Wednesday, October 12, 2022

स्वामी रामानंद तीर्थ शासकीय रुग्णालयात आधार कार्ड, पॅन कार्ड सक्तीचे.


*ज्यांच्याकडे कार्ड नाही त्यांनी काय करायचे?

परळी वैजनाथ ( प्रतिनिधी)अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व दवाखान्यात उपचारासाठी येणाऱ्या बाह्य रुग्णांना नवीन केस पेपर काढताना आधार कार्ड, पॅन कार्ड, किंवा मतदान कार्ड यापैकी एक कार्ड सक्तीचे केले असून तरच केस पेपर मिळणार आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे हे कार्ड नाही अशा रुग्णांनी काय करायचे हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
      याबाबत अधिक माहिती अशी की, महाराष्ट्रातील प्रसिद्ध असे असणारे अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात दररोज हजारो रुग्ण उपचारासाठी येत असतात. केवळ मराठवाडाच नाही तर मराठवाड्याच्या बाहेरूनही अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात येणाऱ्यांची संख्या अधिक आहे. महाराष्ट्रात चालणारे सर्व राज्य शासनाचे सरकारी दवाखाने यामध्ये येणाऱ्या रुग्णांना मोफत उपचार केला जातो. तसेच त्यांच्या औषध आदींचा खर्चही राज्य शासन करत असते.
     गोरगरीब सर्वसामान्य यांना खाजगी दवाखान्यातील खर्च परवडत नाही. असे कुटुंबातील रुग्ण शासकीय रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय यांचा आधार घेत असतात. अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात आता बाह्य रुग्णांना उपचारासाठी नवीन केस पेपर काढत असताना सोबत आधार कार्ड, पॅन कार्ड, किंवा मतदान कार्ड घेऊनच जावे लागणार आहे. अशा प्रकारच्या सूचना केस पेपर ज्या ठिकाणी काढले जातात त्या ठिका
णी नोटीस बोर्डवर मोठ्या अक्षरात लावलेल्या आहेत.
     अनेक रुग्ण शासकीय रुग्णालयात आल्यानंतर त्यांना ही बाब लक्षात येत आहे. सोबत कोणतेही कार्ड नसल्याने त्यांना परत जावे लागत आहे. तर असे अनेक नागरिक आहेत किंवा लहान मुले असतील वृद्ध असतील यांचे आधार कार्डच नाही किंवा मतदान कार्ड नाही. पॅन कार्ड नाही अशा रुग्णांनी शासकीय रुग्णालयात उपचार घ्यायचा की नाही हा गंभीर प्रश्न आता निर्माण झाला आहे. खाजगी रुग्णालयांचा न परवडणारा खर्च, बिकट आर्थिक परिस्थिती अशा संकटात सापडणाऱ्या रुग्णांना शासनाने आधार देण्यासाठी हा निर्णय बदलण्याचा सूचना अंबाजोगाई शासकीय रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांना देण्याची गरज आहे. तसेच समाजसेवेचा वसा घेतलेल्या सामाजिक संघटना आणि राजकीय पक्षांनी याची दखल घेण्याची गरज आहे.

No comments:

Post a Comment