गेले दोन दिवस महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप होत आहे. शरद पवार यांनी 40 आमदार फोडून वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजीर खुपसला. त्यानंतर जवळजवळ चौवेचाळीस वर्षांनंतर पुन्हा खंजीर उगारला गेला. दुर्दैव असे की त्यावेळी सत्तेसाठी दगाफटका झाला आणि यावेळीही सत्तेसाठीच दगाफटका झाला आहे. ज्या भाजपाने शिवसेनेचा पदोपदी अपमान केला. आमदारांना निधी नाकारला, शिवसेनेच्या बंडखोरांना मानाचे स्थान देऊन भाजपात बसविले असे असंख्य आरोप 2014 साली झाले आणि शिवसेनेने भाजपाची साथ सोडली त्याच भाजपाच्या छत्रछायेखाली आता एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदार जाणार आहेत. शिवसेनेचा मुख्यमंत्री असूनही निधी मिळत नाही अशी ओरड करणारे बंडखोर आमदार याआधी भाजपाचे फडणवीस सरकार निधी देत नाही अशी ओरड करीत होते.
भाजपासह राहिलो तर शिवसेना संपेल. भाजपा आपल्या कार्यकर्त्यांचा छळ करीत आहे, ही युती तोडा असे जोरदार भाषण एकनाथ शिंदे यांनीच केले होते. किंबहुना व्यासपीठावर उभे राहून मी मंत्रिपदाचा राजीनामा देतो, भाजपासह मंत्रिमंडळात राहायचे नाही असे म्हणत एकनाथ शिंदे यांनी भर सभेत उद्धव ठाकरे यांच्या हातात राजीनामा दिला होता. मग आता एकदम भाजपा जवळचा का वाटू लागला? 2014 च्या निवडणुकीनंतर भाजपा आणि सेनेच्या युतीच्या काळात सेनेला अतिशय अपमानास्पद वागणूक दिली होती. सरकारच्या शपथविधीला उद्धव ठाकरे यांना आमंत्रणही दिले नव्हते. ते फडणवीस सरकार होते. शिवसेनेला केवळ 12 बिनमहत्त्वाची खाती होती. त्या काळात रोज धुसफूस सुरू होती. शिवसेना आमदार खिशात राजीनामे घेऊन फिरत होते आणि अखेर सर्व आमदारांच्या एकमताने शिवसेनेने भाजपाशी युती तोडली. त्यानंतरही मुख्यमंत्रिपदाचे आश्वासन भाजपाने पाळले नाही असा आरोप सतत होत राहिला. ही सर्व पार्श्वभूमी असताना आज एकनाथ शिंदे आणि त्यांचे बंडखोर आमदार त्याच भाजपा पक्षाच्या मांडीला मांडी लावून बसण्यास तयार आहेत. त्यामुळे हे स्पष्ट आहे की, हे बंड सत्तेच्या आणि खुर्चीच्या स्वार्थासाठी झाले आहे. जे भाजपा समवेत जाऊन भोगले होते तेच आता राष्ट्रवादीमुळे भोगत आहोत असे म्हणत पुन्हा भाजपाकडे जायचे आणि या निर्णयाला हिंदुत्त्वासाठी असे गोंडस कारण द्यायचे हे कितपत योग्य आहे? एकनाथ शिंदेंचा अपमान झाला. त्यांना पक्षात योग्य महत्त्व दिले नाही हेच बंडाचे मूळ कारण आहे, पण निधी दिला नाही ही ओरड करीत एकनाथ शिंदेंनी बंडखोरांना आपलेसे केले.
एकनाथ शिंदेंनी मोठा भूकंप केला म्हणून आज ते हिरो आहेत. पण पुढील दहा वर्षात ते निष्प्रभ आणि निस्तेज होतील. भाजपाने त्यांना सन्मानाने वागविले तरी पंगतीत त्यांना काटकोनाचेच स्थान असेल. एकनाथ शिंदेंचे बंड हे हिंदुत्त्वासाठी नाही आणि निधीसाठीही नाही. त्यांचे बंड त्यांच्या दुखावलेल्या स्वाभिमानाला फुंकर घालण्यासाठी आहे. पण हा स्वाभिमान बंडखोरांना, खंजीर खुपसणार्यांना कुठल्याच कोपर्यात लाभत नाही. ते कायम संशयित आणि बेभरवंशाचे राहतात. त्यामुळे त्यांच्यावर कायम अंकुश ठेवला जातो. ज्यांनी सत्ता आणि संपत्तीसाठी बंडखोरी केली, खंजीर खुपसले त्यांची अवस्था उभा महाराष्ट्र पाहतो आहे. एकनाथ शिंदेंवर ही वेळ येणार आहे. त्यांच्या सहनशिलतेची परीक्षा पाहणारा काळ आता सुरु झाला आहे..
*दैनिक नवाकाळ*
*संपादकीय*
No comments:
Post a Comment