परळी वैजनाथ (प्रतिनिधी) इंदोर येथे होणाऱ्या १४ वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेत परळी वैजनाथचा भूमिपुत्र कै. रामभाऊ (अण्णा) खाडे सेवाभावी संस्थेचे उपाध्यक्ष श्री.बालाजी फड यांचे चिरंजीव अमेय बालाजी फड हा विदर्भ संघाचे नेतृत्व करणार आहे. १५ ते ३० जानेवारी दरम्यान इंदोर येथे आयोजित करण्यात आलेल्या राज सिंह डुंगरपूर चषक (सेंट्रल झोन) स्पर्धेसाठी विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या निवड समितीने विदर्भ संघाची घोषणा केली असून, या संघाच्या कर्णधारपदी अमेय फड याची निवड करण्यात आली आहे.
अमेय फड याची कर्णधारपदी निवड होणे ही परळी शहरासाठी अभिमानाची बाब मानली जात असून, या निवडीमुळे परळीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. लहान वयापासूनच क्रिकेटकडे असलेली ओढ, सातत्यपूर्ण सराव, शिस्तबद्ध खेळ आणि नेतृत्वगुणांच्या जोरावर अमेयने ही मजल मारली आहे. स्थानिक तसेच विभागीय स्तरावर झालेल्या स्पर्धांमध्ये अमेयने केलेल्या प्रभावी कामगिरीची दखल घेत त्याची विदर्भ संघाच्या कर्णधारपदी निवड करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
१४ वर्षाखालील गटातील ही स्पर्धा अत्यंत प्रतिष्ठेची मानली जाते. सेंट्रल झोन अंतर्गत विविध बलाढ्य संघ या स्पर्धेत सहभागी होणार असून, विदर्भ संघाकडून अमेय फड याच्याकडून दमदार नेतृत्व आणि उत्कृष्ट कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
अमेयच्या या यशाबद्दल त्याचे पालक, प्रशिक्षक, मित्रपरिवार, क्रीडाप्रेमी तसेच परळीतील नागरिकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. अनेक मान्यवरांनी अमेयच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देत, भविष्यात तो राष्ट्रीय स्तरावर विदर्भ आणि महाराष्ट्राचे नाव उज्वल करेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.
परळी वैजनाथसारख्या छोट्या शहरातून राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत विदर्भाचे नेतृत्व करण्याचा मान मिळणे, ही आगामी पिढीसाठी प्रेरणादायी बाब ठरत असून, अमेय फडची ही निवड परळीच्या क्रीडा इतिहासात एक महत्त्वाचा टप्पा मानली जात आहे.
No comments:
Post a Comment