परळी वैजनाथ (प्रतिनिधी)परळी शहरातील मोंढा भागात असलेल्या हालगे गल्ली व घरणीकर रोड परिसरात गेल्या चार-पाच दिवसांपासून रात्रीच्या वेळेस चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. यामुळे या भागातील रहिवासी व व्यापारी वर्ग प्रचंड त्रस्त झाला असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या परिसरात श्री मंगलनाथ बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, वैद्यनाथ बँक, पूर्णवादी बँक, मराठवाडा ग्रामीण बँक यांसह मोठी व्यापारी पेठ आहे. अशा गजबजलेल्या व संवेदनशील भागात चोऱ्यांच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने व्यापाऱ्यांसह नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
विशेष म्हणजे प्रभाग क्रमांक १३ अंतर्गत येणाऱ्या हालगे गल्ली परिसरात सलग चार दिवसांपासून चोरट्यांचा मुक्त संचार सुरू आहे. चोर घरांवर पत्रे चढत असून दुचाकी व चारचाकी वाहनांमधील पेट्रोल चोरीस जात असल्याच्या घटनाही वारंवार घडत आहेत.
या पार्श्वभूमीवर परळी पोलिसांनी या भागाकडे तातडीने लक्ष देऊन रात्रीची गस्त वाढवावी व चोरट्यांना जेरबंद करावे, अशी ठाम मागणी सामाजिक कार्यकर्ते गजानन हालगे यांनी केली आहे.
तसेच प्रशासनाने सीसीटीव्ही कॅमेरे व सार्वजनिक दिवे (स्ट्रीट लाईट) या परिसरात तात्काळ बसवावेत, अशी मागणीही नागरिक व व्यापाऱ्यांकडून जोर धरू लागली आहे. चोरट्यांचा वाढता धुमाकूळ थांबवण्यासाठी प्रशासन आणि पोलिस यंत्रणेने तातडीची पावले उचलावीत, अन्यथा नागरिकांत असंतोष उफाळून येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
No comments:
Post a Comment