Sunday, January 11, 2026

जिल्ह्यातील दिव्यांग पुनर्वसन केंद्रासाठी स्वयंसेवी संस्थेने १३ जानेवारी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन.

धाराशिव (जिमाका) जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींचे पुनर्वसन करण्यासाठी तसेच त्यांना विविध प्रकारच्या थेरपी देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र कार्यान्वित करण्यात येणार आहे.या केंद्राच्या संचालनासाठी जिल्हा व्यवस्थापक समिती गठित करण्यात आली असून,समितीकडून दिव्यांग क्षेत्रात कार्य करणारी व आयुक्त, दिव्यांग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य,पुणे यांच्याकडून अनुज्ञप्ती प्राप्त स्वयंसेवी संस्था निवडण्यात येणार आहे.त्यासाठी प्रस्ताव मागविण्यात येत आहेत.
या संदर्भात पुढील निकष निश्चित करण्यात आले आहेत.संस्थेस २० वर्षांपेक्षा अधिक सामाजिक क्षेत्रातील अनुभव असावा,त्यापैकी किमान १५ वर्षांपेक्षा अधिक दिव्यांग क्षेत्रातील अनुभव असावा.संस्थेस दिव्यांग क्षेत्रात कार्य केल्याबद्दल केंद्र शासन किंवा राज्य शासनाचे पुरस्कार प्राप्त असल्यास प्राधान्य देण्यात येईल. संस्थेस DDRC उपक्रम चालविण्याचा उत्तम अनुभव असावा. ADIP योजनेअंतर्गत जास्तीत जास्त दिव्यांग लाभार्थ्यांना लाभ दिलेला असावा.निरामय आरोग्य योजनेचा लाभ जास्तीत जास्त लाभार्थ्यांना दिलेला असावा.राज्यस्तरावर कार्य केल्याचा अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येईल.संस्था राष्ट्रीय न्यासकडे नोंदणीकृत असावी.
संस्थेस जिल्हास्तरीय दिव्यांग समितीचे सदस्यत्व किंवा अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येईल. संस्थेची स्वतःची जागा जिल्ह्यात असावी.संस्थेस स्वतःचा दवाखाना चालविण्याचा अनुभव असावा.
संस्थेने दिव्यांग प्रतिबंधक शस्त्रक्रिया केल्याचा अनुभव असावा.संस्थेकडे दिव्यांग व्यक्तींच्या कौशल्य विकासाचा अनुभव असावा. संस्थेमध्ये पदाधिकारी नातेसंबंधातील नसावेत.मागील तीन वर्षांचे लेखापरीक्षण झालेले असावे.मागील तीन वर्षांचे DDRC चालविण्याचे ऑडिट रिपोर्ट प्रस्तावासोबत सादर करणे आवश्यक आहे.
वरील सर्व अटींची पूर्तता करणाऱ्या संस्थांनी आपला परिपूर्ण प्रस्ताव जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण विभाग, जिल्हा परिषद,धाराशिव या कार्यालयाकडे दिनांक १३ जानेवारी २०२६ पर्यंत सादर करावा,असे आवाहन जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी, जिल्हा परिषद,धाराशिव यांनी केले आहे

No comments:

Post a Comment