोळ्याचे झुंबर जोड, 7 ग्रॅमचा नेकलेस, 7 ग्रॅमचे मिनी गंठण, 5 ग्रॅमची सोन्याची ठुशी, 4 ग्रॅमचे मनी, मंगळसूत्र, 5 ग्रॅमची अंगठी आशा दागिन्यासह,नगदी रोख 74 हजार रुपये मिळून एकूण 4 लाख 44 हजार रुपयाचा ऐवज चोरट्यानी लंपास केला. या प्रकरणी अण्णा कोंडीराम चाळक यांच्या फिर्यादी वरून युसूफवाडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मच्छिन्द्रनाथ शेंडगे करीत आहेत.
या प्रकरणी पावसाळी वातावरण असल्यामुळे श्वान पथका ऐवजी ठसे तज्ञाचे पथक पाचरण करण्यात आले होते. दरम्यान, माळेगाव येथील कपड्याच्या दुकानासह इतर दोन ठिकाणीही चोरट्यानी चोरीचा प्रयत्न केला होता. परंतु त्याठिकाणचे नागरिक जागे झाल्यामुळे तेथील चोरीचा त्यांचा प्रयत्न फसल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली.
पवनचक्की कंपनीने शेतकऱ्यांची केली फसवणूक.चोरट्यांचा पालशिंगण शिवारात ॲल्युमिनियम तारेवर दरोडा
पवनचक्की कंपनीने तार ओढताना अनेक शेतकऱ्यांना मावेजा न देता गंडा घालण्याचा काम केलं. त्याच ओटू कंपनीच्या तीन टावर वरील 2 हजार फुटाहून अधिकची तार चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी कंपनीचे प्रशांत माने (रा.बीड) यांनी याबाबत फिर्याद नोंदविली. त्यानुसार, ते ग्रीन पॉवर एक्सआय (ओटू पॉवर) येथे कार्यरत आहेत.दि. 11 मे रोजी सायंकाळी ते चौसाळा ते पालसिंगण या परिसरात पेट्रोलिंग करत होते. या दरम्यान पालसिंगण शिवारातील टॉवर क्र.38,39 व 40 क्रमाकांच्या टावरवरील 2 हजार 32 फुट अॅल्युमिनियम कंडक्टर तार चोरी झाल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणी नेकनूर पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुध्द बुधवारी 21 मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
बीड जिल्ह्यातील बोगस शिक्षक भरतीचा भांडाफोड होणार. पाचशे कोटीचा घोटाळा शिक्षणाधिकारी भगवान फुलारी, नागनाथ शिंदे चौकशीच्या फेऱ्यात.
राज्यात सध्या शिक्षक भरती घोटाळे चर्चेला येत आहेत. नागपूरमध्ये देखील शिक्षक भरती प्रकरणी चौकशी सुरु झालेली आहे. बीड जिल्ह्यातही शिक्षक भरतीमध्ये खाजगी शिक्षण संस्था चालक आणि शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी संगणमत करून कोट्यवधींचा घोटाळा केल्याच्या तक्रारी आहेत. पवित्र पोर्टलमध्ये खेळ करत आणि नित्यं डावलून शिक्षकांना नियुक्त्या देण्यात आल्या आणि त्या नियुक्त्यांना शिक्षण विभागाने मान्यताही दिली अशा तक्रारी आहेत. विशेष म्हणजे यासंदर्भातील कोणतीच माहिती दिली जात नव्हती. एवढेच नाही तर माहिती अधिकारात देखील द्यायला शिक्षण विभाग तयार नाही . या संपूर्ण प्रकरणात शेकडो कोटींची उलाढाल झाल्याच्या तक्रारी होत्या. या संदर्भात भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे अध्यक्ष इंजि . सादेक इनामदार यांनी राज्याच्या शिक्षण मंत्र्यांकडे तक्रार केली होती. त्यात प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी भगवान फुलारी आणि माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी नागनाथ शिंदे यांनी 400 ते 500 कोटींचा भ्रष्टाचार केल्याचे म्हटले होते. यावर शिक्षण मंत्र्यांनी शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांना चौकशीचे निर्देश दिले होते. त्यानुसार शिक्षण विभागाने आता राज्याच्या शिक्षण आयुक्तांना या प्रकरणात प्राथमिक चौकशी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे बीड जिल्ह्यातही बोगस शिक्षक भरतीचा भांडाफोड होणार आहे.
Thursday, May 22, 2025
कर्जाला कंटाळलेल्या शेतकऱ्याने विषारी औषध प्राशन करून संपवले जीवन.
गंगामसला (प्रतिनिधी) सततची नापिकी आणि वाढत्या कर्जाला कंटाळून ४५ वर्षीय नरहरी आत्माराम खेत्री या शेतकऱ्याने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना १९ मे राेजी माजलगाव तालुक्यातील मोठेवाडी येथे घडली.
