Saturday, January 2, 2021

पत्रकारांनी रक्तदान करावे ही संकल्पनाच आदर्शवत- सीईओ अजित कुंभार.

* पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांचा वाढदिवस राज्यभर रक्तदान शिबिराने संपन्न.

बीड-(प्रतिनिधी) कोरोना महामारीमुळे आर्थिक आणि आरोग्याचा कणा मोडला आहे.राज्यात रक्ताचा तुटवडा मोठ्या प्रमाणात निर्माण झाल्याने गरजू रुग्णांचे हाल होत आहेत.ही बाब लक्षात घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांनी रक्तदानाचे आवाहन केले.या आवाहनाला प्रतिसाद देत पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी स्वतःच्या वाढदिवसाचे औचित्य साधून संपूर्ण राज्यभर रक्तदान शिबिराचे आयोजन केले.बीडमध्ये देखील रक्तदान शिबिराला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला, हे सामाजिक कार्य निश्चितच आदर्शवत आहे असे मत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी  अधिकारी अजित कुंभार यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र राज्य  पत्रकार संघ मुंबईचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त बीड जिल्हा शाखेच्या वतीने स.मा.गर्गे भवन येथे भव्य रक्तदान शिबिर दिनांक 1 जानेवारी 2021 रोजी सकाळी 11 वाजता संपन्न झाले. रक्तदान शिबिर समवेतच प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांचा वाढदिवस केक कापून जल्लोषात मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला.यावेळी व्यासपीठावर सोशल डिस्टन्स नियमाचे पालन करत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार,सुप्रसिद्ध डॉक्टर अनिल बारकुल, शांतीवन प्रकल्पाचे संचालक दीपक नागरगोजे,माजी सभापती राजेंद्र बांगर,पत्रकार संघाचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष वैभव स्वामी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दैनिक दिव्य लोकप्रभा'चे संपादक संतोष मानूरकर यांची विशेष उपस्थिती लाभली. पुढे बोलताना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार म्हणाले, बीड जिल्हा हा नेहमी सामाजिक उपक्रमात पुढे असलेला जिल्हा आहे. कोरोना महामारी मुळे संपूर्ण राज्यभरात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला.या गंभीर बाबीकडे दूरदृष्टी असलेल्या पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी संपूर्ण राज्यभरात रक्तदान शिबिराचे आयोजन वाढदिवसानिमित्त केले. ही बाब निश्चितच आदर्शवत आहे.वैभव स्वामी यांच्या पुढाकाराने बीड जिल्ह्यात सातत्याने सामाजिक उपक्रम घेण्यात येतात.संपूर्ण राज्यभरात होत असलेले रक्तदान शिबिर निश्चितच कौतुकास्पद आहे.वसंत मुंडे यांना दीर्घायुष्य लाभावे आणि त्यांच्या हातून असेच सामाजिक दायित्व पार पडत राहावे या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा राहतील असे मनोगत व्यक्त केले.याप्रसंगी डॉक्टर अनिल बारकुल सर म्हणाले, वसंत मुंडे सारख्या उभरत्या नेतृत्वाला पत्रकार संघाने प्रदेशाध्यक्ष पद देऊन गरुड भरारी घेण्यासाठी बळ दिले आहे.प्रदेशाध्यक्ष पद स्वीकारल्यानंतर त्यांनी संपूर्ण राज्यभरात आपला स्वतःचा वाढदिवस बॅनर बाजी व इतर बाबींवर खर्च करत साजरा करण्यापेक्षा रक्तदान शिबिराच्या माध्यमातून वाढदिवस साजरा करून आपल्या सामाजिक कार्याची पावती दिली आहे.याप्रसंगी शांतीवन प्रकल्पाचे दीपक नागरगोजे म्हणाले ,भविष्यात वसंत मुंडे यांच्या नेतृत्वाखाली पत्रकार संघ सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून निश्चित नाव लौकिक करेल. अध्यक्षीय समारोपात दैनिक दिव्य लोकप्रभा'चे संपादक संतोष मानूरकर म्हणाले ग्रामीण पत्रकारांच्या समस्येची नाळ माहित असल्याने राज्याच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळताना निश्चित वृत्तपत्रसृष्टीला चांगले दिवस येण्यासाठी त्यांचे नेतृत्व सक्षम पणे पुढे येईल राज्यभरातील पत्रकारांना सन्माना सोबत सामाजिक प्रतिष्ठान देण्यामध्ये त्यांचे योगदान इतिहास निर्माण करेल या प्रसंगी सत्कार मूर्ती वसंत मुंडे मनोगत व्यक्त करताना म्हणाले की,महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांनी रक्ताचा तुटवडा असल्यामुळे राज्यातील रक्तदात्यांना रक्तदान करण्याचे आव्हान केले.त्याच वेळी पत्रकार संघाच्या वतीने संपूर्ण राज्यभरात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्याचा निश्चय केला. माझा वाढदिवस हे केवळ निमित्तमात्र. यापुढे पत्रकार संघाच्या माध्यमातून सातत्याने सामाजिक उपक्रम राबवले जाणार आहेत.वृत्तपत्रांना चांगले दिवस यावे यासाठी वृत्तपत्रांच्या अंकाची किंमत वाढली पाहिजे या भूमिकेला देखील आता राज्यभरातील संपादक सकारात्मक प्रतिसाद देत आहेत. वृत्तपत्र आणि सामाजिक हित जोपासण्याचे कार्य भविष्यात करणार असल्याचे स्पष्ट करून माझ्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण राज्यभरात एक हजारापेक्षा अधिक रक्तदाते रक्तदान करत असल्याने आज माझा वाढदिवस अविस्मरणीय ठरला असल्याचे भावनिक मत व्यक्त केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन,प्रास्ताविक आणि आभार पत्रकार संघाचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष वैभव स्वामी यांनी मानले.अभिष्टचिंतन सोहळा आणि रक्तदान शिबिरासाठी बीड जिल्हाभरातील पत्रकार बांधव,संपादक, प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.तब्बल 51 रक्तदात्यांनी उस्फूर्तपणे रक्तदान शिबिरात सहभाग घेत रक्तदान केले.पत्रकारांसोबत वकील, डॉक्टर, प्रतिष्ठित नागरिकांनी देखील रक्तदान करून पत्रकार संघाच्या आव्हानाला प्रतिसाद दिला.

No comments:

Post a Comment