Thursday, April 30, 2026

संत तुकडोजी महाराजांनी आपल्या कीर्तन व ग्रामगीतेच्या माध्यमातून समाजप्रबोधना चे महान कार्य केले-अभयकुमार ठक्कर

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) परळी येथील उपजिल्हा रुग्णालयात आज संत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे माजी उपजिल्हाप्रमुख तथा माजी नगराध्यक्ष अभयकुमार उर्फ पप्पू अण्णा ठक्कर यांच्या हस्ते संत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अरुण गुटे, डॉ.  दिनेश कुरमे  तसेच रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना अभयकुमार ठक्कर म्हणाले की, संत तुकडोजी महाराजांनी आपल्या कीर्तन व ग्रामगीतेच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचे महान कार्य केले. त्यांनी स्वच्छता, व्यसनमुक्ती, ग्रामविकास आणि राष्ट्रभक्ती यांचे महत्त्व पटवून दिले. आजच्या काळात त्यांच्या विचारांची अधिक गरज असून समाजाने त्यांच्या आदर्शांचे पालन करून एक सुदृढ व सुसंस्कृत समाज निर्माण करावा.
तसेच त्यांनी सांगितले की, संत तुकडोजी महाराजांचे कार्य केवळ अध्यात्मिक नसून सामाजिक परिवर्तन घडविणारे होते. त्यांच्या शिकवणुकीतून प्रेरणा घेऊन समाजहितासाठी कार्य करणे हीच त्यांना खरी अभिवादन ठरेल असे श्री ठक्कर म्हणाले.

परळीत सोमवारी मांस विक्री बंदीचा ऐतिहासिक निर्णय सर्वानुमते ठराव मंजूर भक्तांचा व जन भावनांचा आदर.


परळी वैजनाथ (वार्ताहर)  परळी नगरपरिषदेच्या दि. 30 एप्रिल 2026 रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत “प्रत्येक सोमवारी मांस विक्री बंदी” या महत्त्वपूर्ण विषयास सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. परळी हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक पवित्र तीर्थक्षेत्र असल्यामुळे नागरिक व भाविकांच्या भावना लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला.
यापूर्वी दि. 20 एप्रिल 2026 रोजी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत हा विषय समाविष्ट करण्यात आला होता. त्यानंतर आजच्या सर्वसाधारण सभेत हा विषय मांडून अंतिम मंजुरी देण्यात आली.
परळी नगरपरिषदेच्या थेट लोकनिर्वाचित नगराध्यक्षा *सौ. पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी* यांच्या नेतृत्वाखाली हा निर्णय घेण्यात आला असून, त्यांच्या “विकास पर्व 2.0” या संकल्पनेतून जनभावना, धार्मिक संवेदनशीलता आणि स्थानिक गरजा यांचा समतोल साधणारे प्रशासन दिसून आले. शहराच्या सर्वांगीण विकासाबरोबरच परळीच्या पवित्रतेचा सन्मान राखण्याचा त्यांचा दृष्टीकोन या निर्णयातून अधोरेखित झाला आहे.
या निर्णयासाठी मा. पंकजाताई गोपीनाथराव मुंडे (पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री, महाराष्ट्र राज्य) व मा. आमदार धनंजय मुंडे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच उपनगराध्यक्षा *सौ. खैसर राजा खान पठाण*, गटनेते तसेच सर्व नगरसेवक-नगरसेविका यांच्या एकमताने हा ठराव मंजूर करण्यात आला.
या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते *श्री. शिवकुमार केदारी (हिंद नगर, परळी वैजनाथ)* यांनी या निर्णयाचे स्वागत करत सर्व पदाधिकारी व सदस्यांचे मनःपूर्वक आभार मानले. तसेच या विषयाला व्यापक प्रसिद्धी देणाऱ्या सर्व पत्रकार, ऑनलाइन न्यूज चॅनल व टीव्ही प्रतिनिधी यांचेही त्यांनी विशेष आभार व्यक्त केले.

मराठा भवन व राजमाता जिजाऊंचे स्मारक याविषयी परळी नगर परिषदेची अनास्था.सकल मराठा समाज आक्रमक ११ मे पासून बेमुदत ठिय्या आंदोलचा ईशारा.


परळी वैजनाथ  : (प्रतिनिधी)  अनेक वर्षापासून प्रलंबित असलेले “मराठा भवन” व “बाल शिवबासह राजमाता जिजाऊ माँ साहेबांचा पुतळा” याविषयी तात्काळ निर्णय घ्यावा याकरिता मंगळवार दिनांक ३१ मार्च २०२६ रोजी सकल मराठा समाजाच्या वतीने परळी वै. च्या नगराध्यक्षा व मुख्याधिकारी यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली होती. परंतु याविषयी परळी नगर परिषदेची अनास्था दिसून येत आहे. त्यामुळे सोमवार दिनांक ११ मे २०२६ पासून नगर परिषद कार्यालया समोर बेमुद्दत ठिय्या आंदोलन करण्याचा ईशारा सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आला आहे.
परळी शहरात “मराठा भवन” उभारण्यासाठी जागेच्या संर्भात नगर पालिकेकडे अनेक वर्षापासून
मागणी केली जात होती. दि. ७ मे २०२३ रोजी मराठा समाजाच्या झालेल्या व्यापक बैठकीत तत्कालीन पालकमंत्री तथा सद्याचे परळीचे आ.धनंजयजी मुंडे यांनी मराठा भवन बनवण्यासाठी साठी पंडित दिनदयाल उद्यान,औद्योगिक वसाहत येथील जागा देण्याचे नगर पालिकेस आदेशीत केले होते. तशा स्वरूपाची घोषणाही त्यांच्याकडून करण्यात आली होती. मराठा समाजाकडून या निर्णयाचे मोठ्या प्रमाणात स्वागत पण केल्या गेले होते.
परंतु आजतागायत शिवसृष्टी तथा मराठा भवन जागेच्या बाबतीत होत असलेली थट्टा आता सहन केली जाणार नाही. बहुतेक न. प. प्रशासनास मागणीच्या अनुषंगाने निर्णय घ्यायचाच नाही का काय ? मराठा समाजास असा प्रश्न पडत आहे.
दुसरा विषय असा की परळी शहरातील राजमाता जिजामाता उद्यानाचे काम करण्यासाठी लाखो रुपये खर्च झाले आहेत. सदरील उद्यानाच्या प्रवेशद्वारा समोर बालशिवबा सहित जिजाऊ माँ साहेबांचा पुतळा उभारण्यात यावा अशी मागणी समस्त परळीकरांकडून वारंवार करण्यात आली होती. जिजाऊ माँ साहेबांचा पुतळा उभारण्यासाठी तशा स्वरूपाचे बेसमेंट पण करण्यात आले आहे. मात्र नगर पालिकेस मुहूर्त का सापडत नसेल ? परळीकरांना हा प्रश्न पडला आहे.
तब्बल तीन वर्षाची मागणी अद्याप पावेतो पूर्ण केली गेली नाही. ठिय्या आंदोलनाचे निवेदन देऊन एक महिना उलटला परंतु त्याकडे न. प. कार्यालयाकडून पूर्णपणे दुर्लक्ष केल्या गेले. आमच्याकडे आता आंदोलना शिवाय पर्याय उरला नाही. असे सकल मराठा समाजाच्या वतीने आम्ही ठिय्या आंदोलनावर ठाम असल्याचे सांगण्यात आले आहे.

Monday, April 27, 2026

उष्माघाताचा पहिला तीव्र उन्हाने शरीर पोळले, उष्माघाताने तरूणाचा मृत्यू .


परभणी(प्रतिनिधी) जिल्ह्यात उष्माघाताचा पहिला बळी नोंदवला गेला आहे. नाशिक येथून परभणीत आपल्या भावाला भेटण्यासाठी आलेल्या 37 वर्षीय शिवाजी बबन कांबळे या व्यक्तीचा तीव्र उन्हामुळे मृत्यू झाला.

ही धक्कादायक घटना परभणीतील नांदखेडा रोड भागात घडली आहे. शिवाजी कांबळे हे मूळचे जिंतूर तालुक्यातील चारठाणा येथील रहिवासी असून कामासाठी ते नाशिकला स्थायिक झाले होते. दोन दिवसांपूर्वीच ते आपल्या कुटुंबासह परभणीत विटभट्टीवर काम करणाऱ्या भावाकडे आले होते, मात्र काळाने त्यांच्यावर घाला घात.

साडूच्या घरी जाताना चक्कर आली आणि खड्ड्यात कोसळले

शिवाजी कांबळे हे 24 एप्रिल रोजी सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास आपली पत्नी मिनाक्षी, मुलगी विद्या आणि सासू यांच्यासह साडू विजय मस्के यांच्या घरी जाण्यासाठी निघाले होते. वाटेत जात असताना त्यांना अचानक चक्कर आल्याचे त्यांच्या मुलीने पाहिले. त्यानंतर ते बेपत्ता झाले होते. दुपारी 12 वाजेच्या सुमारास त्यांच्या पत्नीने ही माहिती भाऊ महादेव कांबळे यांना दिली. बराच वेळ शोध घेतल्यानंतर, मोबाईल लोकेशनच्या आधारे शोध घेतला असता नांदखेडा रोडवरील एका खड्ड्यात शिवाजी यांचा मृतदेह पालथ्या अवस्थेत पडलेला आढळून आला.

तीव्र उन्हाने शरीर पोळले; पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद

शिवाजी यांचा मृतदेह सापडला तेव्हा त्यांचे शरीर कडक झाले होते आणि पाठ व हातावर तीव्र उन्हामुळे त्वचा करपल्याचे व्रण दिसत होते. त्यांच्या नाकातून आणि तोंडातून रक्त येत असल्याचेही प्रत्यक्षदर्शींनी पाहिले. विटभट्टी मालक देशमुख यांच्या गाडीतून त्यांना तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. या घटनेनंतर महादेव बबन कांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नानलपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Saturday, April 25, 2026

टोकवाडी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी

*जय हिंद सामाजिक प्रतिष्ठानचा स्तुत्य   उपक्रममाने जयंती साजरी 

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जय हिंद सामाजिक प्रतिष्ठानचा सामाजिक उपक्रमाने साजरी करण्यात आली यावेळी 
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती टोकवाडी येथे मोठ्या उत्साहात  साजरी करण्यात आली.
यावेळी गावात मिरवणुक दरम्यान उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन जय हिंद सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने मोफत  पाण्याच्या बॉटल चे वाटप करण्यात आले यावेळी टोकवाडी चे माजी सरपंच मारोतरावजी मुंडे गुरुजी, नाथराव दादा मुंडे,  संभाजी मुंडे योग प्रशिक्षक,विवेकानंद हॉस्पिटलचे संचालक डॉ. भरत मुंडे साहेब ,भाजपा तालुका उपाध्यक्ष संजय मुंडे सर, युवा नेते तुकाराम टी.डी.मुंडे, टोकवाडी ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच बंडूभाऊ काळे डॉ. संदीपान काळे, सोपान तात्या मुंडे, श्रीराम मुंडे,ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य तुकाराम भक्तराम मुंडे, युवा उद्योजक अर्जुन मुंडे,ज्येष्ठ नेते महादेव आण्णा मुंडे , श्रीनिवास मुंडे,प्रदीप घुले, माउली फड, राजाभाऊ गित्ते,गणेश नागरगोजे,दिलीप भालेराव,भरत रोडे , पंडितराव रोडे,अमर रोडे , साहेबराव रोडे, माजी उपसरपंच सुरेश रोडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.*

केजमध्ये गरिबांचा घरकुल निधी गायब ४ कोटींचा घोटाळा; निवृत्त मुख्याधिकाऱ्या सह ६ जणांवर गुन्हा.

असा झाला ४ कोटींचा 'डबल गेम

'२० मे २०२१ ते ३१ जानेवारी २०२२ या कालावधीत तत्कालीन मुख्याधिकारी मिलिंद सावंत यांनी लेखापाल आणि इतर कर्मचाऱ्यांच्या संगनमताने हा निधी नियबाह्य पद्धतीने वापरला. केंद्र आणि राज्य सरकारकडून प्राप्त झालेला निधी केवळ पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावर वर्ग करणे बंधनकारक असताना, तो इतर अनधिकृत खात्यांवर वळवण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांनी नेमलेल्या उपविभागीय अधिकारी दीपक वजाळे यांच्या समितीने सखोल चौकशी केल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

गुन्हा दाखल झालेले आरोपी.