१९ मे रोजी सकाळी शेतातून येतो, असे घरातील लोकांना सांगून नरहरी निघून गेला होता. बराच वेळ होऊनही घरी न परतल्याने त्याच्या कुटुंबीयांनी शाेध घेतला असता, एका शेतात विषारी औषध प्राशन केल्याने बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. नरहरी याच्या पश्चात कुटुंबात पत्नी, एक मुलगी, एक मुलगा, वृद्ध आई, मोठा भाऊ असा परिवार आहे. घरातील कर्ताच गेल्याने हे शेतकरी कुटुंब अक्षरशः खचले आहे.
मृतक नरहरी यांच्यावर बँकेचे, लोकांचे देणे असल्यानेच त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचे समजते. मयताचा भाऊ विष्णू आत्माराम खेत्री यांनी दिलेल्या फिर्यादीवरून माजलगाव ग्रामीण पाेलिसांनी आकस्मिक मृत्यूची नाेंद केली आहे. तपास बीट जमादार बाळू सोनवणे व पोकॉ. गोविंद बाबरे करीत आहेत.
Monday, May 19, 2025
निर्भिड आणि सामाजिक जाणीव असलेला आदर्श पत्रकार : श्री.संतोषभाऊ जुजगर
एक मराठा लाख मराठाच्या घोषणा देत शिवराज दिवटेस न्याय द्या', परळीत मराठा सेवकांची अजित पवारांकडे मागणी.
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) देशातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या प्रभू वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंदिर परिसरात चालू असलेल्या तीर्थक्षेत्र विकास योजनेच्या कामाची पाहणी केली. त्यानंतर उपमुख्यमंत्री पवार छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळील शासकीय विशेष अतिथी विश्रामगृहामध्ये बैठकीसाठी हजर झाले. दरम्यान, विश्रामगृहाच्या बाहेर मराठा सेवकांनी एक मराठा लाख मराठाच्या घोषणा देत शिवराज दिवटे यांना न्याय मिळालाच पाहिजे, अशी मागणी केली. न्याय द्या न्याय द्या, अजित पवार न्याय द्या, अशा घोषणांनी परिसरात दणाणून गेला.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे बीडचे पालकमंत्री झाल्यानंतर प्रथमच परळी दौऱ्यावर आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून त्यांचे जंगी स्वागत केलं गेलंय. या वेळी परळी शहरातील छत्रपती संभाजी महाराज चौक,राणी लक्ष्मीबाई टावर आणि वैद्यनाथ मंदिर परिसरामध्ये फुलांचे हार क्रेनवर लावण्यात आले होते. उपमुख्यमंत्री पवार यांनी श्री वैद्यनाथ तीर्थक्षेत्र विकास कामाची केली पाहणी. त्यांच्यासोबत मंत्री पंकजा मुंडे, माजी मंत्री धनंजय मुंडे , माजी आमदार संजय दौंड आदींची उपस्थिती होती. त्यानंतर उपमुख्यमंत्री पवार छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळील शासकीय विशेष अतिथी विश्रामगृहामध्ये बैठकीसाठी हजर झाले.बैठकीनंतर उपमुख्यमंत्री पवार बाहेर आले तेव्हा मराठा सेवकांनी निवेदन सादर केले. लिंबुटा येथील युवक शिवराज दिवटे हल्ला प्रकरणी आंदोलक आणि पवार यांच्यात यावेळी चर्चा झाली. पोलीस विनाकारण जलालपूरच्या ग्रामस्थांना पकडत आहेत अशी तक्रार करून शिवराज दिवटे यांना न्याय द्या, अशी मागणी ही आंदोलकांनी केली. यावर शिवराज दिवटे हल्ला प्रकरणी योग्य कारवाई करण्यात येईल असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिष्टमंडळाला दिले. या प्रकरणी योग्य ती कारवाई करण्यात आली आहे. उर्वरित आरोपींना ४८ तासांच्या आत अटक करण्याच्या सूचना पवार यांनी पोलीस अधिकाऱ्यांना दिल्याची माहिती आहे.
आज परळी बंदची हाक.
शिवराज दिवटे यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आज सर्वपक्षीय आणि विविध संघटनांनी परळीत बंद पुकारला आहे. सकाळी काही वेळ बाजारपेठ बंद ठेवण्यात आली. मात्र, अकरा वाजेनंतर बाजारपेठे सुरळीत सुरू होती. बंदचे आवाहन करणाऱ्या दोघांना पोलिसांनी सकाळपासून नजर कैदेत ठेवले असल्याची माहिती आहे.
परळी, अंबाजोगाई आणि बीडमध्ये बैठका.
अजित पवार हे सोमवारी परळी, अंबाजोगाई आणि बीडमध्ये विविध बैठका घेतील. तसेच पवार यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयात नियोजन समितीची दुसरी बैठक होणार आहे. मंत्री अजित पवार यांच्यासोबत पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे देखील उपस्थित राहणार आहेत. यात जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था संदर्भात वादळी चर्चा होण्याची शक्यता आहे.
पालकमंत्री अजित पवारांची बीड जिल्हया वर पकड नाही, म्हणूनच गुंडगिरी वाढली:- मनोज जरांगे
अंबाजोगाई (प्रतिनिधी) जिल्ह्यात गुंडगिरीच्या माध्यमातून हल्ले होतच राहणार. आम्ही काय नुसत्या भेटीच देत फिरायचं का? असा सवाल करीत ही गुंडगिरी निर्माण झालेलं विदारक वातावरण दूर करण्यासाठी आपण स्वतः पुढाकार घेणार आहोत. पालकमंत्री अजित पवार यांची बीड जिल्ह्यावर पकड राहिली नाही. त्यामुळेच गुंडगिरी वाढत चालली असल्याची टीका मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केली.
परळी तालुक्यातील लिंबोटा येथील युवक शिवराज दिवटे हा गुंडांकडून मारहाणीत जखमी झाल्याने त्याच्यावर सध्या अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रविवारी दुपारी जरांगे पाटील यांनी शिवराज याची भेट घेतली. शिवराजच्या अंगावरील बेदम मारहाण केलेले व्रण पाहून अंगावर काटा येतो. सामूहिक कट रचून त्याला जिवे मारण्यासाठीच त्याचे अपहरण केले. मात्र, लोक धावून आल्याने त्याचा जीव वाचला. अशा घटना वारंवार घडूनही सरकार काहीच करत नाही, असा आरोपही जरांगे यांनी केला.
पाच आरोपींना मंगळवारपर्यंत पोलीस कोठडी.
शिवराज दिवटे हल्ला प्रकरणात पाच जणांना संभाजीनगर पोलिसांनी शनिवारी अटक करून परळी न्यायालयात हजर केले. त्यांना २० मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तर दोघा अल्पवयीन मुलांना बीडच्या बाल न्यायालयात हजर करून त्यांची बाल सुधार गृहात रवानगी केली. उर्वरित आरोपींच्या शोधासाठी संभाजीनगर पोलिसांनी दोन पथके नियुक्त केल्याचे पोलीस निरीक्षक धनंजय ढोणे यांनी सांगितले.
सर्व लोकप्रतिनिधी पालकमंत्र्यांशी चर्चा करू.
मी भेट देणार आहे. आमची दहशत कमी झालेली नाही, हे दाखविण्यासाठी अशी मारहाण केली आहे. संतोष देशमुख यांचा तर बळी घेतलाच, पण हादेखील पार्ट टू होण्यापासून वाचला. सोमवारी डीपीसीच्या बैठकीआधीच आम्ही सर्व लोकप्रतिनिधी पालकमंत्र्यांशी चर्चा करू. दिवटे प्रकरणही गंभीर आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्र्यांनीच आरोपींवर मकोका लावण्याचे आदेश द्यावेत.- सुरेश धस, आमदार, आष्टी
प्रशासनाचा वचक राहिला नाही.
वर्षानुवर्षे खुर्चीला चिटकून बसलेल्या लोकांच्या बदल्या झाल्याशिवाय परळीतील गुंडगिरी कमी होणार नाही. तसेच एसपी लेव्हलची स्वतंत्र व्यक्ती परळी व परिसरासाठी आवश्यक आहे, तरच येथील गुंडगिरी कमी होईल. सत्तेच्या जिवावर गुंडगिरी व मस्ती सुरूच आहे. कायद्याचा धाक नसल्याने व्हिडीओ व्हायरल करून मारहाण केली जाते. या गुंडगिरीवर प्रशासनाचा वचक राहिला नाही.- बजरंग साेनवणे, खासदार बीड
उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी घेतला परळी औष्णिक विद्युत केंद्रा अंतर्गत कामकाजाचा आढावा.
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी आज परळी औष्णिक विद्युत केंद्रा अंतर्गत सुरू असलेल्या कामकाजाचा आढावा घेतला.
शासकीय विश्रामगृह येथे आयोजित आढावा बैठकीला पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, आमदार विक्रम काळे, आमदार धनंजय मुंढे आदी उपस्थित होते.
