*अवैध धंदे करणारे लखपती. तर व्यसनाधीन भिकारपती बनताहेत.
परळी वैजनाथ ;- दिल आया गधी पे, तो परी किस काम की असंच आहे मानवी मनात व्यसना धीनतेच्या विळख्यात अडकलेल्या प्रत्येक व्यक्तीला आपल्या जिवापेक्षा, आपल्या कुटुंबापेक्षा आणि आपल्या स्वतःपेक्षा तो ज्या व्यसनांमध्ये स्वतःचं आयुष्य गुंफत असतो. त्यातच त्याला आयुष्याचं समाधान असल्याचे वाटत असते. हीच व्यसनाधीनता माणसाला कोणत्या स्तराला नेऊन ठेवते ते सांगता येत नाही
लॉकडाऊन झाल्यापासून व्यसनाच्या आहारी गेलेल्या प्रत्येक माणसाचे असेच हाल आहेत. व्यसनाची वस्तू कोणत्याही भावात मिळो, तिला प्राप्त करण्याची अंतरिम इच्छा त्या व्यक्तीची असते. यातच काहीजणांनी माणसाची ही इच्छा ओळखून या व्यसनातील प्रत्येक वस्तूचे भाव इतके वाढले आहेत की, या वस्तू विकत घेणारा एकच म्हणतो नादच खुळा!
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी केंद्रासह राज्य शासनाने तंबाखूजन्य वस्तू आणि मद्य यावर प्रतिबंध आणले आहेत. या व्यसनामुळे मानवाचे शरीर प्रतिकारक्षमता कमी करतेच त्याचबरोबर शारीरिक, मानसिक आणि कौटुंबिक हानी मोठ्या प्रमाणात होते. हे सर्व माहीत असताना देखील व्यसनाच्या आहारी गेलेला व्यक्ती यासाठी कोणत्याही स्तराला जाऊ शकतो हे संपूर्ण देशाने पाहिले आहे. व्यसनासाठी काहींनी आत्महत्या केल्या, काही व्यक्ती मनोरुग्ण झाले, पण त्यांचे व्यसन सुटले नाही. व्यसनासाठी काहीही असे ब्रीद त्यांनी पाळले असल्याचे लॉक डाऊन झाल्याच्या काळापासून पहावयास मिळत आहे. याच लोकांचा फायदा अवैधरित्या तंबाखूजन्य पदार्थ आणि मद्य विक्री करणारे लोक घेत असून अव्वाच्या सव्वा किमत लावून या वस्तूंची विक्री करीत असल्याने अनेक जण आर्थिक संकटात सापडले आहेत. शासनाला या वस्तूंच्या विक्रीतून खूप मोठा आर्थिक लाभ होत असताना देखील शासनाने या वस्तूंच्या विक्रीवर प्रतिबंध लावलेला आहे. असे असताना देखील राजरोसपणे या वस्तूंच्या विक्री आणि खरेदी होत आहेत. यामध्ये व्यसनाधीन असलेले नागरिक आर्थिक संकटात सापडले असून विक्री करणारे मात्र गडगंज संपत्ती कमवीत असल्याचे चित्र सध्या पहावयास मिळत आहे.
तंबाखुजन्य पदार्थाला सोन्याचा भाव आला आहे. राज्यामध्ये अनेक वर्षापासुन गुटखा बंदी आहे. तरीही नगर पालिकेने गोळा केलेल्या कचऱ्यात १० % गुटख्याच्या रिकाम्या पुञ्या मिळतात. जिल्हाधिकाऱ्यांनी एका आदेशान्वये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तंबाखुजन्य पदार्थाची विक्री करणारी दुकाने बंद केली. या अगोदर एका गुटखा पुडी मागे तीन ते पाच रुपयांचा नफा घेतला जात होता. पण आज काय अवस्था आहे. गायछाप पुडीचा दर १० रुपये, परंतु ही तंबाखुची पुडी ३० रुपयापर्यंत गेली. बाबा नावाचा गुटखा जो पुर्वी ५ रुपयास मिळायचा, तो १० रुपयावर गेला. तेवढ्याच किंमतीत गोवा गुटखा मिळतोय. विमल पान मसाला २० रुपयाला मिळत होता तो ४० रुपये किंमतीवर गेला. उडण गरम सिगारेट ८० रुपयाला मिळत होती ती २०० रुपयावर गेली बिस्ट नावाची सिगारेट १३० वरुन २८० वर गेली. एवढंच काय जी चुन्याची डबी २ रुपयास मिळत होती ती आता ५ रुपयाला विकली जाऊ लागली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे गायछाप जर्दा पुडी बरोबर चुना पुडी मोफत सांगितली जात होती. परंतु टपरीवाले हा चुना फेकून द्यायचे. आज त्याच चुना पुडीने काय मजल मारली. संचारबंदीने आणि लॉकडाऊननं तंबाखुजन्य पदार्थाची विक्री करणाऱ्या लोकांना मालामाल करणं चालविलं, तर किराणा आदी व्यापाऱ्यांनी हात धुवून घ्यायला सोडलं नाही. या संचारबंदीने लुटण्याची संधी दिली, पोलिसांनी धावपळ करुन मोंढ्यातील दोन दुकानांवर धाड टाकली तरीही काही व्यापारी पुर्वी ३९० रुपये होलसेल दरात मिळणारा गायछाप पुडा हे व्यापारी ४०० ते ४५० रुपये दराने विकत आहेत. पोलीस धाडी टाकतात किंवा संशयित दुकानाची तपासणी करतात तरीही ग्राहकापर्यंत माल कसा पोहोचती होतो असा प्रश्न करुन या बाबत उलट सुलट प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत आहेत.
त्याचप्रमाणे १४० रुपयांना मिळणारी विदेशी दारूची बाटली आज ५०० रुपयांना विकली जात आहे. तर ५२ रुपयांना मिळणारी देशी दारूची बाटली २५० रुपयाला विकली जात आहे. या लॉकडाऊनमध्ये अवैधरित्या माल विक्री करणारे लक्षाधीश बनत चालले आहेत तर नादच खुळा म्हणणारे भिकारपती बनत चालले आहेत.
No comments:
Post a Comment