मुख्याधिकारी अजित ढोपे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी खालील सहा जणांवर गुन्हा नोंदवला आहे:१. मिलिंद सावंत (तत्कालीन मुख्याधिकारी, सेवानिवृत्त)२. असद इसाकोद्दीन खतीब (तत्कालीन लेखापाल)३. लक्ष्मण मारुती जगताप (कंत्राटी लेखापाल सहाय्यक)४. भास्कर एकनाथ ससाणे (व्हॅल्वमन)५. भीमराव शामराव मस्के६. बाशेद वलियोद्दीन काझी

कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेनंतर ऊसतोड मजूर महिलांवर जमिनीवरच उपचार कामा ला जायचे असल्यान रुग्णाचा आग्रह !


केज (प्रतिनिधी):बीड जिल्ह्याचा कणा असलेल्या ऊसतोड मजुरांच्या नशिबी असलेली परवड काही केल्या संपण्याचे नाव घेत नाही. कष्टाचे डोंगर उपसून ऊसतोडीचा हंगाम संपवून परतलेल्या महिला मजुरांना आता सरकारी दवाखान्यातही अपमानास्पद वागणूक मिळत आहे. केज तालुक्यातील विडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेनंतर पाच महिलांना चक्क जमिनीवर झोपवून उपचार केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. या घटनेने आरोग्य विभागाचे ढिसाळ नियोजन चव्हाट्यावर आले आहे.

बेड १० आणि रुग्ण १५; नियोजन शून्य !
२२ एप्रिल रोजी विडा आरोग्य केंद्रात कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात एकूण १५ महिलांच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. मात्र, आरोग्य केंद्रात केवळ १० बेड उपलब्ध होते. उर्वरित पाच महिलांना शस्त्रक्रियेसारखी गंभीर प्रक्रिया पार पडल्यानंतर चक्क जमिनीवर झोपवण्यात आले. संसर्गाचा मोठा धोका असतानाही, या महिलांना अशा असुरक्षित स्थितीत ठेवणे म्हणजे त्यांच्या जिवाशी खेळण्याचाच प्रकार आहे.

प्रशासनाकडून अजब 'सारवासारव'.

या प्रकरणाची माहिती पसरल्यानंतर प्रशासनाने अजब तर्क मांडण्यास सुरुवात केली आहे. "त्या महिलांनीच आम्हाला जमिनीवर उपचार चालतील, असे सांगितले होते," असा दावा वैद्यकीय अधिकारी डॉ. रोहन गायकवाड यांनी केला आहे. मात्र, रुग्ण असुविधा असतानाही उपचार करा म्हणत असेल, तर डॉक्टर आपली जबाबदारी झटकून रुग्णाला धोकादायक स्थितीत ठेवू शकतात का? हा खरा प्रश्न आहे.

आरोग्य मंत्र्यांकडूनही विचारणा.

या प्रकाराची आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनीही दखल घेतली. त्यांनी थेट महिला रुग्णांशी संवाद साधला. मात्र, त्याआधीच या महिलांना प्रशासनाकडून "काय बोलावे" याचे प्रशिक्षण दिल्याचा संशय व्यक्त होत आहे. त्यामुळे मंत्र्यांकडे तक्रार झाली नसल्याची चर्चा आहे. आता आबिटकर कारवाई करणार की, डॉक्टरांच्या खुलाशावर समाधान मानून त्यांना पाठीशी घालणार, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

महिलांनीच आग्रह धरला.

१५ पैकी ५ महिलांना गादी टाकून उपचार केले. संसर्ग होणार नाही, याची काळजी घेतली. महिलांनीच कामाला जायचे असल्याने आग्रह धरला होता. आरोग्य मंत्री यांनीही फोनवरून महिला रुग्णांशी संवाद साधला आहे.-डॉ. रोहन गायकवाड, वैद्यकीय अधिकारी, विडा ता. केज.

Thursday, April 23, 2026

महावितरणमध्ये खळबळ! १८ हजार लाच स्वीकारणाऱ्या महावितरणच्या महिला अभियंता ए.सी.बीच्या अटकेत.


आष्टी (प्रतिनिधी): राज्यात एकीकडे सौर ऊर्जेला प्रोत्साहन देण्यासाठी विविध सवलती दिल्या जात असताना  महावितरणचे अधिकारी मात्र याच प्रकल्पांच्या नावाखाली वसुली करत असल्याचे उघड झाले आहे. आष्टी येथील महावितरण कार्यालयातील सहायक अभियंता कोमल अर्जुन शिंदे यांना १८ हजार रुपयांची लाच स्वीकारताना बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) मंगळवारी दुपारी रंगेहात अटक केली.

तक्रारदाराने आपल्या सोलर प्रकल्पाची पडताळणी करून देण्याची विनंती केली होती. हे काम करण्यासाठी कोमल शिंदे यांनी १८ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. तक्रारदाराने याबाबत बीड एसीबीकडे तक्रार दाखल केली. तक्रारीची शहनिशा केल्यानंतर एसीबीने आष्टी येथील कार्यालयात सापळा रचला. मंगळवारी दुपारी जसा तक्रारदाराने पैसे देण्याचा प्रयत्न केला, तसा दबा धरून बसलेल्या पथकाने कोमल शिंदे यांना रंगेहात पकडले.

महावितरणमध्ये खळबळ.

बीड एसीबीचे उपअधीक्षक सोपान चिटमपल्ले आणि त्यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली. एका महिला अधिकाऱ्याला अशा प्रकारे लाच घेताना अटक झाल्यामुळे महावितरण विभागात मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Wednesday, April 22, 2026

१५ ऑगस्टपर्यंत रेल्वे सुरू झालीच पाहिजे रस्त्यातील ब्लॅकस्पॉट कमी करा.रेल्वे व महामार्ग आढावा बैठकीत खा.बजरंग सोनवणे यांच्या अधिकाऱ्यांना निर्देश

बीड (प्रतिनिधी) मागील दोन वर्षात रेल्वे कामाला गती दिलेली आहे. आता रेल्वेचे काम युध्द पातळीवर करून १५ ऑगस्ट २०२६ पर्यंत पुणे ते परळी रेल्वे धावलीच पाहिजे, शिवाय बीड जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गासहित ग्रामीण मार्गावरील ब्लॅकस्पॉट कमी करण्यासाठी अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत, असे निर्देश खा.बजरंग सोनवणे यांनी रेल्वे व राष्ट्रीय महामार्ग आढावा बैठकीत वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन विभागाच्या हॉलमध्ये रेल्वे आणि राष्ट्रीय महामार्ग आढावा बैठकीचे आयोजन केले होते. बैठकीत विविध प्रलंबित कामे, भूसंपादन, निकृष्ट दर्जा, अपघातप्रवण ठिकाणे व नागरिकांच्या अडचणी यांसह सर्वच मुद्द्यांवर सखोल चर्चा करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, रेल्वे व राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी उपस्थित होते. खा.बजरंग सोनवणे यांनी बैठकीत अंबाजोगाई, केज, नेकनूर, मांजरसुंबा, पाटोदा व माजलगाव शहरांभोवती बायपास व उड्डाणपूल उभारण्याचा मुद्दा उपस्थित केला. अपघातप्रवण ठिकाणांची तातडीने दुरुस्ती, पिंपळा धायगुडा-लोखंडी सावरगाव-केज-मांजरसुंबा-पाटोदा-चुंबळी फाटा हा रस्ता दुहेरी करणे, तसेच अंबाजोगाईतील यशवंतराव चव्हाण चौकात फूटओव्हर ब्रिज उभारण्याची गरज अधोरेखित करण्यात आली. सुरत-चेन्नई राष्ट्रीय महामार्गासाठी आवश्यक भूसंपादनाची सद्यस्थितीही तपासण्यात आली. खरवंडी-मादळमोही-पाडळसिंगी-गढी-माजलगाव मार्गावरील खराब रस्त्यामुळे होत असलेल्या अपघातांबाबत तक्रारी येत आहेत. तालखेड फाटा, शृंगारवाडी फाटा यांसह विविध ठिकाणी तातडीने दुरुस्ती करण्याचे निर्देश देण्यात आले. माजलगाव-धारूर-केज (रामा ५४८ सी) रस्त्याचा दर्जा अत्यंत खराब असल्याने संबंधित एजन्सीकडून तातडीने दुरूस्ती करण्याचे निर्देश देण्यात आले. धारूर घाटातील थेटेगव्हाण पर्यायी मार्ग, तसेच बर्दापूर-लोखंडी सावरगाव दुहेरीकरणाच्या निविदांबाबत माहिती घेण्यात आली. पाटोदा व आष्टी तालुक्यातील अंमळनेर-टाकळी काजी तसेच गेवराईतील राक्षसभुवन फाटा-उमापूर-शेवगाव या रस्त्यांना राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला.
००
पालखी मार्गाबाबत नाराजी
१ पैठण-पंढरपूर मार्गावरील डोंगरकिन्ही ते पारगाव (अनपटवाडी) या भागातील अत्यंत खराब रस्ता, मळेकर घाटातील अपूर्ण कामे, मोठ्या भेगा व अपघातांची मालिका यावर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.
२ पाटोदा शहरातील अपूर्ण रस्ता काम निकषानुसार पुन्हा करण्याचे, एजन्सीवर कारवाई व अनावश्यक खर्चाची चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आले.
००
खोदलेल्या रस्त्याकडे लक्ष
माजलगाव तालुक्यातील सादोळा येथे खोदलेला रस्ता तातडीने सुरू करण्याचे, तेलगाव येथे साचणारे पावसाचे पाणी काढण्याचे, तसेच मांजरसुंबा-अंबाजोगाई मार्गावरील खड्डे बुजवून रस्ता समपातळीवर आणण्याचे आदेश देण्यात आले.
००
रेल्वे कामांचा घेतला सखोल आढावा
रेल्वे विभागाच्या आढाव्यात अहमदनगर-बीड-परळी रेल्वेमार्गाच्या सर्व टप्प्यांवरील कामांचा सखोल आढावा घेण्यात आला. ३१ मे पर्यंत परळीपर्यंत रेल्वे ट्रॅक आणि जून महिन्यात रेल्वे चाचणी होणे अपेक्षित आहे.आष्टी स्थानकास वीज जोडणी, बीड-वडवणी, वडवणी-सिरसाळा व सिरसाळा-परळी या टप्प्यांतील सिव्हिल वर्क, भूसंपादन, अर्थवर्क व रुळ अंथरण्याच्या कामांबाबत माहिती घेण्यात आली. बीड-नगर-मुंबई व बीड-नगर-पुणे इंटरसिटी सेवा सुरू करण्याची मागणी करण्यात आली. आष्टी, पाटोदा, शिरूर व बीड तालुक्यातील अनेक गावांमध्ये रोड ओव्हर ब्रिज उभारण्याची गरज मांडण्यात आली असून, त्यासाठी प्रस्तावांची सद्यस्थिती विचारण्यात आली. बार्शीनाका येथे अतिरिक्त रेल्वे थांबा, पालवन व बार्शी नाका स्थानकांसाठी पार्किंग सुविधा, तसेच सर्व स्थानकांसाठी सोलर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचे निर्देश देण्यात आले. उस्मानाबाद-बीड-औरंगाबाद नवीन रेल्वेमार्ग सर्वेक्षण, प्रकल्पाची व्यवहार्यता, तसेच प्रलंबित भूसंपादन प्रकरणे तातडीने निकाली काढण्यावर भर देण्यात आला.
००
गंभिर मुद्दयावरही फोकस
विविध गावांमध्ये रेल्वेमुळे शेतीमाल वाहतुकीस अडथळे, पुलाखाली साचणारे पाणी, रस्त्यांचे अपूर्ण काम, लाईटची सुविधा नसणे, तसेच भूसंपादनातील अनियमितता व भ्रष्टाचाराबाबतही गंभीर मुद्दे उपस्थित करण्यात आले. रायमोहा, शिरापूर, मोरजळवाडी, गोमळवाडा, विघ्नवाडी, नागरेचीवाडी आदी ठिकाणांतील स्थानिक समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले.
००
बीडमधील रस्त्यांच्या कामाबाबत अधिकारी फैलावर
बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते बार्शी नाका रस्त्याचे काम अतिषय संत गतीने सुरू असल्यामुळे खा.बजरंग सोनवणे यांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. माझ्या बीडमधील लोकांना होत असलेला त्रास तात्काळ कमी केला नाही तर कोणाचीही गय करणार नाही, असा इशारा दिला.
००
घाटनांदूर रेल्वेथांब्यासाठी प्रस्ताव द्या
घाटनांदूर रेल्वे स्टेशनवर विविध रेल्वेंना थांबा देणे आवश्यक असून त्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी रेल्वे थांबा देणेबाबत तातडीने केंद्राकडे प्रस्ताव सादर करावा, त्यासाठी मी पाठपुरावा करेल, अशा सुचना खा.सोनवणे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

Tuesday, April 21, 2026

एसीबीच्या छत्रपती संभाजीनगर पथकाची कारवाई.जालन्यात कृषी अधिकारी, बीड मध्ये ग्रामविकास अधिकारी एसीबीची जाळ्यात.


