औरंगाबाद (कांतीकारी साथी न्युज) नाशिक आणि नागपुरात शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत राजकीय वातावरण तापले असतानाच, आता मराठवाडा विभागात देखील अशीच काही परिस्थिती निर्माण झाली आहे. कारण विधान परिषदेच्या मराठवाडा शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी दाखल करण्यात आलेल्या अर्ज मागे घेण्याची मुदत संपली असताना देखील, राष्ट्रवादीचे नेते प्रदीप सोळुंके यांनी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवत बंडखोरी केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला अखेर बंडखोरीचा ग्रहण लागल्याचे पाहायला मिळाले.
काय म्हणाले प्रदीप सोळुंके?
दरम्यान या सर्व घडामोडीवर प्रतिक्रिया देताना प्रदीप सोळुंके म्हणाले की, "माझ्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांनी तुमचे काम करुन तुम्हाला मराठवाडा शिक्षक मतदारसंघातून तीनवेळा निवडून दिले. पण तुम्ही आमच्याकडे ढुंकून देखील पाहत नाही. मग तुम्ही शिक्षकांचे प्रश्न काय सोडवणार. पक्षाने तुम्हाला तिसऱ्यांदा उमेदवारी दिलीच कशी? हा खरा प्रश्न माझ्यासह इतरांना देखील पडला आहे. त्यामुळे मी निवडणुकीतून माघार घेणार नाही असं प्रदीप सोळुंके म्हणाले.
विक्रम काळे यांच्या अडचणीत वाढ होणार!
गेल्या अठरा वर्षांपासून राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार असलेले विक्रम काळे हे मराठवाडा शिक्षक मतदारसंघाचं नेतृत्व करत आहे. तसेच यंदाही त्यांना पक्षाने उमेदवारी दिली आहे. त्यामुळे त्यांच्याकडून निवडणूकीसाठी तयारी करण्यात आली आहे. पण आता त्यांच्याच पक्षातील महत्वाचे नेते असलेले प्रदीप सोळुंके यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवला असल्याने, काळे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पक्षाची भूमिका महत्वाची ठरणार!
विक्रम काळे यांना राष्ट्रवादीने अधिकृत उमेदवारी दिली असतांना देखील पक्षातील नेते प्रदीप सोळुंके यांनी बंडखोरी केली आहे. त्यामुळे आता पक्षाकडून यावर अधिकृत काय प्रतिक्रिया येणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे. सोबतच प्रदीप सोळुंके यांच्यावर काही कारवाई होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत. तर दुसरीकडे मी निवडणुकीतून माघार घेणार नाही असं प्रदीप सोळुंके यांनी स्पष्ट केले आहेत.
No comments:
Post a Comment