Saturday, January 9, 2021

दिलदार, सदाबहार, हसतमुख, कार्यकुशल; कार्यतत्पर, समर्पित व्यक्तीमत्व-अजय पुजारी


चेहर्‍यावर कायमस्वरूपी स्मित हास्य, ओठातून तेवढेच स्मीत आणि गोड येणारा आवाज...असं जर कुणाच्या बाबतीत म्हणायचं असेल तर सर्वांचचं लक्ष आमच्या साथी परिवारातील सदस्य आमचा सहकारी अजय पुजारी यांच्या बाबतीत म्हणता येईल. अगदी भल्या पहाटे उठल्यापासून रात्री उशिरापर्यंत 24 बाय 7 असा कार्यरत राहणारा हा आमचा सहकारी आज वाढदिवस साजरा करीत असताना त्याच्या कामाचा गौरव करणे उचित वाटते. 
अजय पुजारी आणि मराठवाडा साथी किंबहुना बियाणी परिवार हे समीकरण सुमारे 25 वर्षापासून आम्ही पाहत आलो आहोत. मराठवाडा साथी मध्ये कार्यरत असताना एकामागून एक अनेक जबाबदार्‍या अजय पुजारी स्वीकारत गेले आणि पाहता पाहता जबाबदारीच्या सर्वच आघाड्यावर ते यशस्वी होत गेले आहेत. नगर परिषदेच्या अंतर्गत स्वच्छतेचे काम असेल, मराठवाडा साथीचे वितरण, एखाद्याला अंक मिळाला नसेल, एखाद्याची जाहीरात किंवा बातमी असेल तेथे अजय पुजारी यांचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संपर्क आल्याशिवाय राहत नाही. मुर्ती लहान परंतू किर्ती महान या वाक्यप्रचाराचा खरा अर्थ पुजारीच्या अंगा खांद्यावर असलेल्या मोठ मोठ्या जबाबदारीतून लक्षात येतो. 
मराठवाडा साथी आणि बियाणी परिवाराशी अत्यंत निकटचे नाते अजय पुजारी याने जोपासले आहे.आमचे मुख्य संपादक चंदुलाल बियाणी आणि त्यांचे बंधू संपादक सतिश बियाणी यांचा अजय पुजारी यांच्या कामावर फार मोठा विश्वास आहे. काम लहान असो किंवा मोठे त्याची जबाबदारी एकदा पुजारीवर टाकली कि पुढे कोणतीही अडचण न येता काम पूर्ण झालेच असा विश्वास पुजारी यांनी निर्माण केलेला आहे. चंदुसेठ आणि सतिशसेठ यांचा देखील पुजारीवर व त्याच्या कामावर विश्वास असणे सहाजिकच आहे. घड्याळाचे तास 24 असले तरी हा माणूस चंदुसेठसाठी सातत्याने कार्यरत आहे. आधुन मधून कामाचा ताण तणाव येत असला तरी सहजपणे त्यावर मात करून केवळ एका स्माईलने तो पुन्हा ताजा तवाना होवून कामाला लागल्याचे आम्ही अनेकदा पाहिले आहे. केवळ कामापुरती नोकरी नाही तर जबाबदारीची नोकरी कशी करावी हे अजय पुजारी यांच्या कामातून शिकता येईल. सहज रस्त्याने चालता चालता एखाद्याने सांगितलेले काम तातडीने कसे सोडवता येईल किंवा त्यासाठी कसा पाठपुरावा करावा हे पुजारी यांना सहजपणे करता येते. मराठवाडा साथी कार्यालयात आमच्यासोबत काम करतांना तो आमचा सहकारी आहे का आमच्या बाह्य जगातील इतर लोकांचा सहकारी आहे असा प्रश्न पडतो. अगदी पाणी आले नाही इथपासून पुजारी सर गटारी साफ झाल्या नाहीत इथपर्यंतच्या तक्रारी पुजारी यांच्यापर्यंत आल्यानंतर ते भावी नगरसेवक आहेत कि काय असाही प्रश्न मला अनेकदा निर्माण झाला. हा माणूस नेमके काय काम करतो हे मलाच काय परंतू अनेकांना कळालेच नाही. मराठवाडासाथीच्या स्पर्धा असतील, काही इतर सांस्कृतिक कार्यक्रम असतील तेथे पुजारी आवश्यकच असतात. पोद्दार, बचपन, राजस्थानी मल्टीस्टेट, डीएमआयटी अशा अनेक साथी परिवाराशी निगडीत असलेल्या संस्थेत अजय पुजारी यांचा वावर स्पष्टपणे दिसून येतो. 
एखाद्या जबाबदारीचे काम अजय पुजारी यांच्यावर सोपवून दिले कि ते काम यशस्वी झाले असे समजायला हरकत नाही कारण अजय पुजारी जेव्हा काम हाती घेतो तेव्हा त्यासाठी आवश्यक असलेल्या काळजीपासून तयारीपर्यंत तो लढायला तयार झालेला असतो. मराठवाडा साथीच्या दिनदर्शिका असतील किंवा काही विशेषांक तेथे सुद्धा अजय पुजारीचा सहभाग ठरलेला असतो. दिवंगत मुख्य संस्थापक संपादक स्व.मोहनलालजी बियाणी यांच्या गळयातील अजय पुजारी हे तर ताईतच होते. आमच्या बाई म्हणजेच काकीजींनाही अजय पुजारी याच्या कामाची सवय झाली आहे. अर्थातच अजय पुजारीने हे नाते फार चांगल्या पद्धतीने जोपासले आहे. रक्ताचे नाते जेवढे घट्ट असते तेवढेच घट्ट नाते अजय पुजारी यांच्या व्यक्तीमत्वातून आणि त्यांच्या समर्पित भावनेतून बियाणी परिवाराशी जोडले गेले आहे. अजय पुजारी याचा आज वाढदिवस साजरा करीत असतांना या आमच्या उमद्या, समर्पित, सेवावृत्ती जोपासणार्‍या मित्राला प्रभु वैद्यनाथ उदंड आयुष्य प्रदान करो एवढीच प्रार्थना. 

*आनंद हाडबे*
पत्रकार तथा मुख्य जाहीरात प्रतिनिधी
दैनिक मराठवाडा साथी
बीड, परभणी, जालना, औरंगाबाद

No comments:

Post a Comment