बीड (प्रतिनीधी)  कोरोनामुळे राज्य सरकारने सहकारी संस्थांच्या निवडणुका सातत्याने पुढे ढकलल्या होत्या. आता मात्र या संस्थांच्या निवडणूकांना राज्य सरकारने हिरवा कंदिल दाखविला आहे. 16 जानेवारी रोजी काढलेला आदेश राज्य सरकारने रद्द करून सहकारी संस्थांच्या निवडणूका घेण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार बीड जिल्हा बँकेच्या निवडणूकीचा मार्ग आता मोकळा झाला आहे.

शासन निर्णयात म्हटले आहे की, राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याबाबत मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार संदर्भाधीन क्र. 12 येथील आदेशान्वये राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका ज्या टप्प्यावर असतील त्या टप्प्यावर दि.

31 मार्च 2021 पर्यंत पुढे ढकलण्यात आल्या होत्या. तथापी, राज्यातील पार पाडलेल्या विधान परिषदांच्या निवडणुका व ग्रामपंचायतींच्या निवडणुका तसेच राज्यातील लोकप्रतिनिधी व सहकारी संस्थांचे पदाधिकारी यांनी सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया सुरु करण्याबाबत केलेली विनंती विचारात घेवून, राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणूका तात्काळ सुरु करणे उचित राहील अशी शासनाची खात्री झाली आहे.

"शासनाचे दि.16 जानेवारी 2021 रोजीचे आदेश रद्द करुन, ज्या टप्यावर सहकारी संस्थांच्या निवडणूका स्थगित करण्यात आलेल्या होत्या, त्या टप्प्यापासून, शासनाच्या कोरोना संदर्भातील मार्गदर्शक सुचनांचे काटेकोरपणे पालन करुन राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणूका घेण्याबाबतची कार्यवाही तात्काळ सुरु करण्यात यावी. सदर शासन आदेश महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला आहे."