वाराणसी-सेवा ही सर्वच धर्मात श्रेष्ठ मानली जाते. त्यामुळे सेवा हादेखील सर्वोच्च धर्मच होय, असे विचार श्रीकाशीजगद्गुरू डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांनी आपल्या आशीर्वचनात व्यक्त केले. काशीपीठाचे परम सेवक लिं. पंचाक्षरी काशीनाथ लिगाडे यांची तेराव्या दिवशी काशीपीठात गणाराधना करण्यात आली, त्यावेळी आशीर्वचन करताना ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, ङ्गसेवा धर्म: परम गहन: योगिनामगम्य:फ अशी एक उक्ती आहे. याचा अर्थ असा की, सेवा हा धर्म अत्यंत श्रेष्ठ असून तो योगी लोकांना देखील अगम्य आहे. मनुष्याला आपल्या जीवनाचे सार्थक करून घेण्यासाठी योगसाधना करून परमतत्त्वाची प्राप्ती करून घ्यावी लागते. सर्वच मनुष्यांचे मन परमतत्त्वावर केंद्रित होत नाही. मग अशा मनुष्याने समाजसेवेवर लक्ष केंद्रित केले तर त्याला तीच स्थिती प्राप्त करून घेता येते. ज्याचे मन एकाग्र होऊ शकते त्याने ध्यानधारणा करून आत्मकल्याण साधावे. इतरांनी समाजसेवी संस्थांमध्ये सेवा करून त्यात तन-मन-धन अर्पण करावे. यालाच गीतेमध्ये ङ्गयोग: कर्मसु कौशलम्फ असे म्हटले आहे. आपल्या वाट्याला आलेली सेवा जर मन:पूर्वक केली तर त्यामुळे देखील योगसाधनेचे फळ मिळते. पंचाक्षरी लिगाडे हे आपले घर, परिवार सोडून काशीमध्ये कायम वास्तव्यास राहिले. लिं. विश्वेश्वर शिवाचार्य महास्वामीजींच्या कृपाशीर्वादाने आणि विद्यमान जगद्गुरू डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजींच्या मंगलाशीर्वादाने त्यांनी मठामध्ये यात्रेकरूंची, विद्यार्थ्यांची व अभ्यागतांची सेवा केली. त्यांची मने जिंकून घेतली. सेवाधर्मामुळे त्यांचे कल्याणच झाले आहे, असे महास्वामीजी म्हणाले. पंचाक्षरी लिगाडे लिंगैक्य झाल्यानंतर आज तेराव्या दिवशी त्यांचा ब्रह्मभोज कार्यक्रम जंगमवाडी मठात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात काशीतील प्रतिष्ठित लोक सहभागी झाले होते. आयकर विभागाचे वकील सुभाषचंद्र, मठाचे वकील अॅड्.उदयभान सिंग, डॉ. शुक्ला, बनारस हिंदू विश्वविद्यालयाचे डॉ. बसवप्रभू जिरली, धर्मागम विभागाध्यक्ष पं. डॉ. कमलेश झा, मठाच्या व्यवस्थापिका नलिनीताई चिरमे, जगद्गुरू विश्वाराध्य गुरुकुलाचे सर्व विद्यार्थी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment