Saturday, June 18, 2022

शिक्षणाचा बाजार सुरू पालकांना लुटणारा इंग्रजी शाळेत सुरु झाला शैक्षणिक साहित्यांचा मॉल.

 
*शाळा चालकांनी फीसमध्ये केली प्रचंड वाढ; पालकांमध्ये संतापाची लाट!* 

*पालकांनो इंग्रजी शाळाच का?*
 
बीड (प्रतिनिधी) :- कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे गेल्या दोन वर्षांपासून ज्ञानाची गंगा ही ऑनलाईन वाहत राहिली. या ऑनलाईनच्या ज्ञानगंगेत विद्यार्थ्यांना कितीपत ज्ञानप्राप्ती झाली?, लॉकडाऊनमध्ये झालेल्या शैक्षणिक नुकसानाचे सुरु वर्षात काय नियोजन असणार? अशी विविध महत्वपूर्ण प्रश्न बाजूला सारून बीड जिल्ह्यातील इंग्रजी माध्यमातील शाळांनी शालेय फीसमध्ये तब्बल २० टक्के वाढ केली आहे. याबरोबरच अभ्यासक्रमाची पुस्तके वह्या, पुस्तकांचे कव्हर, पेन्सिल, वॉटर बॅग, दफ्तर, रंगपेटी,  रेनकोट, शाळेचा गणवेश, बूट, मोजे इत्यादी वस्तूंचे दर देखील भरमसाठ वाढवले आहेत.

  इंग्रजी माध्यमांच्या शाळा संस्थाचालकांनी सर्रासपणे शिक्षणाच्या नावाखाली पालकांना लुटणारा शैक्षणिक साहित्याचा मोठा मॉल उभा केल्यागत चित्र दिसून येत आहे. शाळेसाठी आवश्यक शालेय साहित्य आमच्यकडूनच घेणे अनिवार्य आहे असे सांगत शाळेतील शिक्षक पालकांना चढ्या भावाने निकृष्ट दर्जाचे गणवेश आणि साहित्य विकत पालकांची लूट करत आहेत. शैक्षणिक शुल्क हा शाळेचा वैयक्तिक निर्णय आहे. पण याबरोबर शाळांसाठी लागणाऱ्या साहित्याची खरेदी शाळेतूनच करावी ही सक्ती का आणि कशासाठी? आर्थिक विवंचनेत सापडलेल्या पालकांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली असून सोशल मीडियावर देखील पालक मोठ्या संख्येने संताप व्यक्त करताना दिसून येत आहेत. पालक वर्ग वारंवार शिक्षण विभागाकडे यासंदर्भात तक्रार करत आहेत. पण शिक्षण विभाग याकडे कोणतेही लक्ष देण्याच्या तयारीत दिसून येत नाही.  
 
*इंग्रजी शाळेत शिक्षणाचा बाजार!*     
   आपल्या मुलाने चांगले आणि दर्जेदार शिक्षण घ्यावे यासाठी पालक शक्यतो इंग्रजी माध्यमाच्या शाळेत मुलांचा प्रवेश घेण्यास प्राधान्य देतो. पालकांची हीच गरज ओळखून शाळा चालकांनी शिक्षणाचा मोठा बाजार सुरु केला आहे. भव्य-दिव्य शाळेच्या इमारती, मोठ्या प्रमाणात शाळा शुल्क, महागडे निकृष्ट दर्जाचे गणवेश आणि शाळा साहित्य शाळेतच खरेदी करण्याची सक्ती, डान्स, स्केटिंग, कराटे यासारख्या विषयांचे आमिष  दाखवून शिक्षणाचा बाजार करणाऱ्या शाळा चालकांनी शिक्षणाचे मात्र तीन तेरा केले आहेत. या सर्व बाबींचा सखोल विचार करून शिक्षण विभागाने कुठे तरी पालकांचा विचार करून शाळा संस्थाचालकांनी चालवलेला हा शिक्षणाचा बाजार बंद करण्यासाठी सक्षम पाऊल उचलने आता गरजेचे आहे.  
 
*पालकांनो, इंग्रजी शाळाच का?*
  
   स्पर्धेच्या या युगात मुलांना दोन हात करता यावे यासाठी पालकवर्ग मोठ्या जागरूकतेने केवळ इंग्रजी शाळा हाच एक पर्याय आहे असे समजून आपल्या पाल्याचा प्रवेश इंग्रजी शाळेत करतो. पण पालक एकदा देखील हा विचार करत नाही की, इंग्रजी शाळेत शिकवणारा शिक्षक देखील मराठी माध्यमांच्याच शाळेमध्ये शिकलेला आहे. एमपीएसी व युपीएसी परीक्षांमध्ये विशेष गुणवत्तेने उत्तीर्ण विद्यार्थी याबरोबरच वैद्यकीय आणि अभियांत्रिकी शाखेत प्रवेशपात्र विद्यार्थ्यांचे शिक्षण हे बहुतांश मराठी माध्यमांच्या शाळेतूनच झालेले असते. हे आता सुज्ञ पालकांनी लक्षात घेणे अत्यावश्यक आहे. पालक जागरूक असल्यास मराठी शाळा देखील एक सक्षम पर्याय आहे. आजच्या तिथीला मराठी शाळेमध्ये देखील सेमी इंग्लिश अतिशय दर्जेदार पद्धतीने शिकावण्यात येते. शिक्षणाच्या या बाजारात इंग्रजी शाळेवर निरर्थक खर्च करण्यापेक्षा पालकांनी मोठ्या विश्वासाने मुलांना मराठी शाळेत पाठवण्याचा निर्णय घेणे गरजेचे आहे.
×=====×=====×=====×

No comments:

Post a Comment