यावेळी औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता सुनील इंगळे यांनी सादरीकरणाद्वारे औष्णिक विद्युत केंद्राबाबत माहिती दिली. यामध्ये प्रस्तावित संच क्रमांक-1 ची मंजुरी व उभारणी, सौर ऊर्जा प्रकल्प मान्यता, राखेचे प्रदूषण व उपाययोजना, औष्णिक विद्युत केंद्राच्या विश्रामगृहाचे नुतनीकरण, थर्मल परिसरात स्वतंत्र पोलीस ठाणे, थर्मल कॉलनी परिसरात वृक्ष लागवड, सौर ऊर्जा प्रकल्प, आदी विषयांबाबत आढावा घेण्यात आला. परळी औष्णिक विद्युत केंद्राबाबत असलेल्या अडचणी सोडविण्यासाठी आपले सहकार्य असेल असे श्री.पवार यांनी सांगितले.
यावेळी उपविभागीय अधिकारी अरविंद लाटकर, तहसिलदार व्यंकटेश मुंढे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी त्रिंबक कांबळे आदी विकसीत होते.
बांधकाम विभागातील वरिष्ठ अधिकारी पाच हजाराची लाच घेताना कार्यालयात रंगेहाथ. अटक.
बीड (प्रतिनिधी) -मजूर संस्थेचे नूतनिकरण करण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच घेणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभाग क्र 2 मधील वरिष्ठ लिपिकाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने जेरबंद केले. कृष्णा मुंडे असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
बेलगाव येथील तक्रारदार यांच्या मजूर संस्थेचे नूतनिकरण करून अ वर्ग वर्गीकरण करण्यासाठी बीडच्या सार्वजनिक बांधकामं विभाग क्र 2 मधील वरिष्ठ लिपिक कृष्णा वसुदेव मुंडे याने पाच हजार रुपये लाचेची मागणी केली
याबाबत तक्रारदार यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानंतर सापळा रचण्यात आला.मुंडे याला पाच हजाराची लाच घेताना कार्यालयात रंगेहाथ पकडण्यात आले.
Saturday, May 17, 2025
जनसेवेचे वैद्यकीय रूप - डॉ. विवेक दंडे
Friday, May 16, 2025
सर्वच आधुनिक सुविधा चा अभाव वैतागून अखेर गावकऱ्यांनी वाडीच काढली विक्री ला!
आष्टी (प्रतिनिधी): वाडीत जाण्यासाठी रस्ता, संपर्क साधण्यासाठी मोबाइल रेंज, बस यासह अनेक सुविधांचा अभाव असल्याने वारंवार मागणी करूनही प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याने वैतागलेल्या नागरिकांनी गुरुवारी सकाळी चक्क वाडीच विक्रीला काढली. हा निर्धार गाव बैठकीत केला.
आष्टी तालुक्यातील वनवेवाडी येथील १,००० लोकसंख्या असलेली वाडी; पण रस्त्यांची अवस्था बिकट आहे.
रेंजसाठी चढावे लागते झाडावर
मोबाइलला रेंज येत नसल्याने ग्रामस्थ अनेकदा झाडावर चढतात. अगदी जीव धोक्यात घालून त्यांना संवाद साधावा लागत आहे. त्यामुळेच आम्ही वैतागलो, असे ग्रामस्थांनी सांगितले.
आमच्या वाडीला रस्ता नाही. मोबाइलला रेंज मिळत नाही, बस येत नाही. सुविधांचा अभाव आहे. ग्रामस्थांनी वैतागून वाडीची विक्री करण्याचा निर्णय घेतला.विष्णू वनवे, माजी सरपंच
ग्रामस्थांनी काय निर्धार केला हे अद्याप आमच्यापर्यंत आले नाही. लेखी स्वरूपात कळले तर काही मार्ग काढला जाईल.वैशाली पाटील, तहसीलदार
गाव बैठकीत निर्धार
पक्का रस्ता नसल्याने वनवेवाडीतील नागरिकांना प्रचंडहाल सोसावे लागत आहेत. तर विद्यार्थ्यांना पायी चालताना अडचणीचा सामना करावा लागतो. पाऊस झाल्यावर या रस्त्याला नदी-नाल्याचे स्वरूप येते.
वयोवृद्ध नागरिकांना दवाखान्यात येण्यासाठी कोणतीही रुग्णवाहिका या गावात येत नाही. एसटी तर फक्त मतदान पेटीसाठीच गावात येते.
राज्य सरकारने आमचे गाव 3 विकत घ्यावे नाहीतर रस्ता द्यावा, अशा निर्धार ग्रामस्थांनी बैठकीत घेतला.
मांजरसुंबा ते केज मार्गावर मद्यधुंद चालका चा कहर. कंटेनरने १९ जणांना उडवले, महिलेचा मृत्यू .
केज (प्रतिनिधी) : शुक्रवारी दुपारी सुमारे अडीच वाजता, मांजरसुंबा ते लोखंडी सावरगाव राष्ट्रीय महामार्गावर एक कंटेनर (क्रमांक डीडी ०१ झेड ९७७१) मद्यधुंद अवस्थेतील चालकाने हयगयीने चालवल्यामुळे मोठा अपघात झाला. या घटनेत मीना प्रवीण घोडके (वय ३७, रा. चिंचोलीमाळी, ह. मु. टाकळी) या महिलेचा जागीच मृत्यू झाला तर केज परिसरातील १९ जण जखमी झाले, त्यापैकी ८ जण गंभीर आहेत.
