Tuesday, January 3, 2023

सावित्रीमाई फुले यांचे साहित्यिक कर्तृत्व अलौकिक -प्रो.डॉ.मनोहर सिरसाट यांचे प्रतिपादन.


*सावित्रीमाई फुले सार्वजनिक जयंतीनिमित्त बीड शहरात भव्य रॅली आणि अभिवादन सभा. 

बीड(प्रतिनिधी):-सावित्रीमाई फुले यांचे साहित्यिक कर्तृत्व अलौकिक  असल्याचे प्रतिपादन बलभीम महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख प्रो.डॉ.मनोहर सिरसाट यांनी केले. क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या १९२ व्या सार्वजनिक जयंती,बीड आयोजित भव्य रॅलीची सांगता व अभिवादन सभे प्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते.या कार्यक्रमाचे अध्यक्ष सीए.बी.बी.जाधव होते.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून प्रा.प्रदिप रोडे, समाज कल्याण आयुक्त रवींद्र शिंदे, संदीप उपरे,उत्तमराव पवार,मुख्याध्यापक गणेश वाघ,प्रा.राम गायकवाड,प्रा.लक्षण गुंजाळ, लक्ष्मण ढवळे, कॅप्टन राजूभाऊ आठवले, इंजि.डी.जी.शहाणे, प्रा.भगवान माने, प्रा. खांडे, प्रा.विद्या अवघडे,प्रा.डॉ.योगिता लांडगे, भास्कर सरपते, अंकुश येळे, राजकुमार कदम, संगमेश्वर आंधळकर यांच्यासह सर्व शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक यांची उपस्थिती होती.
दि.३ जानेवारी २०२३ रोजी सकाळी ८ वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास्त पुष्पहार अर्पण करून मान्यवरांच्या हस्ते रॅलीला हिरवा झेंडा दाखववण्यात आला.सदरील रॅली माळी वेस मार्गे सावित्रीमाई फुले यांचा पुतळा येथे अभिवादन करून, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा मार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन बीड येथे रॅलीची सांगता झाली.या अभिवादन सभेत बोलतांना प्रोफेसर.डॉ.सिरसाट म्हणाले की, सावित्रीमाई फुले आणि जोतीराव फुले यांचे कर्तृत्व अभिन्न स्वरूपाचे आहे.भारताच्या सामाजिक क्रांतीमधील अग्रणी समाजसुधारक आद्य शिक्षिका सावित्रीबाई ह्या प्रचंड प्रतिभेचे धनी होत्या.1854 सालीचा त्यांचा काव्यफुले हा काव्यसंग्रह प्रकाशित झाला, त्यामुळे त्या मराठी साहित्यातील आद्य कवयित्री आहेत असे त्यांनी सांगितले. सावित्रीमाईंनी विचारसुत्र देणाऱ्या कविता आपल्या काव्यसंग्रहातून मांडल्या विचारप्रधानता हे त्यांच्या कवितेचे वैशिष्ट्य आहे.बावनकशी सुबोध रत्नाकर या संग्रहातून त्यांनी भारताचा सामाजिक इतिहास मांडून महात्मा जोतीराव फुले यांचे व्यक्तिचित्र आणि एकूण कर्तृत्व रेखाटले आहे.
त्यासोबतच त्यांनी महात्मा जोतीराव फुले यांना लिहिलेली दोन पत्रे प्रकाशित आहेत.त्या पत्रावरूनही त्यांच्या प्रतिभेचा,उत्तम भाषेचा प्रत्यय येतो सावित्रीमाई फुले यांच्या सामाजिक कर्तृत्वाविषयी अभ्यासपूर्ण भाष्य डॉ.मनोहर सिरसाट यांनी केले. प्रास्ताविक पर भाषणामध्ये प्रा.प्रदीप रोडे यांनी सावित्रीमाई फुले आणि महात्मा जोतीराव फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकत उपस्थित विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले.अध्यक्षीय भाषणामध्ये सीए.बी.बी.जाधव यांनी बालवयापासून शिक्षण महत्त्वाचे असून महापुरुषांच्या विचाराचा वसा आणि वारसा शिक्षणातूनच विद्यार्थ्यामध्ये बिंबवता येतो असे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्राचार्य.डॉ.पांडुरंग सुतार यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रा.लक्ष्मण गुंजाळ यांनी मानले. यावेळी सर्व शाळेचे शिक्षक विद्यार्थी विद्यार्थिनी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment