Tuesday, August 25, 2020

प्रशासनाचा अजब करभार खाजगी वाहनाने आलात तर क्वारंटाईन.एसटी बसने या...बिनधास्त फिरा .


बीड ; (प्रतिनीधी ) कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन प्रशासन व्यवस्था गेल्या दोन दिवसापर्यंत लॉकडाऊनच्या प्रक्रियेत होती मात्र आता अनलॉकमध्ये काही सेवा सुरू करण्यात आल्या असून यातील काही सेवांमधील नियम मात्र तुघूलुकी असल्याचे दिसून येते. बाहेरच्या जिल्ह्यातून खाजगी वाहनाचा पास काढून बीड जिल्ह्यात डेरेदाखल झाले तर त्या व्यक्तीला संस्थानिक क्वारंटाईन रहावे लागते मात्र एसटी बसने सदरचा व्यक्ती बाहेर जिल्ह्यातून बीड जिल्ह्यात आला तर त्याला मात्र मोकळीक असते. अनलॉकमध्ये असलेल्या जिल्ह्याच्या या नियमावलीचे बाहेर हसू होताना दिसून येत असून लोकांना याचा त्रासही होत असल्याच्या तक्रारी आता लोक जाहिरपणे बोलून दाखवू लागले आहेत.
गेल्या चार दिवसापूर्वी राज्यभरात बससेवा सुरू करण्यात आल्या. बीड जिल्ह्यातही जिल्हाबाहेर बस सेवा सुरू करण्यात आल्याने प्रवाशांची ये-जा सुरू झाली. मात्र या अनलॉकमध्ये बससेवेला जेवढी मुभा देण्यात आली तेवढी मुभा खाजगी वाहनांना देण्यात आली नसून राज्यशासनानेही पास शिवाय खाजगी वाहनांना इतर जिल्ह्यात प्रवास करता येणार नाही हे स्पष्ट केले आहे. तसे बीड जिल्हा प्रशासनाच्यावतीनेही या नियमाचे काटेकोरपणे पालन केले जाते. मात्र बीड जिल्ह्यात बाहेर जिल्ह्यातून आलेल्या व्यक्तीला चौदा दिवस क्वारंटाईन रहावे लागते हा इतर जिल्ह्याव्यतिरिक्त नियम असून खाजगी वाहनाने पास घेवून तुम्ही बीड जिल्ह्यात डेरेदाखल झाला तर तुम्हाला चौदा दिवस क्वारंटाईन रहावे लागते मात्र राज्य शासनाच्या एसटी महामंडळाच्या बसने तुम्ही बाहेर जिल्ह्यातून बीडमध्ये डेरेदाखल झाले असाल तर तेव्हा मात्र तुम्हाला क्वारंटाईन रहावे लागत नाही. शासन प्रशासन व्यवस्थेचा हा तुघलूकी नियम सर्वसामान्यांना गोंधळात घालणारा आणि खाजगी वाहनाद्वारे प्रवास करणार्‍यांना मानसिक ताण देणारा दिसून येतो. त्यामुळे या निर्णयाचे हसू होत असून एकतर बाहेर जिल्ह्यातून कशाही मार्गे येणार्‍या म्हणजे एसटी बस अथवा खाजगी बस त्या दोघांसाठी नियम सारखाच असावा. नसता हा नियमच बंधनकारक नसावा. अशी मागणी आता जनतेतून होताना दिसून येत आहे.

* कोरोनाबाधीतांवर घरी उपचार,
जिल्हाबाहेरून आलेला संस्थानिक क्वारंटाईन
बीड जिल्हयात कोरोना जनसंसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन आरोग्य विभाग प्रयत्नांची परिकाष्टा करते, मेहनत करते. यामध्ये दुमत असण्याचे कारण नाही. परंतू काही निर्णय मात्र अफलातून असल्याचे दिसून आले आहे. कोरोनबाधीत रूग्ण स्वत:च्या घरी व्यवस्था असल्यानंतर तो तेथेही उपचार घेवू शकतो. परंतू जिल्हाबाहेरून आलेला व्यक्ती घरात क्वारंटाईन राहू शकत नाही तर त्याला संस्थानिक क्वारंटाईन रहावे लागते. हा नियम जरा आश्‍चर्यकारकच म्हणावा लागेल.

* एसटीने आलो असतं तर बरं झालं असतं...
काल परवा एक कर्मचारी नगर जिल्ह्यातून बीड जिल्ह्यात खाजगी वाहनाने पास काढून आला. तेव्हा बीड जिल्हा प्रशासनाच्या नियमानूसार बाहेरील जिल्हयातून बीड जिल्ह्यात आलेल्या व्यक्तीला चौदा दिवस क्वारंटाईन रहावे लागते तसे प्रशासनाने त्याला चौदा दिवस क्वारंटाईन राहण्याचे आदेश दिले. तेव्हा त्या कर्मचार्‍याने ‘मी एसटी बसने आलो असतं तर बरं झालं असतं..’ अशी प्रतिक्रिया देत एसटी बस आणि खाजगी वाहन या दोन प्रवासासाठी बीडमध्ये असलेल्या नियमावर स्वत:चा माथा मारून घेतला.

No comments:

Post a Comment