जालना (प्रतिनिधी): शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी लाचेची मागणी करणाऱ्या शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. बोरगाव (खु.) येथील सहायक कृषी अधिकारी राजकुमार मोतीराम खिल्लारे (४८) याला ५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. या प्रकरणी त्याला प्रोत्साहन देणारा खासगी इसम ज्ञानेश्वर उर्फ माउली पवार याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अनुदानासाठी लाचेची मागणी.

तक्रारदाराने आपल्या शेतात लावलेल्या आंबा बागेचे शासनाकडून मिळणारे अनुदान मिळवण्यासाठी 'कुशलचे मस्टर' ऑनलाईन करणे आवश्यक होते. हे काम करण्यासाठी खिल्लारे याने ५ हजार रुपयांची मागणी केली. तक्रारदाराने जालना एसीबीकडे धाव घेतल्यावर सोमवारी सापळा रचण्यात आला. पैसे स्वीकारताच दबा धरून बसलेल्या पथकाने खिल्लारे आणि पवार या दोघांनाही बेड्या ठोकल्या. त्यांच्याकडून लाचेची रक्कम, मोबाईल आणि एटीएम कार्ड जप्त करण्यात आले आहे.

बीडमध्येही ग्रामविकास अधिकाऱ्यावर कारवाई.

एसीबीच्या छत्रपती संभाजीनगर पथकाने केवळ जालन्यातच नव्हे, तर बीड जिल्ह्यातही मोठी कारवाई केली. गेवराई तालुक्यातील तलवाडा येथील ग्रामविकास अधिकारी सोपान नामदेव मुसळे (४८) यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दुहेरी कारवाईमुळे महसूल आणि ग्रामविकास विभागात मोठी खळबळ उडाली आहे.

परळी रेल्वे स्टेशन जवळ रेल्वे खाली येऊन एका युवकाचे दोन्ही पाय निकामी.

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) - रेल्वे स्टेशन नजीक असणाऱ्या रेल्वे उड्डाण पुला जवळ एक युवक गाडीतून खाली उतरत असताना तो अनावधान्याने गाडीखाली गेला आणि त्याचे दोन्ही पाय या अपघातात कटले. 

निजामबाद एक्सप्रेसगाडी नंबर 11414  पंढरपूर हुन परळीच्या दिशेने येणाऱ्या गाडीतून स्थानका नजीक असलेल्या पुला जवळ वेग कमी झाल्यास खाली उतरण्याच्या प्रयत्नात सदर युवक गाडीखाली आला आणि गुडघ्यापासून खाली त्याचे दोन्ही पाय निकामी  झाले.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर अपघातग्रस्त तरुणाचे नाव शेख  समीर शेख हसन रा. गंगाखेड, असे आहे .सदर तरुणास उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करून अधिक उपचारासाठी स्वामी रामानंद रुग्णालय तथा वैद्यकीय महाविद्यालय येथे दाखल करण्यात आले आहे.सदर घटनेचा अधीक तपास परळी रेल्वे पोलीस करत असल्याची माहिती सपोनी सोमनाथ वाघमोडे यांनी  दिली.
.....................

◾सदर युवक या गाडीतून प्रवास करत होता की त्याने स्टेशन नजीक आत्महत्येचा प्रयत्न केला याबाबत संभ्रम  आहे. घटनास्थळी वेगवेगळ्या चर्चा चालू होत्या.

राज्यातील अतिरिक्त 30,000 शिक्षकांच्या नोकरीवर टांगती तलवार!


मुंबई (प्रतिनिधी) राज्यात एका बाजूला शेकडो शाळा अत्यल्प पटसंख्या असूनही सुरू आहेत, तर त्याच वेळी अत्यल्प पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये शिक्षकसंख्या मोठी आहे. परिणामी, कमी पट असलेल्या शाळांचे अस्तित्व आणि शिक्षकांच्या नोकऱ्या या दोन्ही गोष्टी धोक्यात आल्या आहेत. ‌‘कमी विद्यार्थी आणि अधिक शिक्षक‌’ अशा विसंगत परिस्थितीमुळे अनुदानित तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांतील शाळांतील 30 हजारांवर शिक्षकांना अतिरिक्त होण्याची भीती आहे.

राज्यात एकूण 1 लाख 8 हजार 35 शाळांमध्ये तब्बल 7 लाख 46 हजार 377 शिक्षक कार्यरत आहेत आणि तब्बल 2 कोटींहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. ही आकडेवारी समाधानकारक वाटत असली, तरी प्रत्यक्षात चित्र वेगळे आहे.

अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या अत्यल्प असताना शिक्षकांची संख्या अधिक असल्याचे कारण देत शालेय शिक्षण विभागाकडून 15 मार्च 2024 च्या शासन निर्णयानुसार 20पेक्षा कमी विद्यार्थी असलेल्या शाळांतील शिक्षकांना अतिरिक्त ठरवले जात आहे. अतिरिक्त व समायोजन झालेल्या शिक्षकांचे वेतन रोखण्याचेही प्रकार आता शालेय शिक्षण विभागाकडून सुरू झाले आहेत. सध्या सुरू असलेली ‌‘पटपडताळणी‌’ मोहीम 22 एप्रिलपर्यंत चालणार आहे.

या ‌‘पटपडताळणी‌’नंतर मोठ्या प्रमाणावर शिक्षक समायोजन होण्याची शक्यता असून, कमी पट असलेल्या शाळांतील तब्बल 80 हजार शिक्षकांचे समायोजन होईल, अशी भीती आहे. विशेषतः ग्रामीण भागातील शाळा, जिथे आधीच विद्यार्थीसंख्या घटली आहे, त्या शाळांवर याचा मोठा परिणाम होईल. अशा शाळा बंद होण्याची किंवा त्यांची समूह शाळा होण्याची शक्यता अधिक आहे.

" कुटुंब नियोजनामुळे कुटुंबात एक किंवा दोन शिकणारी मुले आहेत. ग्रामीण भागात शिकलेले पालक शहराकडे स्थलांतरित झाले किंवा त्यांची मुले शहरांत शिकत आहेत. यातून ग्रामीण शाळांतील विद्यार्थी संख्या कमी होत चालली आहे. पटसंख्या राखण्यात येणाऱ्या अडचणी समजून घेणे महत्त्वाचे आहे.
-महेंद्र गणपुले, माजी उपाध्यक्ष मुख्याध्यापक संघटना
" पहिली ते पाचवीचे वर्ग असताना दोन शिक्षक असण्यात चुकीचे काय? कमी पटसंख्येच्या शाळेत दोन शिक्षक आहेत म्हणजे खूपच शिक्षक आहेत ही भूमिकाच चुकीची आहे.सहावी ते आठवीची पटसंख्या 20 पर्यंत असल्यास नवीन संचमान्यता धोरणानुसार गणित-विज्ञान विषय पदवीधर शिक्षकाचे एकच पद, उर्वरित तीनही भाषा आणि समाजशास्त्र याकरिता एकच शिक्षक हे कसे? सर्वच विषय एकाच शिक्षकाने शिकविण्यातून गुणवत्तापूर्ण विद्यार्थी घडवणे शक्य तरी आहे का?
-विजय कोंबे, राज्याध्यक्ष, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती

 शिक्षण विभागाकडून मिळवलेल्या आकडेवारीनुसार वर्गात बोटावर मोजण्याइतके विद्यार्थी असताना शाळा सुरू असल्याचे चित्र आहे. राज्यात 1 ते 10 विद्यार्थी पटसंख्या असलेल्या तब्बल 7 हजार 769 शाळा सुरू असून या शाळांमध्येच 12 हजार 717 शिक्षक कार्यरत आहेत, तर 11 ते 20 पटसंख्येच्या 11 हजार 107 शाळांमध्ये 21 हजार 740 शिक्षक आहेत, 21 ते 30 विद्यार्थ्यांचा पट असलेल्या 12 हजार 507 शाळांमध्ये तब्बल 26 हजार 697 शिक्षक कार्यरत आहेत. ग्रामीण आणि दुर्गम भागांत विद्यार्थ्यांची संख्या सातत्याने घटत असताना, त्या तुलनेत शिक्षकांची संख्या फारशी कमी झालेली नाही.

Saturday, April 18, 2026

तहसीलदार गिड्डे यांच्या मृत्यूचे गूढ वाढले. मोबाईल-लॅपटॉप गायब कारची अदलाबदल! तपास आता गुन्हे शाखेकडे!


केज(प्रतिनिधी) केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांच्या अपघाती निधनाचे सस्पेन्स दिवसेंदिवस गडद होत चालले आहे. पहाटेच्या अंधारात टोलनाका ओलांडताना गाडीत असलेली 'ती' रहस्यमय दुसरी व्यक्ती आणि अपघातानंतर घटनास्थळावरून गायब झालेला मोबाईल, लॅपटॉप व टॅब यामुळे या प्रकरणाला आता गंभीर वळण मिळाले आहे. या घटनेचे गांभीर्य ओळखून लातूरचे पोलिस अधीक्षक अमोल तांबे यांनी हा तपास रेणापूर पोलिसांकडून थेट स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला आहे.

तपासातील सर्वांत धक्कादायक बाब म्हणजे वाहनांची अदलाबदल. बुधवारी (दि. ८) रात्री साडेआठ वाजता अंबाजोगाई-लातूर महामार्गावरील सेलूअंबा टोलनाका ओलांडताना जी कार सीसीटीव्हीत कैद झाली आणि ज्या कारचा रेणापूरजवळ भीषण अपघात झाला, त्या दोन्ही कार वेगवेगळ्या असल्याचे निष्पन्न झाले आहे. तहसीलदारांसारख्या जबाबदार अधिकाऱ्याला प्रवासात कार बदलण्याची गरज का भासली? या प्रवासात त्यांच्यासोबत तिसरी व्यक्ती दुसरी कार घेऊन चालली होती का, यादृष्टीने आता गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुधाकर भावसार तपास करत आहेत.

'त्या' सोबत्याचा शोध घेण्याचे आव्हान.

टोलनाक्यावरील फुटेजमध्ये तहसीलदार गिड्डे यांच्या बाजूला एक व्यक्ती बसलेली दिसत आहे. मात्र, अपघातानंतर केवळ गिड्डे यांचाच मृतदेह सापडला. ती दुसरी व्यक्ती कोण आणि अपघाताच्या वेळी ती कुठे होती, याचा शोध घेणे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे. दरम्यान, गिड्डे यांचे बंधू अक्षय गिड्डे यांनी या प्रकरणाच्या सखोल तपासाची मागणी केली होती, त्यानंतरच हा तपास गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला आहे.

तपासातील चार प्रमुख संशयास्पद दुवे.

साहित्याची चोरी : अपघातानंतर गिड्डे यांचा मोबाईल, लॅपटॉप आणि टॅब गायब होणे घातपाताची शक्यता वर्तवते.वाहनांची अदलाबदल : टोलनाका ओलांडलेली कार आणि अपघात झालेली कार वेगळी असणे हा तपासातील मुख्य केंद्रबिंदू आहे.मिस्टर 'एक्स' कोण?: प्रवासात सोबत असलेली दुसरी व्यक्ती अपघातानंतर बेपत्ता कशी झाली?दोन कारचे गूढ : प्रवासात तहसीलदारांसोबत दुसरी एक कार पाठलागावर किंवा सोबतीला होती का?

सखाेल तपासानंतर अधिक स्पष्टता येईल.

केज येथील तहसीलदार राकेश गिड्डे यांच्या अपघाताचा तपास स्थानिक गुन्हे शाखा करत आहे. वेगवेगळ्या बाजूंनी सखाेल तपास केला जात असून, घटनाक्रम आणि अपघात, अशा दाेन्ही बाबींची पडताळणी केली जात आहे. तपास पूर्ण झाल्यानंतर याबाबत अधिक स्पष्टता समाेर येईल.-अमाेल तांबे, पाेलिस अधीक्षक, लातूर

आष्टीत मंदिरामागे हॉटेल कामगाराचा संशयास्पद मृतदेह.नैसर्गिक मृत्यू की घातपात? पोलिसांचा तपास सुरू .


