* पेट्रोलपंपावर तीन ते चार तासात असे ३५ ते ४० पासधारक येऊन पेट्रोल घेऊन गेले.
उस्मानाबाद.( प्रतिनीधी) एकीकडे रस्त्यावरील गर्दी टाळण्यासाठी संचारबंदी, लॉकडाऊन करण्यात आलेला आहे. अशा परिस्थितीत काही अत्यावश्यक सेवेसाठी महसूल प्रशासनाकडून नागरिकांना तात्पुरते पास दिले जात आहेत. परंतु, या पासलाच महसूल भवनातून पाय फुटल्याचे समोर आले असून असे अनेक पास शहरात वाटले गेल्याने सदरील व्यक्ती या पासचा गैरवापर करून शहरात फिरत असल्याचे समोर आले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशासह राज्यभरात लॉकडाऊन घोषीत करण्यात आला आहे. तसेच संचारबंदीही लागू करण्यात आली आहे. मात्र, या संचारबंदीच्या परिस्थितीत अत्यावश्यक सेवेवर परिणाम होऊ नये याकरीता वाहनांना उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून परवाना देण्यात येत आहे. तर अत्यावश्यक सेवेतील नागरिकांनी तहसील कार्यालयाकडून पास देण्यात येत आहेत. यामध्ये सदरील व्यक्तीचे काम, नेमकी कोणती अत्यावश्यक सेवा त्याला निकडीची आहे आदीची पडताळणी करून फोटाेसह पास दिले जात आहेत. परंतु, तहसीलमधूनच अनेकांना विनाफोटाचे केवळ अत्यावश्यक सेवा या मथळ्याखाली पास दिले जात असल्याने यातील गैरप्रकार समोर आला आहे. एकीकडे कोरोनाच्या संकटाने जिल्ह्यात प्रवेश केलेला असताना काही मुजोर व हपापलेल्या यंत्रणेकडून बिनबोभाटपणे बनावट पास वाटप होत असल्याने कोरोनाविरोधातील लढाई अशा प्रकरणातून कमकुवत होण्याचाच धोका दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार एका पेट्रोलपंपावर तीन ते चार तासात असे ३५ ते ४० पासधारक येऊन पेट्रोल घेऊन गेले आहेत. त्यामुळे याची चौकशी होऊन यातील दोषींवर कारवाईची गरज व्यक्त होत असून असे बनावट पास वापरणाऱ्यांवरही गुन्हा नोंदविण्याची गरज आहे.
No comments:
Post a Comment