याबाबत बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयातील अंगणवाडी निरीक्षक सौ.भागीरथी सदाशिव बहिरवाडे यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात सरकारी फिर्यादी होत फिर्याद दिली आहे. नगर शहरातील कोठला झोपडपट्टी येथील एका 16 वर्षाच्या अल्पवयीन मुलीच्या आई-वडिलांवर आरोपी जमीर सलीम शेख व फरजान जमीर शेख (रा. मस्तान शाह चौक, नगर) यांनी दबाव टाकून त्यांच्या 16 वर्षीय मुलाबरोबर त्या मुलीचा 22 मे 2022 रोजी बळजबरीने निकाल लावला. त्यानंतर त्या अल्पवयीन पतीने पिडीतेवर वारंवार अत्याचार केला. नंतर काही दिवसांनी आरोपी जमीर शेख व फरजान शेख यांनी पिडीतेच्या डोक्याचे केस कापून तिला मुकुंदनगरमधील धार्मिक स्थळाबाहेर भीक मागायला पाठवले. आपल्या मुलीचा सासरी सुरू असलेला छळ समजल्यानंतर पिडीतेच्या आई-वडिलांनी तिला घरी आणले. त्यानंतर या वादात कोणीतरी मध्यस्थी करावी म्हणून पिडीतेची आई तिला चाईल्ड लाईनच्या कार्यालयात घेवून गेली. तेथे चाईल्ड लाईनच्या समुपदेशकांनी पिडीतेशी चर्चा केल्यानंतर ती अल्पवयीन असल्याचे आणि तिचा बळजबरीने निकाल लावला असल्याचे समोर आले. त्यामुळे चाईल्ड लाईनने ही बाब बालविकास प्रकल्प अधिकार्यांना सांगितली. त्यानंतर बालविकास प्रकल्प कार्यालयातील अंगणवाडी निरीक्षक सौ. भागिरथी बहिरवाडे तसेच चाईल्ड लाईनचे समुपदेशक अलीम पठाण यांनी पिडीत मुलीला सोमवारी (दि.9) रात्री तोफखाना पोलिस ठाण्यात नेले. तेथे पोलिस निरीक्षक ज्योती गडकरी यांना हा घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर दिलेल्या फिर्यादीवरून 6 जणांविरूध्द भा.दं.वि.कलम 376 (आय) (जे)(एन) सह बालकांचे लैगिंक अपराधांपासून संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 4,6, 8 व बालविवाह प्रतिबंधक अधिनियम 2007 चे कलम 10,11 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच पिडीतेच्या अल्पवयीन पतीला पोलिसांनी ताब्यात घेवून त्याची रवानगी श्रीरामपूर येथील रिमांड होममध्ये केली आहे. पुढील तपास स.पो.नि. भान्सी हे करीत आहेत.
No comments:
Post a Comment