Sunday, June 19, 2022

राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीसाठी काॕग्रेस ची चाचपणी सुरू .सुशीलकुमार शिंदे यांना दिल्लीचे तातडीचे निमंत्रण !


राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी विरोधी पक्षाचा उमेदवार शोधण्याची प्रक्रिया सुरू असतानाच, अखिल भारतीय काँग्रेस समितीतर्फे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांना आज दिल्लीत तातडीने बोलावण्यात आले आहे. त्यामुळे रविवारचे सगळे कार्यक्रम रद्द करून ते राजधानीत रवाना झाले आहेत. आपण तातडीने दिल्लीला जात आहोत, असे स्वतः शिंदे यांनी सांगितले. राहूल गांधी आणि काँग्रेसमधील अन्य तरूण नेत्यांसोबत सुशीलकुमार शिंदे व काही ज्येष्ठ नेत्यांचे फारसे सख्य राहिले नाही. ज्योतिरादित्य शिंदे तर यापूर्वीच भाजपमध्ये दाखल झाले आहेत.

तर कपिल सिब्बल यांनीही अपक्ष राहून वेगळी वाट चोखाळली आहे. ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांच्यापासून अनेकांनी काँग्रेसला अक्षरशः वार्‍यावर सोडले आहे. सत्ता नसल्याने सैरभैर झालेल्या काँग्रेसजनांच्या मागे आता ईडीचे शुक्लकाष्ठ लागत असल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहे. या पार्श्वभूमीवर सुशीलकुमार शिंदे यांना थेट काँग्रेस समितीने निमंत्रण धाडले आहे. विरोधी पक्षांकडून राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीसाठी यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नकार दिला आहे.

2002 मध्ये भैरोसिंग शेखावत यांच्याविरूद्ध उपराष्ट्रपती पदासाठी सुशीलकुमार शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली होती. विशेष म्हणजे, त्यावेळी मतांच्या अंदाजात शेखावत विजयी होणार हे निश्चित होते. तरीही शिंदे यांची उमेदवारी दिली होती. आता राष्ट्रपतीपदासाठी भाजप देईल तोच उमेदवार विजयी होणार हे निश्चित आहे. तरीही सुशीलकुमार शिंदे यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे.

याचा अर्थ शिंदे हे दरवेळी ‘सॉफ्ट टार्गेट’ ठरत आहेत. दुसरीकडे, काँग्रेस नेते राहुल गांधी यांना ईडीने चौकशीसाठी पाचारण केले आहे. सोमवारी त्यांना ईडीच्या कार्यालयात पुन्हा एकदा चौकशीसाठी जावे लागणार आहे. अखिल भारतीय काँग्रेस समितीने मला तातडीने दिल्लीला बोलावले आहे हे खरे आहे. ईडी चौकशीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक असावी. राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीचा विषय या बैठकीत नसावा.- सुशीलकुमार शिंदे, ज्येष्ठ नेते, काँग्रेस

No comments:

Post a Comment