मुंबई - मागील महिन्याभरापासून भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकिय वर्तुळात सुरु आहे. परंतु ती चर्चा आता खरी ठरताना दिसत आहे. कारण खडसे लवकरच भाजपला रामराम ठोकून राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. याबाबत अधिकृत माहिती सूत्रांद्वारे मिळत आहे.
तसेच एकनाथ खडसे यांच्या पाठोपाठ उत्तर महाराष्ट्रातील आजी-माजी आमदार आणि कार्यकर्ते राष्ट्रवादीत येणार असल्याची माहिती आहे. येत्या 17 तारखेला घटस्थापनेच्या मुहूर्तावर खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. एका वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, खडसे यांच्या मुक्ताईनगरमध्ये राष्ट्रवादीत प्रवेश कधी घ्यायचा यावर बैठक झाली. यात 17 ऑक्टोबर तारिख ठरल्याचे बोलले जात आहे.
भाजपवर नाराज असलेल्या खडसेंनी काही दिवसांपूर्वी अचानक मुंबई दौरा केला होता. त्यावेळी राष्ट्रवादीचे सर्वोसर्वा शरद पवार मुंबईत होते. दोघांची भेट होईल अशी शक्यता होती मात्र खडसे भेट न घेताच मुक्ताईनगरला परतले. या दरम्यान माजी आमदार उदयसिंग पाडवी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्य प्रवेश केल्यानंतर गौप्यस्फोट केला होता. 'आमचे मार्गदर्शक आणि ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या आदेशानेच मी राष्ट्रवादीच प्रवेश केला.' पाडवी असे म्हणताच सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्कात आहेत. ते बरेच दिवस मुंबईत ठाण मांडून बसले होते. दरम्यान, भाजपच्या गोटातून सध्या एकनाथ खडसे यांची समजूत काढण्याचे प्रयत्नही सुरु आहेत.
खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यास त्यांच्यावर मोठी जबाबदारी पक्ष संघटनेच्या वतीने सोपवली जाणार आहे. त्यांना राज्यपाल नियुक्त विधान परिषदेवरघेतले जाण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

No comments:
Post a Comment