अंबाजोगाई (प्रतिनिधी) बीड जिल्हा पुन्हा एकदा एका गंभीर गुन्हेगारी घटनेमुळे चर्चेत आला आहे. काही दिवसांपूर्वी सरपंच संतोष देशमुख यांच्या अपहरण आणि हत्याकांडाने राज्यभरात खळबळ उडाली होती, आणि आता अंबाजोगाई शहरात एका विद्यार्थ्याचे बसमधून अपहरण करून त्याला अमानुष मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे बीडमध्ये पुन्हा एकदा दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बीडवरून अंबाजोगाईकडे एसटी बसने प्रवास करणाऱ्या एका विद्यार्थ्याचे काही अज्ञात व्यक्तींनी अपहरण केले आणि त्याला निर्दयपणे मारहाण केली. ही घटना अंबाजोगाई शहरात घडली. या प्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तातडीने कारवाई करत सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे, तर चौथा आरोपी अद्याप फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
या घटनेची सुरुवात बसमध्ये एका क्षुल्लक कारणावरून झाली. बीडवरून अंबाजोगाईला जाणाऱ्या बसमध्ये प्रवास करत असताना एका विद्यार्थ्याचा एका महिलेशी थुंकल्याच्या कारणावरून वाद झाला. त्यानंतर, जेव्हा ही बस अंबाजोगाई शहरात पोहोचली, तेव्हा चार अज्ञात व्यक्ती बसमध्ये घुसले आणि त्यांनी त्या विद्यार्थ्याला व त्याच्या मित्राला मारहाण करण्यास सुरुवात केली. बसमधील वाहक आणि चालकाने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, परंतु आरोपींनी त्यांचे ऐकले नाही. त्यांनी दोघांनाही बसमधून खाली उतरवले आणि त्यानंतरही त्यांची मारहाण सुरूच ठेवली.
*तरूणाला बेदम मारहाण.
या मारहाणीत संदेश सावंत नावाचा विद्यार्थी गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर अंबाजोगाई येथील एसआरटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी या प्रकरणी ऋषी शिंदे, लखन जगदाळे, निकेश जगदाळे आणि बालाजी जगदाळे या चार आरोपींविरुद्ध भा.दं.वि. कलम 109, 147, 148, 149, 352, 341, 323, 504, 506 आणि सहकलम 3(2)(व्हीए) नुसार गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या तीन आरोपींची कसून चौकशी करत आहेत, तर फरार असलेल्या चौथ्या आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, नागरिकांकडून आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
No comments:
Post a Comment