Friday, August 21, 2020

सावधान ! जनावरांना होत आहे लम्पी स्किन डिसेस रोगाची लागन.


* गडचिरोलीनंतर बीड जिल्ह्यात जनावरात पसरतोय हा रोग, पिंपळादेवी, 
रंजेगाव, सुर्डी, कवडगावमध्ये आढळले बाधीत जनावरे, पशूपालकात भीती.

बीड (प्रतिनीधी )- कोरोना महामारीने त्रस्त असलेल्या बीड जिल्ह्यात माणसांपाठोपाठ आता एका व्हायरसने जिल्ह्यातील जनावरांवर हल्ला चढवला असून गढचिरोलीनंतर हा व्हायरस थेट बीड जिल्ह्यात येऊन ठेपल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे. पिंपळनेर परिसरातील  पिंपळादेवी, रंजेगाव, सुर्डी यासह वडवणी तालुक्यातील कवडगाव या ठिकाणच्या जनावरांना लम्पी स्कीन डिसेस या रोगाची लागण होताना दिसून येत असून हा रोग जनावरांसाठी ढास आणि गोचिडामार्फत पसरला जातो. हा पसरायला लागला की आटोक्यात येणे मुश्किल असते, असे गडचिरोलीमध्ये दिसून आले आहे. बीड जिल्ह्यात मार्च महिन्यात परळी तालुक्यातही या रोगाने असाच उच्छाद् मांडला होता. आता तो जिल्ह्यात उच्छाद् मांडू पाहत आहे. त्याला वेळीच आटोक्यात आणणे गरजेचे आहे.  
लम्पीस किन डिसेस हा जनावरातील दिसून येणारा चर्मरोग आहे. याचे जंतू देवी विषाणू गटातील कॅपे पॉक्स गटात मोडतात. या विषाणूचे शेळी, मेंढ्यातील देवी रोगाच्या विषाणूशी समानता आढळून येते. मात्र हा रोग शेळी, मेंढ्यात अजिबात होत नाही. रोगाचा प्रादुर्भाव गोवंशात 30 टक्के, म्हशीमध्ये काही प्रमाणात होताना दिसून येतो. देशी गोवंशापेक्षा संकरीत जनावरात तो अधिकतेने प्रसारीत होतो. हा रोग झाल्यानंतर जनावरे अशक्त होतात. दूध उत्पादन मोठ्या प्रमाणावर घटते. जनावरांचा गर्भपात होतो. प्रजनन क्षमता घटते, रोगामुळे त्वचा खराब होते, जनावरे विकरीत दिसतात. हा लम्पी स्किन डिसेस रोग आता बीड जिल्ह्यात येऊन ठेपला आहे. महाराष्ट्रातील गडचिरोली नंतर तो थेट बीड जिल्ह्यातच दिसून आला असून मार्च महिन्यात या रोगाने परळीत तालुक्यात उच्छाद् मांडला होता. आता तो बीड आणि वडवणी तालुक्यात पसरत असल्याने पशूपालकात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बीड तालुक्यातील पिंपळादेवी, रंजेगाव, सुर्डी या ठिकाणी लम्पीस्किन डिसेसने बाधीत झालेले जनावरे मोठ्या प्रमाणावर आढळून आले असून जिल्हा पशूसंवर्धन विभागाने या गंभीर बाबीकडे अद्याप लक्ष दिले नसल्याचे दिसून येते. हा रोग ढास आणि गोचडामुळे मोठ्या प्रमाणात पसरण्याची भीती असल्याने जनतेत भर कोरोनात भीती निर्माण झाली असून हा रोग माणसांना होऊ शकतो का? याची दहशत जनतेत आहे. याची गंभीर दखल आता जिल्ह्याच्या पशूसंवर्धन विभागाने घेऊन सरसकट लसीकरण मोहीम हाती घेण्याची मागणी पशू पालकांनी केली आहे. 

जनावरांची काळजी घ्या -डॉ. मोरे
गडचिरोली नंतर आपल्याकडेच लम्पीस्किन डिसेस या रोगाचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. आपल्या भागात पिंपळादेवी, रंजेगाव आणि सुर्डी ठिकाणी याची लागण झाल्याचे दिसून येते. तिथे नि:शुल्क उपचार सुरू केले असल्याचे सांगत हा रोग झपाट्याने वाढतो हे जेवढे खरे असले तरी या रोगात मृत्यूदर मात्र अवघा 5 टक्के असल्याचे सांगत पशूपालकांनी जनावरांची काळजीशे घ्यावी, असे आवाहन नाथापूरचे पशूवैद्यकीय अधिकारी डॉ. अविनाश मोरे यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment