अंबाजोगाई (प्रतिनीधी): राज्यावर कोरोना महामारीचे संकट असतानाही अंबाजोगाई तालुक्यात अवैध गुटखा विक्रीला ऊत आला आहे. एवढंच नाही तर काही गुटखा विक्रेते होलसेलर बनले असून तालुक्यातील खेड्या-पाड्यात गुटखा पुरवण्याचा काम सुरू केलं आहे.महाराष्ट्र सरकारने गुटखा विक्री वर बंदी आणली मात्र ही बंदी कागदावरच असल्याचं दिसून आलं आणि असाच गुटखा व्यवसाय अंबाजोगाई तालुक्यात जोरात सुरू आहे .पोलीस प्रशासन विभागाच्या आशीर्वादाने या परिसरात सर्रासपणे गुटखा विक्री सुरु असल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे. दररोज लाखो रुपयांच्या गुटख्याची विक्री अंबाजोगाई परिसरात होत असल्याची धक्कादायक माहिती सूत्राकडून समजते
गुटखाबंदी असतानाही तालुक्यात होलसेल गुटखा विक्री जोरात चालू आहे. विशेष म्हणजे भरदिवसा दुचाकी वर पोटे टाकून बिनधास्त लागेल त्याला माल पुरवला जातो.संबधीत खात्याच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांशी विक्रेत्यांचे आर्थिक हितसंबंध असल्याने कारवाई होण्याची चिंता नाही त्यामुळे गुटखा विक्रेता दिवस-रात्र गुटखा विक्री करत आहे. अंबाजोगाई मधे नगर पालिका समोर, शिवाजी चौक, बसस्टँड, भाजी मांडीत, अशा अनेक ठिकाणी गुटखा विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे.
याबाबतचा कायदा इतका कडक होऊनही त्यांची अंमलबजावणी मात्र संबंधित यंत्रणांकडून होताना दिसून येत नाही. त्यामुळे या सर्वच प्रकारात मिलीभगत असल्याचे खुलेआम आरोप जनतेतून होत आहे. या कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणेकडूनच ढिलाई दाखवली जात असल्याने कायदा कडक असूनही अंबाजोगाई तालुक्यात खुलेआम गुटखा विक्री केली जात आहे.
चार महिन्याआधी रजनीगंधा, पानपराग, गोवा, राजनिवास यासह अनेक कंपनीचा गुटका अंबाजोगाई पोलिसांनी पकडला होता. ही कारवाई होऊनही लॉकडाऊन काळात पुन्हा अंबाजोगाई शहर व परिसरात गुटखा माफिया सक्रीय झालेले आहेत. शहरात गुटखा माफीया नवनवीन मुलांना हाताशी धरून माल विक्रीसाठी देऊन टपरी,किराणा दुकान चालकांपर्यंत पोचवत आहेत.
शहरात दोन पोलीस ठाणे असतानाही गुटखाविक्रीचा खेळ सुरूच आहे. पोलीस प्रशासनाने परिसरात पुन्हा पहिल्यासारखी कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

No comments:
Post a Comment