Tuesday, January 13, 2026

केंद्र शासनाच्या योजना राबविताना समन्वय महत्वाचा घटक - खा.बजरंग सोनवणे

*जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण ( दिशा ) सभा संपन्न. 

बीड दि. 13 (जिमाका):   केंद्र शासनाच्या योजना जिल्ह्यात राबवताना सर्व यंत्रणांनी समन्वय राखणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन खासदार बजरंग सोनवणे यांनी जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण (दिशा) सभेत केले.
 जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात समितीची सभा खासदार सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली त्यावेळी ते बोलत होते. 

या बैठकीत समितीचे सचिव तथा जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जतिन रहमान, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक संगीता पाटील, समिती चे सदस्य मोहन जगताप, अंजली आखाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

*आवास योजनेत कौतुकास्पद काम**
 जिल्हा परिषद अंतर्गत पंतप्रधान आवास योजनेचे विक्रमी  उद्दिष्ट पूर्ण केल्याबद्दल त्यांनी यंत्रणेचे यावेळी अभिनंदन केले. यात पुढील काळासाठी वाढीव उद्दिष्ट जिल्ह्यास प्राप्त झाले आहे याबाबत योग्य ते नियोजन करण्याची सूचना त्यांनी यावेळी दिली. जी कामे 2016 पासून प्रलंबित दिसत आहेत आणि ती विविध कारणांमुळे होणे शक्यच नाही ती कामे वगळा अशीही सूचना त्यांनी दिली.
 अंगणवाडी विकासासाठी ग्रामीण विकास आणि जिल्हा नियोजन निधी यातून सध्या 375 कामे हाती घेण्यात आली आहेत. ही कामे घेताना ज्या अंगणवाड्यांचे काम अत्यावश्यक आहे त्यांना प्राधान्य देण्यात यावे असे खासदार सोनवणे म्हणाले.
*प्रोत्साहन निधी वाढवा*
स्च्छता कार्यक्रमांतर्गत वैयक्तिक शौचालय कामासाठी 12000 रुपये प्रोत्साहन निधी दिला जातो. यात गेल्या 10 वर्षात वाढ झालेली नाही याकडे लक्ष द्यावे, हा निधी ग्रामपंचायत देते त्यामुळे त्यात वाढ करण्यासाठी कार्यवाही करावी अशी सूचना त्यांनी केली. 

*प्रधानमंत्री पीक विमा*
 प्रधानमंत्री पिक विमा योजनेत बोगस सातबारा दाखल करून 7792 जणांनी पिक विमा उचलला हे स्पष्ट झाले आहे. याबाबत आतापर्यंत गुन्हे दाखल का झाले नाही अशी विचारणा करून खासदार सोनवणे यांनी यासंदर्भात गुन्हे दाखल करण्याची कार्यवाही लवकर करण्याचे निर्देश कृषी अधिकाऱ्यांना दिले. 
 जिल्ह्यात कुसुम सौर पंप योजनेअंतर्गत 1,38,452 अर्ज शेतकऱ्यांकडून प्राप्त झाले आहेत. यातील 14,125 कामे पूर्ण झाले आहेत. याबाबतीत बीड जिल्हा अग्रक्रमावर आहे. सोबतच प्रधानमंत्री सुर्यघर योजना अंतर्गत जिल्ह्यात 74 कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे असे सभेत सांगण्यात आले. 

*लखपती दिदी योजना*
 केंद्र सरकारच्या लखपती दिदी योजनेअंतर्गत 88,215 इतके उद्दिष्ट प्राप्त झाले आहे, यात उद्दिष्टापलीकडे जात 88717 प्रकरणे पूर्ण झाले आहेत. 
 वैयक्तिक शौचालय अंतर्गत 4600 तर सार्वजनिक शौचालय अंतर्गत 355 कामे जिल्ह्यात प्रस्तावित आहेत. 

*दुहेरी देयक उचल बाबत चौकशी करा*
 रोजगार हमी योजना अंतर्गत झालेल्या कामात यंत्रणा आणि बांधकाम विभाग या दोन्ही बाजूने देयके उचलली गेली. यात जिल्ह्यात 90 लाख रुपयांच्या निधीची उचल झाली आहे, याबाबत यंत्रणांनी चौकशी करून 8 दिवसात अहवाल सादर करावा अशी निर्देश त्यांनी यावेळी दिले. 
 प्रधानमंत्री पिक विमा योजनेत 2024-25 साठी 398 कोटींचा विमा मंजूर झाला होता. त्यातील 397 कोटीच्या आसपास निधी शेतकऱ्यांना वर्ग झाला आहे. मात्र जिल्ह्यातील 10,500 शेतकऱ्यांचे आधार वेरिफिकेशन झालेले नसल्याने एक कोटी नऊ लाख रुपये परत गेला आहे. याबाबतचे कार्यवाही पूर्ण करण्याचीही  सूचना खासदार महोदयांनी सभेत केली. 
 संसद सदस्यांना ज्याप्रमाणे प्रशिक्षण दिले जाते तसे प्रशिक्षण नव्याने निवडून आलेल्या सरपंचांना चांगले प्रशिक्षण द्या ज्यामुळे ग्रामीण विकास कामास गती प्राप्त होईल असे खासदार सोनवणे यावेळी म्हणाले. 
 वनविभाग घनकचरा व्यवस्थापक, पाणीपुरवठा, पशुसंवर्धन तसेच केंद्राच्या योजना राबविणाऱ्या सर्व कार्यालयांच्या कामाचा आढावा या सभेत घेण्यात आला.
ग्रामीण विकास यंत्रणा संचालक संगीता पाटील यांनी प्रास्ताविक केले तर निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी आभार प्रदर्शन केले.

*****

No comments:

Post a Comment