आष्टी (प्रतिनिधी): आष्टी येथील बाबाजी कुस्ती संकुलासमोरील शिवमंदिराच्या पाठीमागे शनिवारी सायंकाळी एका ४७ वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे. गजानन लोडबाजी साबळे (४७) असे मृत व्यक्तीचे नाव असून, ते मूळचे यवतमाळ जिल्ह्यातील रहिवासी आहेत. दर्शनासाठी गेलेल्या एका भाविकाला हा मृतदेह दिसल्यानंतर ही घटना उघडकीस आली.

पोलीस पथकाची घटनास्थळी धाव.

घटनेची माहिती मिळताच आष्टी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद भुतेकर, सहायक पोलीस निरीक्षक विक्रांत हिंगे, विजय नरवाडे, उपनिरीक्षक कृष्णा शिंदे आणि पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मृताच्या खिशातील ओळखपत्रावरून त्याची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले. गजानन साबळे हे आष्टी तालुक्यातील एका हॉटेलवर कामगार म्हणून रुजू झाले होते, अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे.

मृत्यूचे कारण अस्पष्ट.

मृताचा देह शवविच्छेदनासाठी आष्टी येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. हा मृत्यू नैसर्गिक कारणाने झाला आहे की त्यामागे काही घातपात आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस सध्या ते कोणत्या हॉटेलवर कामाला होते आणि शनिवारी सायंकाळी ते मंदिराच्या पाठीमागे कसे पोहोचले, याचा शोध घेत आहेत.

जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर जन्मोत्सव निमित्त शोभायात्रेचे कल्याणकारी हनुमान मंदिर न्यू माणिकनगर येथे आयोजन.

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त कल्याणकारी हनुमान मंदिर येथे दि 15 ते 19 एप्रिल या कालावधीत आयोजित विविध कार्यक्रमांतर्गत सकाळी 10 ते 1 परमरहस्य पारायण ,दुपारी 1ते 3 महाप्रसाद व दुपारी 4 ते 6 
कल्याणकारी महिला भजनी मंडळ, इच्छापूर्ती महिला भजनी मंडळ, माणिक नगर महिला भजनी मंडळ ,बसवेश्वर महिला भजनी मंडळ,जिव्हेश्वर महिला भजनी मंडळ,सेवाभावी शंभू महादेव महिला भजनी मंडळ ,वैद्यनाथ महिला भजनी मंडळ,गुरुलिंगस्वामी महिला भजनी मंडळ,सुर्वेश्वर सेवाभावी महिला भजनी मंडळ ,शंभू महादेव महिला भजनी मंडळ,शिवकन्या महिला भजनी मंडळ,शनेश्वर महिला भजनी मंडळ या विविध महिला भजनी मंडळाचे भजनाचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याची सांगता आज दि 19 रोजी होणार असून त्यानिमित्ताने दुपारी 12वाजता  जगतज्योती महात्मा बसवेश्वर जन्मोत्सवाचा कार्यक्रम होणार असून त्यानंतर 1 ते 3 या दरम्यान महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी 6 वाजता भव्य अशी शोभायात्रा निघणार असून त्याचा मार्ग पुढीलप्रमाणे आहे कल्याणकारी हनुमान मंदिरापासून निघून माणिक नगर हनुमान चौक ती छत्रपती शिवाजी महाराज चौक , नाथ चित्र मंदिर हिंगलाज माता चौक (दोस्ती टी हाऊस )ते वडर कॉलनी परळी मार्गे परत कल्याणकारी हनुमान मंदिराकडे येणार आहे या शोभा यात्रेत सोलापूर येथील प्रसिद्ध कलापथक *वीरभद्र पुरवंत संघ* सहभागी होणार असून यात विविध महिला भजनी मंडळ व महिलांच्या पावलांचा कार्यक्रम होणार आहे या सर्व कार्यक्रमासाठी सर्व वीरशैव समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.
तरी सर्व समाज बांधवांनी जन्मोत्सव,महाप्रसाद व शोभायात्रेत सहभागी होण्याचे आवाहन वीरशैव लिंगायत समाज न्यू माणिकनगर परळी यांनी केले आहे.

Friday, April 17, 2026

उन्हाळी सुट्ट्यांत एसटी प्रवास महाग 10% भाडेवाढ 2रु. स्वच्छता अधिभार लागू !प्रवाशांची नाराजी .


मुंबई (प्रतिनिधी) उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर राज्य परिवहन महामंडळाने (एसटी) प्रवासी भाड्यात १० टक्के वाढ लागू केली असून, प्रत्येक तिकिटावर ₹२ स्वच्छता अधिभार आकारण्याचा निर्णय घेतला आहे. ही वाढ बुधवारपासून लागू झाली असून, प्रवाशांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

 काय आहे निर्णय?

एसटीकडून १०% भाडेवाढ लागू करण्यात आल्यानंतर प्रत्येक तिकिटावर ₹२ स्वच्छता अधिभार लावण्यात आला आहे. १५ एप्रिल ते १५ जून या कालावधीत उन्हाळी सुट्ट्यांतील वाढती गर्दी लक्षात घेऊन निर्णय

प्रवाशांची नाराजी 

यापूर्वीच एसटीने काही महिन्यांपूर्वी भाडेवाढ केली होती. त्यामुळे आता पुन्हा हंगामी वाढ केल्याने सर्वसामान्य नागरिकांवर आर्थिक ताण वाढल्याने कुटुंबासह प्रवास करणे महाग झाले आहे.लांब पल्ल्याच्या प्रवासाचा खर्च देखील वाढला आहे“भाडेवाढ झाली, पण सुविधा कुठे आहेत?” असा प्रश्न प्रवाशां कडून विचारला जात आहे ‌उन्हाळी सुट्ट्यांमध्ये गावी जाणारे प्रवासी
पर्यटनासाठी जाणारे नागरिक देवदर्शना साठी जाणारी गर्दी  यामुळे एसटी बसमध्ये प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते.

इंधन दरवाढ,बस देखभाल खर्च,अतिरिक्त सेवा व्यवस्थापन , या कारणांमुळे भाडेवाढ आवश्यक असल्याचे एसटी महामंडळा कडून सांगितले जात आहे.वाढत्या प्रवासी संख्येमुळे महसूल वाढून मागील नुकसान (दिवाळी काळातील) काही प्रमाणात भरून निघणार आहे

समस्या अजूनही कायम

्भाडेवाढ झाली असली तरीबसची स्वच्छता अपुरी,वेळेचे पालन नाही आरामदायी प्रवासाचा अभाव या समस्या जैसे थेच आहेत त्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजी अधिक वाढली आहे.

धक्कादायक घटना रेल्वे पोलीस कर्मचाऱ्या चा संशयास्पद मृत्यू, कारण अस्पष्ट.


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) येथे रेल्वेमध्ये कार्यरत असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज सकाळी उघडकीस आली. ही घटना माधवबाग परिसरातील भाड्याच्या घरात घडली असून परिसरात खळबळ उडाली आहे.

काय घडलं नेमकं?

मिळालेल्या माहितीनुसार, मयत पोलीस कर्मचारी नितीन पंडित ढगे वय ३०, रा. लोहारा ता. लोहारा जि. धाराशिव त्यांचे अवघ्या आठवडाभरात लग्न होतं.ते काही दिवस सुट्टीवर गावी आले होते. त्यानंतर ते पुन्हा परळी येथे नोकरीवर रुजू झाले. मात्र आज सकाळी त्यांच्या राहत्या घरात त्यांचा मृतदेह आढळून आला.
प्राथमिक माहितीनुसार, कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून त्रास होत असल्याची चर्चा समोर येत आहे. मात्र, त्यांनी हे टोकाचं पाऊल का उचललं, याबाबत अद्याप अधिकृत कारण स्पष्ट झालेले नाही.

पोलिसांचा तपास सुरू

घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला उत्तरीय तपासणीसाठी पार्थिव उपजिल्हा रुग्णालय, परळी येथे पाठवण्यात आलंसर्व बाजूंनी तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली

अनेक प्रश्न अनुत्तरित

हा मृत्यू नेमका कशामुळे झाला?कामाच्या तणावाचा संबंध आहे का?कोणाचा दबाव किंवा छळ होत होता का? या सर्व प्रश्नांची उत्तरं अद्याप समोर आलेली नाहीत.

केज तालुक्यातील धक्कादायक प्रकार.८ वीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर ८ महिने अत्याचार, 'पोक्सो' अंतर्गत गुन्हा.


केज (प्रतिनिधी): तालुक्यातील एका गावात सालगडी म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीच्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर गेल्या आठ महिन्यांपासून सातत्याने अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आरोपी राहुल भालशंकर (रा. जि. बुलढाणा, ह.मु. केज) याने लग्नाचे आमिष दाखवून आणि वडिलांना जिवंत मारण्याची धमकी देऊन पीडितेचे लैंगिक शोषण केले. याप्रकरणी केज पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लग्नाचे आमिष अन् धमकीचा धाक.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी इयत्ता ८ वीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. तिचे वडील आणि आरोपी राहुल हे दोन्ही मूळचे विदर्भातील असून केज परिसरात वेगवेगळ्या शेतकऱ्यांकडे सालगडी म्हणून काम करतात. ओळखीचा फायदा घेत राहुलने १ सप्टेंबर २०२५ रोजी मध्यरात्री पहिल्यांदा अत्याचार केला. हा प्रकार कोणाला सांगितल्यास वडिलांना ठार मारण्याची धमकी दिल्याने पीडिता दहशतीत होती.

पिंक पथकाकडून तपास सुरू.

हा अत्याचाराचा सिलसिला १४ एप्रिल २०२६ पर्यंत सुरू होता. अखेर पीडितेने धाडस करून हा सर्व प्रकार सांगितल्यानंतर केज पोलिसांनी मंगळवारी दुपारी गुन्हा नोंदवला. आरोपी फरार असून पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंक पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक प्रकाश शेळके या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

गुटख्याची माहिती दिल्याच्या संशयावरून शिक्षकावर 'फायटर'ने हल्ला. माफियांवर 'मकोका' अंतर्गत कारवाईची मागणी.


केज (प्रतिनिधी): शहरातील गुटखा तस्करीची माहिती पोलिसांना दिल्याच्या संशयावरून लाखा येथील एका प्राथमिक शिक्षकाला दोन गुटखा माफियांनी फायटरने बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यात शिक्षक गंभीर जखमी झाले असून, गुटखा माफियांच्या वाढत्या दहशतीमुळे केज परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

लाखा येथील प्राथमिक शाळेचे सहशिक्षक मौसीन साबेर कुरेशी हे १४ एप्रिल रोजी सकाळी ११:३० च्या सुमारास नगरपंचायतीसमोर उभे होते. यावेळी मुजाहीद खैरूमिया कुरेशी आणि आबुजर खैरूमिया कुरेशी (दोघे रा. कुरेशी मोहल्ला, केज) हे तेथे आले. "आमच्या गुटख्याची माहिती पोलिसांना का दिलीस? तुझ्यामुळे आमचे नुकसान झाले आहे," असा जाब विचारत त्यांनी शिवीगाळ करत बेदम मारहाण सुरू केली.

जिवे मारण्याची धमकी.

आरोपींनी मौसीन कुरेशी यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करत हातातील लोखंडी 'फायटर'ने त्यांच्या तोंडावर, नाकावर आणि पोटावर गंभीर प्रहार केले. "पुन्हा पोलिसांना माहिती दिलीस, तर तुला जिवंत सोडणार नाही," अशी धमकी देऊन आरोपी पसार झाले. या प्रकरणी मौसीन कुरेशी यांच्या फिर्यादीवरून केज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस निरीक्षक स्वप्निल उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार महावीर सोनवणे तपास करत आहेत.

Thursday, April 16, 2026

राज्यातील पाच बड्या आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या दोन आठवड्यांत तिसरी वेळ.

मुंबई : राज्यातील पाच बड्या आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. बुधवारी सायंकाळी पाच वाजता त्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले. मागील दोन आठवड्यांत राज्यातील सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांची ही तिसरी वेळ आहे.

राज्यातील सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांची परंपरा या आठवड्यात देखील कायम राहिली आहे. फडणवीस यांनी राज्याचे सूत्रे हातात घेतल्यापासून कॅबिनेट बैठकीच्या दिवशी वा आसपास आठ-दहा अधिकाऱ्यांच्या बदल्याचे आदेश जारी होतात. या आठवड्यात देखील बदल्यांची परंपरा कायम राहिली आहे.

कोणत्या अधिकाऱ्यांच्या कुठे बदल्या?

१. डॉ. बी. एन. पाटील (आयएएस: नॉन-एससीएस: २०१४), संचालक, पर्यटन, मुंबई यांची प्रकल्प संचालक, रुसा, उच्च व तंत्रशिक्षण विभाग, मुंबई येथे बदली झाली आहे.

