Monday, January 26, 2026

दिव्य ज्योती जागृती संस्थानतर्फे लातूर मध्ये ‘कन्या बचाओ’ जनजागृतीचा भव्य उपक्रम; ४५० महिलांचा उत्स्फूर्त सहभाग

लातूर (प्रतिनिधी) दिव्य ज्योती जागृती संस्थानतर्फे संतुलन – लिंग समानता या सामाजिक उपक्रमांतर्गत ‘कन्या बचाओ’ या विषयावर भव्य जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन सिद्धेश्वर मंदिर जवळ,  दिव्य ज्योती जागृती संस्थानच्या लातूर येथील आश्रम परिसरात करण्यात आले. या उपक्रमास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून सुमारे 450 महिलांनी हळदी-कुंकू कार्यक्रमात सहभाग नोंदवला.
कन्या बचाओ – बेटी बचाओ या प्रभावी संदेशाच्या माध्यमातून मुलींचे संरक्षण, शिक्षण, स्वाभिमान आणि उज्ज्वल भवितव्य याविषयी उपस्थितांमध्ये व्यापक जनजागृती करण्यात आली. आजही समाजात अस्तित्वात असलेल्या लिंगभेदाच्या मानसिकतेला आव्हान देत नारी-सन्मान व लिंग समानतेचा संदेश या कार्यक्रमातून प्रभावीपणे पोहोचविण्यात आला.
या कार्यक्रमाचे मुख्य उद्दिष्ट महिलांना स्व-सशक्तिकरणासाठी प्रेरित करणे, त्यांच्या अंगी असलेल्या सुप्त शक्ती, आत्मविश्वास व नेतृत्वगुणांची ओळख करून देणे, तसेच समाजात स्त्री-पुरुष समानतेची भावना दृढ करणे हे होते.कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून दामिनी पथकाच्या प्रमुख पोलीस उपनिरीक्षक (PSI) श्रीमती आरती शिरीष पोवार, मॅडम उपस्थित होत्या.
त्यांनी महिलांच्या सुरक्षेबाबत, विशेषतः महाविद्यालयीन मुलींसाठी आवश्यक असलेल्या खबरदारी, कायदे, समुपदेशन व स्वसंरक्षणाबाबत मार्गदर्शन केले. महिलांनी आत्मविश्वासाने उभे राहावे व अन्यायाविरुद्ध निर्भीडपणे आवाज उठवावा, असे त्यांनी आवाहन केले.
यावेळी ग्राहक न्यायालयात न्यायाधीश म्हणून कार्य केलेल्या श्रीमती अनघा अनिल अंधोरीकर, RSS राष्ट्रसेविका समितीच्या सदस्या, यांनी महिलांच्या कायदेशीर हक्कांबाबत मार्गदर्शन केले. तर श्रीमती जयश्री राजेश्वर हेडगे मॅडम, नर्सिंग आरोग्य अधिकारी, यांनी महिलांच्या आरोग्याविषयी सविस्तर माहिती देत नियमित तपासणी, पोषण व मानसिक आरोग्याचे महत्त्व अधोरेखित केले.सौ. समाधानताई माने यांनी जिजाऊ ब्रिगेडच्या कार्याचा उल्लेख करत महिलांनी संघटित होऊन स्वतःच्या हक्कांसाठी सजग राहण्याचे आवाहन केले.

     कार्यक्रमास नवनियुक्त लातूर महानगरपालिका नगरसेविका  सौ.आदिती अजित पाटील कवेकर मॅडम, सौ.ज्योती अवस्कर मॅडम , श्री. ऋषिकेश राजे साहेब,तसेच माजी नगरसेविका सौ.वैशाली लोंढे यादव मॅडम यांची विशेष उपस्थिती लाभली.शेवटी महिलांचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर आपल्यातील वाईट कुणाचा नाश करणे यासाठी होलिका दहन करण्यात आले.
कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन दिव्य ज्योती जाग्रती संस्थानच्या समन्वय अन्नपूर्णा भारतीजी,  लक्ष्मी भारतीजी  व धनश्री भारतजी यांनी अत्यंत शिस्तबद्ध व प्रेरणादायी पद्धतीने केले. संस्थेच्या समन्वयक अन्नपूर्णा भारतीजी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “महिलांनी बाह्य जगाकडे पाहण्याऐवजी आपल्या अंतर्गत परमेश्वराकडे पाहण्याची दृष्टी विकसित केली, तर जीवनात खरा समतोल साधता येतो.” प्रत्येक व्यक्तीच्या आत परमेश्वराचा अंश आहे आणि तो अनुभवण्याची शास्त्रशुद्ध पद्धत सर्वश्री आशुतोष महाराज यांच्या कृपेने मिळणाऱ्या ब्रह्मज्ञानाद्वारे सहज शक्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच शिक्षण व सन्मानासाठी सर्वांनी सामूहिक जबाबदारी स्वीकारण्याचा संकल्प करण्यात आला. हा उपक्रम महिलांमध्ये आत्मविश्वास, जागरूकता व सामाजिक बांधिलकी निर्माण करणारा ठरल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

No comments:

Post a Comment