परळी वैजनाथ (प्रतिनिधी) वीरशैव लिंगायत समाज व श्री मन्मथ स्वामी जन्मोत्सव समिती, परळी वैजनाथ यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या श्री संत शिरोमणी मन्मथ स्वामी जन्मोत्सवा निमित्ताच्या तीन दिवसीय परमरहस्य पारायण प्रवचन सोहळ्याची शुक्रवार, दिनांक 23 जानेवारी रोजी मोठ्या भक्तिभावात व उत्साहात सांगता झाली. कार्यक्रमाच्या प्रारंभी श्री ष.ब्र.108 गुरु सिद्धचैतन्य शिवाचार्य महाराज साखरखेर्डेकर यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या प्रभू श्री वैद्यनाथ व संतश्री गुरूलिंग स्वामी यांचे दर्शन घेवून पूजा व आरती केली.
येथील श्री संत गुरूलिंग स्वामी मठ संस्थान( बेलवाडी) येथे बुधवार, दिनांक 21 जानेवारीपासून या धार्मिक कार्यक्रमास प्रारंभ झाला होता. समारोपाच्या दिवशी शुक्रवारी सकाळी श्री ष.ब्र.108 गुरु सिद्धचैतन्य शिवाचार्य महाराज साखरखेर्डेकर यांची मान्यवरांच्या हस्ते पाद्यपूजा करण्यात आली. यानंतर झालेल्या धर्मसभेत मार्गदर्शन करताना त्यांनी संत शिरोमणी मन्मथ स्वामी यांच्या जीवनकार्यावर सखोल प्रकाश टाकला. भक्ती, त्याग, समाजसमता व मानव कल्याणाचा संदेश देणारे संत मन्मथ स्वामी यांचे विचार आजच्या समाजासाठी दीपस्तंभासारखे असून त्यांचे कार्य वीरशैव परंपरेला दिशा देणारे व कालातीत असल्याचे त्यांनी नमूद केले.
तरुण पिढीने संतांच्या विचारांतून जीवनमूल्ये आत्मसात करावीत, असे आवाहनही त्यांनी केले. समाजाचे संघटन वाढविणे ही काळाची गरज असून एकमेकांना साथ देणे आवश्यक आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. दुपारी ठीक 12 वाजून 21 मिनिटांनी श्री संत शिरोमणी मन्मथ स्वामी यांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ‘श्री मन्मथ स्वामी’च्या जयघोषाने परिसर भक्तिमय झाला. यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून त्याने तीन दिवसीय परमरहस्य पारायणाची सांगता झाली. याच कार्यक्रमात श्री ष.ब्र.108 गुरु सिद्धचैतन्य शिवाचार्य महाराज यांच्या शुभहस्ते परळी नगरपालिका निवडणुकीत वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीने बहुमताने विजयी झालेल्या नगरसेविका सौ. जयश्री शंकर अप्पा मोगरकर, योगेश विजयकुमार मेनकुदळे व नितीन माणिकअप्पा बागवाले यांचा शाल, श्रीफळ व स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तसेच दैनिक लोकमतचे वार्ताहर संजय खाकरे, संतोष जुजगर, प्रतीक सदानंद चौधरी, महेश निर्मळे, सुयोग गुळवे यांच्यासह विविध भजनी मंडळांच्या पदाधिकार्यांचाही विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सुरेशचंद्र चौधरी यांनी केले, तर आभार प्रदर्शन अॅड. मनोज संकाये यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन अॅड.फुटके यांनी केले. शशीशेखर चौधरी, गिरीश संकाये, रमेश चौधरी, मकरंद नरवणे, अनिल चौधरी, गजानन हालगे, बाळासाहेब चौधरी, संदीप चौधरी, कैलास भीमाशंकरअप्पा रिकीबे, चंद्रप्रकाश हालगे, अशोक झाडे, राहुल निर्मळे, लहु हालगे,रत्नेश बेलुरे, निरंजन गौरशेट्टे, महेश नरवणे, गणेश विडेकर,शिधु बागमारे,कैलास बेलुरे,आमोल नखाते, विशाल नरवणे, अविनाश चौधरी परांडकर सह इतर कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. या तीन दिवसीय धार्मिक कार्यक्रमास परळी शहरासह पंचक्रोशीतील वीरशैव लिंगायत समाजातील महिला-पुरुष व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी झाल्याबद्दल समस्त वीरशैव लिंगायत समाज, परळी वैजनाथ यांच्या वतीने समाधान व्यक्त करण्यात आले.
No comments:
Post a Comment