२. श्री मंगेश जोशी (आयएएस: एससीएस: २०१५), उपमहासंचालक, यशदा, पुणे यांची संचालक, पर्यटन, मुंबई येथे बदली झाली आहे.

३. श्री कुलदीप जंगम (आयएएस: आरआर: २०२०), मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर यांची अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, पिंपरी येथे बदली झाली आहे.

४. श्री कुशल जैन (आयएएस: आरआर: २०२२), प्रकल्प अधिकारी, आयटीडीपी, अहेरी आणि सहायक जिल्हाधिकारी, अहेरी उपविभाग, गडचिरोली यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर येथे बदली झाली आहे.

५. श्री रेवैया डोंगरे (IAS:RR:2023) सहायक जिल्हाधिकारी, भूम उपविभाग, धाराशिव यांना प्रकल्प अधिकारी, ITDP, पांढरकवडा आणि सहायक जिल्हाधिकारी, केळापूर उपविभाग, यवतमाळ म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; एकाच दिवशी ४० जणांना चावा, नागरिकांमध्ये भीती.


केज (प्रतिनिधी) येथील नगर पंचायतीच्या दुर्लक्षामुळे सोमवारी एका पिसाळलेल्या कुत्र्याने तब्बल ४० नागरिकांना चावा घेतल्यामुळे शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

सोमवारी या कुत्र्याने बसस्थानक परिसरात अक्षरशः धुमाकूळ घातला. दिसेल त्या व्यक्तीला हा कुत्रा चावा घेत होता. बसस्थानक परिसरासह मंगळवारपेठ, अजिजपुरा, भीमनगर, रोजा मोहल्ला भागातही या कुत्र्याने अनेकांना चावा घेऊन धुमाकूळ घातला. एक ते दोन तासांत तब्बल ४० जणांना कुत्र्याने चावा घेतल्यामुळे खळबळ उडाली. कुत्रा चावल्याने जखमी रुग्णांची येथील उपजिल्हा रुग्णालयात रेबीज इंजेक्शन घेण्यासाठी सोमवारी रांग लागली होती.

जखमी रुग्णांवर उपचार.

सोमवारी पिसाळलेल्या कुत्र्याने तब्बल ४० जणांना चावा घेतला होता. या सर्व जखमी रुग्णांना केज येथील उपजिल्हा रुग्णालयात रेबीज इंजेक्शन दिल्याचे व दहा रुग्णांना कुत्र्याने जास्त ठिकाणी चावा घेतल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी स्वाराती रुग्णालयात पाठविल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. दत्तात्रय केंद्रे यांनी  सांगितले.

कार्यालयात मोकाट कुत्रे सोडणार..!

केज शहरातील मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यांचा बंदोबस्त नगर पंचायतीने करण्याची मागणी केज विकास संघर्ष समितीने केली आहे. याची दखल त्यांनी न घेतल्यास नगर पंचायतीच्या कार्यालयात शहरातील सर्व मोकाट कुत्रे आणून सोडण्याचा इशारा समितीचे तालुकाध्यक्ष प्रा. हनुमंत भोसले यांनी दिला.

कुत्रा चावल्यास काय करावे?

तात्काळ जखम धुवा: कुत्रा चावल्यानंतर ती जागा नळाच्या वाहत्या पाण्याखाली साबणाने किमान १० ते १५ मिनिटे स्वच्छ धुवावी.घरगुती उपचार टाळा: जखमेवर मिरची, हळद किंवा तेल लावणे टाळावे.रेबीज इंजेक्शन: वेळ न घालवता २४ तासांच्या आत जवळच्या शासकीय रुग्णालयात जाऊन रेबीज प्रतिबंधक लस घ्यावी.निरिक्षण: चावा घेणाऱ्या कुत्र्यावर १० दिवस लक्ष ठेवावे.

Wednesday, April 15, 2026

दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांचे सी.बी.एस.ई बोर्ड परीक्षेत घवघवीत यश.


परळी वैजनाथ (प्रतिनिधी)दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सी.बी.एस.ई बोर्ड परीक्षेत नेत्रदीपक कामगिरी करून १००% निकालाची परंपरा कायम राखली आहे. फेब्रुवारी- मार्चमध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत दहावीतील ८५ विद्यार्थ्यांचा सहभाग होता. परळी तालुक्यातून सी.बी.एस.ई बोर्ड परीक्षेत यशराज बेंबलगे(९८%) या विद्यार्थ्याने प्रथम येऊन शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

सदरील परीक्षेत शाळेतील १५ विद्यार्थ्यांनी ९० टक्केपेक्षा जास्त मार्क्स मिळविले आहेत. यामध्ये यशराज बेंबलगे(९८%), रुद्राक्ष गुट्टे(९६%), वैष्णवी जाधव(९६%), तेजस्विनी गुट्टे(९५.६०%), श्रेयश बळवंत(९५.२०%),तन्मय बेंबलगे(९३.८०%), अमरनाथ कराड(९३.६०%), प्रथमेश लहाने(९२.८०%), अनुष्का नागरगोजे(९२.४०%), कपिल सावंत (९२.२०%), सार्थक केंद्रे (९१.८०%), वैष्णवी मुंडे(९१.४०%), अभिलाषा दहिवाळ (९१.२०%), नंदिनी चाटे (९०.६०%), आकांक्षा गुट्टे (९०.२०%)यांचा समावेश आहे. तसेच ८०% ते ९०% यादरम्यान२७ व ७०%  ते ८०% यादरम्यान २५ विद्यार्थी आहेत.
शाळेतील काही विद्यार्थ्यांनी विविध विषयामध्ये  100 पैकी 100 गुण मिळवून विशेष प्राविण्य मिळविले आहे. यामध्ये संस्कृत विषयांमध्ये यशराज बेंबलगे, प्रथमेश लहाने, श्रेयश बळवंत व मराठी आणि सामाजिक शास्त्र या विषयांमध्ये वैष्णवी जाधव यांचा समावेश आहे. तसेच गणित या विषयांमध्ये यशराज बेंबलगे(९५),प्रथमेश लहाने(९०), श्रेयश बळवंत(८९), इंग्रजीमध्ये  यशराज बेंबलगे(९८),आकांक्षा गुट्टे (९८), वैष्णवी जाधव (९८), विज्ञानमध्ये यशराज बेंबलगे(९५), तेजस्विनी गुट्टे (९२), रुद्राक्ष गुट्टे(९२), मराठीमध्ये वैष्णवी जाधव (१००),अन्वी मुंडे (९९),रुद्राक्ष गुट्टे(९८), संस्कृतमध्ये यशराज बेंबलगे(१००), प्रथमेश लहाने(१००), श्रेयश बळवंत(१००), हिंदीमध्ये प्रणव मोडीवाले(९२), पार्थ बडे(९१), राधिका मुरकुटे(९१), प्रथमेश काळे(९१), सामाजिक शास्त्रामध्ये वैष्णवी जाधव(१००), यशराज बेंबलगे(९९), राधिका मुरकुटे(९७) तर आय.टी.मध्ये यशराज बेंबलगे(९८), रुद्राक्ष गुट्टे (९८), श्रेयस बळवंत(९८), वैष्णवी मुंडे(९८), नंदिनी चाटे(९८), श्रेयश मुंडे(९८) गुण मिळविले आहेत. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल सर्वच स्तरातून कौतुकांचा वर्षाव होत आहे.
सी.बी.एस.ई बोर्ड परीक्षेत सर्वच विद्यार्थ्यांनी उत्तुंग यश संपादन केल्यामुळे विवेकानंद युथ वेल्फेअर सोसायटीच्या अध्यक्षा सौ.उषा किरण गित्ते मॅडम ,शाळेचे मार्गदर्शक व प्रेरणास्त्रोत मा.श्री.किरण गित्ते साहेब IAS (सचिव,त्रिपुरा सरकार) व शाळेचे प्राचार्य मा.श्री.श्रीकांत पाटील सर यांनी सर्व विद्यार्थी, पालक व शिक्षकांचे अभिनंदनही केले. तसेच इयत्ता दहावीतील सर्व विद्यार्थ्यांना भावी वाटचालीस शुभेच्छाही दिल्या.

आधुनिक सीबीएसई शिक्षण पध्दती पालक,विद्यार्थी आणी काळाची गरज.


आधुनिक शिक्षण पध्दती ही काळाची गरज आहे आपल्या मुलासाठी CBSE का निवडावे? प्रत्येक पालकाला माहित असायला हवे की त्याचे आपलेला व आपल्या पाल्यांना प्रमुख फायदे.काय 
योग्य शिक्षण मंडळाची निवड करणे हा प्रत्येक पालकासाठी सर्वात महत्त्वाच्या निर्णयांपैकी एक असतो. भारतात उपलब्ध असलेल्या अनेक पर्यायांपैकी, केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) हे सर्वात विश्वासार्ह आणि व्यापकपणे मान्यताप्राप्त मंडळांपैकी एक म्हणून ओळखले जाते. मजबूत शैक्षणिक रचना, आधुनिक शिक्षण पद्धती आणि देशव्यापी स्वीकृतीमुळे, आपल्या मुलांचा सर्वांगीण विकास इच्छिणाऱ्या कुटुंबांसाठी CBSE ही पहिली पसंती बनली आहे.

या लेखा मध्ये, आपण CBSE चे प्रमुख फायदे आणि ते तुमच्या मुलासाठी एक योग्य पर्याय का असू शकते, हे जाणून घेऊया.

*१. राष्ट्रीय आणि जागतिक मान्यता. 

CBSE हे भारतातील सर्वात लोकप्रिय बोर्डांपैकी एक आहे आणि त्याचा अभ्यासक्रम देशातील जवळपास प्रत्येक शाळा आणि महाविद्यालयात स्वीकारला जातो. भारताबाहेर, अनेक आंतरराष्ट्रीय शाळा आणि विद्यापीठे देखील CBSE प्रमाणपत्रांना मान्यता देतात, ज्यामुळे तुमच्या मुलाला परदेशात उच्च शिक्षणासाठी व्यापक संधी मिळतात.

*२. संतुलित आणि विद्यार्थी-अनुकूल अभ्यासक्रम. 

सीबीएसई अभ्यासक्रम बालक-केंद्रित पद्धतीने तयार केला आहे, जो केवळ शैक्षणिक बाबींवरच नव्हे, तर प्रात्यक्षिक शिक्षण, कौशल्य विकास आणि अभ्यासेतर उपक्रमांवरही लक्ष केंद्रित करतो. पाठांतराऐवजी संकल्पना समजून घेण्यावर भर दिला जातो, ज्यामुळे विद्यार्थ्यांना समस्या सोडवण्याची प्रबळ कौशल्ये विकसित करण्यास मदत होते.

*३. स्पर्धा परीक्षांसाठी भक्कम पाया
            
CBSE चा अभ्यासक्रम शास्त्रीय पद्धतीने तयार केलेला असून तो JEE, NEET, UPSC आणि NDA सारख्या प्रवेश परीक्षांशी मिळताजुळता आहे. CBSE शाळांमधील विद्यार्थ्यांना या परीक्षांमध्ये अनेकदा फायदा होतो, कारण बोर्डाच्या अभ्यासक्रमात त्यांना आवश्यक संकल्पना आणि प्रश्नपद्धतींची आधीच ओळख करून दिली जाते.

*४. भाषा आणि विज्ञान यांवर समान लक्ष. 

CBSE भाषा, विज्ञान, गणित आणि सामाजिक शास्त्र या विषयांचा संतुलित परिचय सुनिश्चित करते. इंग्रजी आणि हिंदी समान महत्त्वावर शिकवल्या जातात, ज्यामुळे विद्यार्थी संवादात पारंगत होतात. त्याचबरोबर, बोर्ड STEM शिक्षणाला खूप महत्त्व देते आणि तार्किक विचार व विश्लेषणात्मक कौशल्यांचे संगोपन करते.

*५. कौशल्य-आधारित शिक्षणावर भर

अलिकडच्या वर्षांत, CBSE ने कौशल्य-आधारित शिक्षण पद्धतीचा अवलंब केला असून, अनेक शाळांमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स, आर्थिक साक्षरता आणि उद्योजकता यांसारखे विषय उपलब्ध करून दिले आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान मिळण्यास मदत होते आणि ते वेगाने बदलणाऱ्या जगासाठी तयार होतात.

*६. कुटुंबांसाठी सुलभ स्थलांतर. 

नोकरी किंवा व्यवसायामुळे वारंवार स्थलांतर करणाऱ्या पालकांसाठी सीबीएसई एक वरदान आहे. भारत आणि परदेशात हजारो सीबीएसई-संलग्न शाळा असल्यामुळे, अभ्यासक्रमात किंवा शिकवण्याच्या पद्धतीत मोठे बदल न होता मुले सहजपणे प्रवेश घेऊ शकतात.

