औरंगाबाद येथील 'मराठवाडा विद्यापीठा'ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्यावे ही 'सरकारी मागणी' या आंदोलनाची होती.
१४ जानेवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हा नामांतर दिवस असला तर या नामांतराच्या दिवसाची वाट पाहण्यासाठी आंबेडकरवादी जनतेला १७ वर्ष संघर्ष करावा लागला.
नामांतर आंदोलन हे १९७६ ते इ.स. १९९४ या दरम्यान महाराष्ट्रात घडलेले दलित बौद्ध चळवळीचे आंदोलन होते
बाबासाहेबांचेच नाव का ?
१९५० ला औरंगाबाद येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मिलिंद महाविद्यालयाची स्थापना केली.
मिलिंद महाविद्यालयाच्या पायाभरणी प्रसंगी श्री गोविंदभाई श्रॉफ आणि माणिकचंद पहाडिया यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ बाबासाहेबांच्या भेटीला आले होते. बाबासाहेबांशी बोलताना त्या शिष्टमंडळाने “आपण हे जे महाविद्यालय सुरु करीत आहात ते या ठिकाणी चालेल का?” असा प्रश्न केला. त्यावेळी बाबासाहेब उद्गारले येथे फक्त एक महाविद्यालय उभारून चालणार नाही तर येथे एक विद्यापीठही उभारले जावे अशी माझी तीव्र इच्छा आहे आणि बाबासाहेबांच्या प्रयत्नाचे फलित म्हणून १९५८ साली मराठवाडा विद्यापीठाची स्थापना झाली. या विद्यापीठाला नाव काय द्यावे हा प्रश्न समोर आला. तेव्हा महाराष्ट्र सरकारने नाव निश्चित करण्यासाठी एक समिती गठीत केली. शासननियुक्त समितीने विचारार्थ घेतलेल्या व गाभिर्याने चर्चा केलेल्या नावांमध्ये मराठवाडा, औरंगाबाद, पैठण, प्रतिष्ठान, दौलताबाद, देवगिरी, अजिंठा, शालिवाहन, सातवाहन, अशी सर्व स्थळ व भूमी-राज्यावाचक नावे होती.
फक्त दोनच व्यक्तींची नावे सुचविली होती - छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे.
यातील शिवाजी महाराजांच्या नावाने आधीच शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे पुढे १९६० साली स्थापन झाले, त्यांचे उचित विद्यापीठीय स्मारक झाले.
पण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने विद्यापीठीय स्मारक झाले नाही. म्हणून औरंगाबाद विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्याचे राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमताने ठराव २७ जुलै इ.स. १९७८ ला संमत करण्यात आला.
असे झाले ऐतिहासिक आंदोलन
२७ जुलै १९७८ मध्ये विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहात मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेबांचे नाव देण्याचा ठराव पारित झाल्यानंतर प्रतिगाम्यांच्या पोटातील पाण्याने कुटील डाव सोडला. सरकारच्या निर्णयाला जातीचा रंग दिला.
मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेबांचे नाव देण्याचा मुद्दा उपस्तीथ झाला तेव्हा, अनंत भालेराव, गोविंदभाई श्रॉफ या अविचारी माणसांनी विरोध केला, त्यांच्या या विरोधामुळे महाराष्ट्रातील तमाम आंबेडकरी जनता पेटून उठली व नामांतराची मागणी जोर धरू लागली.डोक्याला निळे कफन बांधून ४ ऑगष्ट रोजी दीक्षाभूमीची माती माथ्यावर लावली.
दलित मुक्ती सेनेचे सरसेनापती आणि लॉंगमार्च प्रणेते प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी दलित बहुजन समाजाची फौज जमा करून नागपूर ते औरंगाबाद असा लॉंगमार्च आयोजित करून "जिंकू किंवा मरू ", जळतील नाहीतर जाळून टाकतील " अशी आक्रमक भूमिका घेतली. लॉंगमार्च मधील निष्पाप लोकांवर इंग्रजानाही लाजवेल अशा क्रूरपणे लाठीहल्ले केले.
नांदेडमध्ये दलित पँथरच्या गौतम वाघमारे या कार्यकर्त्याने सरकार नामांतर करत नाही म्हणून स्व:ताला भरचौकात जाळून घेतले. अखेरच्या श्वासापर्यंत एकाच नारा होता, "नामांतर झालेच पाहिजे" बाबासाहेबांच्या नावासाठी त्याने आपल्या प्राणाचे बलिदान केले.
परभणी जिल्हातही पोचिराम कांबळे यांचे हात-पाय तोडण्यात आले. त्यांनाही जातीयवादी सैतानांनी जर्जर करून ठार मारले. कित्येक दलितांची घरे जाळण्यात आली, दलित वस्त्या उध्वस्त केल्या.
जनार्धन मवाडे, संगीता बनसोडे, प्रतिभा तायडे, अविनाश डोंगरे, चंदन कांबळे, दिलीप रामटेके, रोशन बोरकर असे कितीतरी दलित क्रांतिवीर नामांतराच्या लढ्यात शहीद झाले.
फक्त बाबासाहेबांच्या नावासाठी दलित बांधवांनी अनेक अन्याय - अत्याचार, जुलूम सहन केले. गावोगावी, शहरात आणि खेड्यापाड्यापर्यंत नामांतराच्या आंदोलनाची ठिणगी पडलेली होती.
त्यावेळी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून एकच आवाज होता नामांतर–नामांतर... चारही बाजूने सरकारच्या नाड्या आवळल्या जात होत्या. त्यांच्यासमोर नामांतराशिवाय पर्याय उरला नाही. १७ वर्षाच्या कडव्या संघर्षानंतर शेवटी सरकारला माघार घ्यावी लागली व १४ जानेवारी इ.स. १९९४ रोजी मराठवाडा विद्यापीठाचा ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद’ असा नामविस्तार करण्यात आला.
दरवर्षी अभिवादन करण्यासाठी हजारो नागरिक येतात
१४ जानेवारी १९९४ पासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे प्रवेशद्वार हे आंबेडकरी समाजाचे प्रेरणास्थान बनले आहे.
दरवर्षी १४ जानेवारी यादिवशी आंबेडकरी जनता डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठच्या ‘प्रवेशद्वाराची’ मनोभावे पूजा करते.
जणूकाही साक्षात आपण बाबासाहेबांपुढेच नतमस्तक होत आहोत या श्रद्धेने गेटपुढे नतमस्तक होतात.
नाममात्र शुल्कात उच्च शिक्षण देणारे देशातील हे पहिले विद्यापीठ आहे.
मराठवाडा, विदर्भ, खान्देश, भागातील शेतकरी, शेतमजूर, दलित, कष्टकरी वर्गातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक भूमी म्हणून विद्यापीठाने नाव लौकिक मिळविला व लाखो विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण देऊन त्यांच्या आयुष्याला आकार दिला.
बालाजी जगतकर - 9960174597
No comments:
Post a Comment