केज (प्रतिनिधी): तालुक्यातील पात्रूड शिवारात शनिवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर त्याचा मित्र गंभीर जखमी झाला आहे.
केज शहरातील शिवाजीनगर येथील रहिवासी बळीराम प्रभाकर मस्के (वय 35) हे आपल्या बाभळगाव येथील मित्र संजय लाटे (वय 30) याच्यासोबत दुचाकी (क्रमांक MH 44 F 1131) वरून तेलगाव मार्गे माजलगावकडे जात होते. पात्रूड शिवारात समोरून जाणाऱ्या टँकरला (क्रमांक MH 43 U 7610) ओव्हरटेक करत असताना दुचाकी घसरली.
दुचाकी घसरून रस्त्यावर पडलेल्या बळीराम मस्के यांच्या अंगावरून भरधाव टँकर गेल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघातात सोबत असलेले संजय लाटे हे गंभीर जखमी झाले असून, त्यांना माजलगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
शवविच्छेदनानंतर अंत्यसंस्कार
अपघातानंतर बळीराम मस्के यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला. तपासणी पूर्ण झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. रविवारी दुपारी अडीच वाजता केज येथील क्रांतीनगर स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
गुन्हा नोंद अद्याप नाही
या अपघातप्रकरणी अद्याप गुन्हा नोंद करण्यात आलेला नसल्याची माहिती जमादार संतोष जातेवाड यांनी दिली. पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
No comments:
Post a Comment