
बीड (प्रतिनीधी )-स्थानिक गुन्हे शाखेने पकडलेला टिप्पर आरोपीने स्कॉर्पिओ गाडी आडवी लावून पळवून घेऊन गेले होते. त्यातील चार आरोपींच्या चकलांबा पोलिसांनी 12 ऑगस्ट रोजी मुसक्या आवळल्या. यातील दोन आरोपी कोरोनाबाधीत निघाल्याने त्यांच्या संपर्कात आलेले सात पोलिस कर्मचारी रात्री पॉझीटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या कर्मचार्यांच्या संपर्कातही दहा ते बारा पोलिस कर्मचारी आले आहेत.
गेल्या काही दिवसांपूर्वी स्थानिक गुन्हे शाखेने गेवराईत तीन वाळुचे टिप्पर ताब्यात घेतले होते. ते कारवाईसाठी चकलांबा पोलिस ठाण्यात घेऊन जात असताना एका टिप्पर चालकाने टिप्परला स्कॉर्पिओ गाडी आडवी लावून टिप्परमध्ये बसलेल्या पोलिसांना दमदाटी करून वाळुसह टिप्पर पळवून नेले होते. त्यानंतर चकलांबा पोलिसांनी एक पथक या वाळु माफियांच्या शोधात पाठविले होते. त्यानंतर 12 ऑगस्ट रोजी वळी (ता. पाथर्डी) येथून चार आरोपींना ताब्यात घेतले होते. त्यांना न्यायालयात हजर केल्यानंतर 17 ऑगस्ट रोजी त्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली. यामध्ये दोन आरोपी पॉझीटिव्ह आढळून आल्याने आरोपीच्या शोधात गेलेल्या आणि त्यांच्या संपर्कात आलेले चकलांबा पोलिस ठाण्याच्या एका पीएसआयसह सहा कर्मचार्यांची 19 ऑगस्ट रोजी कोरोना टेस्ट करण्यात आली. रात्री आलेल्या अहवालात सातही कर्मचारी पॉझिटिव्ह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. भरीस भर म्हणून या पोलिस कर्मचार्यांच्याही संपर्कात दहा ते बारा पोलिस कर्मचारी आले आहेत.
No comments:
Post a Comment