Sunday, January 15, 2023

फडणवीस गडावर आले,पंकजा मुंडे यांनी फडणवीसांच्या व्यासपीठावर जाणे टाळले

बीड  (प्रतिनिधी)   श्रीसंत वामनभाऊ यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजीत कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित राहिले. या कार्यक्रमाला पंकजा मुंडेंची उपस्थिती असेल, असे वाटत असताना पंकजा मुंडे यांनी फडणवीसांच्या व्यासपीठावर जाणं पुन्हा एकदा टाळल्याचे दिसून आले. त्यामुळे फडणवीस-मुंडे यांच्यातील वादाबाबतच्या चर्चा अधिक रंगल्या.
गेल्या पंधरा दिवसांच्या कालखंडामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बीड जिल्ह्यात दोन वेळेस आले. स्व. विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योतीताई मेटे यांनी आयोजीत केलेल्या व्यसनमुक्तीच्या कार्यक्रमाला फडणवीस आले होते, तेव्हाही फडणवीसांची भेट मुंडे भगिनींनी घेतली नसल्याचे दिसून येते. पाठोपाठ आज गहिनीनाथ गडावर उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत कार्यक्रम झाला. प्रत्येक वर्षी पंकजा मुंडे गडावर आवर्जून येतात. यावर्षी मात्र त्यांनी दुपारपर्यंत तरी गडावर येणं टाळलं. खा. प्रितम मुंडेंनीही या कार्यक्रमाकडे पाठ फिरविली. त्यामुळे पुन्हा एकदा फडणवीस-मुंडे यांच्यात वादाच्या चर्चा रंगत आहेत. 

No comments:

Post a Comment