Tuesday, September 22, 2020

मराठा आरक्षणाला 6 ते 7 मंत्री करताहेत विरोध.सरकार मराठ्यांना कधी न्याय देणार? शिक्षण आणि नौकरीमध्ये काय मार्ग काढणार? - आ विनायक मेटे




* मुख्यमंत्र्यांनी आरक्षण प्रश्नाबाबत निर्णय घ्यायला मागितलेले दोन दिवस कधीच होऊन गेले .


नाशिक (प्रतिनिधी):- विद्यमान महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री व मंत्रिमंडळातील मंत्री हे प्रसारमाध्यमे, बैठकांमध्ये मराठा समाजाच्या प्रतिनिधी, संघटनांचे म्हणणे नुसते ऐकून घेतात, मात्र निर्णय काहीच घेत नाहीत, सर्वपक्षीय बैठकीत २ दिवसांमध्ये निर्णय घेऊ असे आश्वासन सर्वांना मुख्यमंत्र्यांनी दिले होते मात्र ते २ दिवस होऊन कितीतरी दिवस उलटले असूनही मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षण व प्रश्नांसंदर्भात काहीही हालचाल केली नसल्याचा आरोप शिवसंग्राम संस्थापक अध्यक्ष आ विनायकराव मेटे यांनी नाशिक येथे पत्रकार परिषदेत केला आहे, यावेळी त्यांनी स्व बाळासाहेब ठाकरे हे शब्द पाळत होते मात्र त्यांचे सुपुत्र मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे हे शब्द पाळत नाहीत असं म्हंटले आहे.
   नाशिक येथे झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी मराठा आंदोलनाच्या नेतृत्वाबाबत बोलताना 'माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेल्याचे' म्हणत भांडणे, वाद लावण्याचा हेतू नसल्याचे स्पष्ट केले. १६ सप्टेंबर रोजी आयोजित केलेल्या सर्वपक्षीय बैठकीत मुख्यमंत्र्यांनी २ दिवसात निर्णय घेऊ असे सांगितले होते. मात्र ते २ दिवस उलटून गेले तरी अद्याप कोणताही ठोस निर्णय घेतला गेला नसल्याचे आ विनायक मेटे म्हणाले. प्रवेश प्रक्रिया सुरु आहेत, पोलीस भरती जाहीर केली आहे. मात्र राज्य सरकारने कसलाच निर्णय जाहीर न केल्याने मराठा समाजात प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. आर्थिक दृष्ट्या दुर्बलमधील आरक्षणाबाबतचा अध्यादेश अद्यापपर्यंत मुख्यमंत्र्यांनी काढलेला नाही, हे मुख्यमंत्री शब्द न पाळणारे आहेत. शिवसेना पाहिल्यापासूनच मराठा आरक्षणाच्या विरोधात आहे, तर राष्ट्रवादी व काँग्रेसमध्ये असलेला मराठा हा प्रस्थापित मराठा समाज असल्याचा आरोप यावेळी आ विनायक मेटे यांनी केला. मराठा समाजातील मुलामुलींच्या शैक्षणिक प्रवेश व नौकऱ्याबाबत तात्काळ निर्णय घ्यावा अशी भूमिका आक्रमकपणे आ विनायक मेटे यांनी मांडली. यावेळी त्यांनी मंत्रिमंडळातील ६ ते ७ मंत्र्यांचा मराठा आरक्षणाला विरोध असून यासंदर्भात या मंत्र्यांची लॉबी सक्रिय असल्याचा आरोप देखील या पत्रकार परिषदेत केला. यावेळी नाशिक येथील जिल्हाध्यक्ष अमित जाधव यांच्यासह पदाधिकारी या पत्रकार परिषदेस उपस्थित होते.

No comments:

Post a Comment