Tuesday, April 7, 2020

शब-ए-बारातसाठीही बाहेर पडू नका, नमाज घरीच पठण करा. कब्रस्तान मध्ये जावून गर्दी नको - मजलीस ए उलमा


परळी, दि. 7 :-  मुस्लिम बांधवांनी गुरुवारी 09/04/2020 रोजी असणार्या शब-ए-बारातसाठी घराबाहेर पडू नये, नमाज, दुआ व प्रार्थना घरातच करावी, तसेच घरातूनच मरण पावलेल्या आपल्या बांधवांसाठी व नातेवाईकासाठी घरातूनच इसाले सवाब पोहचती करावा. कोरोनासंसर्गाची  साखळी  तोडणं आणि नागरिकांचा जीव वाचवणं हे पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांपासून देशातील प्रत्येक व्यक्तीचं आज एकमेव कर्तव्यं आहे. त्यासाठी घराबाहेर न पडणं, बाहेरील व्यक्तीच्या संपर्कात न येणं, कोरोनाला प्रसाराची संधी न देणं आणि कोरोनाची साखळी तोडणं, ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. पुढील सूचना येईपर्यंत नमाज, सण, उत्सव, पूजा, अर्चा, यात्रा, जत्रा, प्रार्थना, धार्मिक कार्ये ही घरातंच करावीत, कुणीही घराबाहेर पडू नये. असं आवाहन मजलीस ए उलमा परळीच्या वतीने करण्यात आले आहे. 
‘कोरोना’च्या रुग्णसंख्येत दररोज शेकड्यांनी वाढ होत आहे. ही वाढ चिंताजनक आहे. नागरिकांनी परिस्थितीचं गांभीर्य ओळखून वर्तन ठेवलं पाहिजे. शासनाने राज्यातील काही भाग सीलबंद करण्याचे निर्णय घेतले आहेत. बंदीआदेश जारी केले आहेत. बंदीआदेशांचं उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करुन तुरुंगात टाकलं जात आहे. कोरोनाच्यासंदर्भात शासन यापुढे अधिक धोका पत्करणार नाही. कोरोनाप्रसारास कारणीभूत ठरणाऱ्यांवर गंभीर गुन्हे दाखल होतील आणि त्यांना परिणाम भोगावे लागतील, त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने शासन व प्रशासन यांनी दिलेल्या सुचनेचे पालन करावे व शब ए बरात ची नमाज आप आपल्या घरीच पठण करावी व कब्रस्तान मध्ये देखील जाणे टाळावे, आपल्या घरी राहून अल्लाह च्या चरणी प्रार्थना करावी की आपल्या देशासह जगावर आलेल्या कोरानाचे संकट दूर व्हावे व समस्त मानवजातीला यापासून वाचवावे. आपल्या बीड जिल्ह्यात आजपर्यंत एक ही कोरोना बाधित रुग्ण नाही जिल्ह्यातील प्रशासन, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार, जिल्हा शल्यचिकत्सक डॉ अशोक थोरात, सी ओ अजीत कुंभार सह सर्व यंत्रणा शर्थीचे प्रयत्न करत असून आपण सर्वांनी आपल्या घरीच राहून या लढाईत आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन मजलीस ए उलेमा तर्फे मुफ्ती अशफ़ाक, मौलाना तैमुर मिल्ली, मुफ्ती जुल्फेखार, मौलाना शकुर कुरेशी, मौलाना रईस, हाफिज आयाज, मुफ्ती आमेर, हाफिज अली हसन, हाफिज अमजद, हाफिज शाहेद, हाफिज जफर, हाफिज जब्बार सह जामा मस्जिद चे सचिव इम्रान खान, जमाते इस्लामी चे अमीर सय्यद अनवर, मलीकपुरा कब्रस्तान चे अध्यक्ष हाजी बाबा, मुख्य कब्रस्तान तळ चे अध्यक्ष हाजी बाबु मिस्कीन, इस्लामपुरा बंगला कब्रस्तान चे अध्यक्ष तहेसीन नवाब व सर्व पदाधिकारी यांनी केले.

No comments:

Post a Comment