भरधाव वेगाने कंटेनर मांजरसुंबा येथून सुटला होता आणि वाटेत दिसेल त्या वाहनाला व माणसाला धडक देत केज बसस्थानक परिसरात आला. यानंतर संतप्त नागरिकांनी लोखंडी सावरगाव टी पॉईंटपर्यंत कंटेनरचा पाठलाग केला. या ठिकाणी तीव्र वळणावर कंटेनर रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्यात उलटला. संतप्त जमावाने कंटेनर पेटवून दिला. अंबाजोगाई येथून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अग्निशमन दलाच्या मदतीने आग आटोक्यात आणली.
गंभीर जखमींची नावे.
शेषेराव मारोती चंदनशिव (५२), कृष्णा हरिदास करपे (२०), बळीराम अप्पाराव पांचाळ (४०), कुमार बळीराम गायकवाड (५५), आशा रावसाहेब मुंडे (५०), सिद्धार्थ शिंदे (५२), फुलाबाई धोंडीराम सावंत (६०), श्रद्धा मधुकर चिंचकर (१८) यांना अंबाजोगाई येथील स्वराती ग्रामीण रुग्णालयात पुढील उपचारासाठी हलविण्यात आले आहे. ही माहिती केज उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. दत्तात्रय केंद्रे यांनी दिली.
वाहतूक पोलिसांचा अभाव ठरला घातक.
या घटनेनंतर नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. केज शहरातील चौकात वाहतूक पोलिसांची अनुपस्थिती असल्याने अपघातात अधिक जीवितहानी झाली, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर शहरात वाहतूक पोलिसांची संख्या वाढवण्याची मागणी करण्यात येत आहे.
धक्कादायक प्रकार! विद्यार्थ्याचे बसमधून अपहरण करून अमानुष मारहाण.
अंबाजोगाई (प्रतिनिधी) बीड जिल्हा पुन्हा एकदा एका गंभीर गुन्हेगारी घटनेमुळे चर्चेत आला आहे. काही दिवसांपूर्वी सरपंच संतोष देशमुख यांच्या अपहरण आणि हत्याकांडाने राज्यभरात खळबळ उडाली होती, आणि आता अंबाजोगाई शहरात एका विद्यार्थ्याचे बसमधून अपहरण करून त्याला अमानुष मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे बीडमध्ये पुन्हा एकदा दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बीडवरून अंबाजोगाईकडे एसटी बसने प्रवास करणाऱ्या एका विद्यार्थ्याचे काही अज्ञात व्यक्तींनी अपहरण केले आणि त्याला निर्दयपणे मारहाण केली. ही घटना अंबाजोगाई शहरात घडली. या प्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तातडीने कारवाई करत सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे, तर चौथा आरोपी अद्याप फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
या घटनेची सुरुवात बसमध्ये एका क्षुल्लक कारणावरून झाली. बीडवरून अंबाजोगाईला जाणाऱ्या बसमध्ये प्रवास करत असताना एका विद्यार्थ्याचा एका महिलेशी थुंकल्याच्या कारणावरून वाद झाला. त्यानंतर, जेव्हा ही बस अंबाजोगाई शहरात पोहोचली, तेव्हा चार अज्ञात व्यक्ती बसमध्ये घुसले आणि त्यांनी त्या विद्यार्थ्याला व त्याच्या मित्राला मारहाण करण्यास सुरुवात केली. बसमधील वाहक आणि चालकाने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, परंतु आरोपींनी त्यांचे ऐकले नाही. त्यांनी दोघांनाही बसमधून खाली उतरवले आणि त्यानंतरही त्यांची मारहाण सुरूच ठेवली.
*तरूणाला बेदम मारहाण.
या मारहाणीत संदेश सावंत नावाचा विद्यार्थी गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर अंबाजोगाई येथील एसआरटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी या प्रकरणी ऋषी शिंदे, लखन जगदाळे, निकेश जगदाळे आणि बालाजी जगदाळे या चार आरोपींविरुद्ध भा.दं.वि. कलम 109, 147, 148, 149, 352, 341, 323, 504, 506 आणि सहकलम 3(2)(व्हीए) नुसार गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या तीन आरोपींची कसून चौकशी करत आहेत, तर फरार असलेल्या चौथ्या आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, नागरिकांकडून आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
Thursday, May 15, 2025
खेळण्याच्या वयातच मुली आई! बीड जिल्ह्यात बालविवाह झालेल्या १५ वर्षाच्या दहा मुली गर्भवती.
