Sunday, January 10, 2021

केरळमध्ये काशीपीठाचा शाखामठ लवकरच स्थापन होणार.श्री काशी जगद्गुरू डॉ.चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी.

वाराणसी-केरळमध्ये 25 लाखांपेक्षा अधिक वीरशैव वास्तव्यास आहेत. त्या प्रदेशातील प्राचीन परंपरा सध्या लुप्त झाली असली तरी तेथील लोक सनातन वीरशैवधर्माच्या परंपरेचे पालन करीत आहेत. वीरशैव धर्मसिद्धान्त, आचार आणि विचार यांचा प्रचार व प्रसार करण्याकरिता केरळमध्ये पोन्नमपेटे भरनीकवी, जि. कोल्लम या ठिकाणी काशीपीठाचा शाखामठ लवकरच स्थापन करण्यात येऊन त्याचे उद्घाटन करण्यात येणार आहे, अशी माहिती श्रीकाशी जगद्गुरू डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांनी दिली. केरळमधून आलेल्या भक्तांना शिवदीक्षा दिल्यानंतर आशीर्वचन करताना ते बोलत होते. 
यासंबंधी बोलताना ते पुढे म्हणाले की, केरळमधील मठासाठी तेथील एका बटूला धर्मप्रशिक्षण देण्यात येईल. पुढे त्याचा पट्टाभिषेक करून त्याच्याद्वारे केरळमध्ये धर्मप्रबोधन करण्यात येईल. याआधी 2014 व 2016 मध्ये अरुणबाबू अप्पूकुट्टन यांच्या विनंतीवरून महास्वामीजी समान पीठाचार्य आणि अनेक शिवाचार्यांसह केरळमध्ये धर्मप्रचार दौर्‍यासाठी गेले होते. त्यामुळे केरळ प्रांतात आज ही धर्मजागृती दिसून येत आहे. केरळमधील कोल्लम, कोट्टायम इत्यादी जिल्ह्यांतील वीरशैव बांधवांनी एकत्र येऊन ‘वीरशैव बसवेश्वर पीपल्स चॅरिटेबल ट्रस्ट’ ही संस्था स्थापन केली असून श्री. सुरेंद्र पिळ्ळै हे त्या संस्थेचे अध्यक्ष आहेत. श्री. सुरेंद्र पिळ्ळै आणि त्यांचे 41 विश्वस्त यांनी कोल्लम जिल्ह्यात तीन एकर जमीन खरेदी केली असून तेथे श्री जगद्गुरू पंचाचार्य मंदिर, काशी जंगमवाडी मठ, काशी विश्वेश्वर मंदिर, अन्नपूर्णा छत्र, श्री म. बसवेश्वर पार्क, आयुर्वेद मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल, श्री जगद्गुरू पंचाचाय सभाभवन आदींचे निर्माण होणार आहे. या कार्यासाठी केरळ शासनाकडून या ट्रस्टला 50 लाख रुपयांचे अनुदान प्राप्त झाले असून अत्यंत जोमाने विकासकार्य चालू आहे. येत्या एप्रिलमध्ये काशी जंगमवाडी मठाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. यावेळी ज. पंचाचार्य संमेलन, लिंगदीक्षा आणि वीरशैव संमेलन इत्यादी कार्यक्रम होणार आहेत, असे महास्वामीजींनी सांगितले. विश्वस्त श्री. सुजीत राजन, श्री. कृष्णराज आर. पिळ्ळै, रवींद्रन एन. पिळ्ळै, सुरेंद्र पिळ्ळै, अशोक एस. पिळ्ळै आणि राजेश या लोकांनी श्रीकाशीमहास्वामीजींच्या इष्टलिंगपूजेत सहभागी होऊन त्यांच्याकडून लिंगदीक्षा आणि मंत्रोपदेश घेतला.

No comments:

Post a Comment