*७. सातत्यपूर्ण आणि व्यापक मूल्यमापन
 
CBSE केवळ अंतिम परीक्षांवर अवलंबून न राहता, नियमित मूल्यमापन आणि प्रकल्पांची पद्धत अवलंबते. यामुळे परीक्षेचा ताण कमी होतो आणि विद्यार्थ्यांना वर्षभर सातत्यपूर्ण कामगिरी करण्यास प्रोत्साहन मिळते.

*८. सह-अभ्यासक्रम उपक्रमांवर लक्ष केंद्रित करा. 

शैक्षणिक बाबींव्यतिरिक्त, सीबीएसई शाळा क्रीडा, कला, संगीत आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभागास प्रोत्साहन देतात. या सर्वांगीण दृष्टिकोनामुळे मुले केवळ अभ्यासातच उत्कृष्ट कामगिरी करत नाहीत, तर त्यांच्यातील सुप्त गुणांचाही शोध घेतात.

*९. तणावमुक्त शैक्षणिक वातावरण

CBSE ने शिक्षण कमी तणावपूर्ण करण्यासाठी गेल्या काही वर्षांत आपल्या परीक्षा पद्धती आणि गुणदान योजनांमध्ये सुधारणा केली आहे. कृती-आधारित शिक्षण, प्रकल्प कार्य आणि उपयोजन-आधारित प्रश्न मुलांना शिक्षण प्रक्रियेचा आनंद घेण्यास मदत करतात.

*१०. भविष्यासाठी तयारी

शैक्षणिक अभ्यासक्रम, कौशल्य-आधारित विषय आणि व्यक्तिमत्व विकास यांचा मेळ घालून, CBSE हे सुनिश्चित करते की विद्यार्थी उच्च शिक्षण, स्पर्धा परीक्षा आणि शालेय शिक्षणानंतरच्या आयुष्यासाठी तयार होतील. ते अशा आत्मविश्वासू व्यक्ती घडवते, जे आपल्या आवडीच्या कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होऊ शकतात.

*अंतिम विचार

सीबीएसई निवडणे म्हणजे आपल्या मुलाला असे शिक्षण देणे जे मान्यताप्राप्त, समर्पक आणि भविष्यासाठी सज्ज करणारे आहे. करिअरच्या संधी असोत, कौशल्य विकास असो किंवा सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकास असो, सीबीएसई पालकांना अपेक्षित असलेला योग्य समतोल साधते.

जर तुम्ही पंचकुलामधील सर्वोत्तम सीबीएसई शाळेच्या शोधात असाल, तर अशी शाळा निवडा जी केवळ शैक्षणिक उत्कृष्टतेवरच नव्हे, तर जिज्ञासा, सर्जनशीलता आणि चारित्र्य जोपासण्यावरही लक्ष केंद्रित करते. कारण, आजचा योग्य पायाच तुमच्या मुलाच्या उद्याच्या यशाला आकार देऊ शकतो.

          हनुमंत श्रीकृष्ण मगर
          एम.ए.एम.फिल.हिंदी
              9822200614

Wednesday, April 8, 2026

बीड जिल्ह्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई. तलाठी व ग्रामसेवक लाच घेताना रंगेहाथ अटक.

बीड (प्रतिनिधी) जिल्ह्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) बुधवारी मोठी कारवाई करत भ्रष्टाचाराविरुद्ध जोरदार संदेश दिला. एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये तलाठी आणि ग्रामसेवकाला रंगेहाथ अटक करण्यात आली. या कारवाईमुळे महसूल व ग्रामविकास प्रशासनात खळबळ उडाली आहे.

पहिली कारवाई: केज तालुक्यात तलाठी जाळ्यात

केज तालुक्यातील दहिफळ (वडमाऊली) येथे ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) परमेश्वर अभिमान जाधव (वय ४७) याला ९ हजार रुपयांची लाच घेताना ACB ने पकडले.
तक्रारदाराच्या वारस नोंदी सातबाऱ्यावर करण्यासाठी जाधवने ३५ हजार रुपयांची मागणी केली होती त्यापैकी ९ हजार रुपये आगाऊ घेताना तो रंगेहाथ सापडला उर्वरित रक्कम काम पूर्ण झाल्यावर घेण्याचे ठरले होते विशेष बाब म्हणजे, जाधव हा माजी सैनिक असून फक्त ६ महिन्यांपूर्वीच सेवेत रुजू झाला होता ही कारवाई उपअधीक्षक सोपान चिट्टमपल्ले यांच्या पथकाने केली

दुसरी कारवाई: परळी तालुक्यात ग्रामसेवक अटक

परळी तालुक्यातील जिरेवाडी येथे ग्रामसेवक दशरथ देविदासराव गोरे याला ५०० रुपयांची लाच स्वीकारताना पकडण्यात आले. विहीर बांधकामाच्या बिलावर सही करण्यासाठी १,००० रुपयांची मागणी केली होती.पंचायत समिती परिसरात मागणी करुन आपल्या खासगी कार्यालयात  ५०० रु लाच स्वीकारली
पोलीस निरीक्षक कवडे आणि त्यांच्या पथकाने कारवाई करत गोरेला पकडले


भरधाव ट्रकनं बँक अधिकाऱ्याला चाका खाली चिरडलं.दुर्दैवी अपघातात बँक अधिकाऱ्याचा मृत्यू.

अंबाजोगाई : (प्रतिनिधी) - बीडच्या अंबाजोगाई शहरात एक भीषण अपघात झाला. एका भरधाव येणाऱ्या ट्रकने बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना चाकाखाली चिरडलं, या दुर्दैवी घटनेत त्यांचा मृत्यू झाला. मृताचे नाव सुदर्शन टाक (वय 45) असे होते. ते दीनदयाळ बँकेत वरिष्ठ अधिकारी म्हणून कार्यरत होते. मात्र, भरधाव वेगाने आलेल्या ट्राकने सुदर्शन टाक यांना धडक दिली, असता या अपघातात त्यांचा मृत्यू झाला.

भरधाव ट्रकच्या धडकेत बँक अधिकाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

घडलेल्या घटनेनुसार, सुदर्शन टाक हे आता नेहमीप्रमाणे सकाळी स्कूटीवरून कामासाठी बँकेत निघाले होते. पण, त्याचक्षणी रिंग रोडच्या मानवलोक कार्यालयाजवळ नको तेच होऊन बसलं, अनियंत्रित ट्रकने दुचाकीला जोराची धडक दिली होती. संबंधित धडक इतकी भीषण होती की, या धडकेत त्याला गंभीर मार लागल्याने त्यांचा घटनास्थळी दुर्दैवी मृत्यू झाला. 

या घटनेची माहिती मिळताच, अंबेजोगाई शहर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत, पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला. या प्रकरणी मृतदेह शवविच्छेदनासाठी स्वामी रामानंद तीर्थ (स्वाराती) रुग्णालयात पाठवला. दरम्यान, पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांच्या मार्गदर्शनाखाली अपघाताचा पुढील तपास सुरु करण्यात आला. 

दरम्यान, अपघाताचे वृत्त समजताच, दीनदयाळ बँकेचे अध्यक्ष अॅड. मकरंद पत्नी तसेच इतर संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी तातडीने रुग्णालयात आणि घटनास्थळी धाव घेत संपूर्ण घटनेची माहिती मिळवली. या घटनेनं परिसरात गोंधळ उडाल्याचं चित्र आहे. सुदर्शन टाक यांच्या अपघाती मृत्यूनंतर त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे.

Tuesday, April 7, 2026

1252 शाळांची मान्यता रद्द;वारंवार अपात्र ठरलेल्या शाळांवर सरकारची कारवाई 30एप्रिल पर्यंत अंतिम मुदत


मुंबई (प्रतिनिधी  महाराष्ट्र शासनाने शिक्षण क्षेत्रात मोठा निर्णय घेत राज्यातील 1252 शाळा आणि 827 तुकड्यांची मान्यता रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे हजारो शिक्षकांचे भविष्य अधांतरी झाले आहे.
सन 2000 मध्ये कायम विनाअनुदानित तत्त्वावर मान्यता मिळालेल्या जवळपास 6 हजार शाळांपैकी अनेक शाळांचे मूल्यांकन करण्यात आले होते. यामध्ये काही शाळांनी टप्पा अनुदान मिळवले, मात्र वारंवार अपात्र ठरणाऱ्या 1252 शाळांवर अखेर कठोर कारवाई करण्यात आली आहे.

शासनाच्या निर्णयानुसार, या शाळांना आता स्वयं-अर्थसहाय्यित तत्त्वावर नव्याने मान्यता घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. अन्यथा, संबंधित शाळा कायमस्वरूपी बंद केल्या जाणार आहेत.

 महत्त्वाची तारीख

1 एप्रिल 2026 पासून कारवाई लागू
30 एप्रिल 2026 अंतिम मुदत अर्जासाठी
तसेच, या शाळांमधील विद्यार्थ्यांचे नजीकच्या शाळांमध्ये समायोजन करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.
शासनाच्या नियमांनुसार, सलग 3 वर्षे मूल्यांकनात अपात्र ठरणाऱ्या शाळांची मान्यता रद्द केली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

 विभागनिहाय आकडेवारी

प्राथमिक शाळा – 433 (33 तुकड्या)
माध्यमिक शाळा – 324 (412 तुकड्या)
उच्च माध्यमिक शाळा – 505 (382 तुकड्या)
एकूण.     –    1252 शाळा (827 तुकड्या)

धक्कादायक घटना; निवासी डॉक्टरची गळफास घेऊन आत्महत्या, वैद्यकीय क्षेत्रात खळबळ.


अंबाजोगाई (प्रतिनिधी) – स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे शिक्षण घेणाऱ्या एका निवासी डॉक्टरने भाड्याच्या खोलीत गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे अंबाजोगाई शहरासह वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

मृत डॉक्टरचे नाव डॉ. मंदार दाभाडे असे असून ते चनई परिसरातील रोहिदास नगर भागात भाड्याच्या घरात राहत होते. बराच वेळ दरवाजा न उघडल्याने संशय आल्यावर ही घटना उघडकीस आली.
घटनेची माहिती मिळताच अंबाजोगाई शहर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.
डॉ. दाभाडे हे पदव्युत्तर शिक्षण घेत असून रुग्णालयातील कामात सक्रिय होते. त्यामुळे एक होतकरू डॉक्टरने असे टोकाचे पाऊल का उचलले, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. प्राथमिक माहितीनुसार कामाचा ताण, वैयक्तिक कारण किंवा इतर काही कारणांचा तपास सुरू आहे.
या घटनेमुळे रुग्णालयातील सहकारी डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांमध्ये शोककळा पसरली आहे. पोलिस अधिक तपास करत आहेत.


Saturday, April 4, 2026

सोमेश्वर साथीतुन जनतेसी नाती जोडणारे : संपादक बालासाहेबजी फड.

आज आपली घरं मुकी व्हायला लागली आहेत.घरात पूर्वीसारखा संवाद उरलेला नाही.बाप एका दरवाजावाटे घरात आला तर मुलगा दुसऱ्या दरवाजावाटे बाहेर जातो.घराची धर्मशाळा झाली आहे,घराचे रेस्ट हाऊस झाले आहे,घराची वेटींग रूम झाली आहे.माणसांचे नाते आता फेसबुक व व्हाट्सअप वरूनच जोपासल्या जात आहेत म्हणून एक कवी असे म्हणतो की 
 विज्ञानाच्या यूगात  केवढी मोठी चूक l
  आता रक्तांच्या ही नात्यांना लागते फेसबुक ll
  नात्यात कृत्रिमता वाढत चालली असून अशा काळात नाते संबंध सांभाळने,जोपासने हे मोठे जिकीरीचे काम बनले आहे.अस्या ही काळात आपल्या कार्याशी प्रामाणिक राहून जनतेसी नाते जोडता येऊ शकते याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे सोमेश्वर साथी  हे वृतपत्राचे संपादक बालासाहेब फड होत.जे या वृत्तपत्राच्या माध्यमातून नाती जोडण्याचे व जपण्याचे प्रामाणिक काम करत आहेत.अस्या या नात्यांनी श्रीमंत असलेल्या संपादक बालासाहेब फड यांचा  आज 04 एप्रिल हा जन्मदिवस.त्यानिमित्ताने त्यांच्या जीवनचरित्राचा घेतलेला हा संक्षिप्त आढावा.