बीड (प्रतिनिधी) जिल्ह्यातील बालविवाह काही केल्या थांबत नसल्याचे उघड झाले आहे. अगदी शिक्षण, खेळण्याच्या वयातच पालक मुलींचे हात पिवळे करत असल्याने अवघ्या १५ व्या वर्षीही मुली गर्भवती राहत आहेत. मागील वर्षात १८ वर्षांखालील १२ मुली गर्भवती असून, त्यातील १० जणी १५ वर्षांच्या आहेत. याची आरोग्य विभागात नोंद झाल्याने ही गंभीर समस्या उघड झाली आहे. ही परिस्थिती राज्यभरातच आहे, परंतु प्रशासन अहवाल समाेर आणत नाही.
बालविवाहासंदर्भात जनजागृतीसाठी शासन कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी करते. तसेच बालविवाह रोखण्यासह झालेल्यांवर बालविवाह प्रतिबंध कायद्यांतर्गत गुन्हे दाखल केले जातात. परंतु, असे असले तरी बीडमधील ही गंभीर समस्या काही केल्या कमी होत नसल्याचे दिसते. पालक अजूनही आपल्या मुलींचे हात अवघ्या १३ व्या वर्षीही पिवळे करत असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळेच खेळण्याच्या वयातच त्यांच्यावर मातृत्वाचे ओझे पडत आहे. विशेष म्हणजे याची शासनदरबारी नोंद होत आहे.
११ मुलींची प्रसूती.
जिल्हा रुग्णालयात १३ ते १७ वर्षांतील ११ मुलींची प्रसूतीही झाली आहे. यातील काही मुली या अत्याचार पीडित असल्याचे सांगण्यात आले.
आरसीएच पोर्टलला नोंद.
गर्भवती महिलांची नोंद ही आरसीएच (प्रजनन व बाल आरोग्य) पोर्टलवर केली जाते. यावरूनच अगदी १५ वर्षांच्या मुली गर्भवती असल्याचे उघड झाले आहे. हे आरोग्य विभागाचे अधिकृत पोर्टल आहे.
कुठल्या आहेत गर्भवती मुली.
एप्रिल २०२४ ते मार्च २०२५ या कालावधीत १२ मुलींची गर्भवती म्हणून नोंद झाली आहे. यात बीड तालुक्यातील ४, गेवराई २, वडवणी २ आणि आष्टी, केज, धारूर, शिरूकासार येथील प्रत्येकी एकीचा समावेश आहे.
बालविवाह कशावरून?.
आरसीएच पोर्टलला नोंद करताना सर्व अधिकृत पुरावे द्यावे लागतात. यात पतीचाही पुरावा असतो. या सर्व १२ मुलींच्या नावापुढे त्यांच्या पतीचे नावही लिहिलेले आहे.
दोषी कोणाला धरायचे?.
पालकांनीच मुलीचा बालविवाह लावलेला असतो. आता अल्पवयीन असतानाच गर्भवती राहिल्याने पीडितेने किंवा तिच्या आई-वडिलांनी तक्रार देणे अपेक्षित असते. परंतु, यात पालकही दोषी असतात. कारण त्यांनीच बालविवाह लावलेला असतो. त्यामुळे नेमका दोष कोणाला द्यायचा? हा प्रश्न आहे.
इतर जिल्ह्यातून २३ गुन्हे वर्ग.
बीड जिल्ह्यात विवाह लावून परजिल्ह्यात कामासाठी अथवा इतर कारणांसाठी स्थलांतरित झालेल्या अल्पवयीन मुलींची तिकडे प्रसूती झाली. यावेळी डॉक्टरांनी अहवाल दिल्याने पतीविरोधात बाल लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला आहे. तो गुन्हा नंतर बीडमध्ये वर्ग केला. २०२२ ते मार्च २०२५ या कालावधीत हा आकडा २३ आहे. यात पुणे, नाशिक, कोल्हापूर, सांगली, छत्रपती संभाजीनगर, सातारा, अहिल्यानगर, नाशिक, जालना आदी जिल्ह्यांचा समावेश आहे.
१८ वर्षांखालील मुलगी गर्भवती असेल किंवा प्रसूती झाली तर त्याचा अहवाल आपण पोलिसांना देतो. मग पुढील कारवाई ते करतात.- डॉ. संतोष शहाणे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक, बीड
अल्पवयीन मुलीसंदर्भात काही अहवाल आला तर आम्ही कारवाई करतोच. पण जोपर्यंत अहवाल येणार नाही, तोपर्यंत काही समजणार नाही.- नवनीत काँवत, पोलिस अधीक्षक, बीड
प्रेयसीने फोन न उचलल्याने तरुणाचा संताप. तरुणीला घरात घुसून मारहाण, जातीवाचक शिवीगाळ.
