Tuesday, June 21, 2022

महाविकास आघाडीला धक्का तब्बल वीस मते फुटली देवेंद्र फडणवीस यांचा महाविकास आघाडीला पुन्हा चकवा.

मुंबई (प्रतिनीधी)विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपने महाविकास आघाडीचा पुन्हा धुव्वा उडवला आहे. राज्यसभा निवडणुकीपेक्षा आणखी दहा मते जास्त मिळवून भाजपच्या पाचही उमेदवारांनी बेगमी केली. भाजपचे 113 आमदारांचे संख्याबळ असताना 133 मते मिळवून महाविकास आघाडी सरकारमधील अनेक मते आपल्याकडे वळवली

विधान परिषदेच्या आज झालेल्या मतमोजणीत काॅंग्रेसला सर्वात मोठा धक्का बसला. राम शिंदे  आणि श्रीकांत भारतीय  यांना भाजपने पहिल्या पसंतीची 30 मते दिली. भाजपचे पाचवे उमेदवार प्रसाद लाड  यांना 17 मते पहिल्या पसंतीची मिळाली. याशिवाय प्रवीण दरेकर यांना 29, उमा खापरे यांना 27 अशी पहिल्या पसंतीची मते मिळाली. राष्ट्रवादी आणि शिवसेना यांचे चारही उमेदवार प्रत्येकी 26 मते मिळवून विजयी झाले. तरी मते फुटल्याचे शल्य या पक्षांना झेलावे लागणार आहे

शिवसेनेकडे अपक्षांसह पहिल्या पसंतीची सुमारे 63 मते असताना आणि काॅंग्रेसकडे 44 असताना काॅंग्रेसच्या दोन्ही उमेदवारांना पहिल्या पसंतीची कोट्याइतकी मते मिळू शकली नाही. ही बाब या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक बाब ठरली आहे. राष्ट्रवादी काॅंग्रेसचे उमेदवार रामराजे यांना 29 आणि एकनाथ खडसे यांना 28 मते पहिल्या मिळाली. त्यामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसने आपले उमेदवार सहज निवडून आणले. शिवेसनेचे सचिन अहिर आणि आमशा पाडवी यांना कोट्याइतकी म्हणजे प्रत्येकी 26 मते मिळाली. त्यामुळे ते देखील विजयी झाले. पण शिवसेनेच्या उमेदवारांना या पेक्षा जास्त मतांनी विजय मिळवणे अपेक्षित होते. काॅंग्रेसचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांना 22 व भाई जगताप यांना 19 पहिल्या पसंतीची मते मिळाली. याचा अर्थ काॅंग्रेसकडे 44 मते असतानाही तीन मते फुटल्याचे दिसून येत आहे.

राज्यसभा निवडणुकीत भाजपला 123 मते मिळाली होती. ती विधान परिषदेत वाढून 133 झाली. भाजपची सभागृहातील अपक्षांसह 113 आमदार आहेत. त्यापेक्षा वीस मते अधिक मते मिळवून भाजपचे पाचही उमेदवार निवडून आले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा शिवसेनेला धक्का दिल्याची प्रतिक्रिया भाजपच्या गोटातून व्यक्त करण्यात आली

No comments:

Post a Comment