    भारत हा विविधतेने नटलेला देश आहे.या देशाला फार प्राचीन परंपरा लाभलेली आहे.हा देश एकेकाळी सोने की चिडिया म्हणून ओळखला जात होता.येथे नालंदा,तक्षशिला सारखे विद्यापीठे होती. "राजा स्वदेश पूजन्ते l विद्वान सर्वत्र पुजन्ते" असा विचार प्रामुख्याने मांडला जात होता.नंतर या देशावर परकीयांनी आक्रमणे केली व या देशाला लुटले.त्यातच राजेशाहीचा जन्म झाला.छत्रपती शिवरायां सारखे मोजके राजे सोडले तर अनेक राजांनी जनतेची पिळवणूक केली.नंतर देशावर दीडशे वर्षे इंग्रजांनी राज्य केले.त्यांनी भारतीय जनतेचा अनन्वित छळ केला.अशातही काही सुधारणा ही आणल्या. तदनंतरच्या कार्यकाळात 15 ऑगस्ट 1947 ला देशाला स्वातंत्र्य मिळाले पण लोकांची खरी प्रगती करावयाची असेल तर लोकशाही शिवाय पर्याय नाही हे लक्षात घेऊन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर व अन्य विद्वानांनी संसदीय लोकशाहीचा स्वीकार केला.तीला बळकट बनविण्याचे काम हे प्रसारमाध्यमे करताहेत.आज प्रसार माध्यमात ही विविधता आली आहे.पण त्यात प्रिंट मिडीयाची प्रामाणिकता सर्वांपेक्षा अधिक आहे.
     संपादक बालासाहेब फड यांचा जन्म 04 एप्रील 1974 रोजी आई गंगाबाई व वडिल सिताराम यांच्या पोटी बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या वैद्यनाथाच्या शेजारी असलेल्या कन्हेरवाडी ता.परळी जि.बीड येथे झाला.त्यांना बालपणापासुन प्रभू वैद्यनाथ व संत जगमित्र नागा, सोमेश्वर यांचा आशीर्वाद लाभला.घरात अनेक पिढ्यांपासून वारकरी संप्रदायाचे वातावरण असल्यामुळे कीर्तन,नामस्मरण व श्रवणभक्ती घडली व या अनुषंगाने चौफेर ज्ञान प्राप्त करता आले.ते स्वतः वारकरी संप्रदायाचे अनुयायी आहेत.सांप्रदायावर त्यांचा जीव आहे.त्यांनी आपल्या ह.भ.प. बालकिर्तनकार प्रकाश महाराज फड नावाच्या मुलाला वयाच्या सातव्या वर्षी ज्ञानाई गुरुकुल सेलू येथे वारकरी संप्रदायाचे शिक्षण घेण्यासाठी ठेवले. त्यांचे चिरंजीव या वयात अभ्यासू व उत्तम कीर्तन करतात.तसेच त्यांचे दुसरे चिरंजीव इंजीनियरिंग  संग्राम बालासाहेब फड करत आहेत .या पुर्वी म्हटल्या प्रमाणे वृत्तपत्र व्यवसाय हा सतीचे वाण आहे.कारण या व्यवसायात बातमी लावताना हजारदा विचार करावा लागतो.बातमीची सत्यता असावी,स्पष्टता असावी,सदरक्षणाय खलनिग्रहणाय हे साध्य व्हावे. पद,पैसा,तोंड पाहून न लिहिता जे सत्य आहे ते लिहावे लागते.
  तोफ मुकाबील हो तो अकबार निकालो l असे या साठीच म्हटले जाते.
ही सगळी वैशिष्ट्‌‍ये संपादकाला पाळावी लागतात.एखादी चुकीची बातमी लागली तर त्याची खूप मोठी किंमत संपादकाला सोसावी लागते हे एक प्रकारचे अग्निदिव्यच आहे. पण हे अग्निदिव्य संपादक बालासाहेब फड  हे 1995 पासून सांभाळत आहेत.त्यांनी साप्ताहिक परळी संदेश या पासून ते हे काम करत आहेत.ना कुठला या क्षेत्रातला वारसा ना भरगच्च पाठीमागे संपत्ती पण प्रामाणिकतेच्या   जोरावर हे कार्य ते पार पाडताना दिसतात.संत तुकाराम महाराजांनी म्हटल्याप्रमाणे
 असाध्य ते साध्य करिता सायास l
   या  न्यायाप्रमाणे त्यांनी ही असाध्य काम साध्य केले आहे.या साप्ताहिक काम करत करत 2016 पासून सोमेश्वर साथी या दैनिकाचा प्रारंभ केला आहे.या दैनिकाच्या माध्यमातून त्यांनी अनेक नवोदितांना लेखन मंच उपलब्ध करून दिला आहे. अनेक क्षेत्रातील लोकांसी नाती जोडण्याचे काम करत आहेत.मी ही असाच जोडला गेलो म्हणुन त्यांच्या वाढदिवसाला लिहीण्याचा मोह होतो.आमचे अनेक लेख त्यांनी छापून आम्हाला लिहिते करण्याचे काम ते करतात.एवढेच नाही तर समाजात चांगुलपणा पेरण्याचं काम करणाऱ्या गुणवंतांचा या वृत्तपत्राच्या मार्फत वर्धापन दिनाला पुरस्कार देऊन सन्मानही करतात.चांगल्या कार्याला प्रबलन देण्याचं काम ते सतत करत आले आहेत.यासाठी स्वतःचे मन मोठे असावे लागते.जगाला ज्यांच्या कार्य कर्तुत्वाचा अभिमान वाटतो त्या शिवरायांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने हा कार्यक्रम घडवून आणतात. त्याशिवाय अशा गोष्टी करता येत नाहीत.हेच यातून दिसून येते.
  भले तरी देऊ कासेची लंगोटी l
 नाठाळाचे माथी हाणू काठी l
   ही भूमिका त्यांची दिसते.वारकरी संप्रदायाची प्रत्येक घडामोड आवर्जून आपल्या वृत्तपत्रात घेतात.
     त्यांच्या अंतकरणात आपणास मदत करणा-यांबद्दल सतत कृतज्ञता दिसते.
 .मा. श्री.किरण गित्ते साहेब IAS सचिव त्रिपुरा सरकार , विवेकानंद यूथ वेलफेअर सोसायटीच्या अध्यक्षा मा.सौ.उषाताई किरण गित्ते त्यांच्याप्रती ते नेहमी आभार व्यक्त करतात.वारकरी संप्रदायातील अनेक गायक,वादक,कीर्तनकार हे त्यांचे अत्यंत जवळचे मित्र आहेत. त्यांना आई-वडिलांचे आई गंगाबाई वडील सितारामजी यांचे सुरुवातीपासून सहकार्य लाभले. दोन भाऊ तसे दोन मुलांचे ही सहकार्य लाभत आले आहे. संपादक म्हटले की समाजसेवेसाठी खूप वेळ द्यावा लागतो अशा वेळेस घर सांभाळणारी व समजून घेणारी पत्नी  महत्त्वाचे असते 2002 साली लग्न झाले तेव्हापासून मुलांची व परिवाराची सर्वाधिक काळजी त्यांच्या सौभाग्यवती सौ. ज्ञानेश्वरी बालासाहेब फड या घेत आहेत.त्यांच्या बद्दलही ते भरभरून सांगतात.वारकरी संप्रदायातील अनेक महाराज मंडळी वरती लेख ते नेहमीच आपल्या वृत्तपत्रात छापतात. महापुरुषांच्या व कार्यकर्तृत्व गाजवणाऱ्या राजकीय नेत्यांच्या वरती ही ते नेहमीच आपल्या वृत्तपत्रातून भरभरून लिहताना दिसतात.
   त्यांच्या कार्याची दखल घेवुन त्यांची महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या परळी तालुकाध्यक्ष पदी निवड झाली.त्यांना आतापर्यंत अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.ही पुरस्काराची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
    अस्या  पत्रकारीतेसी प्रामाणीक राहुन नाते जोडणा-या व जपणा-या  संपादक मा.बालासाहेब फड यांना आज वाढदिवसा निमित्त  मनःपूर्वक शुभेच्छा देतो व त्यांच्याकडून भविष्यातही असेच नाते जोडण्याचे काम  वृत्तपत्रीय माध्यमातुन घडत राहो अशी ईश्वर चरणी अपेक्षा व्यक्त करून  त्यांना दीर्घ आयू आरोग्य चिंतुन मी माझे लेखन थांबवतो
 

प्रा.डॉ.रामकृष्ण बदने
ग्रामीण महाविद्यालय,वसंतनगर
ता.मुखेड जि.नांदेड
भ्रमणध्वनी -9423437215

Tuesday, March 31, 2026

जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात बनावट कर्णबधिर दिव्यांगत्वाचा लाभ घेणाऱ्या आठ शिक्षकांचे निलंबन!


बीड :(प्रतिनिधी) जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात कर्णबधिर दिव्यांगत्वाचा लाभ घेणाऱ्या आठ शिक्षकांचे बिंग अखेर अली यावर जंग नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पीच ॲन्ड हिअरिंग डिसॅबिलीज (दिव्यांगजन) या राष्ट्रीय संस्थेच्या तपासणीत उघडे पडले. दिव्यांगत्वाचे लाक्षणिक दिव्यांगत्वापेक्षा कर्णबधीर दिव्यांगत्व कमी असल्याचे सिद्ध झाल्याने या आठ शिक्षकांवरनिलंबनाची कारवाई करून त्यांच्याविरुद्ध विभागीय चौकशीचा निर्णय जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान यांनी घेतला आहे. आता पुढच्या टप्प्यात आणखी किती दोषी आढळतात हे पाहावे लागणार आहे.

दिव्यांग कल्याण विभाग, मुंबई यांचे पत्रान्वये दिव्यांग अधिकारी व कर्मचारी तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी हे दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे शासनाच्या सरळसेवा नियुक्ती, बदली, पदोन्नती, अतिरिक्त अपंग प्रवास भत्ता, व्यवसाय कर कपात सूट, आयकर कपात सूट आदींचा लाभ घेतात. परंतु या दिव्यांगत्वाच्या प्रमाणपत्र वैधतेबाबत विभागास अनेक तक्रारी प्राप्त झाल्या. या तक्रारींमध्ये दिव्यांगांचे वैश्विक ओळखपत्र बाबत साशंकता व्यक्त केलेली आहे. त्यामुळे सदर दिव्यांगत्वाच्या प्रमाणपत्राची पडताळणी करण्याबाबत तसेच दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, २०१६ च्या कलम ९१ मध्ये लाक्षणिक दिव्यांगत्व असणाऱ्या व्यक्तीस अभिप्रेत असणारा कोणताही लाभ सवलत जर अन्य पात्र नसलेल्या व्यक्तीने प्राप्त करून घेतला किंवा घेण्याचा प्रयत्न केला तर संबंधित व्यक्ती २ वर्षांपर्यंत कारावास किंवा रूपये एक लक्ष दंडासाठी किंवा दोन्ही शिक्षांसाठी पात्र ठरते. या तरतुदीनुसार पडताळणी अंती अपात्र ठरवण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांवर कार्यवाही करून त्याचा अहवाल दिव्यांग कल्याण आयुक्त व विभागास सादर करण्याचे निर्देश होते.

त्यानुसार बीड शिक्षण विभाग (प्रा.) अंतर्गत दिव्यांग कर्णबधिर शिक्षकांच्या दिव्यांगत्वाबाबत साशंकता निर्माण झाल्याने संबंधित शिक्षकांच्या कर्णबधिर दिव्यांगत्वाबाबत पुनर्तपासणी करण्याबाबत अली यावर जंग नॅशनल, इंस्टिट्यूट ऑफ स्पीच ॲन्ड हिअरिंग डिसॅबिलीज (दिव्यांगजन) या संस्थेत दिव्यांगत्व प्रमाणपत्राची, दिव्यांग कर्मचाऱ्यांची शारीरिक तपासणी करून त्यांच्या दिव्यांगत्वाबाबत, दिव्यांगत्वाच्या टक्केवारीबाबत पुनर्तपासणी करण्याबाबत कळविले होते. तपासणीनंतर या संस्थेकडून श्रवण मूल्यांकन अहवाल प्राप्त झाला. त्यानुसार दोषींवर ही कारवाई करण्यात आली आहे.

दिव्यांगत्वाचे लाक्षणिक दिव्यांगत्वापेक्षा कर्णबधिर दिव्यांगत्व कमी असल्याचे सिध्द होत असून संबंधितांनी लाक्षणिक अपंगत्व असलेल्या व्यक्तीसाठीचे खोटे फायदे मिळवून त्याचा लाभ घेण्यासाठी चुकीच्या पद्धतीने जाणीवपूर्वक फसवणुकीच्या उद्देशाने जिल्हा परिषद व शासनाची फसवणूक केल्याचे निलंबन आदेशात म्हटले आहे. त्यामुळे या शिक्षकांवर येत्या काळात फौजदारी गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे.