बीड (प्रतिनिधी) खासगी रुग्णालयात काम करणारे दोघेजण तीन वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिले. परंतु आता तरूणीने फोन न उचलल्याने तिला पहाटेच्या सुमारास घरात घुसून गळा दाबत मारहाण करत जातीवाचक शिवीगाळ केली. तसेच तिच्या दाजीला ही जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचा प्रकार १२ मे रोजी पहाटेच्या सुमारास स्वराज्यनगर भागात घडला. याप्रकरणी दारूड्या तरूणावर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
लक्ष्मण सपकाळ (वय २५ रा. सुर्डी ता. गेवराई) असे आरोपीचे नाव आहे. पीडिता ही वडवणी तालुक्यातील रहिवासी असून लक्ष्मण व ती एकाच खासगी रूग्णालयात काम करतात. तीन वर्षांपासून ते रिलेशनशिपमध्ये होते. त्यांचे फोनवर ही बोलणे होत असे. लक्ष्मण हा पीडिता सध्या बीडमध्ये राहत असलेल्या किरायाच्या घराकडेही चकरा मारत असे. १२ मे रोजीही तो दारूच्या नशेत होता. मला तुझ्या रूमवर यायचे आहे, असे म्हणत तो पीडितेला त्रास देत होता. तिने सकाळी ये म्हणल्यानंतर ही लक्ष्मण ऐकले नाही.
पहाटे ४ वाजताच तो पीडितेच्या रूमवर गेला. तिला जातीवाचक शिवीगाळ करत गळ्याला पकडून मला चापटाने मारहाण केली. तू माझा फोन रिसिव्ह का करत नाहीस, असे म्हणून मला शिवीगाळ केली. त्यानंतर पीडितेने तिच्या दाजीला बोलावून घेतले. यावेळी त्यांनाही तुझा काय संबंध आहे आमच्यामध्ये का बोलतोस, असे म्हणून जिवे मारण्याची धमकी दिल्याचे पीडितेने तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी ॲट्रॉसिटीसह विविध कलमान्वये शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोठी बातमी! मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा आदेश!
मुंबई (प्रतिनिधी) मराठा आरक्षणाच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना निर्देश दिले आहेत की, या याचिकांवर तातडीने सुनावणी करण्यासाठी एका नवीन खंडपीठाची स्थापना करावी. सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्या पहिल्याच कामकाजाच्या दिवशी हा महत्त्वपूर्ण आदेश जारी करण्यात आला. सरन्यायाधीश बी. आर. गवई आणि न्यायमूर्ती ऑगस्टीन जॉर्ज मसीह यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय (SCBC) प्रवर्गांतर्गत वैद्यकीय प्रवेशांसाठी मराठा विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या १० टक्के आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर त्वरित नवीन खंडपीठ स्थापन करून जलद निर्णय घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाला दिले आहेत
नवीन खंडपीठ स्थापन करण्याचे स्पष्ट निर्देश :
या याचिकांवर वेळेत सुनावणी न झाल्यामुळे याचिकाकर्त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. या वर्षी जानेवारी महिन्यात तत्कालीन मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय यांची दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून बदली झाल्यानंतर या याचिकांवर सुनावणी होऊ शकली नाही. याच कारणास्तव याचिकाकर्त्यांनी सर्वोच्च न्यायालयात अपील केले होते. सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना मराठा आरक्षण कायद्याच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर जलद सुनावणीसाठी नवीन खंडपीठ स्थापन करण्याचे स्पष्ट निर्देश दिलयापूर्वी, जानेवारी महिन्यात मुंबई उच्च न्यायालयाचे तत्कालीन मुख्य न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय यांची दिल्ली उच्च न्यायालयात बदली झाली. न्यायमूर्ती उपाध्याय हे पूर्ण किंवा तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाचा भाग होते, जे गेल्या वर्षी एप्रिलपासून सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय (SEBC) कायदा, २०२४ च्या विरोधातील याचिकांवर सुनावणी करत होते. त्यांच्या बदलीमुळे सुनावणी रखडली होती.
विधानसभा निवडणुकां च्या काळात राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी.
याचिकाकर्त्यांनी आगामी शैक्षणिक सत्राची निकड आणि मुंबई उच्च न्यायालयाकडून निर्णय घेण्यास होणारा विलंब याकडे सर्वोच्च न्यायालयाचे लक्ष वेधले होते. वैद्यकीय प्रवेशाला उशीर होण्याची शक्यता सुनावणीदरम्यान स्पष्टपणे मांडण्यात आली. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने योग्य ते निर्देश देण्याची विनंती याचिकाकर्त्यांनी केली होतीयाचिकाकर्त्यांचा युक्तिवाद १४ ऑक्टोबर २०२४ रोजी पूर्ण झाला होता. महाराष्ट्राच्या लोकसंख्येच्या जवळपास एक तृतीयांश असलेल्या मराठा समाजाला शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये १० टक्के आरक्षण देणारा २०२४ चा कायदा गेल्या वर्षी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या काळात राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी होता. आता या प्रकरणावर लवकरच निर्णय येण्याची शक्यता आहे.
