
अंबाजोगाई (प्रतिनीधी )- स्वाराती रुग्णालयामध्ये उपचार घेणार्या बीड शहरातील एका ३२ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. रुग्णालयाच्या फ्रिजरमध्ये अन्य एकाचे शव ठेवण्यात आला होता. संबंधित विभागाच्या कर्मचार्याने मृतदेहाची शहानिशा न करता दुसराच मृतदेह नातेवाईकांकडे सोपविला. अंत्यसंस्कार करत असताना मृतदेहाची किट काढली असता हा मृतदेह आपला नसल्याचे समोर आले. तो मृतदेह रात्री पुन्हा अंबाजोगाईच्या रुग्णालयात नेण्यात आला आणि आपला मृतदेह नातेवाईकांनी बीडला आणला. रुग्णालयाच्या या भोंगळ आणि अनागोंदी कारभारामुळे हा प्रकार घडला. ज्या वार्डात मृतदेह ठेवण्यात आले होते त्या वार्डात लाईट नसल्यामुळे हा प्रकार घडला असल्याचे सांगण्यात आले.
बीड शहरातील मोमीनपुरा भागातील ३२ वर्षीय तरुणाला उपचारार्थ अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. या तरुणाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. त्याची टेस्ट केली असता त्याला निमोनिया झालेला होता. निमोनियाने त्याचा मृत्यू झाला. त्याचा मृतदेह तेथील फ्रिजरमध्ये ठेवण्यात आला होता. त्याच दरम्यान परळी तालुक्यातील अन्य एकाचा मृतदेहही फ्रिजरमध्ये ठेवला होता. रात्री त्या मयताच्या नातेवाईकांना रुग्णालय प्रशासनाने मृतदेह दिला. मृतदेह किटमध्ये बंद होता. अंत्यसंस्कार करण्याच्या वेळी चेहर्यावरची किट हटविण्यात आली. या वेळी हा मृतदेह आपला नसल्याचे समोर आले. त्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह पुन्हा अंबाजोगाई रुग्णालयात पाठविला आणि त्याठिकाणाहून आपला मृतदेह आणला. ज्या वेळी मृतदेह नातेवाईकांकडे सोपविण्यात आला त्यावेळी फ्रिजर रुममधील लाईट गेलेली होती. संबंधित कर्मचार्याने कुठलीही शहानिशा न करता दुसरा मृतदेह नातेवाईकांना दिला त्यामुळे हा गोंधळ उडाला. रुग्णालयीन कर्मचार्याच्या अनागोंदी कारभारामुळे मयताच्या कुटुंबियाने मन:स्ताप सहन करावा लागला.
No comments:
Post a Comment