*गजर किर्तनाचा कार्यक्रमाचे श्री संत जगमित्र मंदीरात चित्रीकरण.दि.१३ जुलैपासून होणार झी टॉकीजवर प्रसारण.
परळी वैजनाथ;- (प्रतिनिधी) परळीचे वैभव असलेल्या श्री संत जगमित्र नागा मंदीर येथे झी टॉकीजच्या वतीने गजर किर्तनाचा या कार्यक्रमाच्या कार्यक्रमाचे गेल्या पंधरा दिवसांपासून चित्रीकरण करण्यात आले. ही किर्तने येणाऱ्या १३ जुलै पासून प्रसारीत करण्यात येणार आहेत. कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीकोनाने आवश्यक असलेल्या सर्व गोष्टींची काळजी घेवून हे चित्रीकरण करण्यात आले आहे. बीड येथे होणारे हे चित्रीकरण राधा-मोहन साथी प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा प्रभू वैद्यनाथ देवस्थान विकास कृती समितीचे अध्यक्ष चंदुलाल बियाणी, ह.भ.प.तुकाराम महाराज शास्त्री यांच्या आग्रहाने व जगमित्र देवस्थान समितीच्या सहकार्याने परळीत करण्यात आले. सदरील कार्यक्रमामुळे परळीच्या वैभवात आणखी भर पडणार असून, यामुळे प्रभू वैद्यनाथाचे ज्योतीर्लिंग असलेल्या या शहराचा लौकीक आणखी वाढणार आहे.
बीड शहरापेक्षा परळी शहर सुरक्षीत आहे असे लक्षात आल्यानंतर झी मराठी या वाहीनीने गजर किर्तनाचा या कार्यक्रमाचे चित्रीकरण परळीत करण्याचा निर्णय घेतला. गेल्या पंधरा दिवसांत परळीत विविध नामांकीत किर्तनकारांची किर्तने चित्रीत करण्यात आली. हे करत असतांना कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर सामाजीक अंतराचचे सर्व नियम पाळण्यात आले. यासाठी बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेण्यात आली होती. परळीचे पारंपारीक आणि धार्मिक महत्व लक्षात घेता हे चित्रीकरण परळीत करण्याचा निर्णय झी टॉकीजच्या वतीने घेण्यात अला होता. सदरील चित्रीकरण करण्यासाठी संत जगमित्र नागा देवल कमिटीचे अध्यक्ष अभिजित देशमुख, सचिव संजय देशमुख, अखिल भारतीय वारकरी मंडळाचे पदाधिकारी, दै.मराठवाडा साथी परिवार यांचे सहकार्य लाभले.
झी टॉकीजवर प्रसारीत होणाऱ्या गजर किर्तनाच्या या कार्यक्रमाची सुरूवात झी टॉकीजचे पारंपारीक व प्रतिभावंत किर्तनकार ह.भ.प.तुकाराम महाराज शास्त्री यांच्या किर्तनाने दि.१३ जुलै २०२० पासून होणार असून, दररोज सकाळी ७ ते ९ या वेळेत ही किर्तने प्रसारीत केली जाणार आहेत. यामध्ये ह.भ.प.गणेश महाराज गुट्टे, ह.भ.प.प्रकाश महाराज साठे, ह.भ.प.जगदीश महाराज सोनवणे, ह.भ.प.दिपक महाराज बादाडे,ह.भ.प.समाधान महाराज शर्मा, ह.भ.प.संतोष महाराज अढावणे आदींचे किर्तने सलग प्रसारीत होणार आहेत. यामध्ये ह.भ.प.तुकाराम महाराज मुंडे (शास्त्री) यांचीच चार किर्तने होणार आहेत. झी टॉकीजच्या वतीने चित्रीत करण्यात आलेल्या या कार्यक्रमासाठी परळी तालुक्यातील भजनी मंडळाचे मोलाचे सहकार्य लाभले.
No comments:
Post a Comment