* बोरुळ तलाव स्मशानभूमीनजीक पोलिस बंदोबस्त.
* एसआरटी परिसरात शेड मारून अंत्यविधी करण्याचा निर्णय तिथेही विरोध .
अंबाजोगाई - (प्रतिनीधी) अंबाजोगाई येथील कोविड सेंटरमध्ये उपचार घेताना मृत्यूमुखी पडलेल्या दोन कोरोना बाधीतांवर अंबाजोगाई येथील बोरुळ तलाव स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती होताच या भागातील नागरिकांनी बाधीतांच्या अंत्यसंस्काराला विरोध दर्शविल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र प्रशासनाने नंतर अंत्यविधीसाठी स्वाराती परिसरातच शेड उभारण्याचा निर्णय घेतल्याचे कळते. मात्र इथेही स्थानिकाचा विरोध होत असल्याचे समजते.
बीड जिल्ह्यामध्ये कोरोनाबाधीतांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असतानाच मृत्यूचा आकडाही मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसून येत आहे. काल अंबाजोगाईत ७ कोरोनाबाधीत रुग्ण आढळून आले. त्यापैकी हाऊसिंग सोसायटी येथील एका ९० वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला त्याचबरोबर आणखी एक कोरोनाबाधीत रुग्ण मृत्यूमुखी पडला. त्या दोघांवर बोरुळ तलाव येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार होते. मात्र ही स्मशानभूमी लोक वस्तीत असल्याने आजुबाजुच्या नागरिकांत भीती निर्माण झाली. त्यामुळे कोरोनाबाधीत असलेल्या रुग्णाच्या मृतदेहावर याठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात येऊ नये, अशी भूमिका या भागातील नागरिकांनी घेतली. विरोध दर्शविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर नागरिक जमा झाले. त्यामुळे परिसरामध्ये पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला. एसआरटी ते स्मशानभूमी हे अंतर ३ ते साडेतीन कि.मी.चे आहे. सदरच्या स्मशानभूमी परिसरात ७० टक्के लोकवस्ती आहे त्यामुळे या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात येऊ नये असे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यानंतर प्रशासनाने कोरोना बाधीत मृत्यू झालेल्या व्यक्तींवर अन्य ठिकाणी अंत्यसंस्कार कण्याच्या हालचाली सुरू ठेवल्या आहेत. सुत्रांच्या माहितीनुसार एसआरटी परिसरात शेड उभारून अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते.
No comments:
Post a Comment