या शिक्षकांवर कारवाई, अहवाल काय सांगतो?.

१) मच्छिंद्र सदाशिव वाघमारे, जि. प. प्रा. शाळा आगरनांदूर, ता. गेवराई (श्रवण मूल्यांकन अहवाल मध्यम श्रवण)२) संतोष किसन सोनवणे, जि. प. प्रा. शाळा खांडेकर वस्ती केंद्र पाली (मध्यम श्रवण दोष)३) दादासाहेब नानासाहेब पवार, जि. प. प्रा. शाळा, वडार कॉलनी, ता. अंबाजोगाई (दोन्ही कानांची श्रवण संवेदनशिलता सामान्य मर्यादेत)४) विलास रामराव माचवे, जि. प. प्रा. शाळा पिंपळगाव धायगुडा, ता. अंबाजोगाई (डावा कान मध्यम, उजवा कान सौम्य श्रवणदोष)५) विकास रामराव माचवे, जि. प. प्रा. शाळा टिळकनगर, केंद्र कारखाना, ता. अंबाजोगाई (डावा कान मध्यम, उजवा कान सौम्य श्रवण दोष)६) युवराज चंद्रभान लांब, जि. प. प्रा. शाळा हनुमंत पिंप्री, केंद्र काळेगाव, ता. केज (डावा कान मध्यम, उजवा कान सौम्य श्रवण दोष)७) शिवाजी देसू चव्हाण, जि. प. प्रा. शाळा जोडवाडी, ता. अंबाजोगाई (दोन्ही कान संवेदशिलता मर्यादेत)८) अंबिका बळीराम बगाडे, जि. प. प्रा. शाळा लोणीघाट, केंद्र चौसाळा कन्या (दोन्ही कानांची श्रवण संवेदनशिलता सामान्य मर्यादेत)

सालेवडगाव-गणेशवाडी पुलाच्या निकृष्ट कामाचे पितळ उघडे ग्रामस्थांचा हिसका! निकृष्ट पूल जेसीबीने पाडला गुत्तेदार-अधिकाऱ्यांना फुटला घाम.


आष्टी (प्रतिनिधी): आष्टी तालुक्यातील सालेवडगाव ते गणेशवाडी दरम्यान नदीवर बांधण्यात येत असलेल्या ३५ लाखांच्या पुलाच्या कामात मोठा भ्रष्टाचार होत असल्याचे समोर आले आहे. ग्रामस्थांनी दाखवलेल्या सजगतेमुळे या निकृष्ट कामाचे पितळ उघडे पडले असून, संतप्त नागरिकांनी अधिकारी आणि गुत्तेदाराला घटनास्थळीच धारेवर धरले. अखेर वाढता रोष पाहून निकृष्ट झालेले काम जेसीबीच्या साह्याने पाडून नव्याने चांगल्या दर्जाचे काम करण्याचे आश्वासन प्रशासनाला द्यावे लागले आहे.

पावसाळ्यात नदीला पाणी आल्यानंतर शाळकरी मुले आणि ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत होती, ही अडचण दूर करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडून या नळकांडी पुलाला मंजुरी मिळाली होती.

'लाखोंचे काम दोन-तीन लाखांत उरकण्याचा सपाटा'.

ग्रामस्थांनी पुलाच्या कामाची पाहणी केली असता, बांधकामाचा दर्जा अत्यंत सुमार असल्याचे दिसून आले. ३५ लाख रुपयांच्या निधीतून होणारे हे काम अवघ्या दोन ते तीन लाखांत उरकण्याचा गुत्तेदाराचा प्रयत्न असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. अधिकारी आणि गुत्तेदाराने संगनमताने शासनाच्या निधीवर डल्ला मारण्याचे नियोजन केल्याचे लक्षात येताच सोमवारी सालेवडगाव येथील ग्रामस्थ आक्रमक झाले आणि त्यांनी थेट पुलावर जाऊन काम थांबवले.

इंजिनिअरला घातला घेराव अन् विचारला जाब.

कामाची पाहणी करण्यासाठी आलेल्या आष्टी पंचायत समितीच्या बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना ग्रामस्थांनी घेराव घातला. संतप्त नागरिकांनी निकृष्ट कामाबद्दल प्रश्नांची सरबत्ती केल्यावर अधिकाऱ्यांची बोलती बंद झाली. अखेर हे निकृष्ट काम पाडून पुन्हा नव्याने आणि गुणवत्तापूर्ण काम करून देण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतरच ग्रामस्थ शांत झाले. इंजिनिअर सुनील राठोड यांनी याप्रकरणी गुत्तेदारावर कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन देत सावरासावर करण्याचा प्रयत्न केला.

भ्रष्ट अधिकारी-गुत्तेदारावर कारवाईची मागणी.

शासकीय निधीचा असा दुरुपयोग करणाऱ्या संबंधित अधिकारी आणि गुत्तेदारावर केवळ आश्वासन न देता कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी सालेवडगाव आणि गणेशवाडी येथील ग्रामस्थांकडून केली जात आहे. ग्रामस्थांच्या या जागरूकतेमुळे भविष्यातील मोठा अपघात टळला असून, या प्रकरणाची जिल्हा स्तरावरून चौकशी व्हावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

Saturday, March 28, 2026

बीड जिल्हा कारागृहात कैद्याचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू.या घटनेने एकच खळबळ.


बीड (प्रतिनिधी) जिल्हा कारागृहा त एका कैद्याचा हृदयविकाराचा त्रास झाल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाला.या घटनेने एकखळबळ उडाली आहे.

चेक बाउन्स च्या प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेल्या एका पन्नास वर्षीय कैद्याचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला… गणेश पवार असे या कैद्याचे नाव असून आठ दिवसापूर्वी त्याला कारागृहात आणण्यात आले होते.

शनिवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास त्याला छातीत दुखण्याचा त्रास होऊ लागल्याने याबाबतची माहिती कारागृहातील कर्मचाऱ्यांना देण्यात आली.. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले.. त्या ठिकाणी उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

दरम्यान यानंतर आता जिल्हा न्यायालयातील न्यायाधीशांसह पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये पंचनामा करण्यात आलेला आहे.

whatsapp sharing button
facebook sharing button
twitter sharing button


Friday, March 27, 2026

उजनीचे पाणी मांजरा धरणात आणा. खा. बजरंग सोनवणेंनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे संसदेत वेधले लक्ष.शेतकऱ्यांना वेळेत मदत देण्याचीही मागणी.

नवी दिल्ली: मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यासाठी आणि बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विविध समस्यांसाठी खा.बजरंग सोनवणे यांनी दि.२७ मार्च रोजी संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आवाज उठवला. सोलापूरच्या उजनी धरणातून मांजरा नदीमार्गे मांजरा धरणात पाणी आणण्याचा प्रकल्प त्वरित मार्गी लावावा, अशी आग्रही मागणी करत त्यांनी बीडच्या दुष्काळी परिस्थितीकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधले.

दिल्लीत सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात बीडचे खा.बजरंग सोनवणे बोलत होते. यावेळी दुष्काळ आणि अस्मानी संकटाबाबत खा.सोनवणे यांनी आपल्या भाषणात बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या. ते म्हणाले की, बीडचा शेतकरी दरवर्षी दुष्काळाच्या झळा सोसतोय. यावर्षी त्यात वादळ, अतिवृष्टी आणि अवकाळी पावसाची भर पडली आहे. निसर्गाच्या या लहरीपणामुळे कष्टाचे पीक डोळ्यादेखत मातीत जात असून, शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. या अस्मानी आणि सुलतानी संकटामुळे शेतकरी आत्महत्या करत असून ही बाब अत्यंत गंभीर आणि वेदनादायक असल्याचे त्यांनी नमूद केले. बीड जिल्ह्यातील दुष्काळावर तोडगा काढण्यासाठी बाहेरून जिल्ह्यात पाणी आणल्याशिवाय पर्याय नाही. बीड जिल्ह्याला कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करण्यासाठी उजनीचे पाणी मांजरा धरणात आणणे हाच एकमेव पर्याय असल्याचे सोनवणे यांनी ठामपणे सांगितले. हा प्रकल्प पूर्ण झाल्यास बीडच्या शेतकऱ्यांसाठी ते 'जीवनदायी' ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

००
दिरंगाईवर ओढले ताशेरे
१ बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वेळेत कर्ज मिळत नाही, शेतीच्या योजनांचा लाभही उशीरा मिळतो, एकूणच जिल्ह्यातील प्रशासकिय दिरंगाई कमी व्हावी, असेही ते म्हणाले.
२  शेतकऱ्यांना कर्जव्याज सवलत, अनुदान आणि पीकविम्याची रक्कम वेळेवर मिळत नाही. हक्काच्या पैशांसाठी बळीराजाला बँकांचे उंबरठे झिजवावे लागतात.
३ सोयाबीन, मका, तूर आणि ज्वारीची हमीभावाने खरेदी तर होते, पण त्याचे पैसे मिळायला महिनोन् महिने वाट पाहावी लागते. हा अन्याय तातडीने थांबवून चुकारे वेळेत देण्याची मागणी त्यांनी केली.
४ व्याज सवलतीसारख्या अनेक योजना कागदावरच राहतात. पात्र शेतकऱ्यांना या योजनांपासून वंचित ठेवणाऱ्या बँकांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी संबंधित मंत्रालयाकडे केली.
००
मराठवाड्याच्या हक्काचे पाणी, मदत आणि न्याय मिळेपर्यंत माझा हा लढा थांबणार नाही. बीडच्या शेतकऱ्याचा आवाज मी संसदेत असाच बुलंद ठेवेन. बीड जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या विश्वासाने दिल्लीत पाठविले असून मी त्यांचे प्रश्न मांडण्यास कमी पडणार नाही.

—खा.बजरंग सोनवणे, बीड.

परळीत वैद्यनाथ ज्योतिर्लिंगच्या पवित्र सोमवारी मांस विक्री बंदीची मागणी केदारी यांचे प्रशासनाला निवेदन.

परळी वैजनाथ (वार्ताहर)बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथे प्रत्येक सोमवारी मांस विक्री व सेवनावर कडक बंदी लागू करण्यात यावी, या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते *श्री. शिवकुमार केदारी (हिंद नगर, परळी वैजनाथ*) यांनी प्रशासनाकडे सविस्तर निवेदन सादर केले आहे.
परळी वैजनाथ हे भारतातील १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक पवित्र धार्मिक स्थळ असून, येथे दर सोमवारी हजारो भाविक प्रभू वैद्यनाथ भगवान यांच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. त्यामुळे त्या दिवशी शहरात भक्तिमय, सात्विक व धार्मिक वातावरण निर्माण होत असते. मात्र, अशा पवित्र दिवशीही शहरात मांस विक्री सुरू असल्याने भाविकांच्या धार्मिक भावना दुखावल्या जात असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
याबाबत श्री. केदारी यांनी प्रत्यक्ष नगर परिषद परळी वैजनाथ कार्यालयात जाऊन निवेदन सादर केले असून, तसेच जिल्हा प्रशासन व राज्यातील मान्यवरांना ईमेलद्वारे निवेदन पाठवून तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली आहे.
सदर निवेदनाची प्रत मा. जिल्हाधिकारी, बीड, मा. उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार, मा. पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे तसेच मा. आमदार धनंजय मुंडे यांना पाठविण्यात आली आहे.
निवेदनात पुढे नमूद करण्यात आले आहे की, सोमवार हा भगवान शंकराचा पवित्र दिवस असून त्या दिवशी भाविक उपवास, पूजन व धार्मिक आचरण करतात. अशा वेळी मांस विक्री सुरू राहणे ही बाब जनभावनेला ठेच पोहोचवणारी असून परळी वैजनाथच्या पवित्रतेला बाधा आणणारी आहे.
या पार्श्वभूमीवर श्री. केदारी यांनी प्रशासनाकडे प्रत्येक सोमवारी मांस विक्री, कत्तल, वाहतूक व सेवनावर पूर्ण बंदी लागू करावी, नगर परिषदेमार्फत याबाबत अधिकृत ठराव मंजूर करावा तसेच आदेशाची कडक अंमलबजावणी करून उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
दरम्यान, नगर परिषद स्तरावर हा विषय पुढील सभेत मांडण्यात येणार असल्याचे समजते. त्यामुळे या मागणीबाबत प्रशासन कोणता निर्णय घेते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.