भाजपाच्या संपूर्ण महाराष्ट्रात जिल्हाध्यक्षां च्या नियुक्ती जाहीर.बीडमध्ये जिल्हाध्यक्षा ंची घोषणा रखडली. चर्चांना उधाण.
शितल अंगदराव भंडारे हिचे दहावी परीक्षेत 98% मार्क घेऊन यश संपादन.
भीषण अपघात दुचाकीला वाचविताना कार उलटली; तीन ठार तर पाच जखमी.
अंबाजोगाई (प्रतिनिधी) दुचाकी स्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात कार पलटी होऊन झालेल्या भीषण अपघातात दोन जण ठार झाले. तर एकाचा उपचार दरम्यान मृत्यू झाला तर चार जण गंभीर जखमी झाले. ही घटना आज (दि.१४) दुपारी अंबाजोगाई – आडस रोडवरील उमराई पाटी नजीक घडली. माजलगाव तालुक्यातील पाथरूड येथून (एम एच 05 सी व्ही 9186) या कारमधून अंबाजोगाईकडे एका विवाह समारंभास उपस्थित राहण्यासाठी एक कुटुंब जात होते. आडस अंबाजोगाई रोडवरील उमराई पाटील नजीक असलेल्या दत्त मंदिरासमोर एक दुचाकीस्वार अचानक आडवा आला. या दुचाकीस्वारास वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि कार जागीच पलटी झाली. यात शौकत अहमद शेख व खय्युम अब्बास अत्तार हे दोघे जागीच ठार झाले. तर शामू जागीरदार यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती असून या अपघातात जखमी झालेल्या सर्वांवर स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
Wednesday, May 14, 2025
दुर्दैवी घटना, सौर पॅनल बसवण्यासाठी आलेल्या अभियंत्याचा खदाणीच्या पाण्यात बुडून मृत्यू.
केज (प्रतिनिधी ): केज तालुक्यातील कानडीमाळी शिवारात मंगळवारी (दि. 13) सकाळी साडे सहाच्या सुमारास एक दुर्दैवी घटना घडली. सौर ऊर्जा पॅनल बसवण्यासाठी आलेले अभियंता सचिन केरबा गोरे (वय 25, रा. अवंतीनगर, बार्शी रोड, लातूर) खदानीच्या पाण्यात बुडून मृत्युमुखी पडले.
लातूर येथील सिंकसन एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड या खासगी कंपनीकडून कानडीमाळी येथील एका क्रेशरवर सौर पॅनल बसवण्याचे काम गेल्या आठ दिवसांपासून सुरू होते. हे काम मंगळवारी सकाळी पूर्ण झाल्यानंतर सचिन गोरे व इतर चार सहकाऱ्यांनी जवळच असलेल्या खदानीत पोहण्यासाठी जाण्याचा निर्णय घेतला. मात्र, पोहता न येणाऱ्या सचिन गोरे यांचा पाय घसरून पाण्यात पडल्याने ते खोल पाण्यात बुडाले.
त्यांचे सहकारी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत असतानाही त्यांना वाचवण्यात अपयश आले. घटनास्थळी सहायक पोलीस अधीक्षक कमलेश मीना व पोलीस निरीक्षक वैभव पाटील यांनी भेट देत बीडच्या अग्निशमन दलासह खासगी पाणबुड्यांच्या मदतीने शोध मोहीम सुरू केली. मात्र, मृतदेह सापडला नाही.
११ तासांच्या शोधानंतर मृतदेह बाहेर.
शेवटी माजलगाव येथून आलेल्या खासगी पथकाने गळ टाकून मृतदेह शोधण्याची मोहीम हाती घेतली आणि तब्बल ११ तासांच्या प्रयत्नांनंतर रात्री १०.३० वाजता सचिन गोरे यांचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात यश आले. बुधवारी सकाळी केज उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणी करून दुपारी २ वाजता लातूर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
अग्निवीर म्हणून झाली होती निवड.
सचिन गोरे हे विवाहित असून त्यांची नुकतीच अग्निवीर म्हणून निवड झाली होती आणि लवकरच प्रशिक्षणासाठी जाणार होते. मात्र, त्याआधीच हा दुर्दैवी अपघात त्यांच्या आयुष्याची अखेर घेऊन आला.एनर्जी कंपनीचे संचालक विश्वजीत माने यांनी सांगितले की, सकाळी काम संपल्यानंतर ते लातूरला परतण्याच्या तयारीत होते, त्याच वेळी ही दुर्घटना घडली.