
बीड (प्रतिनीधी )- परतीच्या पावसाने आज सकाळपासून जिल्ह्यामध्ये धुमाकूळ घातला. या पावसाने खरीप पिकाचे पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अनेक शेतकर्यांचा कापूस फुटलेला होता. या फुुटलेल्या कापसाचे आजच्या पावसामुळे अक्षरश: वाती झाल्याने शेतकर्यांना मोठा आर्थिक फटका बसला. तसेच सोयाबीन आणि काढून ठेवलेल्या बाजरीचेही नुकसान झाले. अनेक नद्या-नाल्यांना पूर आलेला होता.
पंधरा दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यासह मराठवाड्यात धो-धो पाऊस पडला. या पावसामुळे जिल्हाभरातील जवळपास १० हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रातील खरीप पिकाचे नुकसान झाले. या नुकसानीचे संपूर्ण पंचनामे होत नाही तोच आज सकाळपासून जिल्ह्यामध्ये पावसाने धुमाकूळ घातला. या पावसाने कापसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. विशेष म्हणजे उघडीपमुळे कापूस चांगलाच फुटलेला होता. काही शेतकर्यांनी कापूस वेचला असला तरी बहुतांश शेतकर्यांच्या कापसाची वेचणी राहिलेली होती. या पावसाने फुटलेल्या कापसाच्या वाती झाल्याने कापूस उत्पादक शेतकर्यांना जबरदस्त आर्थिक फटका बसला आहे. सोयाबीनचेही मोठे नुकसान झाले आहे. शेतकर्यांनी सोयाबीन काढून ठेवलेला होता. मात्र आजच्या पावसाने सोयाबीन पुर्णत: भिजली. काढून ठेवलेल्या बाजरीचेही नुकसान झाले. बीड, गेवराई, नेकनूर, केज यासह अन्य तालुक्यातील नद्यांना पाणी आले होते.
No comments:
Post a Comment