आजच्या दोन्ही स्पर्धेत 500 विद्यार्थ्यांचा सहभाग; विद्यार्थ्यांसोबत पालकांचीही उपस्थिती.
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) विद्यार्थी विद्यार्थीच असतात...दररोजचा अभ्यास ते करतात. वर्गामध्ये खोड्या करतांना त्यांच्यातील आगळेवेगळे गुण सुध्दा दिसून येतात. परंतू या सुप्त गुणांना प्रदर्शित करण्याची संधी सहसा मिळत नसते. मराठवाडा साथी बाल धमाल स्पर्धा अशा अवखळ, नटखट आणि मनाला भुरळ पाडणार्या विद्यार्थ्यांसाठी व्यासपिठच आहे. बाल धमाल स्पर्धेच्या आजच्या दुसर्या दिवशी वेशभूषा आणि एकपात्री अभिनय या स्पर्धेतून शालेय विद्यार्थ्यांनी आपल्यातील अलौकिक प्रतिभा समोर ठेवत सर्वांनाच खिळवून ठेवले.
दै.मराठवाडा साथीच्या 43 व्या वर्धापन दिनानिमित्त वैद्यनाथ सहकारी औद्योगिक वसाहतीतील सभागृहात बाल धमाल स्पर्धा चालू आहे. स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस वेशभूषा आणि एकपात्री अभिनय यासाठी होता. सकाळच्या सत्रात शालेय विद्यार्थ्यांनी वेगवेगळया महापुरूषांच्या, वस्तूंच्या भूमिका साकारत आपल्यातील अलौकिक कला सर्वांसमोर ठेवली. छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, माँ साहेब जिजाऊ, मोबाईल, एटीएम, राणी लक्ष्मीबाई, डॉ.बाबासाहेब आंबेडकर अशा महान व्यक्तीमत्वांच्या व्यक्तीरेखा समोर ठेवल्या. या स्पर्धेसाठी शहर आणि ग्रामिण असे दोन भाग होते, त्यात एकत्रित मिळून सुमारे 350 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
या स्पर्धेचे उदघाटन सौ.कल्पनाभाभी बियाणी, जयप्रकाश बियणी, परळी समाचारचे संपादक आत्मलिंग शेटे, परळी प्रहारचे संपादक राजेश साबणे यांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धेचे परिक्षक म्हणून सोनाली ठक्कर, डॉ.मीरा लाहोटी, श्वेता काबरा यांनी काम पाहिले. विद्यार्थ्यांसोबत पालकही या स्पर्धेला असल्याने मोठी गर्दी झाली होती. चार्ली चॅप्लीनने यावेळी विद्यार्थ्यांसोबत मुक अभिनय करत संवाद साधला.
*एकपात्री स्पर्धा.
एका पात्रातून दुसरे पात्र आणि त्यातून होणारा संवाद हा नेहमीच कौतुकाचा विषय ठरलेला असतो. आज मराठवाडा साथी बाल धमाल स्पर्धेत सुद्धा मुलांच्या अभिनयातून साकारलेले एकपात्री अभिनय कौतुकास्पद आणि विद्यार्थ्यांच्या गुणांना उर्जा देणारे ठरले. चित्रपट, नाटक आदीमधील संवाद विद्यार्थ्यांनी एकपात्री अभिनयातून उपस्थितांच्या समोर ठेवले होते. शहर आणि ग्रामीण अशा दोन टप्यात पार पडलेल्या या स्पर्धैेला 150 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. काही वेळा तर आपण प्रत्यक्ष रंगमंचावर आहोत आणि प्रेक्षक म्हणून हा अभिनय पाहत आहोत असाच भास होत होता.
या स्पर्धेचे उदघाटन सौ.धनश्री येलमाने, सौ.कल्पनाभाभी बियाणी, सौ.भारतीभाभी बियाणी यांच्या हस्ते करण्यात आले. परिक्षक म्हणून प्रा.माणिक गडदे, प्रा.राजेश मुंडे यांनी काम पाहिले.
*मुक्त व्यासपिठ.
मराठवाडा साथी आयोजित बाल धमाल स्पर्धा विद्यार्थी वर्गासाठी खर्या अर्थाने मुक्त व्यासपिठच आहे. मागील पंधरा वर्षापासून या स्पर्धा सातत्याने होत असून प्रत्येक वर्षी नवनवीन विद्यार्थ्यांना आपल्यातील कलागुण प्रदर्शित करण्याची संधी या माध्यमातून मिळत आली आहे. आजही स्पर्धेमध्ये सहभागी होताना विद्यार्थ्यांचा उत्साह पहायला मिळत होता. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांचे पालक सुद्धा आपणच जणू काही स्पर्धेक आहोत या भावनेतून आपल्या पाल्याच्या स्पर्धेसाठी पुढे आले होते. स्पर्धेचा तसा पाहता आज दुसराच दिवस परंतू स्पर्धेला मिळणारा प्रतिसाद अभुतपूर्व असाच म्हणावा लागेल.
*चंदुलाल बियाणी यांच्या नियोजनाचे कौतुक.
विद्यार्थी वर्गासाठी पहिली काही वर्षे शहरापर्यंत मर्यादित असलेली ही स्पर्धा मागील काही वर्षापासून ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांच्या सहभागामुळे मोठी होत आहे. मराठवाडा साथीचे मुख्य संपादक चंदुलाल बियाणी यांचे नियोजन या ठिकाणी कौतुकास्पद ठरले. प्रत्येक स्पर्धेच्या आयोजना पासून स्पर्धेसाठी आवश्यक असलेली सर्व तयारी ते करून घेत होते. त्यांना सहसंयोजक ओमप्रकाश बुरांडे व संयोजन समितीतील सर्व सदस्य मनापासून साथ देत होते.
No comments:
Post a Comment