मुंबई: राज्यात सुरू असलेला करोनाचा प्रादुर्भाव आणि पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या पवित्र रमजानच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मुस्लिम बांधवांना सात सूचना केल्या आहेत. त्यांना नमाज पठणासाठी मशिदीत, घराच्या छतावर एकत्र न येण्याच्या, तसेच तरावीह आणि इफ्तारसाठी एकत्र न येण्याच्याही सूचना केल्या आहेत.
राज्याच्या अपर मुख्य सचिव जयश्री मुखर्जी यांनी हे परिपत्रक काढलं असून त्यात केंद्र सरकारच्या अल्पसंख्याक मंत्रालयाने रमजान निमित्त दिलेल्या सात सूचनांचा समावेश करण्यात आला आहे. राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांना हे परिपत्रक पाठवण्यात आलं आहे. राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनीही त्यांच्या ट्विटर हँडलवर हे परिपत्रक पोस्ट केलं आहे. मुस्लिम बांधवांनी रमजान महिन्यात घरीच नमाज पठण करण्याचं आवाहन या परिपत्रकातून करण्यात आलं आहे. तसेच मुस्लिम समाजातील धर्मगुरु, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते आणि स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून जनजागृती करण्याच्या सूचनाही यावेळी करण्यात आल्या आहेत.
No comments:
Post a Comment